पुस्तक. खाजगी सैन्यांचा जमाना.

पुस्तक. खाजगी सैन्यांचा जमाना.

पुस्तकं.   खाजगी सैन्यांचा जमाना?

 अफगाणिस्तान तिरीन कोट विभाग आहे. तिथं अफगाण सरकारचे कायदे कानून चालत  नाहीत. मतिउल्ला खान नावाच्या माणसाची सत्ता तिथं चालते. सरकारी योजना, सरकारी पैशाचं वाटप, नेमणुका इत्यादी गोष्टी मतीउल्ला खान हा माणूस करतो. 

मतिउल्ला खानाची ही औकात आहे याचं कारण त्याच्याजवळ खाजगी सैन्य आहे. ते रीसतर सैन्य आहे आणि त्यातली भरती आणि कारभार सारं मतिउल्ला खान करतो. याच भागातून कंदाहारपर्यंत एक रस्ता जातो. या रस्त्यावरून अमेरिका आणि नेटोचं सैन्य जात असे, त्यांची रसद या रस्त्यावरून जात असे. हा रस्ता विनाअडथळा वापरता यावा यासाठी नेटो आणि अमेरिका मतिउल्ला खानला पैसे देत असे. अमेरिकेच्या दृष्टीनं तिथं अफगाण सरकार नव्हे मतीउल्लाचं सरकार चालत होतं.

आपल्याला आपला उद्योग निरवेध करायला मिळतोय ना मग तो कोणाहीमुळं कां असेना असा अमेरिकेचा विचार होता. मतिउल्ला खानाचं सैन्य खाजगी आहे, त्याला कोणाचीही मान्यता नाही, ते सैन्य गुन्हेगारी करतं, खंडण्या उकळतं इत्यादी गोष्टींशी अमेरिकेला देणंघेणं नव्हतं. आज अमेरिकेनं अफगाणिस्तानातून काढता पाय घेतलाय पण मतिउल्ला मात्र त्यांच्या जागी कायम आहे.

मतिउल्ला खानचं सैन्य हा एक खाजगी उद्योग, इंडस्ट्री, आहे.   जगाला ते मान्य आहे कारण जगाची सोय होतेय.

प्रस्तुत पुस्तकाचा लेखक सांगतो की  पुढल्या पाच पन्नास वर्षात जगभर अशा तऱ्हेनं खाजगी लष्करी उद्योग उभे रहाण्याची शक्यता आहे, हे एक नवं लष्करी राजकीय वास्तव तयार होतंय. 

मध्य युगात अशा तऱ्हेची खाजगी सैन्यं जगभर होती. भारतात शिंदे, होळकर, शहाजी राजे वगैरे सरदारांची खाजगी सैन्य होती. ते सुभेदार होते, सम्राट त्यांच्या सैन्याचा वापर करून आपलं राज्य टिकवत असत. सम्राटांचं स्वतःचंही सैन्य असे आणि ही खाजगी सैन्यही सम्राट वापरत. 

ती पद्धत जवळपास त्याच कारणानं आधुनिक जगात सुरु होताना दिसतेय.

या खाजगी सैन्याची सुरवात रेगन, थॅचर इत्यादीनी सुरु केलेल्या खाजगीकरणाच्या तत्वाशी मिळती जुळती आहे. कामं खाजगी कंपन्यांकडं सोपवायची. लोच्या झाला तर खाजगी कंपन्यांवर त्याची जबाबदारी टाकता येते.

अमेरिकेला इराक, अफगाणिस्तान, लायबेरिया इत्यादी देशात लष्करी कारवाया करायच्या होत्या. अफगाणिस्तानात अमेरिकेनं १८,८६९ खाजगी सैनिक वापरले. सर्व सैनिक खाजगी कंत्राटी कंपन्यांनी पुरवले होते. त्यातले फक्त १९७ अमेरिकन होते. इराकमधे अमेरिकेनं ११,६२८ खाजगी सैनिक वापरले. त्यातले १०१७ अमेरिकन होते. DynCorp, MPRI, Aegis, Triple Canopy या कंपन्या ही सैन्य पुरवत होत्या. जगभरात कुठूनही या कंपन्या सैनिक गोळा करत.

 सरकारांचा फायदा असा की खाजगी सैन्यातली माणसं मारली गेली तर ती आपली नाहीत असं म्हणायला सरकारं मोकळी असतात. नागरिकांनाही आपले सैनिक मेले याचं दुःख होत नाही.  सरकारच्या सैन्यातला एक माणूस मेला तरी त्याच्या घरची, गावची माणसं दुःखी होतात, नुकसान भरपाई मागतात, आपल्या देशाची माणसं मेलेली कोणत्याही देशाला आवडत नसतं. 

  अमेरिकेनं विनाकारणच वियेतनाममधे युद्ध केलं. या युद्धात अमेरिकन सैन्यानं  केलेल्या कित्येक कारवाया सदोष होत्या, त्यात विनाकारण अमेरिकन सैनिक मारले गेले. अमेरिकन जनतेत या सर्वाबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली, सरकारं कोसळण्याच्या बेतात होती. पण खाजगी सैन्यातले कंत्राटी सैनिक मारले गेले याचा परिणाम सरकारवर झाला नाही. वर्तमानपत्रांनीही सरकारला जाब विचारला नाही. 

आफ्रिकेत  बंडाळ्या करून माणसं सत्तेत येतात. सत्तेत आल्यावर पुन्हा नव्या बंडाची शक्यता असते. अशा वेळी देशातल्या सैन्यावर अवलंबून रहाता येत नाही.कारण ते सैन्य सत्ताधारी माणसाशी प्रामाणिक राहील याची खात्री नसते. अशा वेळी सत्ताधारी लोक पूर्णपणे आपल्याशी ईमानदार रहातील अशा लढवय्यांच्या शोधात असतात. खाजगी सैन्य या बाबती उपयोगाचं असतं. पैसे देऊन आणलेले असल्यानं ते पैशाशी प्रामाणिक रहातात, त्यांचं जगणंच इमानदारीवर असतं.  

 सुदानमधे अनेक एनजीओ जनहिताची कामं करतात, सुदानी जनतेला औषधं, अन्नधान्य पुरवतात. यादवीत गुंतलेली दोन्ही बाजूची सैन्य या संस्थांना काम करू देत नाहीत. अशा वेळी या संस्था खाजगी सैन्याची मदत घेतात. भविष्य काळात मातबर खाजगी व्यक्तीही स्वतःचं वा स्वतःच्या कारखाने वगैरेचं संरक्षण करण्यासाठी खाजगी सैन्य वापरण्याची शक्यता आहे.

माली या देशात युनायटेड नेशन्सच्या वतीनं शांतता सैन्य ठेवण्यात आलं होतं. सैन्य फ्रान्सचं होतं. वॅग्नर या खाजगी सैन्यानं माली सरकारला सांगितलं की फ्रेंच सैन्यावर होणाऱ्या खर्चापेक्षा कमी खर्चात आमचं सैन्य काम करेल. वॅग्नरचं सैन्य स्वस्तात पडलं, मालीनं फ्रेंच सैन्याला रजा दिली. 

  युक्रेनमधे रशियाच्या वतीनं लढणाऱ्या वॅग्नर सेनेत ३० ते ५० हजार सैनिक होते. जगभरातून सैनिक या सेनेत एक नोकरी म्हणून सामिल झाले.  त्यांच्या विविध तुकड्या आहेत आणि सैन्याप्रमाणंच या तुकड्या कामं करतात. एक तुकडी काम दहशत पसरवते. दुसरी  तुकडी अपहरणं करते, लोकांवर अत्याचार करते. एक तुकडी रणगाडे घेऊन रीतसर युद्ध करते. 

खाजगी लष्करं वाढतील, खाजगी लष्करांची एक बाजार व्यवस्था निर्माण होईल या लेखकाच्या प्रतिपादनावर वादंग माजले आहेत. लष्कर, राज्यवस्था इत्यादी विषयांचा अभ्यास करणारी माणसं म्हणतात लेखक म्हणतो इतकी काही सरकारं अगतीक होणार नाहीत. लोकशाही आणि लिबरल राजवटी अशा खाजगी सैन्यांच्या मागं लागणार नाहीत असं अभ्यासकांचं मत आहे. सामान्यतः हुकूमशहा खाजगी सैन्याचा वापर करतात. उदा. बशर आसद, पुतीन. त्यामुळं खाजगी लष्करी कंपन्यांचा प्रभाव मर्यादीत राहील असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

काय होईल ते होवो पण आजवर दडलेलं खाजगी सैन्याचं वास्तव लेखकानं उघड करून लोकांची झोप उडवलीय हे खरं.

लेखक काही काळ लष्करात होता. नंतर तो DynCorp या खाजगी सैन्यात सामिल झाला. या सैन्यात राहून त्यानं बुरुंडीच्या अध्यक्षावर होऊ घातलेला घातक हल्ला थोपवला होतं. तसंच सुदानमधे यादवी झाल्यावर सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याची कामगिरी लेखकाच्या सैन्यानं काही काळ पार पाडली होती.

।।

The Modern Mercenary: Private Armies and What They Mean for World Order. 

 Sean McFate.

Oxford University Press; 248 pages.

\\

Comments are closed.