पुस्तकं. चीनला वळण लावणारं पुस्तक. किंमत २७५० डॉलर.

पुस्तकं. चीनला वळण लावणारं पुस्तक. किंमत २७५० डॉलर.

नुकतंच एक पुस्तक चीनमधल्या बाजारात २७५० डॉलर या किमतीला विकलं गेलं. कारण या पुस्तकाच्या फार कमी प्रती उपलब्ध होत्या. पुस्तकाची वाच्यता झाल्यावर लोकं दुकानं आणि पुस्तकालयं धुंडाळू लागले, ते पुस्तक पाहिेजे पुस्तक पाहिजे म्हणू लागले. जसजशी मागणी वाढू लागली तसतशी पुस्तकाची किमत वाढू लागली आणि २७५० डॉलरला त्याच्या प्रती विकल्या गेल्या.

पुस्तक ३४९ पानांचं आहे. चीनमधे या पुस्तकाला मागणी आल्याबरोबर अमेरिकन लोकही हे पुस्तक वाचू लागले, पुस्तकाची नव्यानं आवृत्ती निघाली आणि पेपरबॅक प्रत २० डॉलरला दुकानात उपलब्ध झालीय, पुठ्ठा बांधणीची किमत आहे ४० डॉलर.

पुस्तकाचं नाव आहे America Against America. लेखकाचं नाव आहे Wang Huning (王沪宁). हे पुस्तक लिहिलं गेलं १९८८ साली आणि प्रसिद्ध झालं १९९१ साली. वॉंग शांघाय फुदान विद्यापीठात राज्यशास्त्र शिकवत असत. त्यांना चीन सरकारनं सहा महिन्यांची शिष्यवृत्ती दिली, अमेरिकेत फिरून पुस्तक लिहा असं सांगितलं. वॉंग ३० अमेरिकन शहरांत हिंडले. वॉशिंग्टनमधे कॅपिटॉल हिलपासून अटलांटातल्या कोका कोला कारखान्यापर्यंत सरकारी कार्यालयं, सर्व प्रकारच्या  व्यापारी आणि  उत्पादक ठिकाणी गेले. शहरवस्त्या आणि खेड्यांत हिंडले. त्या वेळी जपानी माणसं अमेरिकेत स्थलांतरीत होत होती, अमेरिकन अर्थव्यवस्था श्रीमंत करत होती.वाँगनी जपानी व्यक्तिमत्व आणि अमेरिकन माणसाचं मानस जाणून घेतलं. हा सगळा खटाटोप करून चीनमधे परतल्यावर त्यांनी वरील पुस्तक लिहिलं.

पुस्तक चिनी भाषेत लिहिलं आणि नंतर पुस्तकाचं इंग्रजीत भाषांतर झालं. चिनी लोकांनी पुस्तक वाचलं चिनी भाषेतून. अलीकडं चिनी माणसं इंग्रजीही खुप वाचू लागले असल्यानं इंग्रजीतल्या पुस्तकाला मागणी आली.

वाँगनी प्रस्तावनेत लिहिलंय ‘पुस्तकात अमेरिकन समाजाच्या अनेक पैलूंवरची निरीक्षणं लिहिली असली तरी पुस्तकाचं मुख्य सूत्र अमेरिकेतील सामाजिक आणि राजकीय प्रक्रिया हे आहे.’

अमेरिकेच्या आर्थिक श्रीमंतीची चार प्रतिकं लेखकानं निवडली. कार, फोन, कंप्यूटर आणि क्रेडिट कार्ड. असंख्य औद्योगीक उत्पादनं बाजारात आली होती त्यांचं कार हे प्रातिनिधीक रूप लेखकानं निवडलं. कंप्यूटर. उत्पादन ते विक्री या साखळीला कंप्यूटरनं गती दिली. फोन-कंप्यूटर ही संपर्कसंवादाची साधनं. क्रेडिट कार्ड. वस्तू विकत घेणं नागरिकाला सोपं व्हावं यासाठी क्रेडिट कार्ड तयार झालं. भरारा अमेरिका श्रीमंत झाली.

चीन हा इतर सिविलायझेशनांच्या तुलनेत सर्वात आधीचा श्रीमंत देश. कागदी नाण्यांचा वापर चीननं इसवीपूर्व २१० मधे सुरु केला होता. व्यापार हे समाजाच्या प्रगतीचं मुख्य साधन चिनी सम्राटांनी इसवी पूर्व एक हजार वर्षापासूनच मानलं होतं. असा हा चीन आपल्या काळात मागास आहे आणि जेमतेम २०० वर्षांचा इतिहास असलेला अमेरिका आपल्या तीनचारशे पट श्रीमंत कसा झाला हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न लेखकानं या पुस्तकात केला.

पुस्तकातले धडे खालीलप्रमाणं आहेत.

(1) the uneven development of society and its various

features; (2) the values that dominate political life and their flux;(3) the diverse character of the nation and its social efficacy; (4)the formal and informal mechanisms that regulate people’s social activities; (5) the political forces active in society and their relations; (6) the democratic and non-democratic elements in election campaigns; ( (7) top-down political operations and their characteristics; (8) non-political coordination mechanisms and socialized regulation; (9) the reproduction of culture, values and even institutions and the connection with education; (10) the role of ideas in the development and management of society; (11) the various undercurrents that threaten future development.

वांग यांचं कथन सावध आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेची बलस्थानं वांग सागतात पण त्याच बरोबर अमेरिकन समाजव्यवस्था कोसळल्याशिवाय रहाणार नाही हेही ते मार्क्स आणि लेनिनचा हवाला देऊन सांगतात. 

वांग यांना चीनच्या कम्युनिष्ट पार्टीनं अमेरिकेला पाठवलं होतं. वांगही सावध पण कर्मठ कम्युनिष्ट होते. वरील पुस्तक लिहिलं गेलं तो काळ देंग यांचा होता. देंग यांनी चीनची अर्थव्यवस्था मोकळी केली. उत्पादन व्यवस्था आणि तत्वज्ञान यांचा संबंध असायचं कारण नाही असं त्यांना वाटत होतं. देंग यांनी सिंगापूरच्या विकासाचा अभ्यास केला होता. बाजारावर आधारलेली अर्थव्यवस्था देशाचा आर्थिक विकास करेल, पण बाजार व्यवस्थेतले दोष टाळून कम्युनिष्ट समाज निर्माण करता येईल असं काही तरी गणीत देंग यांनी मांडलं होतं. हे गणित मांडण्यासाठी लागणारे पुरावे देंग गोळा करत होते. पूर्वेकडे ते त्यांना सिंगापूरमधे मिळाले, पश्चिमेत अमेरिकेकडं.

वांग आणि देंग दोघांचं जुळलं. वांग यांची नेमणूक चीनच्या वरिष्ट वर्तुळात झाली. तेव्हांपासून तर आजपर्यंत वांग चीनच्या सर्वोच्च नेतृत्वातल्या सात जणात ध्रुवासारखे पक्के आहेत. देंग ते सीजिनपिंग अशी सत्तांतरं झाली पण वांग शिल्लक आहेत. याचं एक कारण प्रस्तुत पुस्तक असू शकेल.

चीननं (देंगनी प्रामुख्यानं) अर्थव्यवस्था मोकळी केली. अमेरिकेतली सर्व वैशिष्ट्यं त्यांनी आत्मसात केली. आज चीनचा फोनच्या बाबतीत जगात पहिला क्रमांक आहे, तिथं १.३८ अब्ज फोन आहेत.कार, कंप्यूटर आणि क्रेडिट कार्ड या कसोट्यांवर चीन अमेरिकेच्याही पुढं आहे. आज चीन जगातली दोन नंबरची अर्थव्यवस्था झालाय. 

आज एकाएकी या पुस्तकाला मागणी आली कारण वांग यानी पुस्तकात म्हटलंय की अमेरिकन समाजातले व्यक्तीस्वातंत्र्य इत्यादी गुण जसे अमेरिकेच्या विकासाचं कारण ठरतात तसेच ते अमेरिकेला अधोगतीला नेतील. अमेरिकन समाज विस्कळीत होईल, विषमता आणि आर्थिक संकटात सापडेल असं वांग यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

ट्रंपवाद्यांनी कॅपिटॉल हिलवर हल्ला केला या निमित्तानं अमेरिकेतलं अराजक उघड झालं. ट्रंप हा फॅसिस्ट माणूस अमेरिकन समाजातला मोकळेपणा आणि लोकशाहीचाच वापर करून देशाची वाट लावतोय हे सिद्ध होत असताना लोकाना साहजीकच वांगच्या पुस्तकाची आठवण झाली. चिनी आणि अमेरिकन. दोन्ही लोकाना.

पुस्तक दणादण खपतंय.

।।

Comments are closed.