पुरीतलं पाणी आणि गंगेतलं पाणी

पुरीतलं पाणी आणि गंगेतलं पाणी

वडोदरा (बडोदा नव्हे) नगरपालिकेनं पाणी पुरीवर बंदी घातलीय.

शहरात नाना रोगांचा उच्छाद झाल्यावर पालिका अधिकाऱ्यांनी शहराचं आरोग्य कुठं बिनसतंय ते पहाण्यासाठी चौकशा केल्या, त्यात पाणी पुरीच्या गाड्यांवर त्यांना अस्वच्छता दिसली. 

पाणी पुरी मुंबईत असते, गोलगप्पा लखनऊमधे असतो, पुचका बंगालात असतो. कुठंही असो, पाणी पुरीचं पाणी शुद्ध नसतं. ती देणारा माणूस अस्वच्छ असतो, घामेजलेला असतो. ज्या हातानं घाम पुसतो तोच हात पाण्यात घालून ते पाणी पुरीत भरून खाणाऱ्याला देतो. या पाण्याबद्दल न ऐकलेल्या बऱ्या अशा अनंत कहाण्या आहेत. या कहाण्या माहित असून, त्या कहाण्या इतरांना ऐकवतच माणसं पाणीपुरी खात आली. म्हणत आली की म्हणून तर त्या पाण्याला एक खास चव असते, घरी केलेल्या पाणीपुरीला अशी चव नसते.

  पावसाळ्यात पाणी पुरी खाऊ नये असं सकाळी बाहेर पडताना आईऩं सांगितलेलं असतं, पत्नीनं सांगितलेलं असतं, नवऱ्यानं सांगितलेलं असतं. तरीही न कळत पाय पाणीपुरीवाल्याकडं वळतात.

पाणीपुरीची चटक असते, व्यसन असतं? काय असतं त्या अस्वच्छ पाणी पुरीत की तिची चव आठवत रहावी, तिकडं नकळत पाय वळावेत?

मुंबईत एके काळी इराण्याचा चहा मिळत असे. तसा चहा इतर कुठल्याही हॉटेलात किंवा घरात मिळत नसे. नॉर्मल आणि पानी कम असे दोनच प्रकार. काही और चव. हा चहा पिऊन मुंबईतले पुढारी, पत्रकार, लेखक, कलाकार वाढले.

लोक म्हणत की त्या चहात अफूची बोंडं उकळत असत. 

मी एकदा इराणी हॉटेलमधे गेलो. हॉटेलच्या किचनमधे गेलो, मालकाला सोबत घेऊन. अफूची अफवा त्याला सांगितली आणि म्हटलं की चहा कसा करतात ते दाखव.

मुंबईतच जन्मलेला तो इराणी हसला. त्यानं मला सारं सांगितलं. सगळ्या इराणी हॉटेलामधे एकच विशिष्ट चहा मिश्रण वापरलं जातं. अनेक प्रकारचे चहा मिसळून ते तयार होतं. चहात घातलं जाणारं दूध कित्येक तास चुलीवर रहात असल्यानं त्यात एक दाटपणा येत असे, त्याला एक विशिष्ट चव येत असे. बस. अफूबिफू काही नाही.

फुस्सं झालं. मला काही तरी थरारक ऐकायला मिळेल असं वाटलं होतं, तर तिकडं एक साधाच चहा निघाला. भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि डावी चळवळ याच चहात शिजली? याच चहाबरोबर ब्रून मस्का, बन मस्का खात?

काहीही असो, इराणी हॉटेलच अस्ताला गेली तरी ती चव अजून त्या पिढीतल्या लोकांच्या जिभेवर आहे.

इराणी गेले आणि मुंबईवर उडुप्यांचं राज्य सुरु झालं. माटुंग्यात मद्रास कॉफीचं राज्य सुरु झालं. राज कपूर इत्यादी मंडळी तिथं कॉफी पिऊ लागली. माणसं रांगा लावून कॉफी पिऊ लागली. इराणी चहाची जागा मद्रासी कॉफीनं घेतली. काही विशिष्ट  कॉफीच्या बिया आणतात, ताज्या ताज्या दळतात आणि त्याचा अर्क एका फिल्टरमधे तयार करतात असं लोकांना कळलं. तरीही त्यांचा फिल्टर वेगळा असतो, फिल्टरमधे विशिष्ट काळ कॉफी ठेवण्यात येते अशी काही रहस्यं माणसं वर्णतात. मद्रासी कॉफीत काही मादक द्रव्यं घातलं जातं अशी अफवा मात्र अजून पसरलेली नाही.

इराण्याच्या चहात आणि मद्रासी कॉफीत अस्वच्छपणा नाही. पाणी पुरीत अस्वच्छपणा आहे. त्या अस्वच्छपणातच एक रहस्य गुंतलेलं आहे असं लोकांना वाटतं.

वडोदऱ्याच्या पालिका अधिकाऱ्यांनी छापे घातल्यावर काही काळ नाक्यावरची पाणीपुरी बंद होईल. पण ती पुन्हा अवतरणारच नाही याची खात्री देता येणार नाही. लोकांच्या जिभेवर जोवर चव आहे आणि तेवढ्या पैशात पाणी पुरी देणारे शिल्लक असतील तोपर्यंत पाणी पुरीचे मटके नाहिसे होणार नाहीत.

पाणी पुरीतलं पाणी खराब असतं. ते देणारा माणूस अस्वच्छ असतो. हे दोष अलीकडं लग्नाच्या इवेंटमधे नाहिसे झालेत. फिल्टर-बाटलीबंद मिनरल पाण्यात पुरी बुडवली जाते. एसी हॉल असतो. माशा नसतात. देणारा माणूस स्वच्छ युनिफॉर्मधे असतात, डोक्यावर टोपरं असतं आणि हातात मोजे असतात. सारं कसं स्वच्छ असतं. खरंच ती पाणी पुरी छान असते. लग्नाचं जेवण जेवायला आलेली माणसं पाणी पुरीनंच अर्थ पोट भरतात.

रस्त्यावर सहा पुऱ्या समजा दहा रुपयाला मिळत असतील तर एसीमधे त्यांची किमत चाळीस किंवा पन्नास रुपये होते.

पैशाचा प्रश्न तर आहेच. अजूनही खिशाला न परवडणं नावाची गोष्ट शिल्लक आहे. अन्न खराब असलं तरी स्वस्त आहे म्हणून खाणारी माणसं जोवर असतील तोवर रस्त्यावरची पाणी पुरी बंद होणं कठीण.

म्हणजे एका परीनं समाजाची आर्थिक परिस्थितीच महत्वाची म्हणायचं.

।।

नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलनं एक जाहीर वक्तव्य केलं. ते असं.  हरिद्वार ते उन्नाव दरम्यानच्या १०० किमी गंगेच्या काठावर गावोगावी एकेक बोर्ड लिहावा. त्यावर लिहावं की इथलं गंगेचं पाणी पिण्याच्या लायकीचं नाही किंवा आंघोळ करायच्या लायकीचं नाही. प्यालं, त्यात डुबकी मारली तर रोग होतील. 

   सिगारेटच्या पाकिटावर इशारा दिलेला असतो की सिगारेट ओढल्यानं कॅन्सर होण्याची शक्यता असते.

उन्नाव ते हरिद्वारच कां  एकूणच २५२५ किमी लांबीची गंगा प्रदुषित झाली आहे. केवळ गंगाच नव्हे तर गंगेला मिळणाऱ्या सर्व नद्या प्रदुषित आहेत. सुमारे ५० कोटी जनता गंगेच्या पाण्यावर अवलंबून असते. शिवाय भारतभरहून पर्यटन आणि धार्मिक कारणांसाठी गंगेकडं जाणारे लाखो लोक वेगळे.

प्रदुषण कां होतंय? 

१ लाखापेक्षा जास्त लोकसंख्येची २९ शहरं, ५० हजार ते १ लाख लोकसंख्येची २३ शहरं आणि ५० हजारपेक्षा कमी लोकसंख्येची ४८ शहरं गंगेच्या काठावर वाढली आहेत. या शहरातलं सांडपाणी आणि जे जे लोकांना नको आहे ते ते (पापं) गंगेत सोडली जातात. गंगेच्या काठावर औद्योगिक शहरं आहेत. कानपूरमधे चामड्याचा व्यवसाय आहे. चामडं कमावण्याच्या प्रक्रियेतली लक्षावधी लीटर घातक रसायनं गंगेत सोडली जातात. कानपुरला औष्णिक वीज केंद्र आहे. तिथं दर वर्षी ६ लाख टन कोळसा जळतो आणि २ लाख टन राख तयार होते. ही सगळी राख गंगेत मिसळते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारांनी गंगा शुद्धीकरणाच्या योजना आखल्या.   २०१६ साली भाजप सरकारनं आखलेली नमामी गंगे योजना जाहीर केली. आठ राज्यांना सामिल करून घेतलेल्या या योजनेत काठावरच्या ग्रामपंचायतीही घेतल्या. योजना केवळ सरकारी राहू नयेत यासाठी कार्यकर्त्यांना (बहुतांशी भाजपच्या) या कामात सरकारनं गुंतवलं. सुमारे ३० हजार कोटी रुपये या कामी सरकारनं मंजूर केले. 

२०१६ साली योजना सुरु झाली आणि ग्रीन ट्रायब्युनलचं वक्तव्य २०१८ सालाच्या मध्याला येतंय. दोनेक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला. किमानपक्षी हरिद्वार ते उन्नाव या दरम्यान तरी योजना निष्फळ ठरली असा अर्थ होतो.   

हज्जारो वर्षं गंगा वाहते आहे. गंगेच्या काठावर रहाणारी माणसं त्यांचं सांडपाणी आणि देहसुद्धा गंगेत सोडत होते. रासायनिक शेती नव्हती तेव्हां वनस्पतीचे उरले सुरले भाग, कुजलेल्या वनस्पती, जनावरांचं मलमूत्र बऱ्याच प्रमाणात गंगेत जात होतं. पाणी प्रदुषित होत होतं. आजच्या तुलनेत लोकसंख्या कमी असल्यानं दर लीटर पाण्यात असलेले घातक पदार्थ कमी असल्यानं त्यांची घातकता जाणवत नव्हती. रोगांबद्दलची आजची माहिती आणि जाणीव नसल्यानं माणसं खराब पाण्यासह जगत होती. त्यांचं आयुष्य काहीसं कमीही होत होतं आणि पोटाच्या व अन्य त्रासामुळं आरोग्याचा त्रास माणसं सहन करत होती. परंतू त्रासमुक्त जगता येतं ही कल्पनाच नसल्यानं त्रास सहन करत माणसं जगत होती. औषध उपलब्ध झालं की माणसाला ते घ्यावंसं वाटतं, ते उपलब्धच नसतं तेव्हां माणसं असेल ती परिस्थिती सुखाची आहे असं मानून जगतात. त्या काळात भारतात उद्योग नव्हते. जगभरच्या औद्योगीकरणाचा आणि शेती रासायनीक होण्याचा परिणामही भारतावर खूपच अलिकडं झाला आहे. ब्रिटीशांच्या काळात या दोन प्रदुषक घटकांची लागण झाली पण स्वातंत्र्यानंतर ते घटक वेगानं विकसित झाले.

भारतीयांनी अनेक समजुती करून घेतल्या.  वाहतं पाणी शुद्ध असतं. गंगा पवित्र असते. गंगा देवाच्या जटेतून आलेली असल्यानं ती पापं व इतर वाईट गोष्टींचा नाश करते. इत्यादी. या कल्पना अजूनही लोकांच्या डोक्यात असल्यानं दरवर्षी करोडो माणसं गंगेचं पाणी प्यायला आणि त्यात आंघोळ करायला जातात. मनोमन यातल्या खूप लोकांना प्रदुषणाची कल्पना आली आहे. पुराव्यावर आधारलेल्या आधुनिक विज्ञानाचं महत्व लोकांना जाणवलंय पण पावित्र्याचा किडा काही मेलेला नाही. अशा विचित्र परिस्थितीत भारतीय मन आहे. त्यामुळं विज्ञानाच्या डिग्र्या घेतलेले लोकंही गंगेत आंघोळ करतात, गंगेत घाण सोडतात.

भारतीयांचा एक सांस्कृतीक गुण म्हणजे कायदा न पाळणं, स्वतःला कायद्याच्या पलिकडं कल्पिणं. आपल्याला कायदा लागू नाही, आपण कायदा सुखात मोडू शकतो याचं भारतीय माणसाला अप्रूप असतं.   रांगेत उभ्या असलेल्या शेकडो माणसांना खोळंबून ठेवून आपल्याला थेट विठ्ठलाच्या पायाशी जाता येतं याचा मोठ्ठा अभिमान पुढाऱ्यांना वाटतो. आपण बलात्कार करतो, आपण लोकांची घरं जाळतो, आपण अर्वाच्य बोलतो, तरीही आपल्याला कोणी हात लावू शकत नाही याचा अभिमान भारतातल्या पुढाऱ्यांना असतो आणि त्याचं कौतुक भारतीय नागरिकाला असतं. त्यामुळं कायदा काहीही असो आपण गंगेत घातक पदार्थ सोडणारा उद्योग चालवतो याचाही अभिमान काठावरच्या उद्योगीना असतो.

आणखी एक. भारतीय समाज अद्यात्मिक आहे. त्याच्या लेखी पैसा ही गोष्ट दुय्यम असते. शिक्षण पवित्र असतं. मंदीर पवित्र असतं. नदी पवित्र असते. न्यायालय पवित्र असतं. पण ते सारं उभं करण्यासाठी, टिकवण्यासाठी, विकसित करण्यासाठी पैसा लागतो हे भारतीय अद्यात्मिक मनाला शिवत नाही. पैसा फक्त खाजगी वापरासाठी, व्यक्तिगत चैनीसाठी असतो असाच त्याचा एक उपअद्यात्मिक समज आहे. शुद्धीकरणासाठी विज्ञान, तंत्रज्ञानाचा विकास करावा लागतो. उपकरणं, यंत्रं इत्यादी विपुल प्रमाणात लागतात, त्यासाठी पैसा लागतो. माणूस जी घाण करतो तिची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावणारी यंत्रणा उभी करायची असेल तर त्यालाही फार पैसा लागतो. सव्वाशे कोटी माणसं म्हणजे घाणही तेवढीच आणि तिची विल्हेवाट लावण्याचा खर्चही तितकाच.   अर्थव्यवस्था भरपूर विकसित केली तरच गंगा पवित्र व्हायची. 

  परलोकातच सारं सुख साठवलेलं आहे, जन्ममृत्यू या चक्रातून सुटून मोक्ष मिळवणं हाच खरा अर्थ आहे असं मानणारी माणसं कशाला पैसा वगैरे क्षुल्लक गोष्टीत लक्ष घालतील.

अद्यात्मिक-धार्मिक भारताची परंपरा जितकी जुनी तितकीच गंगाही जुनी. दोघांची जोडी.  

काय करणार.

।।

2 thoughts on “पुरीतलं पाणी आणि गंगेतलं पाणी

  1. लेख पोट तिडिकतेने लिहिलेला आहे व बहुतेक मुद्दे पटणारे वाटले. खरं म्हणजे पंतप्रधान मोदीजींनी याबाबत बराच पुढाकार घेऊन चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न करून त्यांना समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य देऊन उत्कृष्ठ कार्य देखील केलेले आहे परंतु ‘जित्याची खोड ….. जात नाही’, हे ‘महान सत्य’ अधोरेखित केल्याचे दिसले (वाईट वाटते). शास्त्रीय कारणे देऊन बराच उहापोह झालेला असल्यामुळे असे सांगायचे की ‘इराण्याच्या हॉटेल मधील चहा’ उकळलेला असतो व म्हणून त्यातील जंतू अथवा द्रव्ये इत्यादी मरतात व म्हणून तो अपायकारक होत नसे. ते वापरत असलेले पाणी अशुद्ध असले तरी देखील. या एकाच कारणास्तव माझी आई त्यांच्या हॉटेल मधून बर्फ मागवत नसे -शिक्षण विशेष नसून देखील. मात्र त्यांच्या चहात अफूची बोंडे घालतात -हे मी आजपर्यंत ‘ते खरे आहे’ अश्या समजत होतो त्या गैसमजास दूर केल्याबद्दल धन्यवाद!

    एक अनुभव असा की मी स्वतः रोजचा चहा घरी करत असतो व कांही कारणास्तव अधून मधून तो गरम असताना ‘ताजा म्हणून’ प्यायला जात नाही. थोड्या वेळाने तो परत गरम केल्यास त्याची चव बदलून जाते -म्हणजे न पिववण्या इतकी. मग इराण्याच्या सतत उकळत असलेल्याची गोम कोणती असावी -हे कुणीतरी स्पष्ट केल्यास समाधान होईल. त्यावर उपाय काय -की तो मोरीत ओतून नवा चहा करणे?

  2. लेख नेहमीप्रमाणे छान. मूळात भारतीय लोकांना शिस्त आणि स्वच्छता यांचे वावडे असल्याने शेवटचा प्रश्न उरतोच . काय करणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *