इस्रायलची गुंडगिरी

इस्रायलची गुंडगिरी

इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमधे एक लघुयुद्ध  पार पडलं. इस्रायलची सुमारे २० माणसं मेली. २२० पेक्षा अधिक पॅलेस्टिनी इस्रायलच्या क्षेपणास्त्रांचा बळी ठरले.

गाझा दाट वस्तीचा प्रदेश आहे. एक इमारत जमीनदोस्त होते तेव्हां पाच पन्नास माणसं मरतात. त्यामुळं पॅलेस्टाईनमधे २२० माणसं मरणं ही गोष्ट नित्याची अपेक्षीत आहे.

  इस्रायलच्या दक्षिण भागात गाझातून सोडलेली रॉकेटं पोचणं आणि तिथल्या इमारती उध्वस्थ होणं ही घटना पहिल्यांदाच घडली आहे. गाझामधून किंवा लेबनॉनमधून आलेली रॉकेटं हवेतल्या हवेतच छेदण्याची यंत्रणा इस्रायलकडं असूनही काही रॉकेटं इस्रायलमधे पोचणं ही घटना लक्षणीय आहे, इस्रायलला जागं करणारी आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष हा दोन असमान घटकांमधील संघर्ष आहे. इस्रायल बलदंड आहे, पॅलेस्टाईन अगदीच किरकोळ आहे.

पॅलेस्टाईनला श्रीमंत अरब जगानं पाठिंबा दिला पण शस्त्रं दिली नाहीत. इस्रायलला अमेरिका प्रभावी शस्त्रसामग्री देते,तीच सामग्री अमेरिका सौदीलाही पुरवते. सौदी पॅलेस्टाईनला पाठिंबा देतात पण शस्त्रसामग्री देत नाहीत. त्यामुळंच इस्रायल पॅलेस्टाईन कुस्ती म्हणजे पैलवान आणि काडी पैलवान यांच्यातली कुस्ती ठरते. 

 या लघुयुद्धात पॅलेस्टाईननं इतकी रॉकेटं कशी जमवली आणि इस्रायलवर डागली;  त्याचा पत्ता इस्रायलला कसा लागला नव्हता या गोष्टीचा शोध लागला तर इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाचं बदलतं रूप कळू शकेल.

  ससेहोलपटीचा बळी ठरलेल्या ज्यू लोकांना पॅलेस्टाईन या भूमीत ब्रीटन-अमेरिका इत्यादीनी  १९४८ मधे इस्रायल नावाचा एक नवीन देश तयार करून दिला. 

तेही सुखासुखी घडलेलं नाही. स्थानिक पॅलेस्टिनी लोकांना अत्यंत क्रूरपणे त्यांच्या घराबाहेर काढून त्यांची घरं, जमिनी इत्यादी गोष्टी ज्यूनी बळकावल्या. 

  जर्मनी, पोलंड, रशिया इत्यादी ठिकाणी ज्यूना फार क्रूरपणे वागवलं गेलं.त्याचा  वचपा ज्यूनी पॅलेस्टिनी लोकांना क्रूरपणे वागवून काढला. ज्यू तसं करू शकले कारण पॅलेस्टिनी दुर्बळ होते. 

ज्यूंनी जर्मनांना मारलं नाही, रशियनांना मारलं नाही, पोलिश लोकांना मारलं नाही, मारलं पॅलेस्टिनी लोकांना. कारण ते दुर्बल आहेत.

१९४८ साली इस्रायल निर्माण करताना स्थानिक पॅलेस्टिनीना  त्यांची इच्छा काय आहे, त्यांचं काय करायचं याचा विचार जगातल्या बलाढ्य देशांनी केला नाही. १९४८ मधे पॅलेस्टाईनची ५६ टक्के भूमी इस्रायलनं बळकावली. नंतर १९६७ च्या युद्धाचा फायदा घेऊन ७८ टक्के  जमीन बळकावली. २०२० साली इस्रायलनं पॅलेस्टाईनमधली ८५ टक्के जमीन बळकावली आहे. उरले सुरले पॅलेस्टिनीही हुसकावून लावण्याची खटपट इस्रायल करत आहे.

जेरुसलेमच्या आसपास, वेस्ट बँक या भूभागात तुरळक पॅलेस्टिनी वस्त्या आहेत. तिथल्या लोकांना हाकलून लावण्याच्या खटाटोपातला एक भाग म्हणून मे महिन्यात शेख जर्रा या वस्तीतल्या पॅलेस्टिनी लोकांना त्यांची घरं सोडायला सांगितलं गेलं. प्रकरण कोर्टात गेलं. कोर्ट चालढकल करत राहिलं. पोलिस पोचले. त्यांनी दादागिरी करायला सुरवात केली.

शेख जर्रातल्या लोकांचा प्रश्न सरळ होता. ‘ आम्ही जायचं कुठं?’ 

उर्मट इस्लायली सैनिक  म्हणत ‘ तो तुमचा प्रश्न आहे. ‘

तिथे ठिणगी पडली. 

अगदी याच रीतीनं बाहेरून आलेल्या ज्यूनी विसाव्या शतकाच्या सुरवातीला स्थानिक पॅलेस्टिनी लोकांना बेघर करायला सुरवात केली होती. इस्रायल स्थापनेच्या अलीकडं पलीकडं तर पॅलेस्टिनी लोकांना बेदखल करण्याला ऊत आला होता.

मागं कधी तरी, इतिहासात,  ज्यू पॅलेस्टाईनमधे होते म्हणून ती भूमी द्यायची? 

इतिहास कुठून सुरु होतो असं धरायचं? 

पॅलेस्टाईनमधे ज्यू होते तेव्हां त्या वेळी इतरही उपासना पद्धती मानणारी माणसं होती. ज्यू स्वतःला आपण पृथ्वीवरचे पहिले मानव आहोत असं मानत असले तरी ते सत्य नाही. पॅलेस्टाईनमधे ज्यूंच्या समकालीन आणि त्यांच्या आधीही अनेक उपासनापद्धती असणारे समाज होते.प्रत्येक धर्माच्या माणसाला वाटतं की देवानं आपल्यालाच स्पेशल म्हणून निर्माण केलंय. तुम्हीच माझे लाडके असं सांगत सांगत देवांनी धर्म तयार केले, धर्माचे बखेडे निर्माण करून माणसं मारण्याची एक  व्यवस्था करून टाकली.

हिटलरनं केलेला नरसंहार हा तसं पाहिलं तर अगदी अलीकडचा. त्या आधीपासून ज्यूना वगळणं,त्यांना गावातून हाकलून लावणं युरोपात घडत आलं होतं. सगळा घोळ ख्रिस्ती धर्मानं घातला, ज्यू लोकं धार्मिक विधीसाठी ख्रिस्ती मुलांचं रक्त पितात अशी समजून करून घेतली आणि ती धर्मात घुसडली.

तेव्हां ज्यूना समजा घर द्यायचं असेल तर ती जबाबदारी ख्रिस्ती लोकांची आहे. अमेरिका, ब्रीटन इत्यादी ख्रिस्ती लोकांना जर ज्यूना जमीन द्यावीशी वाटत असेल तर ती देण्यासाठी न्याय्य वाटेनं त्यांना जाता आलं असतं. इस्रायलवर जेवढा पैसा ओतला तेवढाच स्थानिक पॅलेस्टिनी लोकांवर खर्च केला असता, दोन देश पॅलेस्टीनमधे रीतसर उभारून देता आले असते.

पॅलेस्टाईनमधे ज्यूना वसवायचं तर स्थानिक लोकांशी बोलूनच ते करायला हवं होतं. ते झालं नाही.

पॅलेस्टिनी लोकांनी इस्रायलचं अस्तित्व अमान्य केलं.

इस्रायलनं पॅलेस्टिनी अस्तित्व अमान्य केलं.

 गोल्डा मेयर यांच्या मुलाखती वाचा. त्यांच्या मते इस्रायल म्हणजे जॉर्डन पासून भूमध्य समुद्रापर्यंतची पूर्ण जमीन. पॅलेस्टाईनचं अस्तित्वच त्या अमान्य करत असत.

आम्ही असलो तर तुम्ही नसाल अशी भूमिका दोन्ही बाजूनी घेतली. तुम्ही नसणारच अशी  परस्परांच्या अस्तित्वाबद्दलची भूमिका दोघांनी घेतली.

दुर्दैवानं इस्रायलच्या निर्मितीत हात असलेल्या महाशक्तीनी ठामपणानं दोघांना दोन स्वतंत्र देश देण्याची भूमिका घेतली नाही. इस्रायलनं गुंडगिरी करत पॅलेस्टिनीना हाकलायचं आणि महाशक्तीनी गप्प बसायचं असं घडत घडत आज पॅलेस्टिनी फक्त १५ टक्के भूमीवर शिल्लक आहेत.

पॅलेस्टिनी लोकांना हुशार नेतृत्व लाभलं नाही. इस्रायलच्या हुशार आक्रमकतेला तितक्याच मुत्सद्दी पद्धतीनं उत्तर देण्याची कुवत यास्सर अराफत यांच्यात नव्हती.ते आडव्या डोक्याचे होते.

 ज्यूंनी आपल्या बुद्धीमत्तेचा वापर करून अमेरिकी-ब्रिटीश संसाधनांची मदत घेऊन स्वतःचा विकास केला. आर्थिक विकास केला, शैक्षणिक विकास केला, भरपूर शस्त्रं गोळा केली. अमेरिकेत आणि ब्रीटनमधे; आर्थिक, चित्रपट, कला, शिक्षण, विज्ञान,तंत्रज्ञान इत्यादी सर्व  क्षेत्रात सर्वोच्च लायकीची मंडळी ज्यू असतात याचा फायदा इस्रायलमधल्या नेतान्याहू टाईप गुंड लोकांना मिळाला. जर्मनीतल्या भीषण नरसंहाराची सहानुभूती इस्रायलमधल्या गुंड प्रवृत्तीच्या लष्करी अधिकाऱ्यांनी वापरुन घेतली आणि पॅलेस्टिनी लोकांचा नायनाट करण्याचं ठरवलं.

इस्रायलच्या या उद्योगांना तोंड देण्याचं सामर्थ्य पॅलेस्टिनी, अरब, इजिप्शियन इत्यादी लोकांमधे नव्हतं, आजही नाही. आधुनिकतेच्या हिशोबात ही मंडळी मागं पडली होती, त्यांच्यात प्रचंड फूटही होती. याचा फायदा इस्रायलनं घेतला.

जर्मनीनं जे ज्यूंचं केलं ते ज्यू पॅलेस्टिनी लोकांचं करत आले  आहेत.

आज पॅलेस्टिनींची दुर्दशा आहे याचं एक कारण महमूद अब्बास यांच्यासारखं बंडल आणि भ्रष्ट नेतृत्व त्यांना लाभलं आहे. सुशिक्षीत अशा हन्नान अश्रावी यांच्या वाटेनं  जायला पॅलेस्टिनी तयार नाहीत. गंमत म्हणजे महमूद अब्बास यांच्या तोडीस तोड भ्रष्टाचारी नेतान्याहू आहेत. त्यांच्यावर खटले आहेत. खटले मागे घेतले जावेत याची खटपट ते करत आहेत. नुकतंच घडलेलं युद्ध हा नेतान्याहू यांनीच स्वतःला वाचवण्यासाठी  टाकलेला डाव आहे असं इस्रायलमधले पेपर सांगत आहेत.

 अमेरिका इत्यादी देशांनी घडवून आणलेल्या गवगव्यामुळं पॅलेस्टाईनमधली लोकं राक्षस आहेत आणि इस्रायली देवदूत आहेत अशी हवा पसरली आहे.

सगळा घोटाळा ज्यू हा धर्म होणं, त्यानंतर ख्रिस्ती हा धर्म होणं आणि त्यानंतर इस्लाम हा धर्म होणं यातून झालेला आहे.

इस्लाम निर्माण होण्याआधी, ख्रिस्ती धर्म निर्माण होण्याआधी, ज्यू आणि इतर लोकं एकमेकाच्या शेजारी रहात होतेच ना?

आज जी काही भौगोलीक स्थितीत आहे ती मोडायला हवी. १९४८ साली ठरल्याप्रमाणं इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात विभागणी होऊन दोन सार्वभौम देश निर्माण करायला हवेत. त्यानंतर दोन्ही देशांनी सामजंस्यानं एकमेकाशेजारी रहायला हवं. 

।। 

Comments are closed.