सारी मानव जातच नष्ट करणारं अमेरिकन (रशियनही) अणुसंहार यंत्र.

  सारी मानव जातच नष्ट करणारं अमेरिकन (रशियनही) अणुसंहार यंत्र.

सारी मानव जातच नष्ट करणारं अमेरिकन (रशियनही) अणुसंहार यंत्र.

।।

द.कोरियाचे किम उन यांच्या अणुधमकीला उत्तर देताना अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंप म्हणाले की त्यांचंही बोट अणुबाँबच्या बटनावर आहे, कुठल्याही क्षणी ते बटन दाबू शकतात.

ट्रंप हे गृहस्थ विश्वास ठेवण्यालायक नसल्यानं, त्यांचं बोलण्यात बोलणं नसल्यानं त्यांचं बोलणं हसण्यावारी नेलं जातं. परंतू त्यांची धमकी काय प्रकारची आहे याचा प्रत्यय डॅनियल एल्सबर्ग यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातून येतो.

१९६० च्या सुमाराला अमेरिकेनं तयार केलेल्या अणुयुद्धाच्या कार्यक्रमाचे कागद एल्सबर्ग यांच्या हाती लागले. केवळ प्रेसिडेंटच पाहू शकतात असं त्या कागदावर लिहिलं होतं पण एल्सबर्गसारख्या सत्तेच्या उतरंडीवर शेकडो पायऱ्या खाली असलेल्या माणसालाही ते कागद पाह्यला मिळाले. त्यानुसार अमेरिकेनं एका व्यापक अणुयुद्धाची तयारी केली होती. त्या तयारीनुसार अमेरिकेनं योजलेल्या अणुस्फोटामुळं त्याच क्षणी २७.५ कोटी माणसं मरू शकत होती. स्फोटानंतर सहा महिन्याच्या काळात आणखी ३२.५ कोटी माणसं मरू शकत होती.

रशियाच्या विरोधात म्हणून तयार केलेला हा कार्यक्रम चीनलाही लागू होता. त्या दोन्ही देशातल्या सर्व मोठ्या शहरांवर बाँब पडणार होते. पूर्व युरोप, उत्तर युरोप, पाकिस्तान, अफगाणिस्तान इत्यादी विभागांवरही या स्फोटाचा परिणाम होऊन आणखी वीसेक कोटी माणसं मरणार होती. शिवाय जखमी होणारी, पुढली कित्येक दशकं नाना शारीरीक त्रास होणाऱ्यांची संख्याही काही करोड होती.

एल्सबर्ग यांच्या हाती हा कार्यक्रम लागला कारण अमेरिकेचे अध्यक्ष, संरक्षण मंत्री, परदेश मंत्री इत्यादींना अणुकार्यक्रमाची माहिती देणं, त्या साठी त्या कार्यक्रमाचा अभ्यास करणं या प्रकल्पात एल्सबर्ग काम करत होते.  अमेरिकेतले सर्वोच्च अणुवैज्ञानिक, तीनही संरक्षक दलांचे सर्वोच्च आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी एल्सबर्ग चर्चा करत. अणुबाँबची निर्मिती, तो वाहून नेणारी विमानं व रॉकेटं यांची यंत्रणा, बाँबफेकीत भाग घेणाऱ्यांचं प्रशिक्षण, रेडार यंत्रणा, इत्यादी सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात पहाणं, त्यात दोष असतील तर त्यांची माहिती संबंधितांना देणं हे एल्सबर्ग यांचं काम होतं.

या एकूण प्रकल्पाचा अभ्यास करताना एल्सबर्ग यांना कळलं ते असं. रशिया हल्ला करणार याची सूचना मिळणं किंवा रशियाची रॉकेटं-विमानं अमेरिकेच्या दिशेनं झेपावली आहेत अशी माहिती मिळणं यावर अमेरिकेची कारवाई अवलंबून होती. रेडार यंत्रणेतर्फे ही सूचना अमेरिकेला मिळणार होती. रेडार यंत्रणा सदोष होती, आजही कित्येक वेळा हवेतल्या बदलामुळं, वादळांमुळं किंवा पक्षांच्या वावरामुळं चुकीचे संदेश दिले जातात. तसंच एकाद्या ठिकाणी अपघातानं स्फोट होतो किंवा स्थानिक पातळीवरची लढाई होते पण त्यातून युद्ध सुरु झालंय अशी सूचना मिळते किवा तसा अर्थ काढला जातो. चुकीच्या सूचनेवरून विमानं बाँबफेक करायला निघाली तर त्यांना परत बोलावण्याची सोय नव्हती, तसं प्रशिक्षणही वैमानिकांना नव्हतं. अणुयुद्ध सुरु करा असा आदेश कोरिया, जपान किंवा युरोपभर पसरलेल्या तळावरचा एकादा अधकारीही स्वतंत्रपणे देऊ शकत होता. एकादा वैमानिक किंवा तळावरचा प्रमुखही युद्धाला सुरवात करू शकत होता. प्रत्यक्षात जरी अमेरिकन प्रेसिडेंटलाच युद्ध सुरू करण्याचा अधिकार असला तरी प्रत्यक्षात तो अधिकार त्यांच्या खालच्या पातळीवरील किती तरी लोकांना उपलब्ध होता.

