अॅनी झैदींचं घर कुठंय?

अॅनी झैदींचं घर कुठंय?

                  Bread, Cement, Cactus:

                         A Memoir of Belonging and Dislocation

                             Annie Zaidi

                                ।।

अॅनी झैदी यांना एका माणसानं विचारलं तुम्ही कुठल्या?

झैदीनी स्वतःला विचारलं- खरंच मी कुठली? माझं घर कुठाय? माझं घर म्हणजे कुणाचं घर? माझं? आई वडिलांचं? आजोबा पणजोबांचं?

ब्रेड, सिमेंट, कॅक्टस या पुस्तकात झैदी आपल्या घराचा, घर या कल्पनेचा शोध घेतात.

झैदींचा जन्म लखनऊमधला. त्या वाढल्या जयपूरमधे. नंतर मुंबई. मुंबईची गर्दी आणि धावपळ मानवेना, त्या दिल्लीत गेल्या. तिथंही रमल्या नाहीत. मुंबईत परतल्या.

आपण जन्मलो ते गाव आपलं की आपण जिथं शाळेत गेलो ते गाव आपलं की जिथं आपण कामासाठी राहिलो ते गाव आपलं की आपल्या आई वडिलांचं गाव ते आपलं की आपल्या पूर्वजांचं गाव ते आपलं असे प्रश्न झैदी यांना पडले. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी झैदी फिरल्या, लोकांना भेटल्या, पुस्तकं वाचली, ज्ञानी माणसांच्या साक्षी काढल्या. झैदी पत्रकार असल्यानं त्यांनी माहितीचा रीसर्चही केला. हे सारं त्यांनी प्रस्तुत पुस्तकांत एकत्र केलं.

काही आठवणी, काही अभ्यास, काही मुलाखती, काही मतं, काही स्वैर विचार असं या पुस्तकाचं रूप आहे. हे पुस्तक म्हटलं तर आत्मचरित्र आहे, म्हटलं तर भारत या देशाबद्दलचा अभ्यास आहे.

झैदींना कळलं की त्यांचे पूर्वज अलाहाबादमधे होते. तिथं झैदी गेल्या.  आईआजीकडून कळलेलं अलाहाबाद आणि प्रत्यक्ष अनुभवायला मिळालेलं आजचं अलाहाबाद यात फारच फरक होता. ऐकीव आणि पुस्तकातलं अलाहाबाद पूर्वेतलं ऑक्सफर्ड होतं. झैदींना काल परवा दिसलेलं अलाहाबाद हे अलाहाबाद नव्हतं, प्रयागराज होतं. 

झैदींना प्रयागराज आपलं गाव वाटलं नाही.

झैदी उत्तर प्रदेशात मुहंमदाबादला गेल्या. तिथं त्यांचे आजोबा होते. महंमदाबाद म्हणजे आझमगढ जिल्ह्यातला एक छोटासा कसबा. इम्रती हा गोड पदार्थ आणि गुंडगिरी हे महंमदाबादचं वैशिष्ट्यं. नंतर नंतर सगळा आझमगडच गुन्हेगारीचा अड्डा झाला. गावठी बंदुका, कट्टे या जिल्ह्यात होत आणि देशभर निर्यात होत. आणि नंतर नंतर पाच दहा हजारात खून करणारी माणसंही तिथून निर्यात होऊ लागली.

झैदींना ते गाव, तो जिल्हा आपला वाटला नाही.

झैदींची आई झैदींच्या वडिलांपासून वेगळी झाली आणि जयपूरमधे स्थलांतरीत झाली. जेकेपुरम या एका कॉलनीत झैदींचं शिक्षण झालं. 

कोणत्याही सांस्कृतीक इत्यादी खाणाखुणा नसलेलं निव्वळ पोट भरणाऱ्या माणसांचं शहर. एका उद्योगपतीला उद्योग करायचा होता, त्यासाठी त्यानं माणसं गोळा केली, नाना प्रकारच्या घरात कोंबली, त्यांच्या पोटात अन्न कोंबलं, त्यांच्या अंगावर कपडे चढवले, त्यांना पगार बिगार दिला. 

जेकेपुरममधे माणसं त्यांच्या घरांच्या प्रकारावरून ओळखली जायची. घरं पगाराच्या आकड्यानुसार दिली जायची. टॉप पगार, त्या पेक्षा कमी पगार, त्याच्या पेक्षा कमी पगार असं करत करत शिपाई आणि दारवान इतक्या खालपर्यंतचे पगार आणि घरं. ए, बी,सी,डी,ई, एफ या घरांच्या प्रकारावरून   माणसं ओळखली जायची. तुम्ही ए मधे रहाता की डी मधे रहाता यावरून तुमची किंमत ठरायची. हीच माणसाची किमत. बस.

  हे शहर जिथं वसलं तिथल्या मुळ लोकाना उद्योगानं उध्वस्थ केलं गेलं. तिथली मूळ माणसं उदा. भिल्ल. जेके पुरममधे रहाणाऱ्या झैदीना सांगितलं जाई की भिल्ल लोक क्रूर आहेत, ते लुटालूट करतात, ते रहातात तो जेकेपुरमला लागून असलेला अरवली डोंगर डेंजरस आहे, तिथं हे भिल्ल रहातात अशा गोष्टी ऐकत ऐकत झैदी वाढल्या.

शाळेत भांडणं झाली की सवंगडी म्हणायचे “ तू पाकिस्तानी आहेस.” झैदी सांगायच्या की त्यांचा जन्म भारतातला, त्यांचे वडील पंजाबी हिंदू होते, फाळणीनंतर ते भारतात आले होते. पण त्याचा उपयोग होत नसे. झैदी म्हणजे मुसलमान म्हणजे पाकिस्तानी.

जयपूर हे काही झैदीना आपलं घर वाटत नाही.

तसं म्हटलं तर अरवली पर्वतातल्या अनेक आदिवासींनाही जयपूर हे आपलं घर वाटत नाही. रहात्या घरातून हुसकून लावलेले, रहातं घर कामाधामासाठी सोडून गेलेल्या स्थलांतरिताना कुठं त्यांचं स्वतःचं घर असतं? ती शहरं, ती घरं म्हणजे छपरं असतात, घरं नसतात.

झैदी लिहितात की भारताच्या १.२ अब्ज लोकसंख्येत ४५.४ कोटी म्हणजे ३२ टक्के माणसं स्थलांतरीत आहेत. त्यांना कुठं असतं त्यांचं घर.

गंमत म्हणजे या स्थलांतरीतांत बहुसंख्य स्त्रियाच असतात. 

स्त्रीचं लग्न झालं की ती सासरी जाते. सासर परकं असतं. सासरी स्त्री परावलंबी असते. काहीही करायचं म्हटलं की तिला सासरच्या लोकांची परवानगी घ्यावी लागते. 

स्त्रीचं घर कुठलं? ती जन्मते ते की ती जिथं सासरी गेलेली असते ते?

घर या कल्पनेचा शोध घेत घेत झैदी भारतातली विविधता दाखवतात, अनंत भाषा दाखवतात, गरीबी दाखवतात, दलित-मुसलमान या समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती दाखवतात, भारतातलं राजकारण कसं चाललंय ते दाखवतात.

देवेंद्र फडणवीसांच्या बायकोला मुंबई त्यांची वाटेनाशी झाली होती. त्या आधी कधीतरी आमीर खान यांच्या पत्नीला आपल्या मुलाचं भारतातलं भवितव्य ठीक नाही असं वाटलं होतं. नंतर कंगना राणावतलाही महाराष्ट्र-मुंबई सुरक्षीत वाटली नाही. मकबूल फिदाअली हुसेन या पंढरपूरमधे जन्मल्या  वाढलेल्या माणसाला भारत या त्याच्या देशाबद्दल काय वाटतं हे विचारायच्या आधीच भारतीय लोकांनी त्याला देशाबाहेर घालवून दिलं.  

काय गंमत आहे पहा. जे आर डी टाटा पॅरिसमधे जन्मले, सगळं आयुष्य भारतात-मुंबईत काढलं, जेनेव्हामधे वारले. त्यांचं घर कुठलं?

घर म्हणजे सिमेंट, विटा नव्हे. घर म्हणजे असं काही तरी ज्यात माणसाचा जीव गुंतलेला असतो. माया अँजेलो या कवीचं एक  अवतरण   झैदी देतात “ घर म्हणजे,  सुरक्षीत जागा जिथं आपण जसे कसे असतो तसे स्वीकारले जातो, कोणी प्रश्न विचारत नाही.”

झैदींचे वडील पाकिस्तानी पंजाबातले. फाळणीनंतर ते लखनऊच्या उपनगरात आले. लखनऊमधे असताना आई त्यांच्या वडिलांपासून दूर झाली आणि यथावकाश झैदी आईबरोबर राजस्थानात जेके पुरममधे गेल्या, तिथं वाढल्या. नंतर त्या मुंबईत स्थिरावल्या. मुंबईचा त्रास होऊ लागला म्हणून त्या दिल्लीत गेल्या. पण तिथ रमल्या नाहीत. पुन्हा मुंबईत परतल्या. हे सर्व होईपर्यंत त्यांची चाळिशी उजाडली.

झैदी पत्रकार झाल्या, लेखन करू लागल्या, व्यावसायिक झाल्या, व्यवसायात स्थिरावल्या, स्वतंत्र झाल्या. माहेर,सासर या चौकटीबाहेर राहून त्या स्वतंत्र जगू लागल्या, आर्थिक आणि सर्व दृष्ट्या स्वतंत्र झाल्या. एका स्पर्धेत त्यांनी ३००० हजार शब्दांचा निबंध, घर या विषयावर पाठवला. स्पर्धेत त्यांचा नंबर लागला, त्याना एक लाख डॉलरचं बक्षीस मिळालं. त्यांनी या रकमेचा वापर केला, संशोधन केलं, लोकांना भेटत फिरल्या आणि वरील पुस्तक लिहिलं.   

झैदी मुंबईत आल्या. पूर्वी ती बाँबे होती. बाँबे या नावाला दीर्घ इतिहास होता, खूप माणसं त्यात गुंतलेली होती. बाँबेचं मुंबई झालं. यथावकाश बाबरी पडली आणि बाहेरून येणाऱ्या मुसलमान माणसाला हिंदू वस्तीत रहायला जागा मिळेनाशी झाली. झैदींचे वडील हिंदू पण त्यांचं आडनाव मुसलमान, त्यातून एकटी, लग्न न केलेली स्त्री. म्हणजे झालंच. भारतात स्त्री ही कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी बहीण, कोणाची तरी पत्नी किंवा कोणाची तरी आई असावी लागते. स्वतंत्रपणे स्त्री ही स्त्री नसते. एकटी स्त्री दिसली की माणसं तिच्याकडं संशयानं पाहू लागतात, आधार नसलेली स्त्री ही पुरुषांच्या शारीरीक भुकेचा बळी असते.

घराच्या शोधात निघालेल्या झैदी दीड पावणेदोनशे पानं लिहून झाल्यावर थकतात. व्यवहारी किवा फिलॉसफिकल होतात. अगदी शेवटी त्या लिहितात “ घर म्हणजे स्टिल लाईफ चित्रं नसतं…चित्रपटातल्या धावत्या चित्रांसारखं ते असतं, ते सतत बदलत असतं, त्याच्या आतमधे कुठं तरी घर लपलेलं असतं..” 

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *