सर्वसाधारण डोक्यावरचा प्रचंड महाग मुकूट-क्राऊन.

सर्वसाधारण डोक्यावरचा प्रचंड महाग मुकूट-क्राऊन.

डायना आणि चार्ल्स यांचं लग्न आणि  वैवाहिक जीवन हा विषय क्राऊनमधे आहे. सगळी बोंबाबोंब याच विषयावर आहे.

 डायनाला मागणी घातली तेव्हांच चार्ल्स आणि कॅमिला पार्कर यांचे प्रेमसंबंध होते, ते जगाला माहित होते. पार्कर विवाहित होत्या, त्यांचा नवरा जिवंत होता. चार्ल्सनं डायनाशी लग्न करावं, पार्करचा विचार करू नये असं माउंटबॅटननी चार्ल्सला सांगितलं होतं, चार्ल्सनं डायनाशी लग्न केलं. 

पार्करशी असलेले प्रेमसंबंध लग्न करतानाच डायनाला माहित होते. परंतू लग्नानंतर चार्ल्स वळणावर येईल अशी डायनाची अपेक्षा होती. तसं घडलं नाही. दोघांमधले गैरसमज वाढत गेले, दुरावा वाढत गेला. राणी त्यात पडत नसे. जे काही करायचं ते सांभाळून करा, वाच्यता होऊ देऊ नका, काडीमोडाला परवानगी नाही असं राणीचं मत.

शेवटी काडीमोड झालाच.

नाराज डायनानं स्वतःचे स्वतंत्र शरीर संबंध निर्माण केले, स्वतःची स्वतंत्र करियरही केली. डायना जगातली एक सर्वात प्रसिद्ध स्त्री झाली. डायनानं एड्स झालेल्या आफ्रिकन मुलाला उचलून कडेवर घेतलं, जेव्हां एड्स झालेल्या माणसाच्या जवळ जायलाही लोकं तयार नव्हतं. जगभर डायनाला अमाप लोकप्रियता मिळाली.चार्ल्स तिच्यापुढं थिटा पडला. लोकं डायनाभोवती गर्दी करत, चार्ल्सकडं दुर्लक्ष करत. दोघांमधला दुरावा वाढत गेला.या सीझनमधे त्यांच्यातले तणाव, भांडणं, राजवाड्यामधे उमटलेले तीव्र पडसाद याचं चित्रण आहे.डायनाच्या अपघाती मृत्यूचा विषय पुढल्या सीझनमधे येणार आहे.

चार्ल्स आणि डायनामधले संवाद, राणी-डायना-चार्ल्स यांच्यातले संवाद हा वादाचा विषय झालाय. राजवाड्यातून त्या बद्दल चकार शब्द नाही. पण मुकुटप्रेमी, परंपरा प्रेमी लोक खवळले आहेत. निर्मात्यानं अतीच स्वातंत्र्य घेतलं आहे असं त्यांचं मत पडतंय.

राणी, चार्लस, डायना ही पात्रं अगदीच सामान्य माणसासारखी दाखवलीयत या बद्दल लोकांना राग आलेला दिसतोय.   लग्न, प्रेम, लग्नाबाहेरचे संबंध, सासवेचा राग, घराण्याची प्रतिष्ठा इत्यादी गोष्टी सामान्य माणसांच्या संसारात घडत असतात. मराठी मालिका आणि हिंदी सिनेमात खानदानकी इज्जत वगैरे एकेकाळी आणि काहीसं आताही खूप असतं. खानदानकी इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून ऑनर किलिंग हा प्रकार भारतात सर्रास आणि अमाप आहे. राजवाड्यात तसलाच प्रकार. तरी ते दाखवायला नको असं अनेकांचं मत दिसतंय. 

थोडक्यात असं की राजा, राणी, मोठा पुढारी इत्यादी लोकांना एका देव्हाऱ्यात बसवायचं आणि त्यांच्याबद्दल गौरवोद्गार सोडता काहीही बोलायचं नाही असा लोकांचा कल साऱ्या जगात असतो आणि तेच ब्रीटनमधे आहे असं दिसतंय. कदाचित अमेरिका हा अपवाद असेल. तिथं कोणालाच देव्हाऱ्यात ठेवत नाहीत.

डायनामधे एक विकार होता. ती खा खा खायची. विशेषतः गोड पदार्थ. नंतर ओकायची. तिला स्वतःची फीगर टिकवायचं खुळ होतं. वजन वाढू नये म्हणून ती पार्टीहून परत आल्यावर ओकारी  करून अन्न बाहेर काढायची. अनेकांना हा विकार असतो. हा विकार म्हटलं तर शारीरीक आहे, म्हटलं तर तो मानसीक आहे.

क्राऊनमधे डायनाच्या या विकाराचं चित्रण बरेच वेळा आलं आहे. यावरही बरेच प्रेक्षक नाराज आहेत. 

डायनाचे प्रेमसंबंधही संयमानं परंतू ठळकपणे दाखवले आहेत.

थोडक्यात असं की चार्ल्स, राणी, राणीचा नवरा, डायना इत्यादी माणसं या वेबमालिकेत तुमच्या आमच्यासारखी दाखवलीत.

त्यात सत्य तर आहेच.

एलिझाबेथ किंवा लिलिबट ही मुलगी राणी झाली कारण तिच्या वडिलानी तिच्या डोक्यावर राजमुकुट ठेवला. एलिझाबेथला मुळीच राणीबिणी व्हायचं नव्हतं. तिला सामान्य गृहिणीप्रमाणं लग्न करायचं होतं, मुलं वाढवायची होती, संसार करायचा होता. पण तिच्या काकाला सिंहासन सोडावं लागल्यानं वडिलांना नाईलाजानं राजाचा मुकुट डोक्यावर घ्यावा लागला होता आणि पुन्हा नाईलाजानं तो तिच्या डोक्यावर आला होता.

एलिझाबेथ तशी अगदी साधारण स्त्री. साम्राज्याचं नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुण वगैरे तिच्यात नव्हते, नाहीत. ट्यूटर मंडळी तिला जगाबद्दलचं ज्ञान देत असत. पण तेही शाळेसारखं नाही. मास्तर लोकं तिला शिक्षा करू शकत नव्हते, फटके मारू शकत नव्हते. परीक्षाच द्यायची नसल्यानं तिच्या ज्ञानाची पातळी कधी सिद्ध झाली नव्हती.

तिच्या आईचा आणि आजीचा तिच्यावर संस्कार. दोघीही राजवाडा आणि राजवाड्यातलं राजकारण यात वाढलेल्या, मुरलेल्या. राजवाड्यातलं निरुंद वातावरण हेच त्यांच्या अनुभवाचं जग. राणीनं काहीही करायचं नसतं, गप्प बसायचं असतं हे आई आणि आजीनं तिला अनेक जुनी उदाहरणं देत शिकवलं. राणीच्या डोळ्यात पाणी येता कामा नये, राणीला राग आलाय किवा खूप आनंद झालाय हे कधीही कोणाला दिसता कामा नये अशी शिकवण तिला मिळाली. 

एकदा एक मोठा अपघात झाला. खनीज माती रचून तयार झालेला एक डोंगर कोसळला. हा डोंगर घातक आहे, अवैज्ञानिक रीतीनं उभारलेला आहे असं अनेक वेळा सांगूनही सरकारनं त्या बाबत कारवाई केली नव्हती.   कधी ना कधी तरी तो डोगर कोसळायचा होता, तो कोसळला. गाव, गावातली एक शाळा त्या मातीखाली गाडली गेली, किती तरी मुलं त्यात जिवंत गाडली गेली.

फार भयानक अपघात होता.

राणी अपघात स्थळी गेली नाही. राजघराण्यातला एक बंडखोर माणूस तिथं गेला, त्यानं ती सारी कहाणी राणीच्या कानावर घातली. ती ऐकताना राणीच्या डोळ्यातून अश्रूचा एक टिपूसही गळला नाही. अगदीच नाचक्की झाल्यावर राणी तिथं गेली, राणीच्या इतमामात. तिथही दुःखाचा लवलेश राणीच्या चेहऱ्यावर नव्हता.

देशात बोंबाबोंब झाली. सरकारची अनास्था आणि भ्रष्टाचार उघड झाला. राणी गप्प. एक शब्दही जाहीर नाही. खाजगीत पंतप्रधानाकडं विचारणा. बस्स. 

 आईनं आणि आजीनं सांगितलं, गप्प रहा. काहीही न करणं, काहीही व्यक्त न करणं हेच राजमुकुटाचं कर्तव्य असतं.

म्हणजे एका परीनं एक अगदीच सामान्य असं माणूस आणि त्याच्या परिवारातली अगदीच सामान्य माणसं. केवळ जन्मामुळं त्यांच्या डोक्यावर मुकुट येतो. तर त्याचा येवढा बाऊ कां करायचा? जर ती माणसं सामान्य असतील तर ती उघडी पडणारच ना? 

  राजघराण्यातली माणसं काहीही न करता उडाणटप्पुगिरी करत असतात, घोडदौडी करतात, जंगी पार्ट्या करतात, प्रचंड महाल आणि बागा वापरतात, कपडे आणि दागिन्यांचं तर पहायलाच नको. डायनाचा साखरपुडा होताना, लग्न समारंभ होताना तिनं आंगठी कुठली घालावी यावर केवढा खटाटोप आणि कशी जगभरच्या खाणीतून गोळा केलेली हिरेमाणकं वापरलेली असतात याची चर्चा.

बरं हे त्यांनी कमावलेल्या संपत्तीतून नाही, लोकांनी त्याना दिलेल्या पैशातून. हे म्हणजे थेट सातव्या आठव्या शतकात गेल्यासारखं होतंय.

पीटर मॉर्गननी क्राऊनमधे हे सारं दाखवलं. 

कां दाखवू नये?

हे चौदावं- सोळावं शतक नाही. त्या  शतकात पोवाडा,बखर, राजाचं कौतुक करणारं स्तोत्र, राजाची आरती इत्यादी शोभून दिसलं असतं, फिट बसलं असतं. एकविसाव्या शतकात ते गिळगिळीत वाटतं. 

क्राऊनमधे राजवाड्यातलं सौंदर्य, भव्यता दिसते. तिथली चर्चेस, मठ, दालनं सारं काही चकीत करणाऱ्या आकाराचं आणि रुपाचं असतं. त्या काळाला अनुसरून ते बऱ्याच वेळा लोकांना लुटून गोळा केलेल्या पैशातून निर्माण झालं होतं. खिशातून पैसे भरायचे असते तर कोणी इतका भव्य राजवाडा उभारला नसता. मजूर स्वस्त,  पैसा लुटीचा, जबरदस्तीही असे. पण त्यातून सुंदर आणि भव्य गोष्टीही घडल्या हे खरंच. स्पँड्रेस इफेक्ट नावाचा प्रकारण असतो. करायला जातो एक आणि त्यातून कल्पना न केलेल्या सुंदर गोष्टी घडतात. तर ते सौंदर्य पहाताना प्रसन्न वाटतं हे खरंच. पण त्या प्रसन्नतेत काही अगदी सामान्य माणसं दडलेली असतात हेही तितकंच खरं.  त्या आनंदाला एक सामान्यपणाचा, एका उडाणटप्पुगिरीचा पदरही आहे.

पीटर मॉर्गननी तो क्राऊनधे दाखवलाय.

क्राऊन या मालिकेची गंमत अशी की ही मालिका शेदोनशे वर्षांचा काळ तपशीलासह दाखवतो.

।।

मानवी संबंध, मानवी जगणं याचे कंगोरे क्राऊनमधे पहायला मिळतात. इतिहास कळायला ही मालिका मदत करते. पण बोचरं सत्यही दाखवते.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *