ईलॉन मस्क. एक चक्रम माणूस.

ईलॉन मस्क. एक चक्रम माणूस.

इलॉन मस्क यांनी निर्माण केलेली स्टारलिंक ही उपग्रह-इंटरनेट व्यवस्था आता एक चिंतेचा, चर्चेचा  विषय झालीय. युक्रेनच्या वापरात असलेली ही व्यवस्था लष्करी उपयोगासाठी वापरण्यासाठी इलॉन मस्क परवानगी नाकारू पहात आहेत. ही व्यवस्था युक्रेननं रशियाच्या तळावर ड्रोनहल्ले करण्यासाठी वापरू नये असं मस्क सांगू पहात आहेत.

 वैतागलेल्या युक्रेनच्या लष्कर प्रमुखांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा इलॉन मस्कच्या धमकीवर चर्चा सुरू केलीय.

इलॉन मस्कची स्पेस एक्स ही कंपनी दर आठवड्याला एकदा तरी रॉकेट उडवते. या रॉकेटला डझनभर उपग्रह (सॅटेलाईट) जोडलेले असतात. एकेक उपग्रह एकाद्या सोफ्याच्या आकाराचा असतो. हा उपग्रह पृथ्वीवरच्या  केंद्राला जोडलेला असतो. पृथ्वीवरून या उपग्रहाकडं संदेश जातात, उपग्रहाकडून पृथ्वीवरच्या केंद्राकडं संदेश येतात. उपग्रह ते उपग्रह ते केंद्र ते केंद्र ते उपग्रह अशी संदेश वहनाची साखळी तयार करण्यात आलीय.

आज घडीला   ४५०० उपग्रह स्पेस एक्सनं अंतराळात सोडलेले आहेत.  

जगातले सुमारे ९० देश स्टारलिंक ही इंटरनेट सेवा वापरतात. त्यात अमेरिका आहे, रशिया आहे, युरोपातले देश आहेत, चीन आहे, तैवान आहे, युक्रेन आहे.

अमेरिकन लष्कर स्टारलिंकचा वापर करतं. स्टारलिंक वापरून अमेरिकन ड्रोन बाँब टाकतात, शत्रुपक्षाची टेहळणी करतात, शत्रु पक्षाचे रणगाडे कसे फिरत आहेत याची पहाणी करतात, शत्रूची विमान कुठून उडत आहेत ते टेहळतात.

  रशियन लष्करही स्टारलिंकचा वापर करतं. चीन आणि तैवान हे दोन परस्पर शत्रुही स्टारलिंकचा वापर करतात.

काही दिवसांपूर्वी रशियाच्या विमानानं युक्रेनवर बाँबवर्षाव केला आणि युक्रेन वापरत होता ती इंटरनेट सेवा उध्वस्थ केली. युक्रेन सरकार आणि लष्कर अपंग झालं. युद्ध सोडाच पण वीज आणि पाणी व्यवस्थाही कोसळली. कारण सर्व सेवा इंटरनेटमुळं चालत असतात. 

शहरातल्या बसगाड्या इंटरनेट वापरतात, बँका इंटरनेट वापरतात.खाणावळीत पदार्थ खाल्यावर त्याचं बिल इंटरनेट सेवेमुळंच तयार होतं आणि त्या बिलाची रक्कमही इंटरनेटमुळंच ग्राहकाच्या कार्डवरून खाणावळीच्या खात्यात जमा होते. माणूस दुकानात वस्तू खरेदी करून काऊंटवर उभा रहातो. वस्तूचा दर आणि त्यांची संख्या इत्यादी हिशोब करून बिल तयार होतं आणि ते गिऱ्हाईकाच्या खात्यावरून दुकानाच्या खात्यात जातं.तेही इंटरनेटवरून. 

वीज गेली की खाणावळ आणि दुकानांची व्यवस्था कोसळते.धावपळ उडते.

 रशियानं शहरांचं इन्फ्रास्ट्रक्चर उध्वस्थ केल्यावर युक्रेनचे वांधे झाले. काही तरी व्यवस्था करणं भाग होतं.युक्रेननं स्टारलिंकशी संपर्क साधला. इलॉन मस्कनी तत्काळ युक्रेनमधल्या काही शहरांसाठी स्टारलिंकची तजवीज केली. हवेत उपग्रह होतेच. युक्रेनच्या जमिनीवर केंद्रं उभारणं बाकी होतं. मस्कनी ती व्यवस्था केली. युरोपातून रिसीव्हर यंत्रं काही तासांत पोचवली. युक्रेनी माणसांचे व्यवहार सुरु झाले, युक्रेनी सैन्याची रशियाबरोबरची हाणामारी सुरु झाली.

इलॉन मस्क आणि त्याची स्टारलिंक फी घेऊन ही व्यवस्था पुरवते. अवकाशात उभारलेल्या या व्यवस्थेची वर्षाची उलाढाल १८० अब्ज डॉलरची आहे. (ही व्यवस्था कार्यक्षम नाही, मंदगती आहे, तिनं हवेत फेकलेले उपग्रह निरूपयोगी होऊन अवकाशातला कचरा वाढवणार आहेत असं जाणकारांचं मत आहे.)

स्टारलिंक ही खाजगी सेवा आहे, ती एक खाजगी कंपनी आहे. तिच्यावर मस्क यांची व्यक्तिगत मालकी आहे. स्पेस एक्स, एक्स,  टेसला या मस्कच्या कंपन्या आहेत. 

मस्कची संपत्ती २२५ अब्ज डॉलर आहे. ग्रीस, अल्जेरिया, हंगेरी, इथियोपिया इत्यादी अनेक देशांचं जीडीपी मस्कच्या संपत्तीपेक्षा कमी आहे. तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे.  

अडचण अशी की मस्क हा एक उडाणटप्पू माणूस आहे, लहरी आहे, त्याच्या एकूणच कल्पना आणि विचार विक्षीप्त आहेत.   हाती असलेल्या संपत्तीचा तो कसा वापर करेल ते सांगता येत नाही.

मस्क हा काही तंत्रज्ञ नाही, त्याचं शिक्षणही धडपणे झालेलं नाही. बाजाराचे खेळ त्याला जमले म्हणून तो श्रीमंत झाला. अर्थव्यवहाराचे काही नियम असतात, शिस्त असते, काही मूल्यं असतात हे त्याला समजत नाही.ट्विटर या कंपनीशी त्यानं केलेले खेळ हे एक मस्क समजून घेण्याचं चांगलं उदाहरण आहे.

ट्वीटर ही कंपनी माहितीचा प्रसार करणारी सोशल मिडिया कंपनी. ट्विटर तोट्यात चालत होती. मस्कनी ट्विटर खरीदायचं ठरवलं. ट्विटर चालवणाऱ्यांचा मस्कना विरोध होता. त्यांना रोखण्याचे प्रयत्न ट्विटरच्या चालकांनी केले. मस्कनी आपल्या टेसला या कंपनीचे पैसे वापरून ४४ अब्ज डॉलर खर्च करून ट्विटरवर ताबा मिळवला. ट्विटरमधे काम करणाऱ्या माणसांनी मस्क यांच्याशी असहकार पुकारला. मस्कनी कंपनी तोट्यात चालतेय असं कारण दाखवून हजारो माणसांना नोकरीतून काढून टाकलं. मस्कना ट्विटर चावण्यासाठी कारभारी मिळेना. ट्विटर म्हणाले की कुत्र्याची त्या जागी नेमणूक करून ट्विटर चालवतील. शेवटी आपला ताबा वापरून मस्कनी काय केलं तर ट्रंप यांच्यावरची बंदी उठवली. ट्रंप ट्विटरवरून विखारी अपप्रचार करतात, हिंसेला चिथावणी देतात या कारणानं ट्विटरनं ट्रंपना ट्विटर वापरायला बंदी घातली होती. मस्कनी ती उठवली.

केवळ बाजार खेळता येतो, लोकांनी तयार केलेल्या कंपन्या पैशाच्या बळावर विकत घेता येतात म्हणून हा माणूस उद्योगपती झाला. तो कुठल्याही (राज्याच्या किंवा केंद्राच्या) विधीमंडळात निवडून येत नाही. तरीही केवळ पैशाच्या जोरावर अमेरिकेचं सार्वजनीक धोरण ठरवू पहातोय. 

काही दिवसांपूर्वी मस्कनं जाहीर केलं की त्याच्याकडं युक्रेन संघर्षावर एक उत्तर तयार आहे, एक प्रस्ताव तयार आहे. तो प्रस्ताव काय आहे ते मस्क बोलला नाही. पण साधारणपणे रशियानं युक्रेनचा गिळलेला प्रदेश युक्रेननं रशियाला सुपूर्द करावा आणि युद्द थांबवावं असं काही तरी तो सुचवत होता. बोलण्यामुळं जगात एकदम भीतीची लाट उसळली.  

इलॉन मस्कसारख्या अनियंत्रीत माणसावर अवलंबून रहावं लागू नये म्हणून युरोपीय देश आता स्वतःच्या इंटरनेट यंत्रणा उभारण्याच्या प्रयत्नात लागल्या आहेत.  

 ट्रंप  रीतसर निवडणुकीत निवडून येऊन प्रेसिडेंट झाले आणि अमेरिकेतली लोकशाही संपवण्याचा घाट घातला. उत्तर कोरियाचा वेडा नेता किम याच्याशी ट्रंप यांची दोस्ती. निवडणुकीत हरल्यावर ट्रंप अमेरिकन संसदेवरच हल्ला करायला निघाले होते. मस्क हा त्यांचा दोस्त 

एक जण लोकशाहीच्याच वाटेनं समाजाची वाट लावतो, दुसरा आपली आर्थिक शक्ती वापरून समाजाची वाट लावू पहातो.

।।

Comments are closed.