पुस्तक. सत्यजीत रे यांचे चित्रपट विषयक विचार

पुस्तक. सत्यजीत रे यांचे चित्रपट विषयक विचार

 Our Films, Their Films हा सत्यजीत रे यांचा लेखसंग्रह १९७६ साली प्रथम प्रसिद्ध झाला. त्यामधे त्यांनी लिहिलेले २५ लेख एकत्र करण्यात आले आहेत.

लेख आजही वाचावेसे वाटतात. 

सत्यजीत रे हा चित्रपटाची सगळी अंगं व्यक्तिशः हाताळणाऱ्या वस्ताद दिक्दर्शकांपैकी एक होता.पटकथा, फोटोग्राफी,संगित, संकलन, पोस्टर्स, दिक्दर्शन, कलादिक्दर्शन ही सगळी अंगं त्यांना अवगत होती,ते लीलया हाताळत असत. प्रत्येक फ्रेममधे रे डोकावतात आणि दृश्य कसं दिसेल ते पहातात, त्यांना योग्य वाटेल तो कोन आणि कॅमेऱ्याची जागा ते नक्की करतात. छायाचित्रकाराला जवळ जवळ कामच नसतं.

कलाकार पारंगत झाला की त्याची मतं घट्ट होतात, ते स्वाभाविकच असतं. घट्ट मतं झाली की इतर कलाकारांकडं पहाण्याची दृष्टी प्रदुषीत होते, पूर्वग्रह तयार होतात.तेही स्वाभाविक आहे. प्रगल्भ कलाकार इतरांच्या कलेबद्दल बोलणं टाळतात. प्रस्तुत पुस्तकात रे यांनी जगातल्या अनेक वस्ताद दिक्दर्शकांवर लिहिलंय,पण त्यात पूर्वग्रह टाळलेले आहेत. मोकळेपणानं रे त्यांच्याकडं पहातात, त्यांची थोरवी वाखाणतात. फार क्वचित असं घडतं.

 स्थानिकता आणि वैश्विकता हे चित्रपटाचं  मुख्य लक्षण, आत्मा. सत्यजीत रे बंगाली होते. त्यांची ची मुळं बंगाली संस्कृती आणि वहिवाटीत होती. चित्रपट हा कलाप्रकार पश्चिमेत जन्मला आणि आकाराला आला. चित्रपटाचं तंत्र अमेरिका, युरोप, जपान या ठिकाणी विकसित झालं. रे यांनी चित्रपटाचं तंत्र तिथून घेतलं, आत्मसात केलं. बंगाली आणि बंगालेतर अशा दोन घटकांचं मिश्रण त्यांनी साधलं. 

चित्रपटाचा इतिहास, १९२० ते १९७०, रे यांनी त्यांना आवडलेले चित्रपट आणि दिक्दर्शक यांचा शब्दचित्रांतून या पुस्तकात मांडलाय. 

पुस्तकाची शैली रे यांच्या चित्रपटासारखीच प्रभावी आणि पटकन   पाझरणारी आहे. ग्रिफिथ, कीटन, फोर्ड, चॅप्लीन यांच्यापासून रेनवार, गोदार, त्रुफॉ, कुरोसावा, डिसिका हे दिक्दर्शक साठेक वर्षांपूर्वी होऊन गेले. रे यांच्या प्रस्तुत पुस्तकात ते ताजेतवाने होऊन आपल्यासमोर येतात, वाचताना थोडे कष्ट घेतले तर ती मंडळी आजचीच आहेत असं वाटू लागतं, आपल्या परिचयाची आहेत असं वाटू लागतं.  

‍‌{}

भारतीय चित्रपट या विभागातले लेख असे आहेत. भारतीय चित्रपट. बनारस डायरी. बंगाली चित्रपट. जलसा घर. रे यांच्या चित्रपट कलेचे काही पैलू. गाणी, संगीत. भारतीय न्यू वेव. रेनवार. इटालीयन चित्रपट. हॉलीवूड. ब्रिटीश चित्रपट.जपानी चित्रपट शैली. रशियन चित्रपट. अकिरा कुरोसावा. न्यू वेव. मूकपट. जॉन फोर्ड.

What Is Wrong with Indian Films?  ❖ Extracts froma BanarasDiary.❖ A Long Time on the LittleRoad  Problems of a Bengal Film Maker. ❖Winding Route to a Music Room Film Making.❖The Odds against Us.❖Some Aspects of My Craft.❖Those Songs.❖Meetings with a Maharaja. ❖An Indian New Wave? ❖ Four and a Quarter .

परदेशी चित्रपट विभागातले लेख असे.Renoir in Calcutta.❖Some Italian Films I Have Seen.❖Hollywood Then and Now. ❖Thoughts on the British Cinema. ❖ Calm Without,FireWithin.❖Moscow Musings.❖ The Gold Rush. ❖ Little Man, BigBook. ❖ Akira Kurosawa.                         ❖  Tokyo,KyotoandKurosawa.❖ New Wave and Old Master.❖ Silent Films.❖  A Tribute to John Ford 

फ्रेंच नव चित्रपटांचा काळ ज्याँ रेनवार यांच्या चित्रपटांपासून सुरु होतो. रेनवार, त्रुफॉ, गोदार. या मंडळींनी तंत्रज्ञान आणि गल्ला यानं लडबडलेल्या हॉलीवूड चित्रपटांपासून फारकत घेतली होती.

रेनवार सत्यजीत रे यांच्यासोबत कलकत्यात होते. पाकिस्तानातून होडक्यानं भारतात आलेलं एक कुटुंब त्यांना दिसलं.

‘वाटेत त्यांनी किती धाडसं केली असतील नाही? मला खात्री आहे त्यावर एक चांगली फिल्म होईल? भारतीय चित्रपटकार नक्कीच तशी फिल्म करतील’ रेनवार म्हणाले.

दिक्दर्शकाला विषय कुठं सापडतात ते लक्षात येतं. विषय शोधावे लागत नाहीत, ते सभोवतालच्या जीवनात असतात.

हा रेनवार यांचा भाबडेपणा आहे असं रे यांना वाटलं. रे म्हणाले ‘भारतीय माणूस यावर चित्रपट करेल असं वाटत नाही. त्याला हॉलिवूडच्या निसरड्या कृत्रीमतेकडून प्रेरणा मिळते, आपल्या सभोवतालचं वास्तव त्यांना प्रेरित करत नाही.’

 मानवी नात्यातला सच्चेपणा, मानवी भावनांतला सच्चेपणा हे रेनवार यांच्या चित्रपटाचं मुख्य लक्षण असे. रेनवार यांचा हा विचार सत्यजीत रे यांना त्यांच्या चित्रपटात अमलात आणला.

पुस्तकात रेनवार यांची अनेक अवतरणं आहेत, रेनवार रे यांना कसे समजले ते पुस्तकात वारंवार वाचायला मिळतं.

{}

रे यांच्यावर अकिरा कुरोसावा यांचाही खूप प्रभाव होता. प्रस्तुत पुस्तकात दोन धडे कुरोसावा यांच्यावर आहेत.

कुरोसावा यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्यं अगदी थोडक्यात रे आपल्याला सांगतात.

साधेपणा. जपानी चित्रकार ब्रशचे अगदी हलके फटके मारून कमीत कमी रेषात चित्र काढतात. फुजियामा हा पर्वत वरून बर्फाच्छादित असतो पण आतून तो धगधगत असतो. तशीच कुरोसावा यांची शैली. कुरोसावांना ॲक्षन हवी असते. कथा, पात्रं, घटना सतत गतीमान असतात. मूव्ही हा शब्द मूवमेंट या शब्दावरुन आलाय, चित्रपटात सतत मूवमेंट असली पाहिजे असं कुरोसावा म्हणत. जपानी वातावरण, जपानी संस्कृतीत कुरोसावांची मुळं घट्ट आहेत. पण त्यांनी युरोप आणि अमेरिकेतून चित्रपट निर्मितीचं तंत्र व प्रेरणा घेतली. डिसिका, ग्रिफिथ, फोर्ड हे त्यांचे गुरु असल्यागत होते.

{} 

 चित्रपट निर्मितीचा अभ्यास करण्यासाठी रे रशियात गेले होते.  रशियन चित्रपटांचा दर्जा सुमार होता.चित्रपट काढण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत असे. विषय कोणता असावा किवा नसावा याचा निर्णय सरकार घेत असे.एका निर्माता दिक्दर्शकांशी चर्चा करत असताना रशियात विनोदी चित्रपट कां निर्माण होत नाहीत असा मुद्दा निघाला. तो दिक्दर्शक हसला आणि म्हणाला की विनोदाचं रशियाला वावडं आहे. 

{}

 रेनवार, गोदार यांचे सिनेमे राजकीय असत. 

रे यांना कोणी विचारलं की भारतात राजकीय चित्रपट निघू शकेल काय. रे हसले. म्हणाले शक्य नाही. प्रश्न विचारणाऱ्याला रे म्हणाले ‘मला सांग, भारतातल्या भ्रष्ट पुढाऱ्याचं चित्रण मी करू शकेन काय?’ 

{} 

गोदारच्या मॅस्क्युलीन-फेमिनीन चित्रपटातलं सुरवातीचं  दृश्य रे पुस्तकात अवतरतात.

‘तरुण तरुणी रेस्टॉरंटमधे एकमेकापासून वीसेक फूट अंतरावर टेबलावर बसलेली असतात, बोलत असतात. ते दूरवर असल्यानं ते काय बोलतात ते ऐकू येत नाही. बाहेर खूप ट्रॅफिक आहे, खूप आवाज आहेत. तेच जास्त तीव्रतेनं ऐकू येत असतात. त्या दोघांचं बोलणं ऐकू येत नाही.सामान्य चित्रपटात त्या दोघांचं बोलणं ऐकवलं जातं. गोदार ते ऐकवत नाही, त्यांचा आवाज खाऊन टाकणारा ट्रॅफिकचा आवाज ऐकवतो.  कारण ते वास्तव असतं. 

रेस्टॉरंटमधलाच एक माणूस उठून बाहेर जातो. एक तरुणी त्याच्या मागोमाग बाहेर पडते, हँडबॅगेतून पिस्तूल काढून त्या माणसाला गोळ्या घालते. तरूण मुलगा मुलगी या बद्दल काही तरी कॉमेंट्स करतात पण सभोवतालच्या आवाजांमुळं ते काय बोलले ते कळलं नाही.दृश्य संपलं. 

नंतर ते तरूण तरुणी चित्रपटाचा मुख्य बिंदू रहातातच. पण त्या खुनाचं पुढं काहीही होताना दिसत नाही.

रे लिहितात ‘कोणी असं म्हणेल की हे दृश्य निर्रथक आहे. ते तरूण तरुणी काय बोलतात ते ऐकायलाच येत नसेल तर दृश्याला काय अर्थ आहे. पण इथंच शैलीतलं वेगळेपण आहे. चित्रपटाचं व्याकरण सांगतं की चित्रपटातल्या मुख्य भागावर जोर दिला पाहिजे. गोदार विचारतो की मुख्य गाभा काय. तो मुलगा मुलगी हाच मुळी गोदारच्या मते चित्रपटाचा मुख्य गाभा नाही. सभोवताली नाना घटना घडतात, सभोवताली कोलाहल असतो हाच चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. तथाकथित मुख्य पात्र नव्हे तर नेपथ्यच महत्वाचं आहे असा गोदारचा मुद्दा आहे…..’

गोदार यांच्यापासूनच नवं चित्रपटाचा काळ सुरु होतो असं सांगताना वरील गोष्ट रे यांनी सांगितली आहे.

{}

सत्यजीत रे कसे घडले असतील याची कल्पना प्रस्तुत पुस्तकातून येते.

—००—

Comments are closed.