एकूणात सारा प्रकार भयानक होता. अमेरिकन सरकार सारं जगच नष्ट करायची तयारी करत होतं. अमेरिकेची इच्छा नसूनही असं युद्ध सुरु होऊ शकत होतं. एल्सबर्ग हे सत्तेच्या उतरंडीवर एकदमच तळातले गृहस्थ होते. जग नष्ट करणारं हे यंत्र बंद करा, अणुयुद्ध करायला सांगणारी यंत्रणा दुरुस्त करा असं ते त्यांच्या वरिष्ठांना सुचवत होते. परंतू १९६० पासून ते २०१८ पर्यंत त्यांचं म्हणणं मान्य झालेलं नाही. आजही अमेरिकेजवळ २४ हजार पेक्षा जास्त आणि रशियाकडं ४२ हजार पेक्षा जास्त अण्वस्त्रं आहेत. १९६० साली जेवढी माणसं मरणार होती तेवढीच किंवा त्याहूनही जास्त माणसं मारणारं यंत्रं हातात घेऊन अमेरिका (आणि रशियाही) बसलं आहे.

एल्सबर्ग सविस्तरपणे दाखवतात की १९५० पासून २०१८ पर्यंत सर्व प्रेसिडेंटांनी अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याचा विचारही केलेला नाही किंवा अण्वस्त्रं आपण वापरणार नाही असंही म्हटलेलं नाही. आजवर निवडून आलेले सर्व संसदसदस्य अणुकार्यक्रमावर विचारही करायला तयार नाहीत. दर काही वर्षांनी भारताच्या एका वर्षाच्या अर्थव्यवस्थेयेवढा खर्च अण्वस्त्रांची दुरुस्ती, नूतनीकरण करण्यावर खर्च होतो. अमेरिकन संसद निमूपणे त्या खर्चाला मान्यता देते.

सारं जग नष्ट करायला निघालेली ही माणसं किती भयानक आहेत याचं एक उदाहरण सदर पुस्तकात आहे.

अमेरिकन लष्करासमोर प्रश्न होता की समजा रशियातून रॉकेटं   उत्तर अमेरिकेच्या दिशेनं निघाली तर काय करायचं. एक वाट अर्थातच होती ती म्हणजे ती रॉकेटं हवेतच नष्ट करायची. तशी सोय अमेरिकन लष्करानं, हवाई दलानं केलीही. पण तेवढ्यानं त्यांना आश्वस्त होता येईना. त्यांनी आयडिया काढली. हजारो राक्षसी इंजिनं सुरु करायची आणि त्यांच्या रेट्याखाली पृथ्वीची फिरण्याची गती बदलायची. जेणेकरून रॉकेटं अमेरिकेपर्यंत आलेली असतील तोवर पृथ्वी फिरलेली असेल आणि रॉकेटं तिसऱ्याच ठिकाणी पडतील.

वैज्ञानिकांनी गणितं मांडली, इंजिनांचे आराखडे तयार केले. एका टप्प्यावर काही वैज्ञानिकांनी त्यांना सांगितलं की या इंजिनांचा रेटा येवढा असेल की पृथ्वीवर (अमेरिकेतही) अनेक सुनाम्या, नेहमीच्या सुनामीच्या किती तरी पटीनं अधीक बलवान सुनाम्या, पृथ्वीवर येतील. जलाशय सुकतील, समुद्रातलं पाणी अन्यत्र पसरेल, रॉकेटं कुठंही पडण्याच्या आधीच पृथ्वी निर्मनुष्य होण्याची वेळ येईल. नशीब असं की तो कार्यक्रम लष्करानं पुढं रेटला नाही.

एल्सबर्ग यांनी शेकडो मुलकी आणि सैनिकी अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.  माणसं किती क्रूर असतात, मानवतेचा काडीमात्र विचार त्यांना कसा सुचत नाही, प्रत्येकाला आज्ञा देण्यात आणि पाळण्यात रस असतो,  माणसं किती भीतीगंडानं पछाडलेली असतात याचा प्रत्यय एल्सबर्ग यांना पदोपदी आला.

एल्सबर्ग यांना ही सारी माहिती हाती लागत होती तेव्हांच वियेतनाममधे अमेरिकेनं केलेल्या उद्योगांचे कागदही एल्सबर्ग यांना मिळाले. पैकी वियेतनामबाबतचे सुमारे ७००० कागद गोळा करून त्यावर आधारित पेंटॅगॉन पेपर्स हे माहिती घबाड एल्सबर्गनी न्यू यॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट इत्यादी ठिकाणी प्रसिद्ध केलं. त्याच वेळी अणुसंहार यंत्राची माहितीही त्यांच्या हातात होती. परंतू वियेतनाम युद्ध आधी थांबलं पाहिजे असा विचार करून पेंटॅगॉन पेपर्सची गाडी त्यांनी पुढं काढली अणुयंत्रं मागं ठेवलं.

                                                             डॅनियल एल्सबर्ग

१९७० पासून २०१६ पर्यंत एल्सबर्ग माहितीची छाननी करत होते, प्रत्येक प्रेसिडेंटपर्यंत जाऊन  अणुयुद्ध कार्यक्रम थांबवा, त्यात बदल करा अशी विनंती करत होते. काही काळ त्यांना पेंटॅगॉन पेपर प्रसिद्ध केल्याबद्दल सरकारी खटल्यांनाही तोंड द्यावं लागत होतं. शेवटी खटल्यांचं लचांड सुटल्यावर आणि अमेरिकन सरकार-प्रेसिडेंट बधत नाहीत असं वाटल्यावर २०१७ साली एल्सबर्गनी हे पुस्तक प्रसिद्ध केलं.

शोध पत्रकार कसं काम करतो याचा प्रत्यय हे पुस्तक वाचतांना येतो. शेकडो माणसांना एल्सबर्ग भेटले. हज्जारो कागदं त्यांनी गोळा केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यातला आशय बरोबर आहे की चूक आहे याची शहानिशा केली. काही वेळा त्यांना मिळालेली माहिती चुकीची होती हे लक्षात आल्यावर तसं त्यांनी संबंधितांना कबूल केलं. सुमारे ४० वर्षं एल्सबर्ग या माहितीवर, या पुस्तकावर मेहनत घेत होते. मुलकी आणि लष्करी अधिकाऱ्यांची बोलणी खावी लागली, त्यांनी केलेले अपमान सहन करावे लागले. मिळालेली माहिती जपून लपवून ठेवावी लागली, कारण सुगावा लागल्यावर ती माहिती ताब्यात घेण्याचा वा नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिस करत होते.

चाळीसेक वर्ष हा माणूस शांतपणे आपलं काम करत होता. भाषणं नाहीत, टीव्हीवर मुलाखती नाहीत, पुरस्कार नाही, जीवनगौरव नाही, काssssही नाही. पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतरही गृहस्थ गप्पच दिसतात. बहुदा पुढल्या पुस्तकाची किवा पुढल्या गौप्यस्फोटाची तयारी करत असतील.

सरकार लोकांपासून माहिती चोरून ठेवतं. त्यामुळं लोकांचं अतोनात नुकसान होत असतं. अमेरिकेनं वियेतनाममधे नापाम बाँब वापरले. हज्जारे निष्पाप माणसांना मारलं. आपल्याला हवा तो माणूस देशप्रमुखपदी बसवला आणि तोच माणूस नकोसा झाला तेव्हां त्याचा खून करून नवा माणूस तिथं बसवला.  अब्जावधी डॉलरचा चुराडा केला. हे सारं सरकार लपवून ठेवत होतं. माहितीच्या अभावी अमेरिकन जनता बावळटपणे सरकारला पाठिंबा देत होती. एल्सबर्गचं पेंटॅगॉन पेपर्स प्रसिद्ध झालं तेव्हां लोकांचे डोळे उघडले आणि वियेतनाम युद्ध थांबलं.तेव्हां सरकार जे जे करत असतं त्याची माहिती लोकांसमोर आली पाहिजे या एकाच उद्देशानं एल्सबर्ग काम करत आले. त्यासाठी जे काही सोसावं लागलं ते सोसत आले.

हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबाँब पडले. तिथं लष्करी तळ नव्हते की जपानी मंत्री, लष्करी अधिकारी नव्हते. निष्पाप, युद्धाशी काहीही संबंध नसणारी माणसं तिथं रहात होती. आताही अमेरिकेचा (आणि रशियाचाही) करोडो निष्पाप माणसं मारण्याचाच डाव आहे.

पेंटॅगॉन पेपर्समुळं वियेतनाम युद्ध थांबलं. डूम्सडे प्रसिद्ध झाल्यानंतर नरसंहाराचं अणुयंत्र थांबेल अशी अपेक्षा करूया.

 

।।

THE DOOMSDAY MACHINE

CONFESSION OF A NUCLEAR WAS PLANNER

DANIER ELLSBERG

BLOOMSBRY PUBLICATION

||

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *