नेवाल्नी भाग ३. ..आणि नेवाल्नी हुतात्मा झाले.

नेवाल्नी भाग ३. ..आणि नेवाल्नी हुतात्मा झाले.

२०११ सालच्या पुतिन यांच्या निवडणुकीला विरोध केल्यानंतर नेवाल्नी यांना फालतू कारणं दाखवून तुरुंगवास झाला. तिथून काही ना काही कारणं दाखवून अटक करणं, स्थानबद्द करणं, तुरुंगात घालणं सुरू झालं.

२०१७ साली नेवाल्नी यांनी पुतिन यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला. सरकारनं नेवाल्नी यांच्यावर खटले भरले आणि त्या खटल्यांच्या आधारे नेवाल्नींचा निवडणूक अर्ज रद्दबातल करण्यात आला.

रशियन सरकारकडं एक खासमखास माणसांचं दल आहे. ही माणसं सैन्यातली असतात, त्यांची ओळख पुसून टाकण्यात आलेली असते. त्यांची नावं, पासपोर्ट बदललेले असतात. या लोकांकडं विषाच्या कुप्या असतात. चहाच्या कपात विष मिसळायचं, डीओडरंटच्या बाटलीतून विष फवारायचं असा उद्योग करून ही माणसं सरकारला नकोशी असलेली माणसं मारत असतात. असे काही हस्तक नेवाल्नींच्या भोवती पसरण्यात आले, ते नेवाल्नींच्या भोवती वावरू लागले. नेवाल्नींना ही खबर मिळाली होती. १९१९ सालापासून हा उद्योग सुरु झाला.

२०२० सालच्या ऑगस्ट महिन्यात नेवाल्नी प्रचार दौऱ्यासाठी सायबेरियात निघाले, विमानात बसले. विषवाल्या दलातले लोक त्यांच्या फ्लाईटवर होते. त्यांच्यापैकी कोणी तरी नेवाल्नी यांच्या अंडरपँटमधे नोविचोक हे विष फवारलं. फ्लाईटवर नेवाल्नी बेशुद्द झाले. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी युलिया होत्या. त्यांनी विमानात दंगा केल्यामुळं विमान इमरजन्सी लँडिंग करून उतरवण्यात आलं. सायबेरियातले डॉक्टर नेवाल्नींवर उपचार करायला तयार होईनात. बातमी पसरली. जर्मन सरकारनं हवाई अँब्युलन्स सायबेरियात पाठवली, नेवाल्नींना बर्लीनला नेण्यात आलं. तिथं ताबडतोब उपचार झाले. नेवाल्नी वाचले. परंतू विष खूप स्ट्राँग होतं, सहा महिने नेवाल्नींना उपचार घ्यावे लागले.

जगभर ओरड झाली. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी पुतिन यांना विषप्रयोगाला जबाबदार धरलं. युनायटेड नेशन्स आणि इतर अनेक देशांनी पुतिन यांच्यावर ठपका ठेवला.

नेवाल्नी हळूहळू बरे होत होते. जरा बरे झाल्यावर त्यांनी हॉस्पिटलमधेच असताना कामाला सुरवात केली. पुतिन यांच्या भ्रष्टाचाराचे, त्यांनी जमा केलेल्या बेहिशोबी संपत्तीचे पुरावे त्यानी गोळा केले. ड्रोन वापरून पुतिन याच्या प्रॉपर्टीचं चित्रीकरण करण्यात आलं. बरे झाल्यावर पुढं काय करायचं असा प्रश्न आला. रशियात परत गेलं की पुतीन तुरुंगात टाकणार, ठार मारणार हे उघड होतं. मित्र आणि सल्लागारांनी सल्ला दिला की नेवाल्नी यांनी रशियात परत जाऊ नये, बाहेर राहूनच पुतिनविरोधी चळवळ चालवावी. नेवाल्नीनी नकार दिला. बाहेर राहिलो तर पुतिनचं आयतंच फावेल, आपल्यावर पळपुटेपणाचा आरोप होईल, कार्यकर्ते तुरुंगात जातात आणि नेता परदेशात मजा मारतो असा आरोप होईल, असं म्हणत नेवाल्नीनी रशियात जायचा निर्णय घेतला.

२०२१ च्या जानेवारी महिन्यात ते मॉस्कोला जाणाऱ्या विमानात बसले. विमानातल्या लोकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. त्यांना वाटलं की नेवाल्नी एकादं भाषण करतील. पण नेवाल्नी हा चमकदार भाषण करणारा माणूस नव्हता. अगदी सामान्य माणसासारखंच ते वागत, रहात, बोलत. मॉस्कोत ते तीन खोल्यांच्या फ्लॅटमधे रहात. प्रवाशांनी टाळ्या वाजवून स्वागत केल्यावर नेवाल्नी एयर होस्टेससारखा आवाज काढत म्हणाले ‘कृपया पट्टे बांधा, नसता आपण मॉस्कोत पोचू शकणार नाही.’ ते काहीसे थकलेले होते, त्यांच्यासोबत त्यांची पत्नी युलिया होती. युलिया म्हणाली ‘ अरे यार मॉस्कोला निघालोय, थोडेसे थकलोय, कुणी तरी थोडीशी व्होडका द्या रे.’ विमानात हशा पिकला.

मॉस्को विमानतळावर नेवाल्नीच्या स्वागतासाठी हज्जारो माणसं गोळा झाली होती.पोलिस त्यांना हाणत होते, पकडून कोठडीत ढकलत होते, तरीही गर्दी हटायला तयार नव्हती. सरकारनं विमान दुसऱ्याच विमानतळावर उतरवण्यात आलं. उतरल्या उतरल्या नेवाल्नी यांना अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पोलिस कोठडीचंच रुपांतर न्यायालयात करण्यात आलं. रशियातले न्यायाधीशही पुतिनचे नोकर असतात, न्यायालय स्वतंत्र नसतं. काही मिनिटं खटला चालला. फालतू कारणं सांगून कोर्टानं नेवाल्नीना १९ वर्षाची सजा दिली.

नेवाल्नी तुरुंगात रवाना झाले त्याच दिवशी यू ट्यूबवर नेवाल्नीनी जर्मनीतल्या मुक्कामात तयार केलेली डॉक्युमेंटरी प्रदर्शीत झाली. ती डॉक्युमेंटरी सांगते. काळ्या समुद्राच्या काठावर १८० एकरांवर परलेला एक महाल आहे. महाल १.९१ हजार चौरस फुटाचा आहे. महालाच्या परिसरात   हॅली पॅड आहेत, फूटबॉलची मैदानं आहेत, स्विमिंग पूल आहेत, द्राक्षाच्या बागा आहेत, कारची रेस खेळता येईल असे ट्रॅक आहेत. इमारतीत बार आहेत, चित्रपट दाखवण्यासाठी थिएटर्स आहेत, पाच पन्नास बेडरुम्स आहेत. बाथरूममला नळ, दरवाजाच्या मुठी आणि कड्या, कुठलीही वस्तू दोन चार लाखाच्या खाली नाही. महाल आणि एकूण परिसराची त्या काळातली किमत १.२ अब्ज डॉलरची आहे असं नेवाल्नींचं म्हणणं होतं.

कोट्यावधी लोकांनी ही डॉक्युमेंटरी पाहिली.

पुतिननी पत्रकार परिषद घेतली. आपण ती डॉक्युमेंटरी पाहिली, आपल्याला मौज वाटली असं पुतिन म्हणाले. ती प्रॉपर्टी आपली नाही, तिच्याशी आपला काहीही संबंध नाही असं त्यांनी जाहीर केलं.

तो माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर सरकारनं धरपकडीचं सत्र सुरु केलं. नेवाल्नी यांचे वकील, जवळचे मित्र, नातेवाईक यांना तुरुंगात घालण्यात आलं.

नेवाल्नींना आर्क्टिकजवळच्या तुरुंगात हलवण्यात आलं. तिथं कमालीची थंडी असते. नेवाल्नीना रात्री दर तासाला जागं करण्यात येत असे. औषधं, चांगलं जेवण मिळावं यासाठी नेवाल्नीनी तुरुंगात अनेक उपोषणं केली. उपोषण करणं हा गुन्हा आहे असं सांगून नेवाल्नीना अंधार कोठडीत, एकांतात ठेवलं जात असे. नातेवाईकांना भेटायची परवानगी नसे.

नेवाल्नीची प्रकृती खालावत राहिली, ते हाडांचा सापळा झाले होते.

कधी कधी त्यांना कोर्टात नेलं जात असे. तेव्हां ते नातेवाईक,मित्र, बातमीदार यांना दिसत. प्रकृती खालावली असली तरी ते हसतमुख असत.सतत विनोद करत असत. शुक्रवारी ते वारल्याची बातमी आली. त्याच्या आदल्या दिवशी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तेव्हां उपस्थित न्यायाधिशांशी त्यांनी विनोद केले. आपल्या खात्यावरचे पैसे संपलेत, सरकारला सांगून माझ्या खात्यावर काही पैसे टाका असं ते न्यायाधिशांना म्हणाले.

नंतर काय झालं ते कळायला मार्ग नाही. पण परिणाम मात्र आपल्याला माहित आहे. ॲलेक्सी नेवाल्नी हुतात्मा झाले.

।।

समाप्त

Comments are closed.