रविवार/ संता बाजार

रविवार/ संता बाजार

संता बाजार

अमेरिकेतल्या (जगातल्याही कित्येक देशातली)  ख्रिस्ती घरातली मुलं २५ डिसेंबरची वाट पहात असतात. त्या दिवशी ती सकाळी उठून कोपऱ्यात ठेवलेल्या ख्रिसमस ट्रीकडं जातात. 

झाडाला खोके लटकावलेले असतात. खोक्यात वस्तू असतात. मुलं फतकल मारून बसतात. एक खोका उघडतात. आनंदानं चित्कारतात. दुसरा खोका उघडतात. आनंद. मुलाभोवती वस्तूंचा जलाशय तयार होतो.  

रात्री म्हणे सांता क्लॉज येऊन गेलेला असतो. त्याच्याकडं प्रत्येक मुलाचा इतिहास नोंदलेला असतो. मुलानं गेल्या वर्षभरात किती सत्कृत्यं केली?  आईबापांचं ऐकलं? नीट अभ्यास केला? सकाळी तोंड नीट धुतलं? भाज्या, गाजर, सफरचंदं खाल्ली? अभ्यास केला? हट्ट केला नाही? प्रार्थना केल्या? सांता ते मोजतो आणि चांगल्या मुलाला खूप वस्तू देतो.

मुलानं वांडपणा केला असेल, नीट वागला नसेल तर त्याला कोळशाचे खडे देतो.

मुलाला कुठं आठवतात आपलं चांगलं वागणं वगैरे? कुठं आठवतं की आपण चॉकलेटचा हट्ट धरला, आईचे धपाटे खाल्ले पण चॉकलेटं खाल्लीच. त्याला इंटरेस्ट असतो मिळणाऱ्या वस्तूत.

ख्रिसमस झाडाची मूळ कल्पना जर्मनीतली. प्रिन्स आल्बर्ट या जर्मन माणसानं ब्रिटीश राणी व्हिक्टोरियाशी १८४० मधे लग्न केलं आणि नंतर ख्रिसमस झाड ब्रीटनमधे आणलं. त्याच्या काही दिवस आधी जर्मन अमेरिकन लोकांनी ख्रिसमस झाड अमेरिकेत नेलं होतं.

सांता म्हणे काही शतकांपूर्वी होऊन गेला. असंही म्हणतात की १८२३ मधे संत निकोलसच्या तुर्कस्तानच्या दौऱ्यानंतर सांता क्लॉज ही कल्पना लोकप्रीय झाली.   खरं म्हणजे सांता खरोखरच केव्हां होता आणि तो काय करत होता यात ना आईबापांना इंटरेस्ट असतो, ना पोरांना. हा सांता वर्षभर काय करत असतो आणि तो ख्रिसमसमधेच कसा उगवतो यातही कोणाला रस नसतो.

सांतामधे रस असतो दुकानदारांना. सांतामधे रस असतो भेटवस्तू तयार करणाऱ्या कारखानदाराना. सांता हवा असतो वस्तू घरोघरी पोचवणाऱ्या लोकांना. ही सर्व मंडळी एकत्रितपणे वस्तूंचा व्यवसाय करतात म्हणून रात्री गुप्तपणे सांता घरोघरी जातो.

एक ख्रिसमस झाड घरामधे येतं. अलीकडं लोकं प्लास्टिकचं झाड आणतात. ते स्वस्त असतं,दरवर्षी साफसूफ करून त्याची स्थापना करता येते. पण परंपरा स्ट्रिक्टली पाळणाऱ्यांना नैसर्गिकच झाड हवं असतं. तेही साधारणपणे सात फूट उंचीचं. बाजारात तीन फुटापासून सात फुटापर्यंत उंचीची झाडं मिळतात. तीन फुटाचं स्वस्त, सात फुटाचं महाग.

फुटाप्रमाणं हिशोब. सध्या अमेरिकेत एका फुटाला १५ डॉलर असा दर आहे.

फुटाप्रमाणं हिशोब कां?

ख्रिसमस झाडाच्या वाढीचा वेग ठरलेला आहे. बी लावल्यापासून ते दर वर्षी १२ ते १४ इंचानं वाढतं. या झाडाला पाणी देणं, खतं वगैरे घालणं करावं लागतं. आंबा, द्राक्षं, ज्वारी,ऊस ही झाडं जशी वाढवावी लागतात तसंच हे ख्रिसमस झाड. दहा वर्षं जपलं वाढवलं की ते साताठ फूट होतं. इतकी वर्षं जपायचं म्हटलं की मजुरीखर्च आलाच. शेतकऱ्याचा नफा आलाच. त्यातही हे झाड वाट्टेल तिथं वाढत नाही, विशिष्ट हवामानातच वाढतं.

खतं, तेल, मजुरी इत्यादी गोष्टी दर वर्षी वाढतच जातात. त्यामुळं झाडाचीही किमत वाढत जाते. खरेदीला दुकानात गेल्यावर यंदा दुकानदारानं सातफुटी झाडाचे १०५ डॉलर्स सांगितले. खरेदीदारानं तोंडाचा चंबू केला आणि म्हणाला की दहा वर्षांपूर्वी हेच झाड मी १० डॉलरला घेतलं होतं. दुकानदार म्हणाला तेव्हां युक्रेन युद्धं नव्हतं, तेव्हां आजच्या इतकी महागाई नव्हती. 

दुकानदार म्हणतो की यंदा आणखी एक नवं संकट होतं. हवामान बदलामुळं काही ठिकाणी अवर्षण झालं तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळं झाडांचं नुकसान झालं.मजूर मिळत नाहीत, मजुरी वाढलीय. किमती वाढणं अटळ होतं.

अमेरिकेत अंदाजे १५ हजार शेतकरी ख्रिसमस झाडं पिकवतात. या झाडांची उलाढाल अंदाजे ५० कोटी डॉलरची आहे.

झाडाला लटकावायच्या भेटवस्तू.बाहुल्या.बंदुका.धनुष्यबाण.पुस्तकं. कपडे.नाना खेळणी.  

प्रत्येक वस्तूचं रूप दरवर्षी बदलतं. कारण मुलं आणि पालक दोघांनाही काही तरी नवं हवं असतं. बाजारात खंडीभर कंपन्या या वस्तूंचं डिझायनिंग करत असतात. एकेकाळी हे डिझायनर ऑफिसात ड्रॉईंग बोर्ड घेऊन बसत असत. 

आता कंप्यूटर. बाजारात अनेक ॲप आलीयत. डिझायनर ॲप. ॲपला बाहुली दाखवायची. सांगायचं की ही बाहुली आता जुनी झालीय. आमची आफ्रिकेतली गिऱ्हाईकं वाढलीत. आफ्रिकन मूल लक्षात घेऊन बाहुली तयार कर. कंप्यूटर पटापट पन्नास डिझायनं समोर टाकतो.त्वचेचे रंग, कपड्यांचे रंग, केसाची स्टाईल सगळं सगळं युरोपियन बाहुल्यांपेक्षा वेगळं. आमची गिऱ्हाईकं मराठी आहेत असं सांगितलं की नऊवारी साडी आणि नाकात नथ घातलेली बाहुली हजर. हां. पण नथ डाव्या नाकपुडीत घालायची की उजव्या तेही सांगावं लागतं. तुमची गरज तुम्ही नेमकेपणानं सांगायची.

परवा परवा पर्यंत या बाहुल्या कारखान्यात तयार होत. यंत्रं, कामगार. आता थ्रीडी प्रिंटिंगचं तंत्र आलाय. अगदी लहान जागेत तुम्हाला हवी तशी नेमकी बाहुली आणि तुम्हाला हवी तेवढी नेमकी संख्या सांगायची. थ्रीडी यंत्रंही स्वस्त आहेत, ती गावोगावी पाठवता येतात. त्यामुळं जगात कुठंही  अगदी अहमदनगर किंवा औरंगाबाद किंवा नागपूरमधेही होऊ शकतात. भारतातल्या मुलांना भारतात तयार झालेल्या बाहुल्या, वाहतूक खर्च वाचतो.

फ्रान्स, ब्रीटन, जर्मनी इत्यादी देशांत लोकांना लहान आकाराच्या  ट्रेनचं आकर्षण असतं. ज्यांची घरं आणि खिसे मोठे आहेत अशी माणसं अशा ट्रेन विकत घेतात. एक फ्रेंच कंपनी या ट्रेनना लागणारे डबे, रूळ इत्यादी लाखो सुटे भाग जगभर वाटलेल्या थ्रीडी यंत्रांमार्फत करून घेते, इंजिन मात्र स्वतःच फ्रान्समधे तयार करते. इंजिन सोडता बाकी गाडी स्थानिक, इंजिन फ्रान्समधून येणार.

नऊवारी स्त्री, ट्रेन इत्यादी तयार झालं खरं पण ते घरोघरी कोण पोचवणार? आताशा ख्रिस्तीच नव्हे तर इतर धर्मातली माणसंही धार्मिक सणांच्याबाबतीत सर्वधर्मी झालीत. त्यामुळं सुमारे १ अब्ज घरांत   जावं लागणार. येवढे सांता आणायचे कुठून? लवकरच सांताचे रोबो बाजारात येतील. पण तोवर  निदान सांताच्या टोप्या आणि डगले तर कोणीही घालून सांता होऊ शकतो.डगले टोप्यांचं उत्पादन.

शेवटी आईबापच दुकानातून भेटवस्तू घेऊन येणार. म्हणजे दुकान आलं. दुकानात वस्तू पोचवायच्या म्हणजे ॲमेझॉनसारख्या कंपन्या आल्या. त्यांची गोदामं, ट्रक, पोचवणारी माणसं आलीच. ही सारी व्यवस्था कंपन्या ऑक्टोबरपासूनच सुरु करतात.

आता ड्रोन आलेत. फूटपाथवर फिरू शकणारे रोबो आलेत. नेमक्या याच दिवसांत त्यांची गरज लागते हे हेरून ड्रोन-रोबो उत्पादन वाढवण्यात आलंय.

बँका कशा मागं रहातील? क्रेडिट कार्डवाले बँकांशी संगनमत करतात. त्यांच्या मार्फत वस्तू घेतलीत तर इतका इतका डिसकाऊंट.

टीव्ही आणि वर्तमानपत्रांत जाहिराती.

इंग्लंडमधल्या एका संस्थेनं अभ्यास केला. त्यांच्या पहाणीनुसार दर मुलामागे इंग्लंडमधे २८१.९४ पाऊंड या किमतीच्या वस्तू खरेदी केल्या जातात.

जगभर १ ट्रिलियन डॉलरची उलाढाल या ख्रिसमस प्रकरणात होते असा अंदाज अभ्यासकांनी केलाय.  एक लाख कोटी डॉलर.

भारताचं जीडीपी यंदा ३.७३ ट्रिलियन डॉलर आहे. 

भारताच्या एकूण आर्थिक उलाढालीच्या एक तृतियांश पैसा या ख्रिसमस प्रकरणात खर्च होतो.

हा सांता खरा की खोटा? जाऊंद्या हो. 

सत्य नारायण पुजेतला तो वाणी खरंच होऊन गेला की नाही? जाऊंद्या हो. महाराष्ट्रात आणि बाहेर कुठलं तरी निमित्त साधून सत्य नारायण होत असतो. प्रत्येक पूजा म्हणजे हजार दोन हजारांचा व्यवहार, किती लोकांना रोजगार मिळतो, किती वस्तू खपतात.

संतोषी माताचं वेड एकेकाळी पसरलं होतं. सध्या नवरात्रीत दररोज एका रंगाची साडी. कुठल्या देवीनं हे सांगितलंय? मुद्दा असा की लाख्खो साड्या या निमित्तानं बाजारात खपतात.

साईबाबा कोण होते आणि त्यानी नेमकं काय केलं? जाऊंद्या हो. किती तरी लोकं शिर्डीला जातात आणि खर्च करतात. तिथं आता विमानतळही झालाय.माणसं जगातून विमानानं शिर्डीला येतात. पॅरिस, रोमला जशी जातात तशी शिर्डीला. केवढी उलाढाल होते.

विचारवंत, संशोधक, विश्लेषक सरसावतात. ख्रिसमसला खरेदी होणाऱ्या वस्तूंपैकी किती वस्तू उपयुक्त असतात, वापरल्या जातात अशा गोष्टींवर ते प्रबंध लिहितात. एकानं शोधलंय की चाळीस टक्के तरी वस्तू फुकट जातात. म्हणजे इतके अब्ज रुपये वाया गेले. ते दुसऱ्या चांगल्या गोष्टीसाठी खर्च झाले तर किती बरं होईल असं विचारवंत म्हणतात.  

विचार विचार विचार यात गुंतलेली ब्रिटीश माणसं म्हणतात २८१ पाऊंड म्हणजे सुमारे ३० हजार रुपये. भेट या चैनीवर खर्चायला येवढे पैसे असणारी माणसं किती? जगभरात किमान ५० टक्के तरी माणसं आहेत जी जेमतेम जगतात. ख्रिसमस म्हणजे झाड आणि टांगलेल्या वस्तू असं असेल तर ख्रिसमस त्या लोकांसाठी नाही.

कुणी काहीही म्हणो आणि काहीही करो. 

सांता येतोच. सत्य नारायण होतोच. होणारच ना?

माणसं श्रद्धेवरच तर जगतात.

।।

Comments are closed.