एका प्रेसिडेंटच्या मुलाची गोष्ट

एका प्रेसिडेंटच्या मुलाची गोष्ट

ब्युटिफुल थिंग्ज

।।

अमेरिकन समाजाची एकूण स्थिती आणि तिथलं राजकारण कसं (भयानक?) झालंय याचं प्रत्यंतर अनवधानानं एका ताज्या पुस्तकात घडलंय. 

काल परवाच प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक म्हणजे अमेरिकेचे प्रेसिडेंट जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन याच्या आठवणी. किंवा असंही म्हणावं की हे पुस्तक म्हणजे हंटर यांची कबुली आहे.

पुस्तकाचं नाव आहे ब्युटिफुल थिंग्ज. हंटरचा अत्यंत प्रिय भाऊ बो यानं मरण्याच्या आधी अत्यंत व्याकुळ क्षणी घराच्या व्हरांड्यातून बाहेरचं निसर्ग सौंदर्य हंटरला दाखवलं आणि ब्युटिफूल येवढाच शब्द उच्चारला. त्यावरून हंटरनं हे शीर्षक निवडलं.

पुस्तकात हंटर बायडन यांनी आपलं व्यसनी जीवन वाचकाला आपण एक थरारक चित्रपट पहातोय असं वाटावं   अशा चित्रमय पद्धतीनं लिहिलं आहे.

हंटर बायडननं शाळेत असतानाच  अल्कोहोलची चव घेतली. कॉलेजात असताना ती चव सवय झाली. नंतर अल्कोहोलच्या संगतीनं ड्रग, कोकेन, क्रॅक, हंटर यांच्या रक्तात भिनलं. पंधराएक वर्षं हंटर व्यसनाधीन होते. परवा परवा मेलिसा नावाच्या एका स्त्रीनं त्यांना व्यसनाबाहेर काढलं.

या भानगडीत हंटरची लग्नं मोडली. त्यांची मुलं त्यांच्यापासून दूर झाली.

हंटर यांचं व्यसन तसं बातम्यात नव्हतं. हंटर यांचा भाऊ, वहिनी, पत्नी, आई, वडील, मुली, मित्रमंडळी, सहकारी,यांनाच ते व्यसन माहित होतं. प्रे. ट्रंप यांनी ते व्यसन सार्वजनीक केलं.

प्रे. ट्रंप दुसऱ्यांदा निवडणुक लढू लागले तेव्हां जो बायडन हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. बायडन या मध्यममार्गी, सरळ माणसावर टीका करण्यासाठी ट्रंप यांना काही सापडेना. ट्रंप यांना कार्यक्रम, देशाचं भलं या पेक्षा काहीही करून स्वहित साधायचं असल्यानं त्यानी बायडन यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांना बदनाम करण्याचा विचार केला. त्यात हंटर यांचं व्यसन त्यांच्या हाती लागलं.

ट्रंप जाहीर सभांतून आणि टीव्ही चर्चेमधे हंटर हा व्यसनी गुन्हेगार होता असं चित्र रंगवत. हंटर त्या काळात व्यसनांशी झगडत होते, बायडन आपल्या मुलाला व्यसनातून बाहेर काढण्याची खटपट करत होते. हे सारं प्रचार मोहिम सुरु असताना घडत होतं.

ट्रंप करोडो लोकांसमोर विचारत-कुठाय हंटर. 

हंटर व्यसनमुक्ती केंद्राच्या आतबाहेर असे. 

मग ट्रंप आपल्या भक्तांकडून वदवून घेत – लॉक हिम अप, त्याला तुरुंगात घाला.

बायडन टीव्हीच्या पडद्यावर करोडो लोकांसमोर म्हणाले ” माझा मुलगा हंटर व्यसनी झाला होता. अमेरिकेत घरोघरी आपण या समस्येला तोंड देत असतो. पण आता तो व्यसनापासून मुक्त झाला आहे, आय लव हिम.”

कोविडचं संकट, देशाची कोसळलेली अर्थव्यवस्था हे प्रश्न भेडसावत असताना हंटर बायडन ही अमेरिकेसमोरची समस्या आहे असं भासवण्याचा प्रयत्न ट्रंप करत. 

जो बायडन यांनी हंटरचं व्यसन लपवलं नाही. 

हंटरच्या व्यसनाची गोष्ट ऐकल्यानंतर अमेरिकन माणसाला राग आला नाही, तो हळहळला. कारण घरोघरी अमेरिकन माणसं या व्यसनाचा सामना करत होती. 

ट्रंप यांचा व्यसन हा बार फुसका ठरला.  मग त्यांनी हंटर बायडन हा बुरिस्मा या युक्रेनमधल्या कंपनीत संचालक होता ते प्रकरण उकरून काढलं. 

युक्रेनमधे बुरिस्मा नावाची एक ऊर्जा कंपनी होती. या कंपनीला भांडवल गोळा करायला आणि जगभर पसरायला मदत करण्यासाठी हंटर त्या कंपनीच्या संचालक मंडळावर गेला. अशी कामं करत असताना अमेरिकन  कायदाबंधनं हंटरनं पाळली. चार वर्षं अमेरिकेचे प्रेसिडेंट असताना बुरिस्माबद्दल कोणतीही आक्षेपार्ह गोष्टी अमेरिकन सरकारला सापडली नाहीत. तेव्हां काहीही करून हंटरनं बुरिस्मामधे भ्रष्टाचार, गैरव्यवहार केला, हे दाखवण्यासाठी पुरावे गोळा करून मला दे अशी विनंती ट्रंपनं युक्रेनच्या अध्यक्षाला केली. अध्यक्ष ते करेना. ट्रंपनी युक्रेनला देऊ केलेली मदत थांबवली आणि हंटर बदनामी माहिती पुरवलीत तरच मदत देऊ असं सांगितलं.

ट्रंपचा डाव फेल गेला. काहीच बदनामीकारक माहिती अध्यक्षानं दिली नाही. 

हंटरनं आपण बुरिस्मामधे काय करत होतो, तिथं कसे पोचले याचे माणसं, तारखा, बैठका यांचे तपशील पुस्तकात दिले आहेत. बुरिस्मामधे संचालक असताना आपल्याला भरपूर पैसे कसे मिळाले, त्या पैशाचा वापर आपण आपल्या भावाच्या उपचारासाठी आणि स्वतःच्या व्यसनांसाठी कसा केला हे हंटरनं लिहिलं आहे. 

हंटर स्वतंत्रपणे वकिली करत होता, सल्लागार म्हणून काम करत होता.  वर्ल्ड फूड प्रोग्रामसारख्या सेवाभावी कार्यक्रमांत तो  भाग घेत. त्यासाठी जगभर फिरत असे.याच कामासाठी लेबनॉन, जॉर्डन इत्यादी ठिकाणी काम करत असताना जॉर्डनचे राजे हुसेन यांच्याशी हंटरच्या व्यक्तिगत बैठकाही होत असत. 

हे सर्व करत असताना हंटर किती तरी दारू पीत असे.  क्रॅक तर दर तासा दोन तासानं ओढत असे. बैठक सुरु असतानाच बाथरूममधे जाऊन येतो असं म्हणे आणि क्रॅक सेवन करे. बैठक संपून आणि हॉटेलवर परतला  की दारू आणि क्रॅक. कधी कधी अनेक दिवस तो भानावर नसे, त्या काळात काम बंद असे.  

भाऊ, वडील, पत्नी, मित्र इत्यादींनी त्याना व्यसनापासून दूर नेण्याचे खूप प्रयत्न केले. पत्नी किंवा मित्र त्याला व्यसनमुकती केंद्रात नेऊन सोडत. पत्नी आणि मित्रांची पाठ फिरली की हंटर केंद्रातून बाहेर पडून हॉटेलवर जाई आणि तिथं दिवसेंदिवस व्यसनमग्न होई.

 हंटर क्रॅकचं व्यसन करताना अमेरिकेचे कायदे मोडत होता. त्याला अमेरिकेतल्या गावोगावी सहजपणानं क्रॅक मिळत होतं. पेट्रोल पंप आणि किराणा दुकानात गेलं की क्रॅक देणारी माणसं सहज सापडतात हे पुस्तकातून आपल्याला कळतं. प्रेसिडेंटचं घर, संसदेची कॅपिटॉल ही इमारत, त्याच्या आसपास खंडीभर पोलिस वगैरेंची कार्यालयं. याच्या मधोमध, रस्त्यावर,  क्रॅक सर्रास चॉकलेट आईसक्रीमसारखं विकत मिळत असे. 

हंटर क्रॅकसह सापडत असे.  हंटरनं अनेक वेळा  क्रॅकच्या प्रभावाखाली गाडीला अपघात घडवून आणले. तो बायडन याचा मुलगा आहे हे कळल्यावर पोलिस प्रकरण दाबून टाकत.त्याच्यावळ सतत क्रॅकचे बटवे असत, पण कधीही पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकलं नाही.

जो बायडन स्वतः निर्व्यसनी आहेत. अल्कोहोल, ड्रग हे कसं घातक आहे याचा अनुभव त्यानी स्वतःच्याच नातेवाईकांच्या वर्तनातून घेतला होता. घरात ते नेहमी व्यसनं करू नका, ते वाईट असतं असं बोलत. तरीही हंटर व्यसनाधीन झाला.

हंटर व्यसनाधीन का झाला असेल हा एक स्वतंत्र विषय आहे. ते त्याच्या जीन्समधे, डीएनएमधे आहे काय? वैज्ञानिक त्यावर संशोधन करत आहेत. 

मित्रांच्या संगतीनं तो व्यसनात सापडला काय? ते खरं आहे. तसं घडलंय. 

त्याचा प्रिय भाऊ बो याचं दुःखद अकाली निधन झालं याचा परिणाम त्याच्यावर झाला काय? तसंही घडलंय. 

हंटर दोन वर्षाचा असताना जो बायडन यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात हंटरची आई आणि छोटी बहीण यांचा अंत झाला या घटनेचा खोल परिणाम हंटरवर झाला काय? तसं घडलंय हे खरं आहे.

अमेरिकेत घरोघरी अशा घटना घडत आहेत. यातला त्रास देणारा भाग असा की व्यसनीना अमेरिकेत अगदी सहज ड्रग उपलब्ध होतात. ड्रग आणि बंदुक या दोन गोष्टी हा आपला जणू हक्कच आहे असं अमेरिकन माणसाला वाटतं. दोन्ही गोष्टी पुरवणारा उद्योग अमेरिकेत फोफावला आहे.

आज अमेरिकेतल्या प्रत्येक नागरिकाला आपलं मूल ड्रगच्या विळख्यात सापडेल अशी भीती वाटते. अमेरिकन विश्वशाळा ड्रगच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. 

अमेरिकेचा अघ्यक्ष. आठ वर्षं अमेरिकेचा उपाध्यक्ष. वीस वर्ष खासदार.अशा माणसाचा मुलगा ड्रगच्या आधीन जातो, त्याला बिनधास्त ड्रग मिळत रहातात. व्यसनमुक्त करण्यासाठी दुनियाभरच्या संस्था, सर्वोत्तम डॉक्टर्स इत्यादी गोष्टी उपलब्ध असूनही मुलगा व्यसनाच्या बाहेर पडू शकत नाही. 

बायडन यांची अध्यक्षीय प्रचार मोहिम सुरु असतानाच मेलिसा ही  दक्षिण आफ्रिकन स्त्री त्यांच्या प्रेमात पडली, तिनं हंटरना व्यसनमुक्त केलं. समांतर पातळीवर बायडन प्रेसिडेंट झाले. त्याच सुमारास हंटरनं हे  प्रस्तुत पुस्तक लिहायला घेतलं. 

अमेरिकन समाजाचं इतकं खरंखुरं चित्रण क्वचित वाचायला मिळतं. पुस्तक बहुपेडी आहे. त्यात हंटर या माणसाची कहाणी आहे. त्यात एक असहाय्य बाप आहे. त्यात अमेरिकेतलं राजकारण आहे. त्यात अमेरिकन समाजाची घसरण आहे.

हंटरला लिहायची, कविता करायची, चित्रं काढायची आवड होती. तो कलाकार होतील असं घरच्यांना वाटत होतं. तो वकील झाला.पण त्यांचं लिखाणाचं कौशल्य या पुस्तकातून व्यक्त झालं आहे.

हंटरवर निस्सीम प्रेम करणारे त्याचे वडील, भाऊ बो, त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणारी मेलिसा हे सौंदर्य पुस्तकात आहे.   हंटरला व्यसनाकडं नेणारं अमेरिकेतलं सामाजिक-राजकीय वास्तव ही कुरूपताही पुस्तकात आहे.

।।

Comments are closed.