वॅग्नर लेख ४. पुतीन सत्तेवरची पकड अधिक घट्ट करतील.

वॅग्नर लेख ४. पुतीन सत्तेवरची पकड अधिक घट्ट करतील.

प्रिगोझीननी वॅग्नर सेना मॉस्कोच्या दारात उभी केली. काही तासातच आपल्याला बंड करायचंच नव्हतं केवळ पुतीनना वस्तुस्थितीची जाणीव करुन द्यायची होती असं म्हणत पळ काढला.

ही घटना साधीसुधी आहे काय? मामला आता संपलाय? या घटनेचा रशियन राजकीय स्थितीवर, पुतीन यांच्या सत्तेवर परिणाम होईल काय?

प्रिगोझीनला खरोखरच काय साधायचं होतं ते कळायला मार्ग नाही. पण वॅग्नर सेना मॉस्कोकडं नेतांना त्यांनी काहीच तयारी केलेली नव्हती. सरकारला हादरवायचं असेल तर मुख्य लष्करातले लोक बरोबर घ्यायला हवेत, सरकारातले काही लोकं बरोबर घ्यायला हवेत. तसं काही त्यांनी केलं नाही. कित्येक महिने त्यांचा असंतोष खदखदत होता पण त्यांनी मोर्चेबांधणी केली नव्हती. त्यामुळं त्यांचं आव्हान अगदीच कमकुवत होतं, ओरखडा काढण्यासारखं होतं, धोबीपछाड देण्यासारखं नव्हतं.

पुतीननी आता त्यांना एकच विकल्प ठेवलाय. बेलारूसमधे जाऊन रिटायर व्हा. नाही तर रशियात येऊन खटल्याना तोंड द्या.प्रिगोझीन संपल्यासारखं दिसतंय.

पुतीनवर या घडामोडीचा काय परिणाम होईल?

पुतीनचं व्यक्तिमत्व पाहिलं तर काही गोष्टींचा अंदाज बांधता येतो. प्रिगोझीन प्रकरणाचे त्यांच्या लेखी असलेले अर्थ असे.

१.प्रिगोझीन काही तरी उद्योग करतोय हे आपल्या एफएसबी या गुप्तचर खात्याला कसं समजलं नाही. याचा अर्थ त्या खात्यात काही गडबड आहे. प्रिगोझीननं रोस्तोववर ताबा मिळवलाय आणि तो मॉस्कोकडं निघालाय ही बातमी अमेरिकन इंटेलिजन्सनं माध्यमांना फोडली, एफएसबीला ती कळली नाही.तेव्हां आता एफएसबीच्या मुसक्या आवळायला हव्यात. तिथली काही माणसं कामावरून हाकलायला हवीत,सूत्रं आपल्या हातात घ्यायला हवीत.

२. प्रिगोझीन हा अर्धलष्कर झाला होता. लष्कराचा ताबा त्याच्यावर राहिला नव्हता. लष्करी अधिकारी ढिले झाले, त्यांचे निर्णय चुकले. तेव्हां लष्कर पक्कं सेट्रलाईज करायला हवं, लष्करानं आता पुतीनचंच ऐकायला हवं, त्यांना स्वायत्तता देता कामा नये.

३. वॅग्नरसारखी खाजगी सेना आपल्या उपयोगाची आहे. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लीक, मोझंबिक, माली इत्यादी देश रशियाच्या ताटाखाली रहायचे असतील तर वॅग्नरची आवश्यकता आहे. त्या देशांच्या दृष्टीनं वॅग्नर म्हणजे रशियन लष्करच आहे. तेव्हां एक तर वॅग्नर लष्करात सामिल करून टाकायचं. पण तसं करणं उपयुक्त नसेल तर वॅग्नरचे तुकडे करायचे, वॅग्नरमधे गुंतलेल्या खाजगी कंपन्या वेगळ्या करायच्या आणि त्यांना स्वतंत्र कामगिऱ्या द्यायच्या; त्या कामगिऱ्यांचं नियंत्रण लष्करानं करायचं. वॅग्नरची ताकद मर्यादित करायची, प्रिगोझीनला निष्प्रभ करायचं.

या बंडोबाचा परिणाम पुतीनवर होईल काय?

शक्यता नाही.  

पुतीन यांचा विश्वास आहे की ते योग्य मार्गानं जात आहेत, असली बंड वगैरे गोष्टींचा त्यांच्या सत्तेवर ढिम्म परिणाम होत नाही. असले उद्योग झाले की आपण कुठं कमी पडतो त्याचा विचार पुतीन करतात आणि पुढं सरकतात. 

पुतीनची सत्तेवर पकड आहे. ती पकड ढिली होईल? नवी बंडं वगैरे होतील? जनतेचा आता पुतीनबद्दल भ्रमनिरास झाला आहे?

नवी बंडं शक्य नाहीत पण अशा बंडांची शक्यता मात्र यातून दिसली. ती शक्यता पुतीन नाहिशी करतील.

पुतीन हे लोकशाहीवाले अजिबातच नाहीत. त्यांचं सत्तेत येणं, सत्तेत टिकून रहाणं यात जनतेचा काडीमात्र सहभाग नाही. लोकांना पटवून,समजून देऊन ते सत्तेत आलेले नाहीत. आपण एक ईश्वरीय काम करत आहोत अशी त्यांची खात्री आहे. रशियावर झालेल्या अन्यायाचं निराकरण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं त्याना वाटतं. हेही त्यांना कोणी सांगितलेलं नाही, हे त्यांचं त्यांनीच डोक्यात भिनवलेलं आहे. आणि ते ध्येय घेऊन ते पुढे निघाले आहेत.

