झटपट संस्था, पुढाऱ्यांची गय न करणारी जनता.

झटपट संस्था, पुढाऱ्यांची गय न करणारी जनता.

कर्जतला जियो नावाची एक शिक्षण संस्था निर्माण झालीय. मुकेश अंबानींच्या उद्योगाच्या खात्यावर ती संस्था आहे. संस्थेबद्दल समजलेल्या गोष्टी दोन. एक संस्थेचे चॅन्सेलर डॉ. माशेलकर असतील. दुसरी संस्थेत विद्यार्थ्याला वर्षाला इतकी इतकी फी आकारली जाईल, इतक्या एकरावर इतके चौरस फूट बांधकाम असेल वगैरे. बाकी  माहित नाही. कोण प्रोफेसर्स आहेत, अभ्यासक्रम कसा असेल, तो कसा शिकवला जाईल इत्यादी गोष्टी समजलेल्या नाहीत. सारं काही अजून घडायचं आहे. माशेलकर ही व्यक्ती लोकांना माहित आहे. शिक्षण किंवा संशोधन या बाबतची त्यांची कामगिरी किती व गवगवा किती याचा अंदाज येत नाही.

अजून घडलेलं काहीच नाही, केंद्र सरकारनं ही संस्था अत्युच्च दर्जाची आहे असं जाहीर करून टाकलं आहे. 

संस्था दर्जेदार कशा होतात?

बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स १९०९ साली स्थापन झाली.

जेआरडी टाटा यांच्या डोक्यात भारतातला पोलाद उद्योग सुरु करण्याचं होतं, उद्योगाला लागणारे पायाभूत तंत्रज्ञ, वैज्ञानिक तयार करणारी शिक्षण संस्थाही त्यांना उभारायची होती. त्याची तयारी करण्यासाठी जेआरडी इंग्लंडला गेले. तिथून परतताना विवेकानंद त्यांच्या जहाजावर होते. ही १८९३ सालची गोष्ट. विवेकानंद प्रसिद्ध होते आणि जेआरडीही. दोघेही नवं जाणून घेणं व चांगल्याचा प्रसार करणं यासाठी प्रसिद्ध होते, दोघांचाही जनसंपर्क दांडगा. जेआरडींनी त्यांची कल्पना विविकानंदांशी चर्चिली. विवेकानंद उत्साहानं जेआरडींच्या प्रयत्नात सहभागी झाले, त्यांनी शिक्षण संस्था कशी असावी याच्या काही कल्पना जेआरडींना सांगितल्या.

भारतात परतल्यावर विवेकानंदांच्या सूचना व इतर जाणकारांशी बोलून जेआरडींनी प्रस्तावित शिक्षण संस्थेचा एक मसुदा तयार करून कर्झन यांना पाठवला. ही १८९८ च्या सुमाराची गोष्ट. त्या वेळी कर्झन भारताचे व्हाईस रॉय व्हायचे होते. राणीच्या भारत विभागामधे ते एक मंत्री (सेक्रेटरी) होते आणि राणीच्या प्रिवी काऊन्सिलचे सदस्य होते. रशिया, आशिया आणि पर्शिया या विषयावर त्यांची ३ पुस्तकं प्रसिद्ध होती आणि अकॅडमिक वर्तुळांत त्यांच्या विद्वत्तेला मान्यता होती. जेआरडींना कर्झन माहित होते. कर्झन  भारताचे सर्वेसर्वा होण्याच्या आधीच जेआरडीनी त्याना  गाठलं होतं.  

कर्झननी संस्थेची कल्पना विल्यम रॅमसे यांच्या कानावर घातली. रॅमसे रसायनशास्त्रज्ञ होते, कर्झननी संपर्क केला तेव्हां त्यांनी नोबल गॅसेसचा शोध लावला होता,  जगभरच्या नामांकित वैज्ञानिकांत त्यांचं नाव होतं, रसायन शास्त्रातलं नोबल त्याना मिळू घातलं होतं. रॅमसेनी बंगलोरला संस्था स्थापन करावी असं सुचवलं.

निझाम आणि वोडियार या दोन राजांनी देणग्या आणि जमिनी दिल्या.

रॅमसेंनी त्यांचे सहकारी ट्रॅवर्स यांना इन्सटिट्यूटचं प्रमुखपद घ्यायला सांगितलं. मॉरिस ट्रॅवर्स हे रॅमसे यांचे सहकारी वैज्ञानिक. रॅमसेंच्या नोबेल विजेत्या संशोधनामधे त्यांचा सहभाग होता. ट्रॅवर्सना संशोधन आणि संस्था दोन्हीचा दीर्घ अनुभव होता. ट्रॅवर्स म्हणाले की त्यांचं स्कॉटलंडमधे सुरु असलेलंच संशोधन ते बंगलोरला पुढं सुरु करतील. याचा अर्थ असा की त्यांचं संशोधन करता यावं अशा तऱ्हेची प्रयोगशाळा ते बंगलोरमधे उभारतील आणि संशोधनाला सहाय्य करू शकतील अशी माणसंही तयार करतील. 

१६ वर्षं सगळी सिद्धता झाल्यावर १९०९ साली संस्था स्थापन झाली आणि ट्रॅवर्स संचालक झाले.  १९१४ पर्यंत ट्रॅवर्स संचालक होते. त्यानंतर बोर्न आणि फॉस्टर हे वैज्ञानिक संचालक झाले आणि १९३३ साली नोबेल विजेते सीवी रामन संचालक झाले.

इन्स्टिट्यूट आज जगातल्या नामांकित वैज्ञानिक शिक्षण संस्थांत गणली जाते. भारतात विविध शिक्षण संस्था, सरकारी संस्था यामधे या संस्थेतून बाहेर पडलेली माणसं कार्यरत दिसतात.   

जियो जितक्या पटकन कागदावर जन्माला आली तसाच एक करारही २०१४ साली जन्माला आला. 

जियोसारख्याच एका झटपट कागदी संस्थेची गोष्ट.

 राफाएल  विमान खरेदीचा करार करायला नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले. राफाएल विमानांमधे असणाऱ्या यंत्रणा, सुटे भाग इत्यादींचं अब्जावधी रुपयांचं कंत्राट देण्याचा करार झाला. हा करार करत असताना अदाणी आणि अंबाणी हे दोन उद्योगपती त्यांच्या सोबत होते. कंत्राट अदाणी आणि अंबाणी यांच्या कंपन्यांना देण्यात आलं.

अदाणी आणि अंबाणी यांच्या कंपन्या आठवडाभर आधीच निर्माण झाल्या होत्या, रजिस्टर झाल्या होत्या. त्या कंपन्या केवळ कागदावर होत्या. कुठल्याही उत्पादनांचा अनुभव त्या कंपन्यांना नव्हता.

 ।।

फ्रेंच प्रेसिडेंट एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सुरक्षा रक्षकानं प्रेसिडेंट हजर नसलेल्या एका कार्यक्रमात घुसून लोकांना बदडून काढलं. बदडताना बेनाल्ला यांनी पोलिसांचं हेलमेट वापरलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यानं दोन पत्रकारांना बाजूला काढून बडवून काढलं होतं.

  दोन्ही प्रसंगांचं व्हिडियोचित्रण ल माँद या पेपरनं मिळवलं आणि प्रसिद्ध केलं.

हे प्रकरण बाहेर आल्यावर एक महिना झाला तरी चर्चा थांबेना, मॅक्रॉनवर होणारा टीकेचा भडीमार थांबेना. मॅक्रॉन यांच्या पक्षातले, त्यांच्या मंत्रीमंडळातले, सहकारी त्यांचं समर्थन करायला तयार होईनात. ते गप्प राहिले.

नाईलाजानं मॅक्रॉन प्रकटले. झाल्या प्रकाराची जबाबदारी त्यानी स्वीकारली. आपण सत्ताधारी असलो तरीही कायदा आपल्याला बंधनकारक आहे, आपले गुन्हे माफ होऊ शकत नाहीत असं ते म्हणाले. परंतू हे वक्तव्यंही सरळ आणि प्रामाणिक नव्हतं. मॅक्रॉन म्हणाले की माध्यमं पराचा कावळा करत आहेत, माध्यमं माझे विरोधक आहेत. थोडक्यात असं की ते माध्यमांवरच घसरले. परंतू बेनाल्ला यांच्यावर कारवाई झाली नाही.

    सरकारच्या एका पत्रकांत जाहीर झालं की बेनाल्ला यांना कामावरून कमी करण्यात आलं आहे.   पंधरा दिवसांनी पत्रक निघालं की त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आलं आहे.

माध्यमांनी मॅक्रॉनना सोललं. मॅक्रॉनची लोकप्रीयता २७ टक्क्यावर घसरली. फ्रान्सचं आर्थिक परिवर्तन करायला निघालेल्या मॅक्रॉनवर अर्थशास्त्रज्ञही वैतागले. ते जाहीरपणे म्हणू लागले की ज्या माणसाला सामान्य माणसाचं मन कळत नाही तो माणूस बहुदा केवळ श्रीमंतांचीच बाजू घेईल. म्हणजे मॅक्रॉन हे श्रीमंतांच्याच बाजूनं आर्थिक पावलं उचलणार असं फ्रेंच अर्थजाणकार म्हणू लागले. प्रकरण मॅक्रॉन यांना निस्तरता आलं नाही तर त्यांचं अध्यक्षपदच वांध्यात आहे. 

पुढाऱ्यांच्या विश्वासातली, त्यांच्या निकट वर्तुळातली माणसं लफडी करतात, सत्तेचा गैरवापर करतात. कधी असा गैरवापर पुढाऱ्याच्या परोक्ष घडत असतो, पुढाऱ्याला त्याची कल्पना नसते. बेनाल्लांनी परस्पर उद्योग केले असणं शक्य आहे. त्या बद्दल मॅक्रॉन यांना जबाबदार धरता येत नाही. मॅक्रॉन यांच्या सांगण्यावरून बेनाल्लांनी हा उद्योग केला हे संभवत नाही.

तरीही बेनाल्लावर कारवाई करायला मॅक्रॉन तयार नाहीत याचं कारण अन्य बाबतीत बेनाल्ला हे मॅक्रॉनना उपयुक्त ठरत असतील. पुढाऱ्याच्या खाजगीत काही माणसं असतात. त्या माणसानी पुढाऱ्याला फार जवळून पाहिलेलं असतं. पुढाऱ्याची काळी बाजू त्यांना माहित असते. काही वेळा त्या काळ्या कृत्यात ती खाजगी माणसं सहभागीही असतात. अशा परिस्थितीत खाजगी माणूस आगाऊपणे वागला असला तरी पुढारी काहीही करू शकत नाहीत. पुढारी त्यांना खाजगीत झापतही असतील,  जाहीरपणे मात्र ते काही करत नाहीत कारण ते त्यांना सोयीचं नसतं. 

फ्रेंच जनता मात्र मॅक्रॉनना क्षमा करायला तयार नाही. 

राष्ट्रपती किवा कोणीही पुढारी कितीही मोठा असो, त्यानं देशासाठी आणि जगासाठी काहीही केलेलं असो. त्याच्या हातून गुन्हा घडला, चूक घडली तर त्याला क्षमा करायला फ्रेंच, ब्रिटीश, जर्मन वगैरे लोक तयार नसतात. 

  नुकतीच ब्रीटनमधे घडलेली गोष्ट. सरकारी पैसा वापरून आपल्या शेतघराचं नूतनीकरण केलं येवढी बातमी प्रसिद्ध झाल्यावर ब्रिटीश मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. पैसेही किरकोळच होते, अब्जावधी वगैरे नव्हते. पण चिमूटभर कां होईना, भ्रष्टाचार होता आणि बेकायदा वर्तन होतं.

ब्रीटनमधे कोणी म्हणालं नाही की या एका बारीकशा गुन्ह्यासाठी एका महान नेत्याला शिक्षा होता कामा नये. पुतीन आणि ट्रंप गुन्हे करून सुटतात मग आमच्या मंत्र्याला एका क्षुल्लक गुन्ह्यातून सुटका द्यायला काय हरकत आहे असंही कोणी म्हणालं नाही.  

।।

One thought on “झटपट संस्था, पुढाऱ्यांची गय न करणारी जनता.

  1. About Dr Raghunath Mashelkar: “माशेलकर ही व्यक्ती लोकांना माहित आहे. शिक्षण किंवा संशोधन या बाबतची त्यांची कामगिरी किती व गवगवा किती याचा अंदाज येत नाही.” I did my PhD at then called UDCT (located behind VJTI of Matunga) where Raghunath as a fresh Chemical Engineering graduate did his PhD research work next to my laboratory under well known guide Prof. Sharma -who later became its director. As I recalled, Raghunath was appointed in charge of Delhi’s prestigious institution CSIR which would provide grants to India’s various universities for higher graduate and PhD studies. First thing he did was to make these educational colleges/institutions should present full details of their research in the planning and make them earn required funds from industries in India and cut down on Govt grants. Industries interested in such research were very much interested in mutually benefitting in the process. Bet, this would be the goal of Ambani initiated project. Later, Raghunath became instrumental in patenting the ‘usage of TURMERIC’ for the benefit of India as foreigners began patenting its use in novel medicinal applications. In other words, Raghunath has been know for what’s mentioned above -a down to Earth accomplished individual who was born to a low middle income uneducated village family. I think, he better be mentioned with some respect!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *