अमेरिकन स्प्रिंग

अमेरिकन स्प्रिंग

अमेरिकन स्प्रिंग

अमेरिकेतला असंतोष थंड व्हायला तयार नाही.

अमेरिकेतल्या  ७३ टक्के गोऱ्या  नागरीकांना अमेरिकेत वर्णद्वेष आहे हे मान्य आहे. सॉल्ट लेक सिटी मधे काळे फक्त दोन टक्के आहेत, तरीही तिथं गोरी माणसं सतत निदर्शनं करून ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीला पाठिंबा देत आहेत.

१९६६-६८ साली कर्नर कमीशननं म्हटलं होतं “आपला देश दुभंगतोय,दोन विभक्त समाज निर्माण होऊ घातलेत,  एक काळा एक गोरा, असमान आणि विभक्त. ”  निक्सन यांच्या काळात सुरु झालेली ही प्रक्रिया ट्रंप यांच्या काळात जवळपास पूर्णत्वाला गेली.

 अमेरिकेत १७ टक्के माणसं लॅटिनो आहेत. (काळे १३ टक्के आहेत). तेही काळ्यांच्या बरोबरीनं रस्त्यावर उतरले आहेत कारण त्यांची अवस्था काळ्यांच्या एकाद दोन पायऱ्या कमी इतकी वाईट आहे. शिक्षण, नोकऱ्या यात ते मागं पडलेत. अमेरिकेतली कमी प्रतीची मानली जाणारी हलकी कामं त्यांना करावी लागतात आणि गोरे अमेरिकन त्यांच्याकडं तिरस्कारानं पहातात. ट्रंप यांचे अनुयायी तर म्हणतात की लॅटिनो हा रोग आहे, ते बलात्कारी आहेत, ते व्यसनी आहेत, ते दहशतवादी आहेत. त्यांच्यातली नोंदी नसलेली माणसं निवडून हाकलायचा प्रयत्न ट्रंप करत आहेत. आमचे रोजगार लॅटिनो चोरतात असं गोऱ्या अमेरिकन कामगारांना वाटतं.

मूळ भारतीय आणि त्यांची अमेरिकेत जन्मलेली मुलं मिळून आज अमेरिकेत सुमारे ३० लाख भारतीय अमेरिकन आहेत, अमेरिकेच्या लोकसंख्येच्या सुमारे एक टक्का. भारतीयांच्या प्रजावाढीचं प्रमाण ६८ टक्के आहे. अमेरिकन गोऱ्यांच्या तुलनेत हे काळेच म्हणायचे. गोरे अमेरिकन लोक त्यांना परकेच मानतात. भारतीय माणसं खूप शिकतात, डॉक्टर-वकील-तंत्रज्ञानी  इत्यादी होतात आणि समाजातल्या वरच्या थरात जातात. गोऱ्या अमेरिकन लोकांना वाटतं की भरपूर पैसा देणारे रोजगार भारतीय लोकं त्यांच्यापासून हिरावून घेत आहेत. काळ्यांवर होतो तितका धडधडीत आणि क्रूर अन्याय भारतीयांवर होत नाही, पण भारतीय माणसांना तिरस्काराच्या नजरा चुकवाव्या लागतात. साड्या, कुंकू, पंजाबी ड्रेसकडं पाहून कुत्सीत उद्गार काढले जातात ही गोष्ट लपून राहिलेली नाही. वंशद्वेषाच्या तुलनेत वेशद्वेष हा कमी घातक असतो हे खरं असलं तरी तो आहे आणि तो क्लेषकारक असतो हेही तितकंच खरं आहे.

चिनी, जपानी, कोरियन, इंडोनेशियन माणसं वेगळी दिसतात. ती आपापल्या वस्त्यांत स्वतःला सावरून असतात कारण गोऱ्या वस्तींमधे ती माणसं नकोशी असतात.

तसं म्हटलं तर गोरे अमेरिकन कोण आहेत?  ते ब्रिटीश, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आहेत, बाहेरून येऊन त्यांनी अमेरिका वसवलीय.  स्थानिक इंडियन सोडले तर कोणीही स्थानिक नाही, सगळे बाहेरूनच आले आहेत. कोण परवा, कोण काल आणि कोण आज येवढाच फरक  आहे. युरोपीय इथे आले, इथल्या संस्था त्यांनी उभारल्या आणि श्रमाची कामं करण्यासाठी आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून आणलं. काळी माणसं कमी प्रतीची आहेत म्हणूनच ती गुलाम व्हायच्या लायकीची आहेत अशी समजूत गोऱ्यांनी स्वतःच्या मनाला फसवण्यासाठी करून घेतली. ती समजूत अजूनही गेली नाही ही मोठी अडचण आहे.

तसं पाहिलं तर आता कडकडीत गोरे ख्रिस्ती अमेरिकन ५५ टक्क्यांच्या आसपास असतील. उरलेली ४५ टक्के प्रजा वेगळ्या वंशाची, रंगांची, संस्कृतींची, भाषांची आहे. त्या सर्वाना चेपून ठेवण्यावर अमेरिकन समाज चालतो. हे आता चालणार नाही असं ४५ टक्के प्रजा म्हणू लागलीय.

अमेरिका हा melting pot आहे की salad bowl आहे अशी चर्चा गेली तीस चाळीस वर्षे चाललीय. नाना प्रकारचे समाज अमेरिका या भूगोलात एकत्र आलेत पण ते एकात्म होत नाहीयेत. अमेरिकन राज्यघटनेनं धर्म, वंश, संस्कृती इत्यादी कसोट्या दूर सारून नागरिकांचा एक समाज निर्माण व्हावा यासाठी राज्यघटना तयार केली, सर्वाना जगण्याचा आणि विकास करण्याचा समान अधिकार दिला. पण ती इच्छा बहुतांशी भावना राहिली, गोरे ख्रिस्ती लोकं वगळता इतर सगळी माणसं सवतीची मुलं आहेत असं मानून वागवली गेली.

 राष्ट्र नावाची कल्पना सामान्यतः पहिल्या महायुद्धाच्या आसपास आकाराला आली. त्या आधी जगभर बहुविधतेनं नटलेली साम्राज्यं होती. पहिल्या महायुद्धानंतर साम्राज्य मोडली, संस्कृती आणि समान सवयींच्या आधारे देश तयार झाले.अमेरिका हे वेगळंच प्रकरण होतं. पहिल्या महायुद्धाआधीपासून कित्येक वर्षं अमेरिका हा बहुविधांचाच देश होता. बहुविधतेशी जुळवून घेण्याचं नवं आव्हान जगातल्या इतर देशांपुढं होतं, अमेरिका त्या आव्हानाशी दोनशे वर्षं आधीपासून झगडत होता. 

दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची घडण बदलली. व्यापार वाढला, देशांच्या भौगोलीक सीमा तेवढ्या टिकल्या पण माणसं फार इकडून तिकडं जाऊ लागली. तंत्रज्ञानातल्या बदलानंतर तर ही प्रक्रिया  इतकी गतीमान झाली की नायजेरिया, केनया इत्यादी  शंभर टक्के काळ्या देशात चिनी माणसांनी दुकानं, उद्योग, वस्त्या थाटल्या. गोव्याच्या किनाऱ्यांवर राहणाऱ्या रशियनांना वाटतं की ते भारतात नसून रशियातच आहेत, तिथल्यासारखीच दादागिरी करत ते वावरतात, स्थानिक गोवेकराना ते नकोसे झालेत. 

लाखो माणसं, अनेक कारणांसाठी आपला देश, आपलं गाव सोडून दूरवर अगदी वेगळ्या ठिकाणी वसू लागलीत. सीरियन जर्मनीत वसताहेत. चिनी नायरेरियात वसत आहेत.रोहिंग्ये भारतात वसत आहेत. 

अमेरिकेत काय किंवा भारतात काय किवा जर्मनीत काय, प्रमाणात अल्प पण संख्येनं खूप असे अनेक समाज गट नांदत आहेत. नांदत आहेत म्हणजे नांदण्याचा प्रयत्न करत आहेत, एकत्र नांदण्याचं तंत्र त्याना अजून अवगत झालेलं नाही. आधीपासून असलेले नंतर आलेल्यांना हाकलून लावण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतातच पहा ना. दोन हजार वर्षांपूर्वी आलेले, पंधराशे वर्षांपासून आलेले, हजार वर्षांपूर्वी आलेले, पाचशे वर्षांपूर्वी आलेले असे लोक आपसात भांडत आहेत. खरं म्हणजे झुरळंच सर्वांच्या आधी इथं पोचलीत, त्यामुळं झुरळं वगळता बाकीच्या सर्वांनी ही भूमी सोडून निघून जायला हवं. 

अनेक अल्पसंख्यांकांचा मिळून तयार झालेला देश असं एक जगाचं स्वरूप आकारताना दिसत आहे. भारतात धर्म, जात, भाषा, प्रदेश, पंथ हे अगदी स्वतंत्र देश होऊ शकतात इतके स्वतंत्र घटक आहेत. या घटकांच्या अस्मिता काय करू शकतात हे गेल्या दशकात भारत अनुभवतो आहे. धर्म, जात, भाषा, प्रदेश या कसोटीवरून माणसांना मारलं जातं, आपल्या वस्तीत रहायला जागा नाकारली जाते. 

एकत्र जगण्याची समस्या अमेरिकेत धगधगते आहे. अमेरिकेपाठोपाठ ती जर्मनी, फ्रान्स, युके इत्यादी देशांतही पेटणार आहे. सीरिया, इराक या देशात तर ते देश इस्लामी असूनही पंथ, भाषा, प्रादेशीक वैशिष्ट्यं या मुद्द्यावर तिथं देशाचे तुकडे होत आहेत.

तातडीनं, निकडीनं एकात्मता या प्रश्नाची उकल करण्याची आवश्यकता अमेरिकेतल्या आंदोलनानं दर्शवली आहे.

२०११ साली जगण्याची आणि स्वातंत्र्याची मागणी करत अरब प्रदेशातल्या तरूणांनी आंदोलन केलं. त्या अरब स्प्रिंगनं काही देशातल्या सत्ता उलथवल्या. २०२० सालातली अमेरिकेली घडामोड ही अमेरिकन स्प्रिंग आहे. 

अमेरिकन स्प्रिंग सत्ता उलथवत नाहीये. सत्ता आणि नागरीक यातलं समीकरण तपासून पहाण्याची मागणी अमेरिकन स्प्रिंग करतेय. सर्वाना आपलंसं वाटेल असं वातावरण आणि संस्थात्मक बदल करावेत अशी मागणी अमेरिकन स्प्रिंग करतेय.

।।

ओआरएफवर पूर्वप्रकाशित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *