खाण्यापिण्याच्या खिडकीतून जग दाखवणारा शेफ, बोर्डेन.

खाण्यापिण्याच्या खिडकीतून जग दाखवणारा शेफ, बोर्डेन.

अँथनी बोर्डेननं छताला दोर टांगून त्यात आपली मान अडकवून घेतली. हॉटेलमधे. तो रात्री डीनरला आला नाही, सकाळी न्याहरी घ्यायला आला नाही म्हणून चिंतेत पडलेला त्याचा मित्र हॉटेलमधल्या बोर्डेनच्या खोलीवर गेला तेव्हां दार तोडल्यावर बोर्डेनचा देह टांगत्या अवस्थेत त्याला दिसला. पार्टस अननोन या मालिकेच्या चित्रीकरणासाठी तो फ्रान्समधल्या एका हॉटेलात मुक्कामाला होता, स्ट्रासबर्ग या गावात तो चित्रीकरण करणार होता.

बराक ओबामानी ट्वीट केलं ” त्यानं आम्हाला अन्नपदार्थ शिकवले, अन्नपदार्थ आपल्याला कसं एकत्र आणतं ते शिकवलं. अज्ञाताबद्दल आपल्याला असणारी भीती त्यानं कमी केली. त्याची आठवण येतेय. वुई मिस हिम.” करोडो माणसं हळहळली. सोशल मिडियावर अगणीत हळहळ पोस्टी प्रकटल्या.

सीएनएनवर होणारी बोर्डेनची जगभरची भटकंती करोडो माणसं मिटक्या मारत पहात असत. बोर्डेन वर्षातले २५० दिवस जगात भटकत असे, आपलं अमेरिकेतलं घर सोडून. हा शेफ माणूस जगात कुठंही जाऊन तिथले पदार्थ चाखत असे, त्या पदार्थांची गंमत जगाला सांगत असे, ते पदार्थ कसे करतात तेही दाखवत असे.  पदार्थांबाबत बोलत असताना तो तिथल्या संस्कृतीबद्दलही बोलत असे. खरं म्हणजे बोलत नसे, तिथली संस्कृती तो दाखवत असे.

प्रत्येक स्थळाची एक खाद्य संस्कृती असते. स्थानिकांना त्यांचे पदार्थ फार प्यारे असतात. स्थानिक माणसं ते पदार्थ पिढ्यान पिढ्या जपत असतात. बोर्डेन जागोजागच्या खाद्यसंस्कृतीचा आदर करे. अमेरिकन माणसं जिथं जातात तिथं आपलं खाणं लादत फिरतात. अमेरिकन असूनही बोर्डेन जिथं जाई तिथलं खात असे, अगदी प्रेमानं. म्हणूनच त्यानं नागाचं हृदय खाल्लं, मेंढीच्या गोट्या खाल्ल्या, डुकराचं गुदद्वार  खाल्लं, फर्मेंट केलेला शार्क खाल्ला. जगातल्या सर्व प्राण्यांचे खाल्ले जातात ते  सर्व अवयव बोर्डेननं खाल्ले. कारण त्या त्या ठिकाणची माणसं ते ते खात होती.

बोर्डेनचा शाकाहारावर खुन्नस होता. तरीही भाजांचं महत्व त्याला पटलेलं होतं.अमेरिकन माणसं फार मांस खातात त्यांनी भाजाही खाल्ल्या पाहिजेत असं तो सांगे. पंजाबमधे त्यानं नान, रोटी, पनीर मटर, सरसोंका साग खाल्लं. अगदी प्रेमानं. शाकाहाराबद्दलचं आपलं मत बदललं असं त्यानं पंजाबात कबूल केलं. त्यानं  प्रेक्षकांना सांगितलं की पदार्थंना चव आणण्यासाठी अमेरिकन वापरतात ते  मसाले पंजाबातल्या मसाल्यांपुढं काहीच नाहीत, त्यांनी पंजाबी मसाले वापरायला सुरवात करावी.

गावात गेला की तिथल्या पदार्थांच्या तो प्रेमात पडत असे. त्याच्या मते जगातले सर्वात उत्तम पदार्थ जपानमधे तयार होतात. त्यानंतर नंबर इटालीचा. जपान, इटाली इथली लोकं त्यांचे परंपरागत पदार्थ जपतात याचं त्याला फार कौतुक होतं. इटालीचा पाश्ता म्हणजे जगातला सर्वोत्तम  पदार्थ आहे असं त्याचं मत.  कोणी इटालीयन पाश्त्याच्या करणीत ढवळाढवळ केलेली त्याला खपत नसे.

कुठल्याही गावात गेला की तिथल्या गृहिणी पदार्थांचे घटक जिथून गोळा करतात त्या स्थानिक मार्केटात तो जात असे, रस्त्यावर वाट्यानं भाजी किंवा मासळी विकणाऱ्यांकडं तो जात असे. गावातलं मार्केट, तिथले विक्रेते, तिथल्या गृहिणी, त्यांची स्वयंपाकघरं, स्वयंपाकी या साऱ्या गोष्टी तो लोकांना दाखवे.

एकदा त्यांनी इराणमधले पदार्थ दाखवले. तेव्हां इराण आणि अमेरिका यांच्यात फार मारामारी चालली होती. अमेरिकन माणसाच्या लेखी इराण म्हणजे राक्षस होता. कार्यक्रमात इराणी वातावरण आणि पदार्थ पहाणाऱ्यांना इराण समजला. इराणची बंद झालेली खिडकी बोर्डेननी उघडली. अगदी तसंच म्यानमारबाबत आणि वियेतनामबाबत घडलं. नकाशावर हे दोन देश आहेत येवढंच लोकांना माहित होतं. मनात त्या देशांबद्दल काहीशी अढीच होती. बोर्डेनचे कार्यक्रम पाहिल्यावर लोकं त्या देशाच्या प्रेमात भले पडले नसतील. पण तिथली माणसं त्यांना कळली मात्र. शत्रू वियेतनाम लोकांना माहित होता.  तिथल्या गृहिणी,  तिथली स्वयंपाकघरं,  दुकानं, मार्केटं कुठं माहित होती. आणि तेच तर खरं जग असतं. प्रेसिडेंट, पंतप्रधान आणि सेनापती म्हणजे देश नव्हे. हे बोर्डेनच्या कार्यक्रमात दिसे. बोर्डेननं कधीच लेक्चर बिक्चर मारलं नाही. तिथली माणसं आणि जगणं तो दाखवत असे, मजेत. बस्स.

बोर्डेनचे कार्यक्रम म्हणजे टीव्ही पत्रकारी होती. बोर्डेन न्यू यॉर्कमधे एका रेस्टॉरंटमधे शेफ होता. त्यानं एकदा न्यू यॉर्करमधे एक लेख लिहिला. शेफ लोकांचं खरं जग, किचनमधलं खरं जग त्यानं भीडभाड न ठेवता त्या लेखात मांडलं. तिथली घाण, तिथला दंगा सारं सारं. रेस्टॉरंटात मिळणाऱ्या पदार्थात किती भरमसाठ मीठ असतं ते त्यानं सांगितलं. चुलीत घाला डॉक्टर, लोणी हे अजिबात वाईट नसतं, ते मजबूत खाल्लं पाहिजे असंही त्यानं सांगितलं. जनतेनं असं कधीच वाचलेलं नव्हतं. बोर्डेनचा लेख गाजला. एका प्रकाशकानं बोर्डेनला ५० हजार डॉलर देऊन पुस्तकाचा करार केला. बोर्डेनचं पुस्तक बेस्ट सेलर झालं. पुढलं आणि त्याच्या पुढलं अशी पुस्तकं दणादण खपत गेली. मग त्याचे टीव्हीवरचे कार्यक्रम सुरु झाले. अशा रीतीनं तो पत्रकार नसलेला माणूस, लेखक नसलेला माणूस पत्रकार झाला, लेखक झाला.

बोर्डेन मनस्वी माणूस होता. दारू, ड्रग्ज, सिगारेट इत्यादीवर त्यानं मनापासून प्रेम केलं. कॉलेजच्या काळात तरूण जसे बेभान आणि बिनधास्त असतात तसा तो आयुष्यभर राहिला. तो स्वतःचं जगत होता आणि त्यातून त्याला जे काही वाटत असे ते बोलत, लिहित असे. जगाला फाट्यावर मारणारा पण सामान्य माणसाचा आदर करणारा, सामान्य माणसाच्या जगण्यावर प्रेम करणारा माणूस.

तत्वज्ञ काय म्हणतात, शहाणी माणसं काय म्हणतात, अभ्यासक काय म्हणतात, नेते काय म्हणतात, परमेश्वर काय म्हणतात इत्यादीशी त्याचा संबंध नव्हता. आपल्याला जे जे दिसतं ते ते तसंतसं व्यक्त करायचं. आपलं मत. आपले अनुभव. वस्तुनिष्ठ नाही. मला जे दिसतं, मला जे वाटतं ते लिहायचं. लेखक जसा असतो, पत्रकार जसा असतो, तसा या शैलीतून समोर येतो.

साठीच्या दशकात अमेरिकेत अशी पत्रकारी सुरु झाली. हंटर थॉम्सनच्या लिखाणापासून. थॉम्सननं Hell’s Angels हा वृत्तांत, पुस्तक लिहिलं. तिथपासून. हे पुस्तक बाईकस्वारांच्या जगाबद्दल होतं.

बाईकस्वार म्हणजे  मोटार सायकल हेच आयुष्य असणारी माणसं. बाईकवरून देशभर फिरत रहायचं. त्यांचा बिस्तरा कायम बाईकच्या पाठी बांधलेला असे. त्यांच्या घरची माणसंही वैतागत कारण त्यांना घर नसे, ते कायम बाईकवर असत. या बाईकस्वारांच्या टोळ्यामधे संघर्ष होत असे, मारामाऱ्या खून होत असत. साठीच्या दशकात अमेरिकन गुन्हेगारी जगात या बाईकवाल्यांचा भाग मोठा होता. बाईकस्वारांची युद्धं हा बातमीचा विषय असे.

थॉम्सन बाईकस्वारांच्या एका टोळीत जाऊन राहिला, सहा महिने. त्यांचं दैनंदिन जगणं त्यानं अनुभवलं आणि त्यावर प्रथम पुरुषी एक वचनी वृत्तांत लिहिला. जे दिसलं ते लिहिल्याबद्दल बाईकस्वार रागावले. थॉम्सनवर प्राणघातक हल्ला झाला, टीका झाली. संपादकीय थाटात भाष्य करणाऱ्या पत्रकारीची सवय असलेल्या अमेरिकन वाचकांना हा प्रकार नवा होता.

समीक्षकांनी या पत्रकारीला गोंझो (gonzo) पत्रकारी असं नाव दिलं. मी मी म्हणत सतत बोलणाऱ्याला त्या काळात बोलचालीच्या भाषेत तो माणूस गोंझो आहे असं म्हणत.

गोंझो पत्रकारी एकाद्या विषयात खोलवर जात असल्यानं त्या विषयाचे तपशील समजत. बाईकस्वारांच्या गुन्हेगारीचे होणारे परिणाम असं संपादकीय स्टाईलमधे लिहून बाईकस्वारांचं जगणं कळत नाही. बरेच वेळा बातम्या केवळ विशेषणाच्या रुपात असतात, त्यातून तपशील कळत नाही. गोंझो पत्रकारीत तपशीलच तपशील. एकाच विषयात खोलवर जाण्याचा तोटाही असू शकतो. अशा लिखाणातून व्यापक पर्सपेक्टिवचा पत्ता लागत नाही. परंतू व्यापक पर्सपेक्टिववाल्या लिखाणातून तपशीलाचा पत्ता लागत नाही हेही तितकचं खरं असतं.

साठीच्या दशकात नेहमीच्या पत्रकारीला गोंझो पत्रकारीची जोड मिळाल्यानं वाचकांना तपशीलही कळले आणि पर्सपेक्टिवही मिळाला.

काही गोंझो पत्रकारांनी बराच घोळही घातला. टॉम वुल्फ हा पत्रकार प्रथम पुरुषी लिहितांना अनेक वेळा मनच्या कल्पित गोष्टी घुसडे. त्याचे वृत्तांत थरारक असत, गाजत. पण ते वास्तवाला सोडून आहेत, त्यात त्यानं स्वतःच्या मनचं घुसडलय, स्वतःची मतं लादलीयत हे उघड झाल्यावर त्याच्या गोंझो पत्रकारीवर टीकाही झाली.

बोर्डेनची पत्रकारी गोंझो शैलीतली आहे. बोर्डेन कोणते पदार्थ चांगले, कोणते बंडल, कोणत्याला अजिबात हात लावू नये, कोणते चांगचे चापावेत, ते पदार्थ कसे करावेत इत्यादी तो दाखवत असे. ही त्याची मतं व्यक्तिगत होती. पण एका परीनं व्यक्तिगत नव्हती. त्याचा संबंध त्या त्या ठिकाणच्या स्थानिक परंपरांशीही होता. म्हणून त्याची मतं लोकांनी खेळीमेळीनं स्वीकारली.

बोर्डेनचं दिसणं, बोर्डेनचा वावर, बोर्डेनचं बोलणं, त्याचं लोकांमधे मिसळणं हे सारंच विशेष होतं, आकर्षक होतं. फिलिपिन्समधे  एका गृहिणीबरोबर स्वयंपाक शिकत असताना त्या गृहिणीच्या अमेरिकेतल्या मुलानं तिला लिहिलेलं पत्रं बोर्डेननं काढलं आणि वाचून दाखवलं. हा काही पदार्थ या विषयाचा भाग नव्हता. ती गृहिणी गहीवरली. माणसं कशी असतात ते दिसलं. फिलिपिन्स आणि अमेरिका या देशाच्या सरहद्दी तिथं वितळल्या, आई-मुलगा नातं हा काय प्रकार असतो ते कळलं. हीच बोर्डेनची गंमत.

बोर्डेन मेल्यावर त्याच्या चहात्यांनी लगोलग एक फंड तयार केला. त्यात भरपूर पैसे लगोलग गोळा झाले. माणसांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी हा फंड वापरला जाणार आहे.

।।

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *