पुस्तकं. सम्राट अलेक्झांडर. दंतकथा.

पुस्तकं. सम्राट अलेक्झांडर. दंतकथा.

आज २०२३ या सालात ग्रीक-मॅसिडोनियन सम्राट अलेक्झांडरच्या  मृत्यूला २३०० वर्षं झाली. अजूनही ॲलेक्झांडरवर संशोधक पुस्तकं लिहीत आहेत. Alexander the Great:The Making of a Myth हे पुस्तक नुकतंच म्हणजे २०२२ साली Richard Stoneman या संशोधकांनी संपादित केलंय. 

लंडनमधल्या ब्रिटीश म्युझियमनं अलेक्झांडरची पुण्यतिथी हेरून महिनाभराचा उत्सव आखला होता त्यासाठी मुद्दा हे पुस्तक संपादित करण्यात आलं. म्युझियमनं २५ देशातून विविध वस्तू, शिल्पं, चित्रं इत्यादी गोळा केली; ॲलेकबद्दलची २१ भाषांतली पुस्तकं गोळा करून प्रदर्शनात मांडली गेली.

पुस्तकात नामांकित संशोधकांचे लेख एकत्रीत केलेले आहेत. खुद्द स्टोनमन हे ॲलेकचे अभ्यासक आहेत. त्यांनी ॲलेकवर स्वतंत्रपणे पुस्तकं रचलेली आहेत. प्रस्तुत पुस्तकात ॲलेक या माणसाच्या दंतकथा आणि त्याचे पुरावे एकत्र करून तो समजून घेण्याचा प्रयत्न आहे. स्टोनमन यांच्या पुस्तकात ॲलेक्झांडरबद्दलच्या आख्यायिका आहेत, या आख्यायिकांच्या संदर्भात त्या त्या काळात प्रसिद्ध झालेला मजकूर आणि चित्रं पुस्तकात आहेत.

ॲलेक्झांडर वयाच्या विसाव्या वर्षी,  इसपूर्व ३३६ मधे राजा झाला. इसपूर्व ३२३ मधे तो पूर्वेकडल्या स्वारीवरून परतत असताना वारला. म्हणजे जेमतेम १३ वर्षाची कारकीर्द. राजा झाल्यावर आपलं राजेपण सिद्ध करण्यासाठी तो पर्शियन साम्राज्यावर हल्ला करत मॅसेडोनियातून निघाला आणि सिंधू नदीच्या खोऱ्यात पोचला. तिथून परतत असताना त्याला मरण आलं. ग्रीस ते भारत येवढा प्रदेश तो जिंकत फिरला. एक प्रचंड आणि बलशाली फौज त्यानं तयार केली आणि त्या जोरावर त्यानं साम्राज्य उभं केलं. हे साम्राज्य त्याला उपभोगता आलं नाही. 

ॲलेक्झांडर एक दंतकथा, मिथ, झाला. पर्शिया, अरब प्रदेश, चीन या प्रदेशात त्याच्याबद्दल किती तरी आख्यायिका सांगितल्या जातात. खरं काय आणि खोटं काय याचा पत्ता लागत नाही हे आख्यायिकेचं, दंतकथेचं वैशिष्ट्यं असतं. ॲलेक्झांडर या दंतकथेलाही ते वैशिष्ट्य लागू पडतं.

पर्शियन लेखकानं एक दंतकथा पसरवली. ती अशी. पूर्वेत (म्हणजे भारतवर्षात) एक नदी होती. त्या नदीतलं पाणी प्यालं की माणूस अमर होतो. राजाच्या सोबत असलेल्या सेनापतींनी ते पाणी एका पाण्याबाहेर काढल्यानं तडफडणाऱ्या माशाला प्यायला दिलं, तो मासा म्हणे जिवंत झाला. ते अमर पाणी ॲलेक्झांडरला प्यायला देण्याचा घाट सेनापतींनी घातला. ॲलेक्झांडरला नदीच्या काठावर घेऊन गेले, एका भांड्यात पाणी घेतलं आणि ते भांडं ॲलेक्झांडरला दिलं. ते भांडं ॲलेक्झांडरच्या हातून पडलं की तसलंच काही तरी झालं. ओठापर्यंत गेलेलं पाणी अलेक्झांडर पिऊ शकला नाही. म्हणजे लोच्या झाला. त्यामुळं नंतर ॲलेक्झांडरचा अवेळी मृत्यू झाला.

भारतातून ॲलेक्झांडर स्वारी बंद करून परत यायला निघाला. संशोधक सांगतात की त्याच्या सेनापतीनी पुढं जायला नकार दिल्यानं त्याला परतायचा निर्णय घ्यावा लागला. परतताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला, तो मॅसिडोनियाला परतला नाही.

ॲलेक्झांडरनं लाखो सैनिक, माणसं मारली. युद्ध करणारा माणूस नेहमीच क्रूर दाखवला जातो. ॲलेक्झांडरची तशी वर्णनं पर्शियन  साहित्यात मांडली आहेत. मॅसेडोन लेखक त्याला एक मृदू आणि कोमल हृदयाचा माणूस दाखवतात. दरायसला त्यानं मारलं. नंतर मृत  दरायसचं डोकं मांडीवर घेऊन अश्रू ढाळणारा राजा असं चित्रं मॅसिडोन साहित्यिकांनी रंगवलं आहे.

येवढा मोठा राजा, इतका मोठा पराक्रम केला. याचा अर्थ त्याच्याकडं दैवी शक्ती असायलाच पाहिजेत. एका चित्रात ॲलेक एका पक्षाच्या पंखावर बसलाय आणि आकाशातून तो पृथ्वीचं निरीक्षण करतोय, राज्य पहातोय, युद्धभूमी पहातोय असं दाखवलंय. एका चित्रात तो एका पाणबुडीसारख्या कशात तरी बसलाय आणि समुद्राच्या तळाशी जाऊन निरीक्षण करताना दिसतो.

एक चित्र प्रसिद्ध आहे. त्यात ॲलेकला शिंगं दाखवलीत. ॲलेक हा सामान्य माणूस नव्हता, असामान्य होता हे दाखवण्यासाठी.  कदाचित त्याच्यातलं जनावर दर्शवण्याचाही प्रयत्न असावा.

आजही अभ्यासक ॲलेक्झांडर ही व्यक्ती, तिचं साम्राज्य, तिच्यावरच्या दंतकथा यातल्या खरेखोटेपणाचा शोध घेत असतात.

    खुद्द ॲलेक्झांडरनंच दंतकथा तयार करून ठेवल्या. त्यानं एक शिल्पकार-चित्रकार नेमला. त्याच्याकडून त्यानं स्वतःची विविध रुपांतली चित्रं काढून घेतली. एका चित्रात अलेक्झांडरने वीज हातात पकडून ठेवलेली दिसते.वीज पकडणारा म्हणजे किती शक्तीवान माणूस याची कल्पना माणसानी करत बसावं. एका चित्रात तो झियस म्हणजे प्रत्यक्ष देव असल्याचं दाखवलं होतं. अलेक्झांडरनं या चित्राची नाणी पाडून घेतली. त्या काळात चित्र छापण्याची सोय नव्हती, आर्ट गॅलऱ्या नव्हत्या. नाणं हे व्हिज्युअल सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात होतं. त्यातून ॲलेक लोकांपर्यंत पोचला.अशा तऱ्हेनं राजाचं चित्र असलेलं नाणं पाडणारा हा पहिला युरोपीय राजा मानला जातो.

ॲलेक नोंदी करणाऱ्या लोकांना, लेखकांना, बरोबर घेऊन हिंडत असे. 

कसं असतं पहा. ॲलेक्झांडर मरून सव्वादोन हजार वर्षं झाली पण आजही नव्या आख्यायिका तयार होत आहेत. Mary Renaul यांनी The Persian Boy ही कादंबरी १९७२ मधे प्रसिद्ध केली. या कादंबरीसाठी असलेली साधनं त्यांनी ऐतिहासिक साहित्यातून मिळवली. ॲलेकच्या दरबारात सुंदर हिजडे होते, ॲलेकची त्याच्या बालपणीच्या पुरुष मित्रांशी संगत होती या गोष्टी त्यानी कादंबरीसाठी वापरल्या. ऑलिव्हर स्टोननं २००४ साली चरित्रपट तयार केला, त्यात त्यानं ॲलेकचे समलैंगिक संबंध सुचवले.

ॲलेकला समलैंगिक किवा बहुलैंगिक दाखवणं यात एक सनसनाटी असल्यानं कादंबरी, चरित्रपट लोकप्रिय करण्यासाठी त्याचा वापर झाला असणं शक्य आहे. पण या शक्यतेला ऐतिहासिक आधार लेखक, दिक्दर्शकानं दिलेला आहे. म्हणजे एक नवी आख्यायिका तयार केली असंच म्हणायचं. 

।।

Comments are closed.