‘चुप’ आणि ‘कंतारा’

‘चुप’ आणि ‘कंतारा’

कंतारा नावाचा सिनेमा सध्या मुंबईतल्या अनेक सिनेमाघरात चाललाय. ऋषभ शेट्टी नावाच्या माणसानं या सिनेमात आपली हौस भागवून घेतलीय. शेकडो नव्हे हजारो वर्षांची जुनी दंतकथा त्यानं थेट २०२२ मधे आणून ठेवलीय. देव, पौराणीक माणसं ते थेट फॉरेस्ट ऑफिसर आणि जंगलात रहाणारी माणसं आणि गावातला एक भ्रष्ट बटबटीत पुढारी.कथा त्याची, दिक्दर्शन त्याचं, हीरोही तोच. हीरो नावाच्या भूमिकेला ज्या ज्या करामती करून लोकांचं लक्ष वेधावं लागतं त्या साऱ्या करामती; सेक्स, मारामारी, विनोद, रेडा शर्यत, राजकीय नेतृत्व; सारं सारं शेट्टीनं या सिनेमात कोंबलंय. तोच कथा लिहिणार, तोच दिक्दर्शन करणार आणि तोच काम करणार म्हटल्यावर काहीही घडू शकतं. 

भीषण सिनेमा आहे. समीक्षकांना त्यांच्या खिशात असलेले स्टार्स पुरे पडत नाहीयेत इतकी या सिनेमाची स्तुती आहे.

टपराट सिनेमांना भरपूर स्टार देणाऱ्या समीक्षकांचे धडाधड खून ‘चुप’ या चित्रपटात होतात. सुदैवानं ‘चुप’ एक काल्पनीक गोष्ट आहे. ती जर खरी असती तर कंताराची जबडा फाटेस्तोवर स्तुती करणाऱ्या पन्नास साठ समीक्षकांचे खून येव्हाना पडले असते. 

कंताराच्या एकाद दोन आठवडेच आधी येऊन गेलेल्या ‘चुप’ या चित्रपटात समीक्षकांचे खून होतात. बंडल चित्रपटाला समीक्षक भरपूर स्टार देतात आणि चांगल्या चित्रपटावर टीका करून चित्रपट पाडतात. म्हणूनच ‘चुप’ च्या नायकाचा समीक्षकांवर खुन्नस आहे. समीक्षकानं समीक्षणात जेवढे स्टार दिलेले असतात तेवढे स्टार समीक्षकाच्या कपाळावर तीक्ष्ण हत्यारानं कोरून नायक समीक्षकांचे खून करतो. 

खुनी शोधून काढण्याची खटपट चित्रपटभर चालते.

चित्रपटाची सुरवात श्रीवास्तव या समीक्षकाच्या खुनाच्या दृश्यानं होते. श्रीवास्तव कमोडवर बसलाय. त्याचा गळा चिरलेला आहे. छाती पोटावर सुऱ्यानं केलेल्या रेषातून रक्त वाहतंय. मांडीवरही जखमा आहेत. चित्रपटभर आपण काय पहाणार आहोत याची कल्पना पहिल्या झटक्यातच येते.

खून. पोलिसांची शोधाशोध. पुन्हा खून. पुन्हा शोधाशोध. थरार, रहस्य. दिक्दर्शक आपली उत्कंठा टिकवत चित्रपट लांबवत नेतात. खरं म्हणजे चित्रपटाच्या सुरवातीच्या साताठ दृश्यांतच खुनी कोण आहे आणि तो कोणाचा खून करणार आहे आपल्याला कळलेलं असतं. दृश्यांच्या रचनेतूनच दिक्दर्शकानं ते सांगून टाकलेलं असतं. हिचकॉकचा चित्रपट असता तर त्यानं आपल्याला जाम गुंगवत नेलं असतं आणि शेवटी अनपेक्षीत दणका देऊन रहस्य उलगडलं असतं. ‘चुप’ चे दिक्दर्शक वेगळ्या वाटेनं जातात. खुणा पेरत पेरत खुनी कोण आहे याचा अंदाज देत देत तरीही उत्कंठा टिकवत ते आपल्याला टोकापर्यंत नेतात.

चित्रपट पहायचा असतो. त्यामुळं तो देखणा असायलाच हवा. तसा ‘चुप’ आहे. रहस्यपट आणि थरारपट असल्यानं काळोख भरपूर आहे आणि एकदम डोळे दिपवून रक्त गोठवणारी दृश्यंही आहेत.

दुल्कर सलमान आणि श्रेया धन्वंतरी या दोघांचा नायक नायिका अभिनय छान आहे. डॅनी या फुलं विकणाऱ्या खुन्याची मानसीक विकृती-डिसॉर्डर सलमाननं चांगली दाखवलीय. बाय द वे मामुट्टी या विख्यात नटाचा हा मुलगा. श्रेया धन्वंतरी (नीला) एक समीक्षक म्हणून आपल्याला आवडू लागते आणि ती मरणार या कल्पनेनं आपल्याला त्रास होतो. पण ती वाचते आणि प्रेक्षक निःश्वास टाकतात.

चित्रपट ऐकायचाही असतो. स्नेहा खानवलकर, अमन पंत आणि अमीत त्रिवेदी यांचं संगीत आहे. कागजके फूल आणि प्यासा सिनेमातल्या झपाटून टाकणाऱ्या गाण्यांची सुरावट आणि गाणं रिमिक्स करून नव्या पद्धतीनं  चित्रपटात वापरलंय. ते भारी आहे. कित्येक ठिकाणी पार्श्वसंगीत आहे पण ते आपल्या ध्यानीही येत नाही.

रहस्याच्या खुणा दाखवण्याच्या नादात बाल्की काही गोष्टी करतो, त्या खटकतात.

डॅनी हा नायक किटलीतून दोन ग्लासात चहा ओततो आणि नंतर एकदा या ग्लासातून आणि नंतर दुसऱ्या ग्लासातून चहा पितो. दिक्दर्शक आपल्या पाठी उभा राहून म्हणतो ‘दिसतय की नाही काही तरी विचित्र. आहेच हा माणूस विक्षिप्त.’

 डॅनी हा नायक त्याच्या झाड फुलांच्या नर्सरीत फिरत असताना जमिनीवर एक गोगलगाय दिसते. अरेरे. ती चिरडली जाईल. डॅनी वाकतो. एका पानावर तिला उचलतो आणि बाजूला ठेवतो. दिक्दर्शक मागं उभा  राहून तमाम थेटराला सांगतो की बघा बरं हा माणूस, एका गोगलगायीला वाचवतो पण माणसाना मात्र बिनदिक्कत मारणार आहे.

बळीच्या  कपाळावर उलटा त्रिकोण, फुलांची डिलीव्हरी देणाऱ्या माणसाच्या टी शर्टवर उलटा त्रिकोण. नंतरच्या खुनात बळीच्या कपाळावर स्टार दिसतो, इकडं  डिलीव्हरी देणाऱ्या मुलाच्या टी शर्टवर स्टार. तोही लाल रेषांमधेच रंगवलेला. 

कशाला हा उद्योग?

बाल्की यांनी पटकथा लिहितांना काही गोष्टी आधीच पक्क्या ठरवलेल्या असाव्यात. उदा. कागजके फूल या चित्रपटातील काही दृश्यांची आठवण करून द्यायचीच. स्टुडियो. काळोख. प्रकाश झोत टाकणारा महाकाय लाईट. प्रखर प्रकाश झोत. त्यात दिसणारी व्यक्ती. कॅमेरा. ‘चुप’चा शेवट तशा दृश्यानंच करायचा असं त्यांनी ठरवलं असावं. नायिका आणि नायक त्यासाठी स्टुडियोत पोचायला हवेत. म्हणून नायकाचं फुलांचं दुकान स्टुडियोच्या जवळ. नायिका बंगलोरहून सिनेमावर लिहिण्यासाठी मुंबईत येते आणि स्टुडियोच्या बाजूच्याच इमारतीत फ्लॅट घेते.

फूल, सौंदर्य, नाजूकपण या गोष्टींशी अगदी विसंगत असं खून, रक्त. तीव्र विरोधाभास बाल्कींच्या मनात असावा. म्हणून नायकाला फूलवाला केलंय. पण त्याचं फुलाचं दुकान चालतं तरी कसं? अख्या सिनेमात फक्त नायिका नीलाच फुलं विकत घ्यायला येते, इतर वेळी दुकानात गिऱ्हाईकं नसतात.  असो.

समीक्षण आणि चित्रपट उद्योग.खून मालिका. डॅनी या माणसाचं निराशाग्रस्त विकृत मन. डॅनीची प्रेम कहाणी. गुरुदत्त या मोठ्या दिक्दर्शकावर झालेला अन्याय. डॅनीचं पूर्वायुष्य. असे चार पाच मुद्दे चित्रपटात गुंफण्यात आल्यानं चित्रपट टोकदार होत नाही, उगाचच पसरतो. डॅनी आणि नीला यांची प्रेमदृश्य संख्येनं आणि मिनिटांच्या हिशोबात विनाकारण लांबतात. सामान्य सिनेमा असता तर लोकांना खुष ठेवण्यासाठी अशी दृश्य घालायला हरकत नाही, पण चित्रपटाची शैली रहस्यपट असताना हा उद्योग अनाठायी झाला. एकूणात  तीसेक मिनिटं कमी करता आली असती. 

असा भास होतो की या चित्रपटाच्या आडून बाल्की चित्रपट व्यवसाय आणि समीक्षक यांची मापं काढतोय. खरं म्हणजे डॅनी या एका मनोरोगी, सायकोपॅथची ही गोष्ट आहे. त्याचा खुन्नस आहे समीक्षकावर. तो व्यक्तिगत आहे. पण आपण खून करतोय यात गुन्हा करत नसून एक मोठं काम काम करतोय, चित्रपट व्यवसायाला वाचवतोय असं त्याला वाटतंय. गुन्हेगाराला स्वतःलाच पटवून द्यायचं असतं की आपण काहीही अनैतिक वा बेकायदेशीर कृत्यं करत नाहीयोत. त्यासाठी तो आपल्या दुष्कृत्याना तात्विक वगैरे आधार शोधतो. 

तर अशा माणसाची ही गोष्ट. पण सिनेमाभर समीक्षा आणि चित्रपट व्यवसाय या बद्दल ताशेरे, मतं पसरलेली आहेत.खून होताहेत तर समीक्षणं बंद करा, समीक्षणं कशाला बंद करायची सिनेमा काढणंच बंद करा अशी वाक्यं काही निमित्तानं आपण सिनेमात ऐकतो. 

समीक्षकांचे खून ही अगदीच टोकाची गोष्ट झाली. भारतीय सिनेमात असं चालत नाही. समीक्षणालाही काही महत्व आहे, समीक्षणाचीही काही एक पॉझिटिव भूमिका असते हे दाखवायला हवं.म्हणून बॅलन्स करण्यासाठी अमिताभ बच्चन येतात. चित्रपटात थर्ड अंपायर नावाचा एक अमिताभचा सिनेमा येणारेय आणि त्याचं प्रमोशन खुद्द अमिताभ करताहेत असं दृश्य. त्या मुलाखतीत मुलाखतकार त्या वेळी घडत असलेल्या समीक्षकांच्या खुनाबद्दल अमिताभना विचारतो. अमिताभ एक छोटंसं भाषण करून सांगतात की आलोचना (समीक्षण) आवश्यक आहे कारण त्यामधून कलाकाराला आपल्यात काय कमी पडतंय ते कळतं.

बाय द वे बाल्कीचं अमिताभवर प्रेमच आहे. चीनी कममधे अमिताभ, पा मधे अमिताभ.

बाल्की हा गृहस्थ आंडूपांडू दिक्दर्शक नाही. खूप विचारपूर्वक तो चित्रपट करतो.

प्रत्येक चित्रपटात काही तरी नवं असावं, प्रयोग असावा असा त्याचा प्रयत्न असतो.

एकदा बाल्कीला वाटलं की अमिताभ बच्चन हा मुलगा आणि अभिषेक बच्चन हा बाप दाखवून त्यावर सिनेमा करावा. त्यासाठी शरीरानं म्हातारा पण वयानं बालक अशी डिसॉर्डर  झालेल्या मुलाचं रूपक वापरून बाल्कीनं पा हा सिनेमा केला. सॅनिटरी टॉवेल लोकप्रिय करणाऱ्या माणसावर त्यानं पॅडमॅन केला. म्हातारा अमिताभ आणि तरूण तब्बू या दोघांच्या प्रेमावर-लग्नावर त्यानं चीनी कम केला. व्यवसायानं जाहीरात क्षेत्रातला असल्यानं लोकांचं लक्ष वेधण्याची कला बाल्कीला चांगलीच अवगत आहे. त्यामुळं त्याच्या चित्रपटांत एक देखणेपण असतं, प्रेक्षकाला खिळवून ठेवण्याची ताकद असते. ‘चुप’मधे त्यानं रहस्यपट-थरारपट ही शैली हाताळलीय, चांगली सांभाळलीय.

पण बाल्कीच्या एकूण कीर्तीच्या हिशोबात चित्रपट कमी पडतो.

जाता जाता. 

बाल्कीनं समीक्षकांवर बाण सोडलेत. भरमसाठ बंडल चित्रपट काढणाऱ्या चित्रपट सृष्टीबद्दल बाल्कीचं काय मत? बंडल सिनेमाना चार स्टार देतात यावर बाल्की बोलतो. पण मुळात बंडल सिनेमांचं काय? टपराट सिनेसृष्टी आणि टपराट समीक्षक अशी जोडी असते, त्यावर बाल्कीचं मत काय?

कदाचित चुप-२ असा पुढला जोड सिनेमा बाल्की करतील आणि त्यात कल्पनादरिद्री दिक्दर्शकांना-निर्मात्याना बाल्की धरतील. 

।।

Comments are closed.