पश्चिमी देशांनी रशियन साम्राज्य मोडलं. आजही पश्चिमी देश आर्थिक निर्बंध लादून रशियाला खतम करण्याचा प्रयत्न करत आहेत. युक्रेन हा रशियाच भाग होता, फुटून निघाला होता, तो परत मिळवणं हे आपलं धर्मकर्तव्य आहे असं ते मानतात. हे काम करायला ते बाहेर पडले आहेत, एकटे.  लोकं काय म्हणतात याची फिकीर त्याना नाही. कोणी विरोध केलाच तर तो या परमकर्तव्याला विरोध आहे असं मानून ते विरोधकाना नेस्तनाबूत करतात. लोकांना समजून वगैरे द्यायचं नसतं असं त्यांचं मत आहे. राज्यकारभार करतानाही ते संसदेला हिंग लावून विचारत नाहीत. ते निर्णय घेणार, संसदेनं त्यावर शिक्का मारायचा असा त्यांचा राज्यकारभाराचा खाक्या आहे.

पुतीन यांचा सत्तेचा फंडा असा.मी तुम्हाला स्थिरता देतो, चांगलं आर्थिक जगणं देतो. त्या बदल्यात तुम्ही मला सत्ता द्या. सरळ कमर्शियल व्यवहार आहे. सर्वसामान्य माणसांना तो पटतो. २००० सालानंतर जागतीक तेल बाजारातल्या तेजीमुळं रशियाची स्थिती एकदम सुधारली, रशियात पैसा खेळू लागला. लोक खुष झाले. पुतीन कोणाचे गळे आवळतात, कोणाचे खून करतात, ते कोणालाही विचारत नाहीत या गोष्टीबद्दल जनतेला देणंघेणं नव्हतं. आजही नाही.

आज रशियाची अर्थव्यवस्था कोसळते आहेत, निदान डगमगते तरी आहे. अमेरिका व युरोपीय देशांनी लादलेल्या निर्बंधांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोय. युक्रेन युद्धामुळं रशियाची तिजोरी रिकामी होते आहे. त्यामुळं पुतीनचं मुख्य आश्वासन, स्थिरतेचं, डळमळीत झालं आहे हे जनतेला जाणवलं आहे. पण बंडबिंडं करणं रशियन जनतेच्या रक्तात नाही. सामान्यतः हुकूम पाळणं, सत्तेसमोर झुकणं हे रशीयन राजकीय संस्कृतीचं वैशिष्ट्यं आहे. त्यामुळं प्रिगोझीननं बंड केलं तरीही रशियन जनता त्यांच्या पाठी उभी रहाण्याची शक्यता नाही. समजा बंड तीव्र झालं आणि पुतीनची राजवट अस्थिर झाली झाली तर जनता बँकांतून पैसे काढून घेईल, ब्रेड आणि लोणी झोळीत भरेल आणि पळून जाईल. युक्रेन लढाई मंजूर नसलेले लोक देश सोडून जात आहेत, पुतीनशी लढत नाहीयेत.

पुतीन यांचं काहीही कधीही चुकत नसतं. ते कायम योग्य त्या वाटेनंच जात असतात. आजही पश्चिमेला धडा शिकवण्याचं परमकर्तव्य ते पार पाडत आहेत. सत्ता आणि सत्तेची सर्व अंगं ठीकठाक आहेत ना, ती आपल्या हातात आहे ना याचा सर्वाळा पुतीन घेतील. वाटचाल सुरु करतील.

या वाटचालीत ते काय करतील ते सांगता येत नसतं. कोणाला जवळ करतील, कोणाचा काटा काढतील ते सांगता येत नसतं. एकेकाळी पीटर्सबर्गच्या मेयरच्या छत्रछायेखाली ते वाढले. त्या मेयरना वरवर जायला त्यांनी मदत केली. आणि शेवटी ते मेयर वाटेत आडवे आल्यानंतर त्याचा खून करून पुतीन मोकळे झाले. पुतीनची घडण गुप्तचर संस्थेत झालीय. आपण काही न करता लोकांकडून कामं करून घ्यायची.  फायदा झाला तर आपला, लोच्या झाला तर तो माणूस मेला ही त्यांची कामाची पद्धत. त्यामुळंच मेयरला कोणी मारलं याचे पुरावे शिल्लक नाहीत.

लोकमत आता पुतीन यांच्या बाजूनं नाही. पण रशियातल्या एकूण वातावरणात, पुतीन कार्यपद्धतीत, लोकमताला कवडीचीही किमत नाही. पुतीन ज्या रीतीनं कपटकारस्थानं करून सत्तेत पोचले त्याच रीतीनं कोणी तरी त्यांना दूर सारू शकतो. हे सारं लोकांचा काहीही संबंध नसतांना घडेल.

प्रिगोझीनचं बंडातून  पुतीनना एक धडा मिळाला येवढंच. 

पुतीन सत्तेवरची पकड अधिक घट्ट करतील.

।। 

Comments are closed.