अमेरिकला दंगा, राज्यघटना,वाईन योगा, गोल्डा मेयर.

अमेरिकला दंगा, राज्यघटना,वाईन योगा, गोल्डा मेयर.

फेरफटका २

ट्रंप यांची लोकशाहीची नवी व्याख्या.

निवडणुकीतला पराजय जिव्हारी झोंबलेल्या डोनल्ड ट्रंप यांनी गुंडांना चिथावलं आणि संसदेवर पाठवलं. काँग्रेस आणि सेनेट या दोन सभागृहांची नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या निवडीवर मोहोर उमटवण्याची बैठक चालली होती. ट्रंप यांच्या गुंडांनी सभागृहावर हल्ला केला, मोडतोड केली, सभापतींच्या दालनात धुडगूस घातला. रक्षकांशी झालेल्या झटापटीत चार माणसं मेली.

या घटनेच्या आधी तीन दिवस ट्रंपनी  जॉर्जियाच्या गव्हर्नला फोन करून सांगितलं ज्या ११ हजार ७ शे मतांनी मी हरलो ती मतं मला परत द्या, जॉर्जियातली मतं रद्द करा, नाही तर मी तुम्हाला बघून घेऊन.

तीच धमकी त्यांनी उपाध्यक्ष माईक पेन्सना दिली आणि बऱ्या बोलानं निवडणूक रद्द करून मला निवडून दिल्याचं जाहीर करा असं सांगितलं.

लोकसभेची बैठक सुरु होण्याआधी गुंडांना गोळा करून त्यांच्यासमोर ट्रंप आणि त्यांच्या मुलानं भाषण केलं. ट्रंप यांच्या मुलानं जमलेल्या लोकाना सांगितलं की रीपब्लिकन पक्षाचे जे खासदार आपल्या बाजूनं मतदान करणार नाहीत त्यांचा ठीक समाचार घ्या.

ट्रंप धमक्यांचे ट्वीट करत असल्यानं त्यांचा ट्वीटर अकाउंट बंद करावा लागला होता.

हे उद्योग करूनही लोकसभेनं बायडन यांची निवडणुक कायदेशीर ठरवली. त्यावर ट्रंप म्हणाले की ठीक आहे. पुढले चार वर्षं आम्ही बघून घेऊ.

सामान्यतः निवडणुकीत हरल्यावर माणसं नाराज होतात, धुसफूस करतात, निवडणुक पद्धतीला दोष देतात, प्रतिस्पर्ध्यानी भ्रष्टाचार केलाय असं काही दिवस म्हणतात. सामान्यतः मामला इथंच थांबतो.

अमेरिकेत जे घडलं ते अभूतपूर्व आहे.

ज्या रीपब्लिकन खासदारांनी, गव्हर्नरांनी, मंत्र्यांनी ट्रंप यांचं ऐकायला नकार दिला त्यांना ठार मारण्याच्या धमक्या सुरु झाल्या. धमक्या मिळालेल्या स्त्री खासदारांना विशेष संरक्षणाची मागणी करावी लागली.

” मला निवडून देणं म्हणजेच लोकशाही. निवडून आल्यावर मी वाट्टेल तसं वागेन, संसदेनं आणि न्यायालयानं मलाच पाठिंबा पाहिजे. यालाच मी लोकशाही म्हणतो.”

डोनल्ड ट्रंप लोकशाहीची नवी व्याख्या करू पहात आहेत

।।

राज्यघटनेवरचं पुस्तक.

एका ताज्या पुस्तकाबद्दल.

पुस्तकाचं नाव आहे Revolutionary Constitutions: Charismatic Leadership and the Rule of Law . पुस्तकाचे लेखक आहेत Bruce Ackerman. अकरमन येल युनिव्हर्सिटीत राज्यघटना हा विषय शिकवतात, अमेरिकन राज्यघटनेवरची त्याची वुई द पीपल की तीन पुस्तकांची मालिका जगभर मान्यता पावली आहे. प्रस्तुत पुस्तकही त्यांच्या राज्यघटनेवरील मालिकेतला एक भाग आहे.

राज्यघटनेचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा चळवळ, दुसरा प्रत्यक्ष राज्यघटना निर्मिती प्रक्रिया, तिसरा टप्पा राज्यघटना कशा प्रकारे अमलात येते आणि चौथा टप्पा एकविसाव्या शतकात राज्यघटना आणि राज्यघटनेच्या तत्वांची आजजी स्थिती. अमेरिका, द. आफ्रिका, भारत, इस्रायल, इराण, पोलंड, फ्रान्स इत्यादी देशांच्या राज्यघटनेचे वरील चारही टप्पे लेखकानं तपासले आहेत.

अमेरिका (जॉर्ज वॉशिंग्टन), द.आफ्रिका (मंडेला), भारत (नेहरू), इस्रायल (बेन गुरियन), इराण(खामेनाई), पोलंड (लेक वालेन्सा) या करिष्मा असणाऱ्या माणसांचा राज्यघटना निर्मितीवर कसा प्रभाव पडला याचा चित्रदर्शी अभ्यास अकरमननी मांडला आहे.

वरील नेत्यांचा जनमानसावर फार प्रभाव होता. वरील माणसं दीर्घ चळवळीचा प्रॉडक्ट होती. त्यांनी त्या त्या देशाचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून ते प्रश्न सुटावेत अशा रीतीनं राज्यघटनेत तरतुदी केल्या, आपल्या व्यक्तिगत विचार किवा व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्यांनी राज्यघटनेत उमटू दिलं नाही असा एक वेधक मुद्दा लेखकानं पुस्तकात मांडला आहे.

या निमित्तानं देश, तिथल्या स्वातंत्र्य चळवळी, घटना निर्मिती आणि ते घडवून आणणारे करिष्मा असणारे नेते यांचा एक धावता अभ्यास घडतो.

पुस्तक हारवर्ड युनिवर्सिटीनं प्रसिद्ध केलंय, पुस्तक ४५७ पानांचं आहे, किंडलवरही उपलब्ध आहे.

।।

वाईन योगा

अमेरिकेत आता लोकांना योग साधना शिकवतांना वाईनचं महत्व आणि उपयोगही शिकवले जातात.

म्हणजे असं की vino vinyasa yoga नावाच्या लॉस एंजेलिस मधल्या स्टुडियोत माणसं गोळा होतात. त्यांना योगशिक्षक ४५ मिनिटं योग साधना शिकवतात, विविध योगासनं शिकवतात. योगसाधना आटोपली की त्यांना शेजारच्या दालनात वाईन टेस्टिंगसाठी नेलं जातं. तिथं विविध वाईन असतात, त्यांची चव, त्यांचा गंध, त्यांचं जिभेवर रेंगाळणं, वाईनची माता असलेलं द्राक्ष, द्राक्षाना जन्म देणारा मळा इत्यादींची सविस्तर माहिती व ज्ञान योगसाधकाना दिलं जातं.

युरोपामधे अशा एका स्टुडियोमधे वाईनचे ग्लासेस हातात घेऊन, ते सांभाळत विविध आसनं शिकवली जातात, ग्लासातली वाईन हिंदकळता कामा नये, सांडता कामा नये,वाईन ही महाग व पवित्र गोष्ट वाया जाता कामा नये याचं भान त्यांना दिलं जातं.

वाः

तुमचा कल्पनेचा वारू मोकाट सोडा आणि काय काय शक्यता आहेत याचा अनुभव घ्या.

।।

घरकामं स्वतःच करणारी पंतप्रधान-गोल्डा मेयर

ओरियाना फलाची या इटालियन पत्रकार महिलेला इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांनी मुलाखतीची वेळ दिली होती. सकाळी १० वाजताची.

 फलाचीनी निघण्यापूर्वी फोन केला आणि मेयर तयार आहेत ना याची चौकशी केली.

मेयर यांचं वय होतं ७४. त्या दमल्या होत्या, त्यांची प्रकृती ठीक नव्हती. फलाची म्हणाल्या की मुलाखत पुढं ढकलूया, तुम्ही बऱ्या व्हा आणि नंतर आपण भेटू.

मेयर म्हणाल्या – नाही. तुम्ही इतक्या दूरवरून माझी मुलाखत घ्यायला आला आहात. या. 

फलाची मेयर यांच्या बंगल्यावर पोचल्या. बंगल्याच्या बाहेर एकच सुरक्षा रक्षक. बाकी कोणीही नाही. स्वयंपाकी नाही, माळी नाही, इतर नोकर नाहीत. सगळी कामं स्वतः मेयर करत. मेयर यांच्या घरी काम करायला दिवसा एक मुलगी यायची. ती झाडू पोछा, करायची बेड तयार करायची. बाकी नोकर बिकर कोणी नाही. त्या मुलीवर कामाचा बोजा पडू नये म्हणून घरातली बरीच कामं स्वतः मेयर करत असत.

मुलाखतीच्या आदल्या रात्री मंत्रीमंडळाची आणि लष्करी अधिकाऱ्यांची बैठक मेयर यांच्या घरी होती. घरात स्वयंपाकी नसल्यानं मेयरनी स्वतःच स्वयंपाक केला होता. रात्री दोन वाजेपर्यंत बैठक झाली. सगळे निघून गेल्यावर मेयरनी ग्लासं धुतली, अशट्रे साफ केले, भांडी घासून जागेवर ठेवली. दुसऱ्या दिवशी येणाऱ्या मुलीवर बोजा पडू नये म्हणून.

सर्व आवराआवर करून मेयर पहाटे साडेतीनला झोपल्या. सात वाजता उठल्या. पेपर वाचन, अधिकाऱ्यांची बैठक इत्यादी आटोपल्यावर त्या थकल्या होत्या. थोड्याशा आजारी झाल्या. तेवढ्यात फलाची आल्याच.

मेयरनी फलाचीची क्षमा मागितली. म्हणाल्या मला काही मिनिटं  विश्रांतीची जरूर आहे, तेवढा वेळ द्या.

मेयर ऑफिसातल्या कोचावर अर्धातास पडून राहिल्या.

त्या फ्रेश दिसत नव्हत्या, निस्तेजच दिसत होत्या. 

तरीही फलाचींसमोर येऊन बसल्या.

पुढं दोन तास मुलाखत झाली.

।। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *