नेवाल्नी भाग २. पुतिनचा निवडणुक फ्रॉड उघडा केला.

नेवाल्नी भाग २. पुतिनचा निवडणुक फ्रॉड उघडा केला.

पुतिन यांचं धटिंगणासारखं वागणं इतकं दृष्टीत भरण्यासारखं होतं की पुतिन विरोधी विचार पटापट जन्मला वाढला. २००५ साली पुतिन विरोधकांची एक संघटना झाली, त्यांनी रशियन मार्च नावाची संघटना काढली. नेवाल्नी या संघटनेत सामिल झाले. परंतू या संघटनेत नाझी, अतिरेकी, टोकाचे देशीवादी, हिंसावादी लोक बरेच होते. नेवाल्नी या संघटनेच्या बाहेर पडले.

नेवाल्नी याब्लोको नावाच्या एका लिबरल संघटनेत सक्रीय झाले. पण तिथंही त्यांचं पटलं नाही, संघटनेनं त्यांना हाकललं. रशियन मार्चमधले लोक अती देशीवादी होते आणि याब्लोकोमधले लोक देशीवादाच्या दुसऱ्या टोकाला होते.

नेवाल्नींचा राजकीय विचार असा होता. झारशाही म्हणजे राजेशाही गेली; सोवियेत युनियनही मोडलं; थोडक्यात म्हणजे दुनियाभरच्या देशांना कवेत घेणारं साम्राज्य मोडलं; आता जे उरलंय तो आहे रशिया; तो रशिया समृद्ध व्हावा; तो रशिया लोकशाहीवादी आणि लोकाना स्वातंत्र्य देणारा व्हावा. 

नेवाल्नी यांनी २००७ साली नॅशनल रशियन लिबरेशन मूव्हमेंट या नावाची संघटना स्थापली. संघटना स्थापनेसाठी ते देशभर फिरले. सुमारे ४०० शहरात त्यांनी शाखा स्थापन केल्या. २००६ साली यु ट्यूब निर्माण झालं. त्याचा फायदा नेवाल्नी यांनी करून घेतला. आपला विचार आणि प्रचार मांडणाऱ्या एवी तयार करण्याचा सपाटाच त्यांनी लावला. त्यांना तरूण मित्र मिळाले, नव्या तंत्रज्ञानात उत्साह असलेल्या तरुणांच्या टीम तयार झाल्या, नेवाल्नीना मदत करू लागल्या. या काळात जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करून घेण्याच्या नादात अनेक मूर्ख उद्योगही नेवाल्नी यांनी केले. देशप्रेमाचा अतिरेक केला, बाहेरून येणाऱ्यांना हाकलून द्या, रशियातून फुटून निघालेल्या भागांना (चेचन्या इत्यादी) पुन्हा देशात घ्या असंही त्यांनी सांगितलं. पण यथावकाश त्यांचं डोकं ठिकाणावर आलं, आपण मूर्खासारखं वागलो असं म्हणत त्यांनी आपल्या मुख्य कामावर लक्ष केंद्रीत केलं.

मुख्य काम होतं नागरी सेवांमधे सुधारणा आणि भ्रष्टाचार दूर करणं. तळातली अवस्था वाईट होती कारण पुतिन आणि त्यांचे मूठभर लोक पैसा हाणत होते, पैसा खेड्यापाड्यात पोचत नव्हता, अगदी मॉस्कोसारख्या शहराचीही अवस्था वाईट होती. क्रेमलिन, पुतिन व त्यांचे निकटवर्तीय, लष्करी वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ओलिगार्क यांच्या आसपास पैसा जात होता.

देशाला सुखी करायचं असेल तर भ्रष्टाचार दूर करावा लागेल आणि भ्रष्टाचार दूर करायचा तर थेट पुतिनवरच हल्ला करावा लागेल हे नेवाल्नीना उमगलं. त्यांची चळवळ त्या दिशेनं सरकली.

नेवाल्नीनी २०१० सालापासून त्यांची चळवळ सोशल मीडियात नेली. अनेक वेबसाईट तयार केले. गावातले लोक त्यांच्या त्यांच्या स्थानिक वेबसाईटवरून रस्त्यांची, विजेची, हॉस्पिटलांची मागणी करू लागले. सरकार सार्वजनिक कामांची टेंडरं कशी काढतं, ती कशी भरली जातात,  ती कोणाकोणाला मिळतात, टेंडरनुसार कामं कशी पार पडतात किंवा पार पडत नाहीत, याचा अभ्यास लोकं करू लागले, ती माहिती वेबसाईटवर टाकू लागले. माहिती गोळा करण्याचं जाहीर आव्हान केलेलं असे, जागोजागचे लोक आपापल्या गावातली माहिती गोळा करून वेबसाईटवर पोचवत. भारतात जवळपास याच काळात राजस्थानात अरूण रॉय यांच्या संघटनेनं राजस्थानातल्या सार्वजनिक कामांवर लक्ष ठेवलं होतं.

नेवाल्नी यांनी भ्रष्टाचाराचा माग काढणाऱ्या रीतींचा अभ्यास केला. एकाद्या कामाचं टेंडर निघाल्यापासून फाईल कशी कशी सरकते, कोणाकोणाकडं जाते, कोणकोण त्यात फेरफार करतं, माल प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कसा कसा पोचतो, त्याचं मोजमाप कसकसं होतं इत्यादी गोष्टी ज्या ज्या बिंदूवर होत असतात ते ते बिंदू हेरून त्यांची नोंद ठेवावी लागते. फायलींचे फोटो काढणं हे अगदी साधं काम असतं पण तेच सर्वात महत्वाचं असतं. फायलींवरच्या तारखाही महत्वाच्या असतात. काम कां आणि किती रखडलं किंवा झालंच नाही ते फायलींवरच्या अधिकाऱ्यांच्या नोदी आणि तारखांवरून समजतं.

नेवाल्नी ब्लॉग लिहीत. चळवळीतल्या इतर कार्यकर्त्यांनाही ब्लॉग लिहायला प्रवृत्त करत. रशियातली माध्यमं सरकारच्या आणि पुतिन या व्यक्तीच्या हातात होती. पुतिन यांना त्रासाची होईल अशी कोणतीही माहिती रशियातले पेपर छापत नसत, चॅनेल प्रसारित करत नसत. चळवळीतल्या लोकांनी लिहिलेले ब्लॉग आणि यु ट्यूबवरच्या क्लिप्सनी देशाचा ताबा घेतला. भ्रष्टाचार शोधणारी आणि त्याची वाच्यता करणाऱ्या अनेक टीम्स सक्रीय झाल्या.

 २०११ साली नेवाल्नी यांनी करप्शन फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या वतीनं ते काम करू लागले. येव्हाना पुतिन आणि सरकार यांच्या भ्रष्टाचाराचा येवढा बभ्रा झाला होता की अगदी तळातल्या माणसांनाही भ्रष्टाचार समजला, उदाहरणं तोंडपाठ झाली. करप्शन फाऊंडेशनचा संदेश होता, नागरिकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे.

पुतिन हुशार माणूस. कायम सत्तेत रहायला हवं यासाठी ते राज्यघटनेत सुधारण करून कधी प्रेसिडेंट होतात, कधी पंतप्रधान होतात, पण सत्ता हाती ठेवतात. २०११ साली पुतिन पुन्हा उभे राहिले. 

नेवाल्नी यांनी मोहिम आखली. ‘निवडणुकीत भरघोस मतदान करा, पुतिन यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला मतं द्या, मग तो विरोधक कोणीही असो.’ आपल्या ब्लॉगवर नेवाल्नी यांनी पुतिन यांच्या पक्षाचं वर्णन ‘बदमाष आणि चोरांचा पक्ष’ या शब्दात केलं.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. ४९ टक्के मतं पुतिन यांच्या युनायटेड रशिया या पार्टीला मिळाली. मतपेट्यांमधे खोटी मतं घुसवण्यात आली होती. ६५ कोटी मतं पडली, त्यातली १.५ कोटी मतं खोटी होती. जगभर या निवडणुकीवर टीका झाली.

नेवाल्नी यांनी ब्लॉगवरून आणि यु ट्यूबवरच्या क्लिपांमधून मतदानातले घपले जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशी मॉस्कोमधे निदर्शनात सामिल व्हा असं आवाहन केलं. मॉक्सोमधे हजारो लोक गोळा झाले. त्यानी निवडणुक फ्रॉड आहे, ती रद्द झाली पाहिजे अशी मागणी केली. जमा झालेल्या विशाल समुदायासमोर नेवाल्नी यांनी भाषण केलं.

त्यांनी लाऊड स्पीकरवरून लोकांना विचारलं ‘ पुतिनची पार्टी कोणाची आहे?’

लोकामधून प्रतिसाद आला ‘ बदमाष आणि चोरांची पार्टी’

रशियात प्रथमच हजारो नागरीक गोळा होऊन म्हणत होते ‘आम्ही आहोत, आम्हाला अस्तित्व आहे, आम्ही आमची मतं मांडत आहोत.’

पुतिन यांनी खूणगाठ बांधली. ‘अती झालंय. या माणसाचा काही तरी बंदोबस्त करायला हवा’

।।

Comments are closed.