सिनेमे. नेवाल्नी डॉक्युमेंटरी

सिनेमे. नेवाल्नी डॉक्युमेंटरी

नेवाल्नी, डॉक्युमेंटरी.

डॉक्युमेंटरी हा दृश्य जर्नालिझम असतो. 

२०२२ साली नेवाल्नी याच शीर्षकाची डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली. नेवाल्नी जिवंत असताना ही डॉक्युमेंटरी चित्रीत झाली. नेवाल्नीवर पुतिननी विषप्रयोग केला होता, त्यातून वाचलेले नेवाल्नी जर्मनीत उपचार घेत होते. त्या काळात ही डॉक्युमेंटरी चित्रीत झालीय.

नेवाल्नी एका रिकाम्या गोदामासारख्या जागी एका टेबलासमोर बसतात आणि बोलतात. फीचर फिल्ममधे दाखवतात तसे फ्लॅशबॅक डॉक्युमेंटरीत आहेत, नेवाल्नी यांच्या बोलण्यात आलेले संदर्भ त्या फ्लॅशबॅकमधे दिसतात. 

डॉक्युमेंटरी सुरु होते.

‘तुला आवडणार नाही, आम्हालाही ते नकोय, पण समजा ते घडलं, तू मेलास, तर रशियन लोकाना तू कोणता संदेश देशील?’

 टेबलावर फक्त एक ग्लास. 

‘कमॉन डॅनियल. ते शक्य नाहीये. मी मरणार नाहीये. मी मेल्यानंतर दाखवण्यासाठी सिनेमा करायचा असेल तर तो कंटाळवाणा सिनेमा स्वतंत्रपणे कर. ही मुलाखत त्यासाठी नको….’ मुलाखतकाराला नेवाल्नी सांगतो.

डॉक्युमेंटरी २०२२ साली पहात असतानाही आपण चकित होतो. पुतिन यांची खुनी कारकीर्द आपल्याला माहित असते आणि हा गडी आत्मविश्वासानं म्हणतो की तो जगणार आहे.

नेवाल्नी काहीसा अशक्त दिसतो, किंचितसा थकलेला दिसतो.

नेवाल्नी बॅगा भरतो. विमानतळाकडं निघतो. मुलाखतकाराला सांगतो ‘ पुतीननं माझ्या खुनाचा प्रयत्न केला. मी पुरून उरलो. पुतीन भडकला. आता तो मला तुरुंगात टाकणार. एक मोठाच्या मोठा बिलबोर्ड मॉस्कोत लावून सांगणार की नेवाल्नी तू परत येऊ नकोस.. निघालोय.’ 

माहितीपट जर्मनीत सुरु होतो. बाहेर वातावरण बर्फाच्छादित आहे. झाडं मात्र बर्फाला न जुमानता उभी आहेत.

नेवाल्नी विमानात प्रवेश करतो. प्रवासी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करतात, सेल फोन उगारून फोटो काढतात.

नेवाल्नी एयर होस्टेसच्या थाटात त्याना सांगतो ‘आपापल्या जागेवर बसा, पट्टे बांधा, नसता आपण कोणीच मॉस्कोला परतू शकणार नाही.’ प्रवासी हसतात.

नेवाल्नीसोबत त्याची पत्नी युलिया आहे. दोघंही थकलेले आहेत. पत्नी टाळ्या वाजवणाऱ्या लोकांना सांगते ‘अरे आपण रशियात चाललोय. कुणी तरी मला थोडीशी व्होडका द्या ना रे.’

नेवाल्नी मॉस्कोत उतरतो, मॉस्को बर्फानं आच्छादलेलं आहे. बर्फाला आणि पुतीननं लावलेल्या जमावबंदीला न जुमानता लोक नेवाल्नीला भेटायला आलेत. 

नेवाल्नीची सभा. बर्फात. नेवाल्नी लोकांमधे मिसळतो, त्यांच्याशी संवाद करत करत भाषण करतो. 

‘पुतीननं तुमच्यासाठी काही चांगलं केलंय?’ माईक हातात घेऊन नेवाल्नी विचारतो.

समोरची शेकडो माणसं एका सुरात उच्चारतात ‘नाही.’

 ‘पुतीन कोण आहे?’ नेवाल्नी विचारतो.

‘चोर’ जमाव एकसुरात ओरडतो.

 नेवाल्नी पुन्हा पुन्हा विचारतो, पुन्हा पुन्हा जमाव उत्साहानं चढ्या आवाजात सांगतो की पुतीन चोर आहे.

डॉक्युमेंटरीत नेवाल्नीच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेची दृश्यं आहेत.

एका दृश्यात नेवाल्नी सायबेरियात कॅमेऱ्यासमोर उभे असतात. तिथल्या लोकांची स्थिती कशी आहे ते सांगत असतात. पाठीमागं एक माणूस एका घराच्या भिंतीकडं तोंड करून, कॅमेऱ्याकडं पाठ करून उभा असतो. लघवी करत असतो.

पण खरी गंमत आहे ती नेवाल्नीवर झालेल्या विषप्रयोगाची माहिती नेवाल्नीनी कशी मिळवली यात.खूप तपशिलात तो सिलसिला डॉक्युमेंटरीत नोंदला आहे.

नेवाल्नी आणि त्याची टीम सीम कार्डं बदलून विष प्रयोग करणाऱ्या लोकाना फोन करतात. 

एक असतो वैज्ञानिक. त्याला विचारतात- तू येवढी मोठी तयारी करून विषाची व्यवस्था केलीस, मग नेवाल्नी जिवंत कसा राहिला.’

वैज्ञानिक बोलायला तयार नाही. तो विचारतो की तुला हे सारं कोणी सांगितलं. नेवाल्नी म्हणतो की तुझ्या मारेकरी टीममधल्या अमूक एका जनरलनं सांगितलं आणि त्यानंच सुचवलं की मी तुझ्याशी बोलावं.

तो जनरल नेवाल्नीला भेटलेला नसतो. पण तो यात गुंतलेला आहे असा नेवाल्नीचा अंदाज असतो. नेवाल्नी खडा टाकतो. तो बरोब्बर लागतो. तो जनरल यात गुंतलेला आहे हेही सिद्ध होतं आणि वैज्ञानिकही गुंतलेला आहे हे सिद्ध होतं.

नेवाल्नीला मारण्यासाठी साताठ जण नेमलेले असतात. ते काही आठवडे सतत नेवाल्नीवर पाळत ठेवून असतात, त्याच्या आसपास हिंडत असतात. हे लोक रशियन लष्करातले असतात पण त्यांना त्यांच्या व्यक्तिगत खुणा पुसून नव्या माणसाची ओळख दिलेली असते, जेणेकरून लष्कर या प्रकरणात गुंतलेलं आहे हे सिद्ध होऊ नये. बेलिंग कॅट नावाची एक इवेस्टिगेटिव जर्नालिम करणारी टीम नेवाल्नीसोबत आहे. तिनं त्या विषप्रयोग टीममधल्या माणसांचा माग काढला. ते सैन्यातल्या कुठल्या युनिटमधे होते, केव्हां ते युनिटच्या बाहेर पडले, केव्हां त्यांना नवी ओळख व पासपोर्ट वगैरे देण्यात आले ही माहिती बेलिंग कॅट मिळवते. या टीममधे निष्णात हॅकर असतात. ते रशियन सरकार, पोलिस, लष्कर यांच्या कंप्युटरात घुसतात आणि तिथून माहिती गोळा करतात.

गुप्तचरांसारखे थरारक उद्योग नेवाल्नी करतात. शर्टाच्या आतमधे मायक्रोफोन चिकटवलेले असतात. 

नेवाल्नी मॉस्कोकडं निघतात. विमानतळावर त्यांना पहायला माणसं गोळा झालेली असतात. पोलिस त्यांना लाठ्यानी बडवतात, व्हॅनमधे कोंबतात. विमान दुसऱ्या विमानतळाकडं फिरवलं जातं. नेवाल्नी विमानातून उतरतात. पोलिस वाटच पहात असतात. नेवाल्नी पोलीस कोठडीकडं रवाना होता.

ही घटना २०२१ च्या जानेवारी महिन्यातली. 

इथे डॉक्युमेंटरी थांबते.

हिचकॉकच्या चित्रपटासारखा थरार डॉक्युमेंटरीत आहे. पूतिननी केलेल्या विषप्रयोगाचं रहस्य उलगडत जातं, ते उलगडण्यातला थरार खुद्द नेवाल्नी आणि त्यांचे सहकारी कसा अनुभवतात ते डॉक्युमेंटरीत दिसतं.

ही डॉक्युमेंटरी जर्मनीत तयार होत असतानाच नेवाल्नी आणि त्यांच्या टीमनं पुतिननं काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर बांधलेल्या विशाल महालाचं चित्रीकरण केलं, ड्रोनच्या सहाय्यानं. 

नेवाल्नी मॉस्कोत परतल्यावर दोनच दिवसांनी महालाचं दर्शन सुमारे १२ कोटी लोकांनी घेतलं.

नेवाल्नींची डॉक्युमेंटरी हे नेवाल्नीचं शेवटलं दर्शन.

त्यानंतर आपल्याला नेवाल्नीच्या मृत्यूची बातमी कळते.

ती या डॉक्युमेंटरीत कशी येणार?

।।

Comments are closed.