कोरोना, स्टेटलेस, दंतकथा.

कोरोना, स्टेटलेस, दंतकथा.

चला जगात एक फेरफटका मारूया.

कोरोनाचा सर्वात भीषण फटका अमेरिकेला बसलाय. सध्या तिथं सुमारे २० लाख माणसांना कोरोनाची बाधा झालीय, सव्वा लाख पेशंट्स हॉस्पिटलात दाखल आहेत, आता अधीक पेशंट घेण्याची क्षमता आरोग्य व्यवस्थेत राहिलेली नाही. सुमारे साडेतीन लाख माणसं मेलीत, दररोज साडेतीन हजार माणसं मरत आहेत. घरातला मिळवता माणूस जिवंत नाही, उद्योग वगैरे बंद असल्यानं घरातली मिळवती माणसं बेकार, अशा अवस्थेत सुमारे २ कोटी माणसांना कोणी तरी मदत केली तरच ती घरात राहू शकतील, जगू शकतील.

सरकारी मदत येवढा एकच मार्ग आहे. लोकसभेनं प्रथम तीन लाख कोटी डॉलर मागितले. ट्रंप नाही म्हणाले. मग दोन लाख कोटी मागितले. ट्रंप नाही म्हणाले. मग शेवटी ८०० अब्ज डॉलरवर तडतोड झाली. पण ते पैसे देणाऱ्या आदेशावर प्रेसिडेंटची सही लागते. प्रेसिडेंट ट्रंप गायब, फ्लोरिडात गोल्फ खेळत बसले. नंतर एकाएकी म्हणाले की ८०० अब्ज कसले देताय, १.८ लाख कोटी द्या. त्या पैशाची सोय करायला आणि पैसे लोकांपर्यंत पोचायला सहज दहा पंधरा दिवस लागणार. म्हणजे मरायला टेकलेल्या दोन करोड लोकांना आणखी दोन आठवडे त्रास सहन करावा लागणार.

अमेरिकन राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हा सर्वोच्च अधिकारी असतो. त्याच्या समंतीनंच आर्थिक व्यवहार होता. ट्रंप हे अजून राष्ट्रपती आहेत, २० जानेवरीपर्यंत ते त्या पदावर रहातील आणि त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन पद स्वीकारतील. परंतु २० जानेवारीपर्यंत बायडन काहीही करू शकत नाहीत. ट्रंप यांचा प्रयत्न आहे की काहीही करून राष्ट्रपतीपदाची निवडणूक रद्द करायची. त्यासाठी त्यांनी कोर्टबाजी केली. निवडणुक प्रक्रियेत कोणताही भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे त्यांच्याकडं नसल्यानं कोर्टानं त्यांना धुडकावून लावलं. आता त्यांचा प्रयत्न आहे मार्शल लॉ आणून निवडणूक रद्द करायची. २० जानेवारीपर्यंत ते अडवाअडवी करणार.

अमेरिकेत त्यामुळं मोठ्ठा पेच निर्माण झाला आहे. उद्या ट्रंपनी एकाद्या देशावर हल्ला करा असा आदेश दिला तर काय होईल? खरोखरच लष्करी कायदा जाहीर करून देशातली लोकशाही स्थगीत केली तर काय होईल?

ट्रंप यांचं वागणं पाहिलं तर ट्रंप यांची बुद्धी धडपणानं काम करत नाहीये असं वाटतं. दोनच वर्षांपुर्वी अमेरिकेतल्या मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी ट्रंप हे विकृत मनोवृत्तीचे आहेत, त्यांना राष्ट्रपतीपदावर ठेवणं धोक्याचं आहे असं जाहीर केलं होतं.

राज्यघटनेनं तर राष्ट्रपतीला अनिर्बंध अधिकार देऊन ठेवले आहेत. त्यानं गुन्हा केला तरी त्याच्यावर खटला भरता येत नाही असं अमेरिकन राज्यघटनेत लिहिलेलं आहे.

फारच मोठा अनवस्था प्रसंग अमेरिकेत झाला आहे.

।।

या कोविडमधलीच एक गोष्ट.

कोविडच्या काळात अमेरिकेत उद्योग व्यवसाय बंद पडत असताना एक नवाच व्यवसाय निर्माण झालाय. गोगलगायी वाढवणं आणि विकणं.

खरं नाही ना वाटत?

लॉस एंजेलिसमधली व्हिक्टोरिया कॉर्टेड ही तरूण मुलगी गोगलगायी वाढवते आणि विकते. एका गोगलगायीला ८ डॉलर असा भाव आहे, तिला भरपूर ऑर्डर्स मिळत आहेत.

हा व्यापार सुरु झाला तो नादिया जियोसिया नावाच्या एका महिलेपासून. ही महिलाही लॉस एंजेलिसमधली. ही शेफ होती. कोविडमुळं बेकार झाली. घरीच होती. बाहेर फिरता येत नाही, निसर्गाचा आनंद घेता येत नाही म्हणून तिनं निसर्गच घरात आणायचं ठरवलं. बाहेरची झाडं घरात आणली. 

त्या झाडांबरोबर एक गोगलबायही आली. या गोगलगायीचं काय करायचं तिला कळेना. बाहेर नेऊन सोडलं तर कावळे खातील. म्हणून तिनं त्या गोगलगायीला पाळलं. दररोज गोगलगाय हातावर ठेवून ती गोगलगायीचा अभ्यास करू लागली. गोगलगाय तिची मैत्रीण झाली. तिनं तिचे अनुभव नेटवर टाकले. ते फार लोकांना वाचले. न्यू यॉर्क टाईम्सनं त्यावर बातमी केली.

अमेरिकेत गोगलगाय प्रेम उफाळून आलं. कोणी तरी गोगलगायींसाठी एक हॉस्पिटलही काढलं. रस्त्यावर गोगलगाय दिसली की आणून त्या हॉस्पिटलमधे ठेवायची.

व्हिक्टोरिया कॉर्टेडनं नेटवर हे सगळं प्रकरण पाहिलं.   तिच्या घराच्या आवारात तिला ३ गोगलगायी दिसल्या. तिनं त्या घरात रिकाम्या टँकमधे ठेवल्या. त्यांना चांगलं खायला प्यायला घातलं.  दोनतीन महिन्यात त्या धष्टपुष्ट झाल्या, त्यांची संख्या झाली २००. तिनं नेटवर आपला साठा जाहीर केला. विक्री सुरु झाली. ८ डॉलर देऊन लोकानी गोगलगायी घरेदी केल्या.

ही ऑगस्ट महिन्यातली गोष्ट. आता तिचा व्यवसाय जोरात चाललाय म्हणतात.

।।

हारवर्ड युनिवर्सिटी प्रेसनं एक पुस्तक नुकतंच प्रसिद्ध केलंय. Statelessness: A Modern History असं त्या पुस्तकाचं नाव. मिरा सीजेलबर्ग या त्या पुस्तकाच्या लेखिका आहेत.

जगभरात आज सुमारे १ कोटी लोक देशोदेशी स्टेटलेस अवस्थेत जगत आहेत. स्टेटलेस म्हणजे त्यांना ते जिथं रहातात त्या देशांचं नागरीकत्व नाही. ते ज्या देशातून आलेले असतात त्या देशातला त्यांचा रेकॉर्ड,  कागदपत्रं त्यांच्याकडं नसतात. ज्या देशात रहातात त्या देशाच्या अटी ते पूर्ण करू शकत नाहीत इत्यादी कारणानं ही माणसं त्या देशात जगत असतात पण त्यांना नागरीकत्वाचे अधिकार नसतात. ते सरकारच्या किंवा आंतरराष्ट्रीय परोपकारी संस्थांच्या उपकारावर ते जगत असतात. ते मतदान करू शकत नाहीत, त्यांना कोणतेही अधिकार नसतात, त्यांनी कसं जगायचं हे ते ठरवत नसतात, ते ज्या देशात रहातात त्या देशानं त्यांना निव्वळ पोसायचं असतं.

लेखिकेनं भगतसिंग थिंड यांचं उदाहरण दिलं आहे. थिंड १९१३ साली अमेरिकेत गेले. त्यांनी पहिल्या महायुद्धात अमेरिकन सैनिक म्हणून भाग घेतला. १९१८ साली अमेरिकन नागरीकत्व मागितलं. १९३६ पर्यंत त्याना नागरीकत्व मिळालं. मधल्या काळात ते अमेरिकेत शिकले, डॉक्टरेट केली, विद्यापीठात शिकवलं पण त्याना नागरीकत्व मात्र मिळालं नव्हतं. वीसेक वर्षं ते स्टेटलेस होते.

लेबनॉन, जॉर्डन इत्यादी ठिकाणी आज अशा रीतीनं परावलंही त्रिशंकू जगणाऱ्यांची तिसरी चौथी पिढी आहे.

लेखिका मिरा सिजेलबर्ग यांनी या प्रश्नाचा सखोल अभ्यास या पुस्तकात मांडला आहे, लेखिका केंब्रीज युनिवर्सिटीत इतिहास हा विषय शिकवतात.

Statelessness: A Modern History

by Mira L. Siegelberg

Harvard University Press, 318 pp., $35.00

।।

एक चिनी दंतकथा

इसवी पूर्व एक हजार सालची. चियांग कुळात जन्मलेल्या युआनला मूल हवं होतं. त्यासाठी तिनं बळी विधी केला. नंतर ती सम्राटाच्या पाऊलखुणांवर उभी राहिली आणि गरोदर झाली, तिनं ‘ हाऊ ची ‘ ला जन्म दिला.

‘ हाऊ ची ‘ ला तिनं एका निरुंद गल्लीत सोडून दिलं. कळपातल्या मेंढ्यांनी त्याला वाढवलं. त्याला जंगलात सोडलं. लाकूड तोड्यांनी त्याला वाढवलं. त्याला बर्फाळ जागी सोडण्यात आलं. पक्षांनी त्याला आपल्या पंखाखाली वाढवलं. पक्षी उडून गेल्यावर ‘ हाऊ ची ‘ रडू लागला. तेव्हां त्याच्या आईनं ओळखलं की ‘ हाऊ ची ‘ हा एक अलौकीक पुरुष आहे. मग ती त्याला घरी घेऊन गेली आणि वाढवलं. तो मोठा झाला. सम्राट याओ यानं त्याला अश्वशाळेचा प्रमुख नेमलं.  त्यानं धान्य, भोपळे, शेंगा यांची लागवड केली, त्यांची खूप वाढ झाली. पुढं त्यानं चाऊ राजघराणं स्थापलं आणि शेंग या दुष्ट सम्राटाचा पराभव करून स्वतःचं राज्य स्थापलं.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *