फाटका माणूस थेट राणीच्या दालनात. क्राऊन.

फाटका माणूस थेट राणीच्या दालनात. क्राऊन.

क्राऊनच्या चौथ्या सीझनमधला पाचवा भाग पूर्णपणे मायकेल फेगन नावाचा माणूस राजवाड्यात घुसतो हा मामला दाखवतो.

मायकेल फेगन हा एक डिस्टर्ब्ड माणूस असतो; रंगारी, भिंती रंगवणारा. थॅचर यांच्या आर्थिक धोरणामुळं तो बेकार झालेला असतो. बायकोही त्याला सोडून गेलेली असते. एकूणात बिनसलेल्या मायकेलला वाटतं की राणीच्या कानावर हे दुःख घालावं.

हा गडी एके रात्री कुंपण ओलांडून, पायपावर चढून, गच्चीतून उतरून, खिडकीतून वाट काढत, राजवाड्यात राणीचं झोपायचं दालन शोधत हिंडतो. राणीचं दालन सापडत नाही. दमतो. एका ठिकाणी त्याला वाईन सापडते. वाईन पीत बसतो. राणी भेटत नाही आणि पोलिसही पकडत नाहीत, कोणी विचारतही नाही. कंटाळून तो निघून जातो.

दुसऱ्या वेळी त्याच वाटेन जातो आणि त्याला राणीचं दालन सापडतं. वेळ सकाळची असते. क्राऊनमधे दाखवलंय की तो राणीच्या खोलीपर्यंत जाताना धडपडतो. हाताला जखम होते. राणीला वॉश बेसिन कुठाय असं विचारतो. राणी दाखवते. आरामात बेसिनमधे जातो, रक्त धुतो. येताना राणीचा टूथ ब्रश घेऊन येतो आणि राणीला विचारतो “तू येवढी मोठी राणी आणि आमच्यासारखा साधाच ब्रश वापरतेस, सेलवर चालणारा यांत्रीक ब्रश नाही वापरत? कमाल आहे!”

मग मायकेल राणीच्या पलंगावरच बसतो, राणीला सुनावतो की थॅचर बाईनी देशाची कशी वाट लावलीय. राणी म्हणते की त्यानं थॅचरबाईनाच भेटावं. तो सांगतो की थॅचर भेटत नाही. राणी म्हणते विरोधी पक्षाच्या माणसाला भेटावं. तो सांगतो की तेही भेटत नाही, राजकारणी लोकं बंडल आहेत. राणी म्हणून अंतीम जबाबदारी तुमचीच असल्यानं तुम्हाला भेटायला आलोय.

राणी आणि हा प्रजाजन. यांच्यात चर्चा. ग्रेट. 

यथावकाश पोलिस येतात, पकडून नेतात.

पूर्ण एपिसोडमधे ही धमाल पहायला मिळते.

खरोखर हे सारं असं घडलं कां?

ही घटना १९८२ सालातली आहे. 

मायकेल फेगन हा माणूस आज जिवंत आहे. त्यानं नुकतीच एक मुलाखत गार्डियनला दिली आणि सांगितलं की राणीच्या दालनात पोचेपर्यंत जे दाखवलंय ते करेक्ट आहे. राणीशी काय बोलणं झालं या प्रश्नावर तो म्हणाला “ मला पाहिल्यावर राणीनं विचारलं की तू कोण, इथं काय करतोयस. आणि लगेच राणी आपल्या बुटक्या पायांवर उभी राहून निघून गेली.”

क्राऊनमधला नट दिसायला चांगला दाखवलेला नाही आणि मला एक चार्मलेस माणूस म्हणून दाखवलंय, ते बरोबर नाही, मी दिसायला चांगला होतो अशी मायकेलची प्रतिक्रिया आहे.

७ जून १९८२ आणि ९ जुलै १९८२ या दोन दिवशी फेगन राजवाड्यात गेला होता येवढंच राजवाड्यानं कबूल केलं आहे. 

राजवाडा आणि स्कॉटलंड यार्ड या दोघानी चौकशी केली. पैकी स्कॉटलंड यार्डनं चौकशी करून फेगनवर खटला भरला. ज्यूरीनं फेगनला सोडलं कारण त्यानं चोरी केली नव्हती की राणीला त्रास दिला नव्हता. राजवाड्यात जाणं हा गुन्हा आहे असा कायदा त्या काळात नसल्यानं त्या बद्दलही त्याला शिक्षा देता येईना. शेवटी विचित्र वागणं या कलमाखाली त्याला ३ महिने मनोरोगी इस्पीतळात पाठवण्यात आलं.

स्कॉटलंड यार्डच्या चौकशीत राजवाड्यातल्या सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी आणि गलथानपणा आढळला. अलार्म वाजला होता पण एका रक्षकानं तो चुकीचा वाजला असं समजून बंद करून टाकला. राणीच्या दालनाबाहेरचा सशस्त्र रक्षक ड्यूटी संपवून गेला आणि त्याच्या जागी दुसरा रक्षक आला नव्हता तेवढ्यात नेमका फेगन राणीकडं पोचला. राणीनं फोन केल्यानंतर सुमारे पंधरा मिनिटानंतर रक्षक राणीकडं पोचला. राणीनं घंटी वाजवली होती, पण शेजारच्या दालनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ती ऐकू गेली नव्हती. राणीचा एक रक्षक नेमका त्याच वेळी राणीच्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी बागेत गेला होता.

ते सारं लोकांना कळलं तर लोक खवळतील म्हणून तो अहवाल प्रसिद्ध करण्यात आला नाही. पण न्यू यॉर्क टाईम्समनं तो मिळवला आणि छापला.

मायकेल मादक परार्थाचं सेवन करत असे. सापडला तेव्हां त्या अमलाखाली तो होता असं अहवाल सांगतो. मायकेलनंही ते कबूल केलं.

वेड्यांच्या इस्पितळातून बाहेर पडल्यानंतर मादक द्रव्य बाळगणं, विकणं इत्यादी काही गुन्ह्यांसाठी मायकेलची तुरुंगात ये जा होत राहिली.

एकादा फाटका माणूस बिनधास्त राजवाड्यात घुसतो, वावरतो, त्याला अटकाव होत नाही, तो थेट राणीच्या दालनात जातो म्हणजे सॉलिड मजा.

पीटर मॉर्गननं ती मजा रंगवली. आलिशान खानदानी दालनात घुसलेला एक फाटका माणूस, बेसिन कुठंय असं राणीला विचारतो आणि राणी त्याला बेसिनची वाट दाखवते. फेगन राणीला व्याख्यान झाडतो. म्हणतो “ येवढा मोठा राजवाडा आणि तुम्ही राजे वगैरे, तुमच्या राजवाड्याच्या भिंती पहा. रंग उडालाय, अनेक ठिकाणी टवके वगैरे गेलेत. तुम्ही साधी रंगरंगोटीही करू शकत नाही. मी पेंटर आहे म्हणून मला ते समजतं. मला बोलवा, मी पेंटिंग करून देईन.”

राणीला आजवर कोणीही असं सुनावलं नसणार.

आणि दोघांमधली राजकीय चर्चा. 

रस्त्यावर किंवा पबमधे कोणाशीही बोलावं अशा थाटात फेगन दालनात वावरतो, बोलतो. राणीच्या बाथरूममधेही त्याचा वापर पहाण्यासारखा.

साहित्य किंवा चित्रपटात एक स्पेस मिळते.ज्या गोष्टी कदाचित घडलेल्या नसतील पण घडू शकतात अशा गोष्टी साहित्य आणि चित्रपटात दिसतात. चित्रपट हे साहित्यच मानलं जातं. कॅमेरा आणि संकलन या दोन गोष्टी उपलब्ध झाल्यानंतर चित्रपट निर्माण झाले आणि त्याला साहित्य मानलं जाऊ लागलं. ती स्पेस क्राऊनमधे पीटर मॉर्गन यांनी वापरलीय.

राणीनं जे अनुभवलं असेल ते राणीचं सत्य. फेगननं जे अनुभवलं ते फेगनचं सत्य. पीटर मॉर्गनला जे दिसलं ते पीटर मॉर्गनचं सत्य.

मुराकामी किंवा मार्खेजच्या कादंबऱ्यात एक जग असतं. तसं जग कोणी प्रत्यक्षात अनुभवलेलं नसतं. पण दोघांच्या कादंबऱ्या वाचत असताना ते जग खरं वाटतं. ते कादंबरीकाराचं जग असतं, ते कादंबरीकाराचं वास्तव असतं. आपण ते अनुभवलेलं नसलं तरीही ते आपल्याला खरं वाटावं असं कादंबरीकारानं मांडलेलं असतं.

क्राऊनचं एक स्वतःचं स्वतंत्र वास्तव आहे.

मायकेल फेगनच्या बाबतीत ते वास्तव सर्वांनीच एंजॉय केलं, त्यावर फार वाद झाले नाहीत. 

परंतू पीटर मॉर्गननं क्राऊनमधे दाखवलेल्या डायना आणि चार्ल्समुळं मात्र खळबळ माजली. 

ते प्रकरण पुढल्या शुक्रवारी.

।। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *