कोविड, कुत्रा आणि ट्रंप

कोविड, कुत्रा आणि ट्रंप

बारा मार्च हा दिवस १० डाऊनिंग स्ट्रीटमधे, म्हणजे पंतप्राधानाच्या अधिकृत निवासाचा, धकाधकीचा होता. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे सल्लागार, विविध खात्यांतले सनदी अधिकारी आणि जॉन्सची मैत्रिण कम पार्टनर केरी सिमंड्स अशी नाना माणसं नाना निर्णयाच्या घालमेलीत होती.

कोविडनं फणा काढली होती. लशींचा पत्ता नव्हता. लॉक डाऊन करणं येवढा एकच मार्ग दिसत होता. बोरीस जॉन्सन लॉकडाऊनला तयार नव्हते. लॉक  डाऊन केला की व्यवहार थांबणार, व्यवहार थांबले की अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार. तेव्हां लॉक डाउन नको, असं  जॉन्सनचं मत होतं.

अगदी नेटकंच बोरिस जॉन्सन १० डाऊनिंग स्ट्रीटवर एका बैठकीत  चिडून म्हणाले होते- “No more fucking lockdowns – let the bodies pile high in their thousands.” भले हजारो प्रेतांचा ढीग झाला तरी चालेल पण लॉक डाऊन नाही.

आरोग्य मंत्री म्हणत होते की लॉकडाऊनला पर्याय नाही, पण जॉन्सन ऐकणार नाहीत, ते हटवादी आहेत. जॉन्सन यांचं मत होतं की वायरस पसरू द्यावा, तो सर्व जनतेत पसरला की हर्ड इम्युनिटी येईल आणि आपोआप वायरसचा नायनाट होईल. एक सल्लागार म्हणाला ” अरे माणसं मेली तर त्यांना पुरण्याची व्यवस्था आपल्याकडं आहे काय?”

आरोग्य मंत्री म्हणत होते की हेकेखोर जॉन्सनशी बोलण्यातही मतलब नाही. त्यावर जॉन्सन यांचे सल्लागार डॉमिनिक कमिंग्ज म्हणाले ” हा माणूस पंतप्रधानपदी रहाण्याच्या लायकीचा नाही.” 

कमिंग्ज आणि जॉन्सन यांच्यात खटके उडत. खटके उडायला  इतरही कारणं होती. जॉन्सनची मैत्रिण हे त्यापैकी एक कारण होतं. आणि १२ मार्च या दिवशी ते कारण धगधगत होतं.

११ मार्चच्या टाईम्समधे एक बातमी छापून आली होती. त्या बातमीत म्हटलं होतं की जॉन्सन यांची मैत्रिण त्यांच्या घरच्या डिलीन या कुत्र्यावर नाराज आहे आणि त्या कुत्र्याला घराबाहेर काढून कुत्रे मॅनेज करणाऱ्या संस्थेकडं पाठवायचा त्यांचा विचार आहे. 

टाईम्सच्या या बातमीमुळं जनतेत चर्चा झाली. ब्रीटनमधे कुत्रा हे एक फार कातर प्रकरण असतं. कुत्र्याशी नीट वागलं नाही तर ब्रिटीश माणूस खवळतो. अमेरिकेचे प्रेसिडेंट लिंडन जॉन्सन यांनी त्यांच्या आवडत्या कुत्र्याला प्रेमानं त्याच्या कानाला धरून उचललं तेव्हां कोण खळबळ माजली होती. तेव्हां या बातमीमुळं केरी भडकल्या होत्या आणि त्यांनी बोरीस जॉन्सनपाठी भुणभुण लावली होती की त्यांनी टाईम्सला पत्र लिहून बातमीचं खंडन करावं. जॉन्सन तयार नव्हते. 

कोविडचं काय करायचं याची चिंता असताना सिमंड्स बाईंची कटकट चालली होती की टाईम्सला पत्र लिहावं,टाईम्सच्या संपादकाशी फोनवरून बोलून आपला राग व्यक्त करावा, बातमी खोटी आहे वगैरे. इकडं माणसं मरत आहेत आणि इकडं बाईना कुत्र्याच्या बातमीची पडलीय.  १० डाऊनिंग स्ट्रीटवरचे लोक त्यामुळं चांगलेच कातावले होते.

तेवढ्यात आणखी एक भानगड झाली. अमेरिकेतून डोनल्ड ट्रंप यांचा फोन आला. इराकमधल्या  एका तळावर अमेरिकन विमानं हल्ला करणार आहेत, त्या हल्ल्यात ब्रीटननं भाग घ्यावा, त्या हल्ल्याला संमती द्यावी असं ट्रंपच्या सहकाऱ्यानं जॉन्सनना विनवलं.

कोविड आणि केरी या चिंतांचा सामना करताना ही एक नवी भानगड उपटली.

ट्रंप हल्ला करायला निघालेच होते, त्यांना घाई होती.

सुरक्षा सल्लागार, लष्करी सल्लागार, १० डाउनिंग स्ट्रीटवर पोचले. त्यांनी माहिती गोळा केली. आदल्या दिवशी इराकमधील ताजी या दोस्त राष्ट्रांच्या तळावर हवाई हल्ला झाला होता आणि त्यात दोन अमेरिकन व एक ब्रिटीश सैनिक ठार झाले होते.ट्रंप यांचं म्हणणं होतं की कताईब हेझबुल्ला या इराणनं स्पॉन्सर केलेल्या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला केला होता. तेव्हां या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी कताईबच्या तळावर हवाई हल्ला केला पाहिजे असं ठरवून अमेरिकेनं हालचाली सुरु केल्या होत्या.

मुळात हा हल्ला कताईबनं केला होता याचे पुरावे नव्हते. खुद्द अमेरिकन लष्करातही त्याबद्दल दुमत होतं. दुसरं असं की समजा कताईबनं हल्ला केला असेलही तरी त्यांच्या तळावर हल्ला करताना विचार करायला हवा. कारण तो तळ नागरी वस्तीत असल्यामुळं हल्ल्यात निष्पाप नागरीकही मारले जातील.

बोरिस  जॉन्सन यांच्या सल्लागारांनी सांगितलं की अमेरिकन हल्ल्याला पाठिंबा देऊ नये. जॉन्सन यांच्यापुढे पेच होता.एक तर जॉन्सन-ट्रंप दोस्ती होती.दुसरं म्हणजे अमेरिका-ब्रीटन हे इराक मोहिमेतले भिडू होते.

एक मुद्दा असाही होता की सहकारी देशांशी सल्ला मसलत न करता एकतरफी निर्णय घेणं योग्य आहे की नाही.

ब्रिटीश सल्लागारांनी विचार करुन मत द्यायला संध्याकाळ उजाडली. पण तो सल्ला घेण्याच्या आधीच ट्रंप हल्ला करून मोकळे झाले होते.

१२ मार्च २०२१ रोजी घडलेल्या घटना समजल्यावर ब्रिटीश पंतप्रधानांचे निर्णय कसे होते, त्यांचे सल्लागार कोण असतात, कोणत्या दबावाखाली त्यांना काम करावं लागतं याचा पत्ता लागतो. निर्णय घेणारे भले मंत्री असोत, सनदी नोकर असोत, शेवटी ती माणसंच असतात. त्यामुळं त्यांचे रागलोभही असतात. पंतप्रधानाची पत्नी किंवा मैत्रीण हा दबाव साधासुधा नसतो. पंतप्रधानांना जवळची माणसं दबाव आणतात आणि पंतप्रधानांच्या व्यक्तिगत प्रभावाखाली नसणाऱ्या माणसांना अवहेलना, दुरावा सहन करावा लागतो. कमिंग्ज यांच्याकडं जॉन्सननी राजिनामा मागितला आणि कमिंग्जनी काही दिवसांनी तो दिलाही.

हे सर्व आपल्याला पेपरात वाचायला मिळतं ही गोष्ट महत्वाची. त्यातही आणखी एक उपगोष्ट म्हणजे खुद्द कमिंग्ज यांनीही कोविड कायदे मोडून प्रवास केला होता आणि त्याचीही भरपूर वाच्यता पेपरांनी केली होती.

कमिंग्ज यांनी बोरीस जॉन्सन यांच्या कार्यपद्धतीवर खाजगीत, सहकाऱ्यांमधे टीका केली. ती पेपरांत पाझरली. हे पाझरणं योग्य की अयोग्य अशी चर्चाही झाली. पण ब्रीटनमधे या चर्चेला पेपर धूप घालत नाहीत. पंतप्रधान, मंत्री, सरकार,इत्यादी लोकांचं वागणं हे शेवटी जनतेच्या हिताशी संबंधित असल्यानं त्याची तहकीकात झाली पाहिजे यावर ब्रिटीश पेपरांचं एकमत आहे, अनेक शतकं.

कमिंग्ज यांनी पाझरू दिलेली माहिती आणि त्यांचं वर्तन याचीही जाहीर चौकशी पेपरांनी केली. बाहेर पाझरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी संसदेनंही एक कमिटी नेमली आणि त्या कमिटी समोर कमिंग्ज यांना साक्ष द्यावी लागली.

मुद्दा असा की सरकार, सत्ताधारी पक्ष, सत्ताधारी व्यक्ती यांच्यावर लक्ष ठेवायलं हवं, त्यांच्या वर्तनाची जाहीर तपासणी होणं समाजाच्या हिताचं असतं. ब्रिटीश पेपर ते तत्व पाळतात आणि ब्रिटीश जनताही अशा  तपासणीचा पाठपुरावा करते. १२ मार्च रोजी घडलेल्या तीन घटनांचा अगदी तासातासाचा धांडोळा त्यातल्या माणसांसह पेपरांनी घेतला आहे.

ही आहे ब्रिटीश वर्तमान पत्रांची, पत्रकारीची परंपरा. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता माहिती गोळा करणं आणि प्रसिद्ध करणं.

।।

Comments are closed.