गुलाबो सिताबो, खूब मजा आया.

गुलाबो सिताबो, खूब मजा आया.

  गुलाबो सिताबो या चित्रपटाला मी दहात सात गुण देईन. तो चित्रपट चारही बाजूंनी पहायला मजा येते. त्यातली पात्रं, त्यातलं संगित, चित्रीकरण, संवाद अशा साऱ्याच गोष्टी छान आहेत.

गुलाबो सिताबोत लखनऊ शहराचा काहीसा अंदाज येतो. कॅमेरा शहरात फिरला असता, लखनऊची खाऊ गल्ली, लखनऊचे कबाब दाखवले असते तर आणखीनच मजा आली असती आणि ती दृश्यं दाखवण्यासाठी आवश्यक स्पेस या चित्रपटात जरूर आहे. पण फातिमा महल ही हवेली पाहूनही लखनऊची मजा कळते. 

हवेलीत नाना आकाराच्या किती तरी खोल्या. खोल्यांची मांडणी आधुनिक इमारतींसारखी एका ओळीत नाही. खोल्या शोधाव्या लागतात.  खोल्या अंधाऱ्या आणि प्रकाशमान. ऊंच छत. झुंबर. मालक मालकिणीपासून नाना प्रकारच्या नोकरांसाठी नाना खोल्या. प्रत्येक खोलीचा आकार आणि रचना वेगळी.कबड्डी खेळता येईल इतका मोठा व्हरांडा. धिप्पाड खांब. मधो मध चौक. दिंडी दरवाजा. 

हवेली हे एक छोटंसं गावंच असतं. त्यात अनेक कुटुंबं रहातात. ती एकमेकावर अवलंबून, एकमेकावर लक्ष ठेवून.

शंभर वर्षापूर्वी या हवेलीत रहाणारी कुटुंबं,कदाचित, मालकीण बेगमच्याच घरात अनेक कामं करणारी असतील. काळाच्या ओघात बेगम म्हातारी झालीय, तिची आणि हवेलीची रया गेलीय. दालनांचं रुपांतर लहान लहान खोल्यात झालंय आणि बाहेरची कुटुंबं तिथं भाड्यानं रहायला आलीयत.

  हवेलीच्या शंभर वर्ष जुन्या खुणा.  टवके पडलेले पिलरखांब. चौकात कित्येक वर्षं पाण्याचा स्पर्श न झालेलं कारंजं.

हवेलीच्या बाहेर पडलं की दिसतात आधुनिक इमारती, रेलवेचा आधुनिक कुरूप पूल. 

दिवसाच्या नाना प्रहरात फातिमा महल पहाणं रम्य आहे. प्रत्येक प्रहरातल्या प्रकाशछटा रम्य आहेत. सत्यजीत रे यांच्या जलसा घर या  चित्रपटाची आठवण होते. रे लयाला जात असलेल्या काळाच्या खुणा दाखवत  समकालीन समाजाचं चित्रण करतात. वर्तमानातली माणसं आणि इतिहासातल्या वास्तू.

बहुतांशी एका इमारतीभोवती सिनेमा फिरतो.

ऐंशी वर्षाचा  शरीरानं वाकलेला पण मिजासीनं ताठ माणूस आणि एक तरूण अशा दोघांमधली जुगलबंदी सिनेमात आहे. मिर्झा हा माणूस नबाब, पण अगदीच फटीचर. बांके हा तरूणही तितकाच गरीब. बांके एक पिठाची गिरण चालवून चार माणसांचं कुटुंबं चालवतो. दोघेही अगदी दोन दोन रुपयांसाठी मोत्ताद. दोघंही पैशासाठी एकमेकाच्या जिवावर उठलेले. नबाब बांकेचे बल्ब चोरतो, त्याची चादर पळवतो, त्याच्या गिरणीत जाऊन पिठाची मोटली पळवतो. बांकेला संडासला जाता येऊ नये म्हणून संडासाला कुलुप लावून ठेवतो. एकदा नबाबानं बांकेची चादर पळवलेली असते, बांके ती चादर नबाबाकडून ओढून घेतो तेव्हां नबाब म्हणतो जा घेऊन ती चादर मी तिच्यात खूप पादलोय.

दोन माणसांमधला संघर्ष ही तशी अगदीच चिमूटभर कथा असताना ती दोनेक तास रंगवायची तर पटकथाकाराला फारच कष्टकौशल्य वापरावं लागतं. बारीक बारीक प्रसंगांची वीण कल्पावी लागते. ते जमलंय. एकदा ही मारामारी आहे हे कळल्यानंतर खरं म्हणजे काहीसा कंटाळा येतो. मारामारीचे कितीसे तपशील सांगणार. पण खटकेबाज संवादानं रंगत येते, कंटाळा विसरायला होतं. हवेली विकणं, हवेली ऐतिहासिक ठरवणं असे फाटे चारही बाजूंनी फोडल्यामुळं चित्रपट बऱ्यापैकी पुढं सरकतो. 

अमिताभ बच्चन (नबाब ),आयुष्मान खुराणा (बांके), फार्रुख जाफर (बेगम) ही चित्रपटातली मुख्य पात्रं. ती तर ठीकच. पण सुजीत सरकार यांच्या चित्रपटांतली एक मजा म्हणजे मुख्य नसलेली लहान पात्रं प्रेक्षकाला खिळवतात. त्यांच्या ऑक्टोबर या चित्रपटात अगदी वीस ते तीस सेकंद दिसणारी किती तरी पात्रं आहेत जी मुख्य पात्रांपेक्षा अधीक लक्षात रहातात. या चित्रपटात पुरातत्व विभागातला ग्यानेश शुक्ला विजय राज नावाच्या नटानं रंगवलाय आणि ख्रिस्तोफर हे एक  वकिलाचं पात्र ब्रिजेंद्र काला या नटानं रंगवलंय. आणि श्रुष्टी श्रीवास्तव. श्रुष्टीनं गुड्डो हे पात्रं चितारलाय. ज्याला स्ट्रीट स्मार्ट असं म्हणतात अशी जगण्यासाठी काहीही करू शकणारी, कोणालाही अंगावर घेणारी (शब्दशः) गुड्डो दीर्घ काळ लक्षात रहाणारी आहे. 

अशा भूमिकांची कल्पना करणं, पटकथेत त्या भूमिका गुंफणं आणि त्या भूमिकांसाठी कलाकार निवडणं हे फारच कौशल्याचं काम. सुजीत सरकार ते काम शिताफीनं पार पाडतात हे त्यांच्या पिकू, विकी डोनर या गाजलेल्या चित्रपटात दिसतं. विकी डोनरमधे दोन म्हाताऱ्या मस्तपैकी दारू पिऊन कुचाळक्या करताना पहाणं हा हिलॅरियस अनुभव होता.

साऊंड डिझाईन चांगलं आहे, गाणी चांगली आहेत आणि जागोजागी वापरलेले ध्वनीचे तुकडेही चांगले आहेत.

हे सारं सत्तर मार्कांचं झालं. उरलेले तीस मार्क कां देता येत नाहीत?

चित्रपटातली गाणी आणि विपुलतेनं वापरलेले ध्वनीचे तुकडे प्रेक्षकाला विनोद, फार्सकडं घेऊन जातात. चित्रपटाच्या कथेवर हा एक तुकडा, लेयर टाकलेला आहे, तो अनावश्यक आहे. चित्रपट गंभीर आहे, विनोदी नाही. नबाबाचा कंजुषपणा, विक्षिप्तपणा, त्रास देण्याची प्रवृत्ती, बांके व इतर कुटुंबांची गरीबी आणि जगण्याची धडपड, कुटुंबाला जगवण्यासाठी गुड्डो ही सुशिक्षीत तरूणी शरीर वापरू देते या गोष्टी विनोदी या सदरात मोडणाऱ्या निश्चितच नाहीत. मिर्झाचा विक्षिप्तपणा प्रसंगी विनोदी वाटत असला तरी तो भीषण परिस्थितीतून उद्भवलेला आहे. त्यामुळं विनोदी ध्वनी चित्रपटाला भलतीकडंच घेऊन जातात.

(घाशीराम कोतवालमधे नाना हे एक गंभीर क्रूर गुंतागुंतीचं पात्र आहे. पण ते विनोदी भासतं. ते बरोबर नाही.)

प्रत्येक गोष्टीला स्वतःचा असा एक बाज असतो. तो बाज तसा मांडणं आणि तो बाज प्रेक्षणीय करण्यासाठी खटपट करणं ही दिग्दर्शनाची एक पद्धत आहे. पण हा बाज लक्षात न घेता त्यावर काही थर वरून पसरणं (फोटोशॉप) ही दिग्दर्शनाची आणखी एक पद्धत आहे. अशा रीतीनं वरून थर, लेयर्स टाकणं म्हणजे शैली, स्टायलायझेशन.स्टायलायझेशन करून चित्रपट मांडणं ही कमअस्सल गोष्ट आहे,भले ती सामान्य प्रेक्षकाला आवडो.

स्टायलाझेशनचा मुद्दा अमिताभ बच्चन यांच्या अभिनयातही दिसतो. बच्चन यांना दिलेला मेकअप, त्यांचं मोठं नाक, त्यांचं वाकणं, त्यांचं तोलून मापून बोलणं हा प्रकार स्टायलायझेशनचा झाला. रया गेलेला, कंजुष, नावापुरताच नबाब असलेला एक पुरुष असतो, त्यात अमिताभनी जाऊन बसायला हवं. इतकं की मग अमिताभना पहातोय हे जाणवत असूनही आपल्याला मिर्झा दिसायला हवा. तसं होत नाही.

नवाजुद्दीननं किंवा इर्रफान खाननं केलेल्या भूमिका पहा. हे दोघंही व्यक्तिशः जसे आहेत तसेच प्रत्येक भूमिकेत दिसतात पण तरीही प्रत्येक ठिकाणी त्या त्या भूमिकेत फिट होतात. 

अमिताभ बच्चन हा काही सामान्य नट नाही. आवाज, अभिनय, शब्दफेक यातल्या सर्व शक्यता साकारण्याची शक्ती त्यांच्यामधे आहे. पण त्या शक्यता त्यांच्याकडून वठवून घेणं, त्यांना त्या पात्रात जायला लावणं, ती पात्रं त्यांच्यामधून दिसतील असा अभिनय त्यांच्याकडून करून घेणं ही दिद्गर्शकाची जबाबदारी असते. सुजीत सरकारना ते  ब्रिजेंद्र काला, विजय राज, श्रुती श्रीवास्तव यांच्या बाबतीत जमलं. 

 ते काहीही असो. थोSSSडासा रेंगाळल्यासारखा वाटला तरी दोन तास चित्रपट आनंद देतो यात शंकाच नाही.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *