सिद्धांताला व्यवहाराची जोड देऊ पहाणारे गोर्बाचेव

सिद्धांताला व्यवहाराची जोड देऊ पहाणारे गोर्बाचेव

कम्युनिझमला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करणारे, कम्युनिष्ट विचाराला लोकशाही आचाराची जोड देणारे मिखाईल गोर्बाचेव काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचं वय ९१ होतं. 

 पेरेस्त्रोएका (खुलेपणा) आणि ग्लासनोस्त ( पुनर्रचना) अशा दोन गोष्टी त्यांनी घडवल्या. रशियातल्या कम्युनिष्ट राज्यव्यवस्थेला त्यांनी लोकशाही वळण दिलं, रशियाची अर्थव्यवस्था मूलतः समाजवादी ठेवत ती बाजाराच्या अधिक जवळ नेली. असं म्हणूया की तसा प्रयत्न त्यानी केला.

गोर्बाचेव समाजवादी होते आणि कम्युनिझमवर त्यांचा विश्वास होता.  समाजवाद आणण्यासाठी लोकशाही असणं आवश्यक आहे असं त्याना रशियाच्या मागील अनुभवावरून वाटलं.  

रशियातल्या कम्यूनिष्ट क्रांतीनंतर स्टालीननं पक्षाचा कबजा घेतला होता. विरोध करणाऱ्या माणसाला मारून टाकणं किवा छळ छावणीत टाकणे ही त्यांची कामाची पद्धत होती. गोर्बाचेव पक्षातल्या सहकाऱ्यांशी आणि जनतेत मिसळत, त्यांचं म्हणणं ऐकून घेत. मतभेद, विरोध असणाऱ्याला त्यांनी मारलं नाही. आपलं म्हणणं समोरच्या माणसाला पटवण्यासाठी ते खूप बोलत इतकं की ते फार बोलतात असा आरोप त्यांच्यावर होत असे.

गोर्बाचेव शेतकरी कुटुंबात जन्मले. स्टालीननं सामुहीक शेतीचं खूळ आणलं आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेची धूळधाण केली. गोर्बाचेव यांच्या एका आजोबानं  स्टालीनच्या हडेलहप्पीला विरोध केला होता. स्टालीननं त्याना तुरुंगात घातले. दुसरा  आजोबानं घरात स्टालीनचे फोटो लावले, त्यालाही स्टालीननं तुरुंगात टाकलं. या अनुभवानंतरही  गोर्बाचेव पक्ष विरोधी झाले नाहीत.   स्टालीनची कामाची पद्धत चूक आहे, तीत सुधारणा केली पाहिजे असं गोर्बाचेवना वाटलं.

गोर्बाचेवनी कार्यक्रम अमलात आणतांना त्यात सुधारणा चालवल्या होत्या हे पुढाऱ्यांना दिसत होतं. पण त्यांचं निरलसपण दिसत असल्यानं पुढाऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि पक्षाच्या सर्वोच्चपदी त्यांना निवडलं.

  दुष्काळ पडत होते, शेतकऱ्याच्या घरात अन्न नव्हतं, शहरातली दुकानं रिकामी असत. अमेरिकेशी स्पर्धा करण्याच्या नादात, कम्युनिझमच कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याच्या नादात विमानं, बोटी, कार, रॉकेटं रशियानं तयार केली. त्यांना दर्जा नसे. रशियानं  ठरवलं की प्रत्येक माणसाला इतक्या चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे, त्यात इतकं फर्निचर असलं पाहिजे. माणसांची संख्या गुणिले चौरस फूट गुणिले खुरच्या आणि टेबलं. हे सारं व्हायला पाहिजे. प्रत्येक कारखान्याला कोटा ठरवून दिला. कच्चा माल आहे की नाही, लोकांची खरेदी करण्याची शक्ती आहे की नाही, बाजारात पैसा आहे की नाही इत्यादी भांडवलशाही विचार न करता नियोजन झालं आणि ते फेल गेलं. भ्रष्टाचार मात्र वाढला. अपयश झाकण्यासाठी माध्यमांवर सेन्सॉरशिप लादली आणि माध्यमंही सरकारी करून टाकली.

जनतेत स्वाभाविक असंतोष होता. जनतेला कम्युनिझम का भांडवलशाही यातलं काही कळत नव्हतं. त्यांना घरात वस्तू हव्या होत्या. असंतुष्ट माणसं कुरकूर करत, कधी निदर्शनं करत, कधी तीव्र विरोध करत. हे पक्षविरोधी झालं, क्रांतीविरोधी झालं. तर अशा लोकांना हुडकून काढा, त्यांची तोंडं बंद करा. यासाठी केजीबीची उभारणी झाली.

काही तरी गडबड आहे आणि ती आपण सुधारली पाहिजे असं गोर्बाचेव यांना कां वाटलं ते कळलेलं नाही. त्यांचा प्रतिगामी लोकांशी संबंध नव्हता, ते कोणाचेही एजंट नव्हते, त्यांना सीआयएवगैरे लोकांकडून फूस नव्हती. स्वतःच्या गावात ते पक्षाच्या धोरणानुसार शेती उत्पादन व्यवस्था सांभाळत होते, ट्रॅक्टर चालवत होते. पक्षावर निष्ठा असूनही त्यांना असंतोष कसा कळला आणि नेत्यांवर निष्ठा ठेवूनही वेगळा मार्ग त्यांना कां काढावासा वाटलं हे अजूनही समजलेलं नाही.

असा हा कोणालाही न समजलेला माणूस थेट अमेरिका, ब्रीटनच्या देशप्रमुखांना भेटून करार करू लागला. अमेरिका आणि रशिया दोघांनीही आपल्याकडची कनवेंशनल अण्वस्त्रं नष्ट करुन टाकावी असा करार रशियानं केला. रशियाची आर्थिक अवस्था बिकट आहे हे वास्तव लपवून न ठेवता ते पश्चिमेतल्या देशांशी संपर्क करून जगाशी आर्थिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न करू लागले.

मुख्य म्हणजे रशियाची आर्थिक गोची ही तिथं लोकशाही नसण्यातून  आहे हे त्यांना उमगलं. तिथून त्यांनी पेरेस्त्रॉएकाला सुरवात केली.

आपण आरंभलेल्या उद्योगामुळं पुढं काय होईल याची कल्पना गोर्बाचेव यांना नव्हती. कम्युनिष्ट पक्ष आणि सोवियेत युनियन हा देश, हे साम्राज्य नष्ट व्हावं असं  त्यांना वाटत नव्हतं. पण नेमकं तेच झालं. सोवियेत युनियनमधले पोलंड, हंगेरी, झेकोस्लोवाकिया, पूर्व जर्मनी इत्यादी देश सोवियेत युनियनमधून बाहेर पडले, लोकशाहीवादी देश झाले. येवढंच नव्हे तर ते अमेरिकन प्रभावाखालच्या नेटो या संघटनेत सामिल झाले. खुद्द रशियात कम्युनिष्ट पक्षावरच बंदी आले, नवे पक्ष स्थापन झाले, कम्युनिष्ट नसलेले येल्तसिन प्रेसिडेंट झाले.

हा अनपेक्षीत परिणाम गोर्बाचेवनी पचवला. रशियन फौजा जर्मनीत घुसवून तो देश ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. उलट १९९० साली अफगाणिस्तानात  असलेलं सैन्य मागं घेतलं, अफगाणिस्तानातली जबरदस्तीनं ताब्यात घेतलेली  राजसत्ता सोडून दिली. कम्युनिझमच जगातून नाहिसा झाल्यासारखं झालं. रशिया हे सत्तेचं केंद्र एकदम अस्ताला गेलं.

त्या वेळी मार्गारेट थॅचर म्हणत होत्या की जे काही घडतंय ते चांगलं आहे, रशियाला आर्थिक मदत केली तर रशिया अधिक लोकशाहीवादी होईल, मुक्त बाजारवादी होईल. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं जर्मनी, जपान या देशांना मदत केली, त्यांना वर यायला मदत केली आणि नंतर ते देश अमेरिका-ब्रीटन या गटात सामिल झाले. तसंच रशियात होऊ शकेल असं थॅचर म्हणाल्या. परंतू त्यांचं म्हणणं अमेरिकेनं मान्य केलं नाही, रशियाशी वैर सुरु ठेवलं, रशियाला एकटं पाडलं.

राजकीय निरीक्षक म्हणतात की अमेरिका-ब्रीटन यांची रशियाविरोधी अतिरेकी भूमिका टोकाला गेल्यामुळंच रशियात एक गंड निर्माण झाला, पश्चिमेवर सूड घेतला पाहिजे अशी भावना निर्माण झाली. पुतीन हा त्या भावनेचा आविष्कार आहे.

काय गंमत आहे पहा. गोर्बाचेव जगाची नव्यानं मांडणी करायला निघाले होते, अमेरिकेनं ती नवी रचना धुडकावून लावली. गोर्बाचेव यांचा रशिया लोकशाहीवादी व मोकळा करण्याचा गोर्बाचेव यांचा विचार  पुतीननी धुडकावून लावला. रशिया मोडला, रशियाचं सामर्थ्य नष्ट  झालं ही गोर्बाचेव यांची चूक होती असं पुतीनना वाटतं. 

जगानं आणि रशियानं, दोघांनीही गोर्बाचेवना झिडकारलं,  दोन्ही बाजूनी गोर्बाचेव टीकेचे धनी ठरले.

१९८५ ते १९९० इतका थोडा काळ गोर्बाचेव रशियात सत्ताप्रमुख होते. नंतर त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग करून येल्तसीननी गोर्बाचेवना सत्तेतून हाकललं, नजर कैदेत टाकलं. तोच उद्योग पुढं पुतीन यांनी केला. गोर्बाचेव जगात असून नसल्यासारखे झाले, एकटे पडले. पत्नी गेली, मुली सोडून गेल्या. गोर्बाचेव अभ्यास करत, भाषणं करत, तगण्याचा प्रयत्न करत. पण जगाच्या लेखी ते अस्तित्वान नव्हते. 

शेवटी त्यांचं शारीरीक अस्तित्वही संपलं. ते अटळच होतं.

गोर्बाचेव यांनी आरंभलेलं काम अर्थवटच राहिलं आणि गोर्बाचेव गेले.

ते करायला गेले एक आणि झालं तिसरंच. पण जे घडलं ते जगाला कलाटणी देणारं ठरलं.

।।

Comments are closed.