पुस्तकं/फ्रेंच दिक्दर्शक अमेरिकन दिक्दर्शकाची मुलाखत घेतो.

पुस्तकं/फ्रेंच दिक्दर्शक अमेरिकन दिक्दर्शकाची मुलाखत घेतो.

एका प्रतिभावान दिक्दर्शकानं दुसऱ्या प्रतिभावान दिक्दर्शकाची मुलाखत घ्यायची ही कल्पना कशी आहे? तीही पूर्वकल्पना देऊन. तीही खूप तयारी करून. तीही कित्येक दिवस.

तसं घडलंय. फ्रान्सवा त्रुफॉनं आल्फ्रेड हिचकॉकची मुलाखत घेतलीय. त्याचं पुस्तक झालं. त्या पुस्तकाच्या आवृत्या निघाल्या.

 मुलाखत १९६२ साली घेतली. संपादित व्हायला १९६६ साल उजाडलं. १९६७ साली पुस्तक प्रसिद्ध झालं. हिचकॉकच्या मृत्यूनंतर या पुस्तकात भर घालून १९८० साली पुस्तक नव्यानं प्रसिद्ध झालं.

चित्रपट या विषयावरचं एक सर्वोत्कृष्ट पुस्तक असं या पुस्तकाचं वर्णन करतात.

हिचकॉक १९५७ साली त्याच्या पस्तिसाव्या फिल्मच्या (टू कॅच अ थीफ)  चित्रीकरणासाठी पॅरिसमधे मुक्कामाला होता. त्रुफॉ हिचकॉकला भेटायला गेला, त्याला मुलाखत हवी होती. त्रुफॉ एका नोटबुक ऑन सिनेमा या फ्रेंच मासिकाचा संपादक होता. स्वतः फ्रेंच नव्या लाटेतला आघाडीचा दिक्दर्शक होता.

त्रुफॉला मुलाखत घ्यायची होती कारण त्याच्या मते हिचकॉक हा ग्रेट दिक्दर्शक होता. तोपर्यंत डायल एम फॉर मर्डर, दी मॅन हू न्यू टू मच, रेबेका, नोटोरियस, रियर विंडो या गाजलेल्या फिल्म्स प्रसिद्ध होत्या. येवढा मोठा दिक्दर्शक आणि अमेरिका त्याची दखल कां घेत नाही असं त्रुफॉला वाटत होतं.  

हिचकॉक एकापरीनं दुर्लक्षित होता कारण तो पत्रकारांपासून फटकून असे. तो मुलाखत देत नसे, आपल्या चित्रपटांचं मार्केटिंग करण्यासाठी पत्रकाराना भेटत नसे. एकूणातच तो लोकांमधे मिसळत नसे. असा माणूस त्रुफॉ या पत्रकाराला भेटायला उत्सूक नसणार हे तर उघडच होतं.

त्रुफॉ रेकॉर्डर घेऊन हिचकॉकला भेटायला गेला. हिचकॉक त्याच्या ताज्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे तुकडे सिनेघरातल्या  काळोखात पहात होता. त्रुफॉ तिथं पोचला. हिचकॉक म्हणाला मला हॉटेलमधे भेट.  त्रुफॉ मिट्ट काळोखातून बाहेर पडला, बाहेरच्या  टळटळीत प्रकाशानं त्याचे डोळे दिपले, वाटेतलं पाण्याचं डबकं त्याला दिसलं नाही. बर्फाळलेल्या पाण्यात त्रुफॉ कोसळला. ओले कपडे, थंडीनं कुडकुडतोय अशा स्थितीत त्रुफॉ हिचकॉककडं पोचला. 

हिचकॉकच्या कंपनीत कपडेपटाचं काम करणाऱ्या स्त्रीनं त्रुफॉला अंग कोरडं करायला टॉवेल दिला आणि ब्याद गेली तर बरी असं म्हणून त्याला हिचकॉककडं ढकललं. कोण आहे हा फालतू माणूस असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.

त्याचं हे ध्यान पाहून हिचकॉक म्हणाला नंतर भेट. हिचकॉकला बरंच झालं, मुलाखत टळली.

त्यानंतर त्रुफॉ सात वर्षं हिचकॉकला पत्रं लिहून वेळ मागत होता. पन्नास तास लागतील, पाचशे प्रश्न असतील असं त्रुफॉनं कळवलं. हिचकॉकनं ते मान्य केलं.

हिचकॉक परिक्षाच पहात असावा. मधल्या काळात हिचकॉकनं त्रुफॉच्या  फिल्म्स आणि त्याचं मासिक पाहिलं असणार.

पाच वर्षाच्या वाट पहाण्यानंतर १९६२ साली मुलाखतीसाठी त्रुफॉ अमेरिकेत पोचला.

एक आठवडा हिचकॉक आणि त्रुफॉ यांच्यात गप्पा झाल्या. दररोज सकाळी ९ ते संध्याकाळी ५. जेवणाच्या सुट्टीतही मुलाखत होत राहिली. त्या वेळी कोणतंही इतर काम हिचकॉकनं केलं नाही, फक्त मुळाखत.मुलाखतीचं ऑडियो रेकॉर्डिंग झालं, फोटोही घेतले गेले. 

हिचकॉकच्या बालपणापासून सुरवात झाली. १९६० च्या ‘सायको’वर खूप चर्चा झाली. त्रुफॉच्या मते सायको म्हणजे हिचकॉक, सायको ही चित्रपट या विषयातली अद्वितीय शैली.सायको हा हिचकॉकच्या चित्रपट निर्मितीचा परमोच्च बिंदू.

 गप्पा चालल्या होत्या त्या काळात बर्ड्स या चित्रपटावर हिचकॉक काम करत होता. बर्ड्सचेही उल्लेख चर्चेत आले. चर्चा तिथं थांबवून त्रुफॉ पॅरिसला परतला.

त्रुफॉ हिचकॉकच्या प्रेमातला माणूस, भक्त नव्हता. स्वतः एक चांगला दिक्दर्शक, पत्रकार, संपादक, प्रेक्षक अशा अनेक भूमिकातून त्रुफॉनं हिचकॉकला तपासलं. हिचकॉक सुरवातीला अडखळत होता, तुटक होता, काहीसा अंतर राखून होता. नंतर तो मोकळा झाला. त्रुफॉनं विचारलेल्या प्रश्नाच्या पलिकडं जाऊन तो स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दलही बोलला. 

त्रुफॉवर फ्रेंच न्यू वेवचा प्रभाव. हिचकॉकवर जर्मन चित्रपटाचा प्रभाव. 

 मुलाखतीत फ्रेंच न्यू वेव्ह, जर्मन दिक्दर्शक मोऱ्नौ आणि  फ्रिट्झ लँग, अमेरिकन दिक्दर्शक ग्रिफिथ आणि बस्टर कीटन यांचे उल्लेख येतात. 

त्रुफॉनं मुद्दा मांडायचा, हिचकॉकनं तो खोडायचा किंवा सहमत व्हायचं.

त्रुफॉनं विचार मांडायचा, हिचकॉक विषयाला बगल देऊन त्याच्या मनात त्या वेळी उद्भवलेलं काही तरी तिसरंच मांडायचा.

मला तुझं म्हणणं मान्य नाही असं त्रुफॉ म्हणायचा.

मला तुझं म्हणणं योग्य वाटत नाही असं हिचकॉक म्हणायचा.

मान्य झालेले मुद्देही खूप होते. एकमत झालेले मुद्देही खूप होते.

मुलाखतीतलं एक वळण होतं लॉजर या चित्रपटाचं.

लंडनमधे जॅक दी रिपर नावाचा खुनी मोकाट सुटला होता. ही सत्य घटना. जॅक दी रीपरचं चित्रपटातलं पात्ररुपांतर म्हणजे ॲवेंजर. मेरी ऑल्ट या  लँडलेडीनं  घरात आयव्हर नोव्हेलो हा एक पोटभाडेकरू ठेवलाय. त्याच्यात आणि ॲवेंजरमधे साम्य आहे. नोव्हेलो गायब असतो त्या वेळी खून होतात. चित्रपटभर लँडलेडी आणि आपण प्रेक्षक पोटभाडेकरूच ॲवेंजरच आहे या संशयानं पछाडलेले असतो, सिनेमाभर पोटभाडेकरू खरा कोण आहे ते शोधत रहातो. तोच सस्पेन्स.

चित्रपटाच्या शेवटी खुलासा होतो. पोटभाडेकरू ॲव्हेंजर नसतो. हुश्श. प्रेक्षक सुसकारा टाकतात.

या बाबत संभाषण असं.

त्रुफॉ- वास्तवात हीरो निष्पाप होता, तो जॅक दी रिपर नव्हता.

हिच – तिथंच तर अडचण आहे. अभिनेता नोवेलो एक मॅटिनी आयडॉल होता.मोठ्ठं नाव. स्टार पद्दतीत अडचण असते. स्टारला खलनायक केलेलं चालत नाही.

त्रुफॉ – मला वाटतं की हीरो जॅक दी रिपर असलेला तुला हवा होता.

हिच – तसंच काही नाही. अशा प्रकारच्या गोष्टीत हीरो रात्री बाहेर पडलेला दाखवणं बरं, त्यामुळं खरा तो कोण आहे ते गुलदस्त्यात रहातं. पण हीरो स्टार होता. त्यामुळं अगदी ठळकपणे  जाहीर करणं भाग होतं की हीरो निष्पाप आहे.

त्रुफॉ – लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं तू टाळतोस याचं मला आश्चर्य वाटतंय.

हिच – लोकांचा प्रश्न असतो की हीरो जॅक दी रिपर आहे की नाही. त्या भोवतीच सस्पेन्स असतो. मी जर उत्तर दिलं की होय तोच जॅक दी रिपर आहे तर प्रेक्षकांचा संशय खरा ठरतो. मग त्यात कसलं आलंय नाट्य. म्हणून मी उलट्या दिशेनं जाऊन दाखवलं की तो जॅक दी रिपर नाहिच्चे मुळी. नंतर सोळा वर्षांनी मला हाच पेच सस्पिशन या चित्रपटाच्या वेळी पडला. तिथं कॅरी ग्रँट हा स्टार हीरो होता. हीरो आणि त्यातल्या त्यात स्टार यामुळं   त्याला खुनी दाखवता येत नव्हतं.

त्रुफॉ – कॅरी ग्रँटनं खुनी हीरोची भूमिका नाकारली असती?

हिच – नाकारलीच असतं असं नाही, स्वीकारलीही असती.पण निर्मात्यानं नकार दिला असता. त्याला स्टार खुनी आहे असं दाखवणं आवडत नव्हतं. (स्टारबद्दलची एक प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात असते. त्या प्रतिमेला धक्का लावणाऱ्या भूमिकात लोकांना स्टार पहायला आवडत नाही.)माझ्या उपजत प्रवृत्तीनं हा चित्रपट मी केला.माझ्या शैलीतला हा पहिला चित्रपट आहे. किंवा एकूणातच तो माझा पहिला चित्रपट आहे असंही तू म्हणू शकशील.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत आणि जागीजागी हिचकॉकच्या शैलीबद्दल त्रुफॉनं लिहिलंय. हिचकॉकबद्दलचं प्रेम आणि आदर या मुलाखतीतून पदोपदी दिसतो.

चित्रपट निर्मितीतल्या खाचाखोचा, बारकावे या पुस्तकातून उत्तम समजतात.

।।

Comments are closed.