पत्रकार असाही असतो

पत्रकार असाही असतो

उंदीर हा एकाद्या दीर्घ लेखाचा विषय होऊ शकतो? 

जोसेफ मिचेल नावाचा पत्रकार ते करू शकतो.

मिचेलनं १९४४ साली न्यू यॉर्कर या प्रसिद्ध साप्ताहिकात किनाऱ्यावरचे ( न्यू यॉर्कच्या किनाऱ्यावरचे) उंदीर या विषयावर १८ हजार शब्दांचा लेख लिहिला. १९३८ ते १९६४ म्हणजे २८ वर्षं मिचेलनं न्यू यॉर्क शहर याच विषयावर लेखन केलं. 

न्यू यॉर्कभर उंदीर पसरलेत. ते कुठं नाहीत असं नाही. कचरापट्टी, पडीक इमारती, धान्य आणि मांसाची मंडी यात तर ते सापडणारच पण न्यू यॉर्कमधल्या चांगल्या हॉटेलांतही असतात. ते भुयारं खणून रहातात. दिवसभर झोपतात किंवा दबा धरून असतात. रात्र झाली की ते बाहेर पडतात. भुयारी रेलवे तर त्यांचं आवडतं ठिकाण. दिवसभर गाड्यांची आणि माणसांची येजा असल्यामुळं ते दबा धरून असतात. गाड्यांची संख्या कमी झाली, प्रवासी संख्या रोडावली की ते बाहेर पडतात. फलाटांवर, रुळावर, सर्वदूर त्यांचा संचार असतो. दिवसभरात रेलवेत पडलेल्या खाद्य वस्तूवर ते ताव मारतात. पहाटे पहाटे सफाई कामगार किंवा शहरात कामाला निघालेले कामगार स्टेशनात येतात तेव्हां हे उंदीर त्यांच्यावर हल्ला करायला कमी करत नाहीत. गाड्या वाढल्या, प्रवाशांची गर्दी झाली की त्यांचा नाईलाज होतो, ते आपापल्या बिळात परततात.

जे जे हलत नाही ते ते ही मंडळी खातात. खाद्य पदार्थ, कागद, डबे, काहीही. रस्त्यावर एकादा भिकारी विकलांग होऊन पडला असेल तर त्यालाही खायला कमी करत नाहीत. हॉस्पिटलं हे त्यांचं आणखी एक आवडतं ठिकाण. अगदी अशक्त होऊन पडलेले रोगी आणि लहानगी मुलं हे त्यांचं आवडतं भक्ष्य. हात आणि पाय कुरतडून खायला लागतात. ओरडा झाल्यावर पळतात.

न्यू यॉर्कमधल्या उंदरांच्या तीन जाती आहेत. काळे, करडे आणि ब्राऊन. पैकी करडे उंदीर संख्येनं आणि एकूणात दुर्लक्ष करण्यासारखे.

 काळे उंदीर मूळचे भारतीय. मध्य युगात कधी तरी ते आखातामार्गे अमेरिकेच्या बंदरांत पोचले. त्यांच्या अंगावर काळी, निळी लव असते, त्यांचं तोंड निमुळतं असतं, त्यांचे कान मोठे असतात. ते स्वच्छ असतात. संशयी असल्यामुळं  ते सापळ्यात सापडणं कठीण असतं. हे उंदीर कसबी म्हणायला हवे. ते अॅथलीटसारखे लवचीक असतात. ते चार फूट लांबीची उडी मारू शकतात तसंच दोन फूट उंच उडी मारतात. ड्रेनेजचे पाईप, कपडे वाळण्यासाठी टांगलेल्या दोऱ्या, विजेच्या वायरी ते सहज चढून जातात. त्यांची शेपटी त्यांच्या शरीरापेक्षा लांब असते. डोंबारी जसा काठीचा उपयोग करून दोरीवरून तोल सांभाळतो तसं हे उंदीर शेपटीचा उपयोग करतात. 

काळे उंदीर उंदीर म्हणून हिंस्र असतातच, पण ब्राऊन उंदरांच्या तुलनेनं कमी हिंस्र असतात. ब्राऊन उंदराना ते घाबरतात, ब्राऊन उंदीर समोर दिसले तर काळे उंदीर पळ काढतात.काळे उंदीर  सांभाळून असतात.

ब्राऊन उंदीर मध्य आशियातून अमेरिकेत आले. ते नकटे असतात, त्यांचे कान लहान असतात. ब्राऊन उंदरांच्या चेहऱ्यावर एक दुःखी रागीट भाव असतो. माणसंही त्यांच्याकडं पाहिल्यावर हादरतात. यांचे दात काळ्या उंदरांपेक्षाही तीक्ष्ण असतात, ते धातूही फाडू शकतात. ते जिथं पोचतात तिथं त्याना कोणी प्रतिस्पर्धी असलेला चालत नाही. ते पोचले रे पोचले की तिथं असलेल्या काळ्या किंवा करड्या उंदरांवर हल्ला करून त्याना पळवून लावतात. हे उंदीर बहुदा खाण्यापिण्याचे लोभी असावेत. जिथं अन्न आणि अल्कोहोल असतो त्या ठिकाणी जर हे रहात असतील तर दारू, खाणं यातून ते चांगलेच लोदडे होतात. असं जरी असलं तरी ब्राऊन उंदीर रबरासारखे लवचीक असतात. त्यांच्या आकाराच्या अर्ध्या आकाराच्या भोकातूनही ते सटकू शकतात. काळ्या उंदरांसारखं उडी मारण्याचं, तोल सावरण्याचं कसब यांच्याकडं नसतं. पण ते उत्तम पोहणारे असल्यानं गटारं, पाणथळ जागा यात ते पसरतात.

ब्राऊन उंदरांची गंमत म्हणजे ते वस्तूंचे लोभी असतात. ते जिथं घर करून रहातात त्या ठिकाणी ते दुनियाभरच्या वस्तू गोळा करून ठेवतात. भुयार असो की एकाद्या कपाटाचा एकादा खण की एकाद्या टेबलाचा खण, वस्तू संग्रहालय आहे असं वाटावं इतक्या वस्तू तिथं सापडतात. एका पडक्या घराच्या टेबलाच्या खणात लिपस्टिक, धातूची पदकं, नाणी, सुऱ्यांच्या मुठी इत्यादी गोष्टी सापडल्या. एक नाटकाचं थेटर पाडण्यात आलं, नवी इमारत बांधण्यासाठी. नाटकघराच्या पायात उंदरांनी बिळं आणि भुयारं केली होती. भुयारात डॉलरच्या नोटा सापडल्या. उंदराना पैशाचंही प्रेम.

ब्राऊन उंदीर वाट्टेल ते खातात. शिळं, ताजं, काहीही. साबण, चपला बूट, पुस्तकांच्या बाईंडिंगमधला गोंद, टेलेफोन वायरचं आवरण असं काय वाट्टेल ते हे उंदीर खातात. कित्येक दिवस ते अन्नपाण्याविनाही राहू शकतात. हे उंदीर जेवढं खातात त्याच्या किती तरी पट नास करतात. बटाटा चावायचा, एक तुकडा खायचा, टाकून द्यायचा. दुसरा बटाटा, चावा, टाकून द्यायचा. ही यांची खाण्याची पद्धत.

ब्राऊन उंदीक १७३० साली ते मध्य आशिया, तुर्कस्तान, भूमध्य समुद्र असा प्रवास करत (बोटीवरून) इंग्लंडमधे पोचले. तिथून ते अमेरिकेत, न्यू यॉर्कच्या किनाऱ्यावर पोचले.

उंदीर पटापट वाढतात. चार महिन्याचे झाले की ते जननक्षम होतात. उंदरी वर्षातून तीन ते चार वेळा विते आणि प्रत्येक वितात पाच ते बावीस पिलांना जन्म देते. 

न्यू यॉर्कमधे उंदराना मारणारं एक स्वतंत्र खातं आहे. हे खातं उंदीरमार कंपन्यांना कंत्राट देतात. काही कंपन्या अगदी लहान आहेत, काही मोठ्या कॉर्पोरेशन्स आहेत, मॅनहॅटनमधे त्यांची पॉश ऑफिसं आहेत. ३०० कंपन्या आहेत. पण हे  लोक म्हणतात की उंदराना मारण्याचा खटाटोप निरर्थक आहे. सोमवारी एकाद्या इमारतीत जाऊन उंदीर मारावेत आणि पुन्हा त्याच इमारतीत बुधवारी तपासणी करायला जावं तर उंदरांची संख्या वाढलेली दिसते.

उंदीर चारेक वर्षं जगतो. चार वर्षाचा उंदीर म्हणजे ९० वर्षाचा माणूस. चार वर्षाचा उंदीर अनुभवानं शहाणा, चलाख आणि हुशार झालेला असतो. अनुभवसंपन्न उंदीर सापळा धक्के मारून उलथवतो. सापळ्याचं दार बंद झालं की तिथं ठेवलेलं अन्न आरामात पळवतो. सापळ्यात विषारी अन्न ठेवलेलं असलं तर ते त्याला यार्डभर अतरावरून कळतं आणि तो तिकडं फिरकत नाही. उंदीर मारणाऱ्यांना संशय आहे की उंदरांना वाचताही येतं.

उंदीर प्रथम बंदरात पोचले आणि नंतर अमेरिकाभर पसरले. शेतातले उंदीर शहरातल्या उंदरांपेक्षा जास्त आळशी असतात. शहरातले उंदीर चलाख असतात.

मिचेल भणंगासारखं न्यू यॉर्क शहरात फिरत असे. त्यानं न्यू यॉर्कच्या कबरस्तातानावर लिहिलंय, न्यू यॉर्कमधल्या जुन्या इमारती आणि चर्चेसवर लिहिलंय, फडतूस सिनेमाघरांवर लिहिलंय, न्यू यॉर्कमधल्या दाढीवाल्या बाईवर लिहिलंय. 

एका शहरावर आयुष्यभर लिहिणारा एक पत्रकार.

।। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *