‘ स्टिल पिक्चर्स’  हे जेनेट माल्कम या गाजलेल्या लेखिका-बातमीदार यांचं आत्मचरित्र आहे.  

माल्कमनी १९६३ साली न्यू यॉर्करमधे लिहायला सुरवात केली आणि मृत्यूपर्यंत म्हणजे २०२१ सालापर्यंत त्या न्यू यॉर्करमधे लिहित होत्या. त्यांची १३ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.त्यांचं JOURNALIST AND THE MURDERER हे पत्रकारी या विषयावरचं पुस्तक गाजलं, अमेरिकेत ते पत्रकारी अभ्यासक्रमामधे शिकवलं जातं. 

जेनेट माल्कम झेक ज्यू होत्या. बुडापेस्टमधे त्या रहात.वडील यशस्वी डॉक्टर होते. माल्कम यांचं कुटुंब सुखी होतं. नाझी अत्याचार सुरू झाल्यावर १९३९ साली त्यांचं कुटुंब अमेरिकेत स्थलांतरीत झालं. या स्थलांतरासाठी जेनेटच्या वडिलांना लाच द्यावी लागली.

जेनेट २०२१ मधे वयाच्या ८७ व्या वर्षी वारल्या. त्या आधी काही महिने त्यांनी आपल्या आठवणी लिहायला घेतल्या. ‘आत्मचरित्र लिहणं कठीण असतं, त्यात अनेक   गोष्टी घुसडल्या जातात’, ‘आठवणी घोटाळ्याच्या असतात, जे आठवतं ते सत्य नसतं, ते काही तरी पुसट-धुसर असतं’ असं खुद्द माल्कम यांचंच मत होतं. त्यामुळं नाखुषीनंच त्यांनी निबंधांच्या रूपात आठवणी लिहायला घेतल्या. शेवटला निबंध पूर्ण होण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलीनं शेवटला निबंध लिहिला.

जेनेट माल्कम यांना त्यांच्या घरातल्या पोटमाळ्यावर एक अडगळीत पडलेली पेटी सापडली. त्या पेटीत जुने फोटो होते, पत्रकारी करत असताना घेतलेली टिपणं होती. त्यातला एकेक फोटो, त्यातली माणसं, टिपणं  निवडून त्या भोवतीच्या आठवणी जेनेट माल्कमनी या पुस्तकात लिहिल्या आहेत.

अमेरिकेत, न्यू यॉर्कमधे, स्थलांतरीत ज्युंची एक वस्ती आहे, घट्ट विणलेला एक ज्यू समुदाय आहे. त्यात अर्थातच जेनेटची आई वडील आणि काके मामे आहेत. त्यांचं व्यक्तिचित्रण पुस्तकात आहे. अमेरिकेनं, अमेरिकेतल्या स्थानिक गोऱ्या ख्रिस्ती समाजानं ज्यूना स्वीकारलं नाही, परकं मानलं. माल्कमच्या पुस्तकात ते दिसतं. 

एक वृद्ध स्त्री आहे. तिचा नवरा,दोन्ही मुलं, दोन्ही सुना आणि एक नातू हिटलरच्या छळछावणीत मारले गेलेत. ही एकटी बाई उरलीय. ती गप्पच असते. कायम काळे कपडे घालते. कुण्णाशीही बोलत नाही.

जेनेट माल्कमची दोन लग्न झालीत. माल्कमचं एक लग्नबाह्य प्रकरण होतं, एकदा प्रियकराबरोबर माल्कमनी एका त्रयस्थ घरात जाऊन मज्जा केली. ते धावते उल्लेख पुस्तकात आहेत. 

माल्कम आपल्या वडिलांबद्दल लिहितात. वडील ज्यू संस्कृतीचा नमुना होते, बुद्धीमानी आणि ह्युमर ही त्यांची स्वभाववैशिष्ट्यं. ह्यूमर यायला हवा असेल तर माणसाला तटस्थ होता यायला हवं, अंतर राखता यायला हवं, गुंतायचं नाही. सिनिक असायला हवं. माणूस गुंतला की भावनाविवश होतो, अनेक गोष्टी त्याला दिसेनाशा होतात.

पेटीत माल्कमना एक जुनी वही सापडली. तिच्यात त्यांनी एका मुलाखतीच्या वेळी घेतलेली टिपणं होती.  या टिपणवहीच्या भोवती एक आठवण प्रस्तुत पुस्तकात आहे.

ते प्रकरण असं.

माल्कमनी मेसन नावाच्या एका मनोविकार तज्ज्ञावर लिहिलं.मेसन फ्रॉईड संग्रहालयाचा संचालक होता पण फ्रॉईडचा सिद्धांत त्याला मान्य नव्हता. मग अशा माणसाला संचालक कां केलं असा प्रश्न होता. माल्कमनी   मेसन यांच्या अनेक तासांच्या अनेक मुलाखती अनेक ठिकाणी घेतल्या. त्या मुलाखतीतून जो अर्थ माल्कमना समजला तो त्यांनी ‘न्यू यॉर्कर’मधे प्रसिद्ध केला. 

  प्रसिद्ध मजकुरात अमूक जागी मी अमूक म्हणालो असं जे लिहिलंय ते खोटं आहे, त्या ठिकाणी आपण ते बोललोच नाही असा दावा करून मेसननी बदनामीचा खटला माल्कम यांच्यावर  भरला. कोर्टानं पुरावे मागितले. माल्कमनी बातमीदारीची पद्धत समजून दिली. मुलाखतीत हज्जारो शब्द बोलले जातात त्याचा सारांश पत्रकार मांडतो. नेमके शब्द नेमक्या वेळी नेमक्या ठिकाणी बोलले गेलेच असतील अशी खात्री नसते असं माल्कमनी सांगितलं. तरीही कोर्टानं पुरावे मागितलेच. मुलाखतीच्या वेळी घेतलेली टिपणं कोर्टानं मागितली.  दुर्दैवानं ती टिपणं हरवली होती. कोर्टानं माल्कमवर ताशेरे झाडले. 

१० वर्षं खटला चालला. शेवटी कोर्टानं माल्कमना निर्दोष ठरवलं.  पण या निमित्तानं पत्रकारीच्या पद्धतीचा अभ्यास माल्कमनी केला आणि त्यावर पुस्तक लिहिलं.

प्रस्तुत पुस्तक छोटं आहे. माल्कमना कॅन्सर झाला होता. आपल्याला खूप कमी दिवस उरलेत, तेवढ्यात लिहून काढायचं असा विचार करून माल्कम लिहायला बसल्या. मुळात आठवणी लिहिण्यावर विश्सास नाही; घाईघाईत लिहिलंय, लिहायचं तर बरंच आहे पण वेळ आणि जागा कमी आहे हे लक्षात घेऊन अगदी संक्षिप्त, धावतं असं लेखन आहे.

 माल्कम अनेक वर्ष मानससाशास्त्राचा अभ्यास करत होत्या, लिहीत होत्या. सुरवातीला त्यांनी फोटोग्राफी या विषयावर लिहिलं, नंतर त्यांनी क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयावर लिहिलं, नंतर त्यांनी मुलाखतींवर आधारलेले मजकूर लिहिले. मुलाखत देणारा, बातमीदाराशी बोलणारा काही एक सांगतो. पण बातमीदाराला जे समजतं ते त्याचं स्वतःचं असतं. अशा परिस्थितीत बातमीत किवा लेखनामधे उतरतं ते कितपत खरं असतं, ते कितपत. त्या मुलाखत देणाऱ्याचं असतं? मानसशास्त्राच्या हिशोबात या प्रश्नानं माल्कम यांना पछाडलं. त्याच संदर्भात आपण काय लिहिलं, ते योग्य होतं कां, आपण ज्याला पत्रकारी म्हणतो ते नैतिक दृष्ट्या योग्य होतं का असे प्रश्न माल्कम प्रस्तुत पुस्तकात स्वतःलाच विचारतात.

माल्कम पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात ‘माझ्या हृदयात दडून बसलेल्या गोष्टी बाहेर पडतील या भीतीनं मी लिहिण्याच्या परिक्षेलाच दांडी मारते. आपलं मन उघडं करतो असं म्हणणारे लेखकही मन लपवण्याचा भ्याडपणा करत असतात, तो त्यांचा लेखक म्हणून विशेषाधिकारच असतो. माफ करा, मी तो विशेषाधिकार वापरणार आहे.’ पत्रकार, लेखकाचं हे वागणं अनैतिक आहे असं माल्कम यांचं मत आहे, ते या पुस्तकात मांडलं आहे. 

आपण आत्मचरित्र लिहितोय खरं पण आपण कपोलकल्पित गोष्टी तर आपल्या आठवणीत घुसडत नाहीयोत ना ही शंका प्रस्तुत पुस्तक लिहिताना माल्कम यांच्या डोक्यात आहे. 

शेवटी आत्म चरित्र म्हणजे तरी काय असतं. आयुष्यात पूर्वी कधी तरी घडलेल्या घटना आठवायच्या आणि त्या लिहायच्या असंच ना. पण या आठवणीच घोटाळ्याच्या असतात असं माल्कम म्हणतात. आपल्याला जे आठवतं असं वाटतं ते अस्पष्ट, धूसर असतं, त्यात नेमकेपणा नसतो. 

‘ भूतकाळ हा देश व्हिसा देत नाही, तिथं व्हिसाशियावच बेकायदेशीर प्रवेश करावा लागतो’  असं माल्कम या पुस्तकात म्हणतात.

माल्कम यांच्या आठवणी  नेमक्या असोत किंवा नसोत, त्यांनी जे लिहिलय ते मोलाचं आहे. पत्रकारी आणि लेखन यातल्या खरेपणाबद्दलच त्यांनी शंका घेतलीय. खरं आणि प्रामाणिक लेखन कोणतं हे त्यांनी सांगितलं नसलं तरीही मुळात लेखन प्रक्रियेबद्दल त्यांनी मांडलेले मुद्दे विचारांना प्रवृत्त करतात.

||

Still Pictures. 

Janet Malcolm.

176 pages.

||

Comments are closed.