चित्रपटाचा चित्रपट, ऑफर

चित्रपटाचा चित्रपट, ऑफर

ऑफर. गॉडफादर असा घडला.

गॉडफादर १९७२ साली पडद्यावर आला.  चित्रपटाच्या इतिहासातला सर्वात जास्त लोकप्रिय चित्रपट ठरला. चित्रपटाचे आणखी दोन भाग नंतर झाले. तेही लोकप्रिय झाले. माणसं अजूनही तो चित्रपट पहात असतात. कधीही तो पहावा, त्यात काही तरी नवं सापडतं.

मारियो पुझ्झोची त्याच नावाची कादंबरी १९६९ साली प्रसिद्ध झाली होती. पुझ्झो आणि दिक्दर्शक फ्रान्सिस कोपोल्ला या दोघांनी मिळून चित्रपटाची पटकथा लिहिली.

न्यू यॉर्कमधल्या गुन्हेगारी जगाची गोष्ट चित्रपटात आहे.विटो कॉर्लिओन आणि त्याची गँग हा चित्रपटाचा विषय आहे. डॉन कॉर्लिओनची गँग आणि न्यू यॉर्कचं सामाजिक राजकी जीवन. कादंबरीतला डॉन कॉर्लिओन खरा नव्हता. साहित्यात कोणतीही व्यक्ती थेट जीवनातून निघून कादंबरीत जात नसते. तिचं रुप साहित्यिकाच्या डोक्यात बदलतं आणि ते नवं रूप, कल्पित रूप कादंबरीत, साहित्यात येत असतं. शिकागोतला खराखुरा चार्ली लुसियानो हा माणूस आणि त्याचं जग मारियोच्या पुझ्झोच्या गॉडफादरमधे येतं.

 चार्ली लुसियानो खरा होता. त्याचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आहे.

मी अशी एक ऑफर त्याला देणार आहे जी तो कधीही नाकारणार नाही असं एक वाक्य डॉन कॉर्लिओन गॉडफादरमधे जॉन फाँटेनला सांगतो. जॉनला एक हॉलिवूडमधला निर्माता त्याच्या चित्रपटात घ्यायला तयार नसतो. डॉन त्याला सांगतो की बऱ्या बोलानं जॉनला चित्रपटात घे, तुझं भलं होईल, नाही घेतलंस तर तुझं खरं नाही. निर्माता ऑफर स्वीकारत नाही. एके रात्री त्याच्या आवडत्या आणि लक्षावधी डॉलर किमतीच्या घोड्याचं रक्तानं माखलेलं मुंडकं निर्मात्याच्या गादीवर, त्याच्या पांघरूणात. 

हे ऑफरचं वाक्य फार प्रसिद्ध झालं. त्याच शीर्षकाची दहा भागांची मालिका आता ओटीटीवर आलीय. गॉडफादर चित्रपट कसा झाला ते कल्पकरीतीनं या मालिकेत आलंय. म्हणजे पहा. गॉडफादर चित्रपट खरा होता. पण तो घडण्याचं खरं रूप नव्हे दिक्दर्शकालाच्या डोक्यात असलेलं रूप ऑफर या मालिकेत पहायला मिळतं. 

गॉडफादरचा पहिला भाग कसा तयार झाला याची कथा ऑफरमधे आहे.

ॲल रुडी हा निर्माता गॉडफादरचा घाट घालतो. पटकथा, नट, पैसे, चित्रांकन इत्यादी सर्व गोष्टी तो जुळवून आणतो. अनंत अडचणी येतात. पैसे कमी पडतात.मानापमान होतात. खूनखराबा होतो. या सर्वांना रुडी तोंड देतो.

चित्रपट निर्मितीचा चित्रपट. चित्रांकन करणाऱ्याचं चित्रांकन. मूळ चित्रपटाईतकं नाही तरी बरंचसं थरारक. न घडलेले काही प्रसंग या मालिकेत चित्रीत केले असले तरी बहुतांशी कथानक खरं आहे. 

चित्रपट निर्मिती कशी होते याची कार्यशाळा घेतल्यागत चित्रपट केलाय. डॉक्युमेंटरी असली तरी फीचरपटासारखी चित्रीत केलीय.

चित्रपटात एका प्रसंगात मायकेल (डॉनचा मुलगा) एका रेस्टॉरंटमधे कमीशनर मॅकक्लस्कीला गोळ्या घालतो. रेस्टॉरंटच्या रेस्ट रूममधे फ्लशच्या टाकीमागं लपवलेलं पिस्तूल घेऊन तो बाहेर येतो. काही क्षण तो थबकतो. नंतर गोळ्या घालतो.

हा प्रसंग पुझ्झोनं लिहिला. दोघं एका घरात बसून पटकथा लिहित होते. पुझ्झोनं लिहिलेला या प्रसंगाचा कागद घेऊन कोपोल्ला खोलीबाहेर तलावाच्या काठावर जातो. प्रसंग वाचतो. प्रचंड खुष होतो. त्याच्या हातात एक केळं असतं. ते कोपोल्ला पिस्तुलासारखं धरतो आणि मायकेल कसा थबकला आणि नंतर कसं मारलं त्याची ॲक्शन कोपोल्ला दाखवतो.

म्हणतो ‘मायकेलनं त्या खुनाची व्यवस्थित तयारी केलेली असते, तालीम केलेली असते. तरीही तो कां थबकतो. कारण त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रसंग असतो. मारू की नको मारू. त्या क्षणाच्या आधीचा मायकेल सैन्यातला अधिकारी असतो, त्यानं ठरवलेलं असतं की बापाच्या गुन्हेगारी जगात जायचं नाही. डॉननंही तसंच ठरवलेलं असतं म्हणूनच मोठ्या सनीला धंध्यात घेतलेलं असतं पण मायकेलला मात्र सैन्यात पाठवलेलं असतं. मायकेल द्विधा मनस्थितीत असतो. क्षणभर. पण निर्णय घेतो, मारायचंच. मायकेल त्या क्षणी बदलेला असतो, भविष्यातला डॉन झालेला असतो’

अर्जुनाचा प्रॉब्लेम.

खरं सांगतो. हा चित्रपट मी किती तरी वेळा पाहिलाय आणि हा प्रसंग माझ्या अगदी आवडीचा प्रसंग आहे. पण त्या प्रसंगाचा अर्थ मला ऑफर पहाताना समजला.उस्ताद (ओतुर) दिक्दर्शक आणि उस्ताद पटकथा लेखक कसा विचार करतात याचा अंदाज आला.

चित्रपट म्हणजे दिसण्याचा मामला. दिसलं पाहिजे. दिक्दर्शकाला चित्रपट दिसत असतो, प्रत्येक प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर असतो. सत्यजित रे तर चित्रपटाच्या फ्रेमचं रेखाटन कागदावर करायचे. त्या फ्रेममधे जे जे दिसतं ते ते ते रेखाटनात घ्यायचे. सेट मांडणाऱ्याला, प्रकाश योजना करणाऱ्याला, चित्रांकन करणाऱ्याला ते रेखाटन उपयोगी पडायचं.

दिक्दर्शक-पटकथालेखकाला दृश्य दिसतं. ते दिसणं घडवून आणणं हे कलादिक्दर्शकाचं काम.

ऑफरमधे एक प्रसंग आहे. पबमधे माणसं नाचत असतात. तिथं नेपथ्य तयार केलेलं असतं, प्रकाश योजना केलेली असते. ॲल रुडी चक्रावून जातो, डिझायनरला विचारतो की कसं काय जमलं गं तुला? 

डिझायनर म्हणते ‘आपल्याला मोना लिसा दिसते, आवडते. चित्रकारानं ते चित्र कसं काढलं, कोणते रंग वापरले, कोणते ब्रश वापरले न् किती वेळ लागला वगैरेशी आपला संबंध नसतो. अंतराळवीर चंद्रावर उतरल्याचा थरार आपण पहातो. तोच आपल्याला महत्वाचा असतो.तो दिसतो. अंतराळायानाची माहिती आपल्याला कुठं असते?’

पुझ्झो-कोपोल्लांनी दृश्य रेखाटायचं. कलादिक्दर्शकानं लाकडं खिळे रंग ब्रश घेऊन ते पार पाडायचं. ही जबाबदारी निर्मात्याची.

चित्रपट हे टीम वर्क असतं. पुझ्झो-कोपोल्ला चित्रपट लिहितात. मार्लन ब्रँडो काम करतो. पण ते दृश्य जुळवणं हे काम एक टीम स्वतंत्रपणे पार पाडत असते. म्हणूनच चित्रपट ही समूहकला आहे. त्यातला प्रत्येक घटक सारखाच महत्वाचा असतो. सर्वांची तार जुळलेली असायला हवी, बस्स.

मायकेलची भूमिका अल पचिनो करतो. एका दृश्यात तो फुलांचा गुच्छ आपल्या प्रेयसीला देण्यासाठी निघालेला असतो. काही केल्या अल पचिनोला ते जमत नाही. कोपोल्ला पचिनोच्या खांद्यावर हात ठेवतो.त्याला सांगतो ‘टेन्शन घेऊ नकोस. चित्रपट होईल की नाही याची चिंता करू नकोस.चित्रपट होणार. आता तू कल्पना कर की तुझ्या प्रेयसीला द्यायला तू गुच्छ घेतला आहेस आणि तिचा विचार करत निघाला आहेस. तो विचार कर. मग सगळं ठीक होईल.’ दृश्य ठीक पार पडतं.खऱ्या चित्रपटात खरोखर तसं घडतं.

कोपोल्लाला विशिष्ट प्रकाश योजना हवी असते. संबंधित कारागीर ती करत नाही. वादावादी होते. कोपोल्ला त्याला शिव्या देतो. तो कारागीर काम करायला नकार देतो. ॲल रुडी कोपोल्लाची समजूत काढतो. क्षमा माग. सगळं ठीक होईल, सॉरी म्हणायला तुझं काय जातंय?ईगोचा प्रश्न करू नकोस. चित्रपट पार पाडायचाय, ते झालं नाही तर आपल्या सर्वांचंच नुकसान होणार आहे, तू ज्या चित्रपटासाठी जीव लावतोयस तो चित्रपट होणार नाही. कोपोल्ला क्षमा मागतो. काम सुरु होतं.

चित्रपट पार पाडण्यासाठी ॲल रुडीला कोणाकोणाच्या दाढीला हात लावावे लागतात, कोणाकोणासमोर वाकावं लागतं, काय काय करावं लागतं. चक्क भाई लोकांचीही मदत घ्यावी लागते. न्यू यॉर्कमधला खरोखरचा डॉन त्याला मदत करतो, त्याला चित्रीकरणासाठी हवं असलेला मालक घर द्यायला नकार देतो तेव्हां डॉन त्या मालकाला चड्डीत मुतवतो. काय न् काय.

ऑफरमधले पचीनो, ब्रँडो यांची कामं अगदीच बंडल केलीयत, दोघेही बावळट विनोदी वाटतात. काही दोष जरूर आहेत पण एकूणात ऑफर एकदम पहाण्यासारखा आहे.

।।

Comments are closed.