वॅग्नर लेख ३. कोण आहे हा प्रिगोझीन?

वॅग्नर लेख ३. कोण आहे हा प्रिगोझीन?

 प्रिगोझीनचा जन्म १९६१ सालचा. वयाच्या अठराव्या वर्षी त्याला चोरी करतांना लेनिनग्राड पोलिसानी पकडलं. दोन वर्षाची शिक्षा झाली. लहान वयाचे असल्यानं त्याला एका कारखान्यात काम करून शिक्षा भरून काढायची परवानगी कोर्टानं दिली,  तुरुंगवास टळला.

या काळात प्रिगोझीन यांचं चोऱ्या करणं चालूच होतं. एका घरात घुसून टोळीनं वाईनचे ग्लासेस पळवले. त्यांची एक टोळी होती.

 शिक्षेचा कालावधी संपल्यावर एकदा टोळी दरोडे घालायला निघाली. एका घरात घुसून त्यांनी २५० डॉलर लुटले, पळाले. नंतर ही लूट एंजॉय करायला ते रस्त्यावर हिंडत असताना एक सुंदर स्त्री त्यांना दिसली. टोळीनं त्यांना धरलं. एकानं त्या महिलेकडं सिगरेट पेटवण्यासाठी लायटर मागितला. त्या महिलेनं लायटर शोधण्यासाठी पर्स उघडली. त्या बरोबर प्रिगोझीननी त्या महिलेला धरलं, तिचा गळा आवळला. एका माणसानं त्या महिलेचे बूट पळवले. महिला घुसमटून खाली कोसळली. प्रिगोझीननी तिच्या कानातले सोन्याचे डूल ओरबाडले.  

प्रिगोझीनला पोलिसांनी पकडलं. कोर्टानं १३ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा दिली.

तुरुंगात एक स्वतंत्र समांतर व्यवस्था होती. तुरुंगात राहून गुन्हेगार आपले घंदे चालवू शकत. बाहेरची टोळी त्यांच्या वतीनं गुन्हे करत असे. गुन्हेगारांच्या कुटुंबियांची काळजी टोळ्या घेत असत. टेपडेक, टीव्ही सेट इत्यादी गोष्टी स्मगल होत, तुरुंगात बिनधास्त येत. गुन्हेगार आणि तुरुंगाचे कारभारी यांच्यात व्यावसायिक संबंध असत. संबंध ठेवण्याचं हे तंत्र प्रिगोझीननी आत्मसात केलं. 

‘चांगल्या वर्तनाची’ दखल घेऊन न्यायालयानं प्रिगोझीनला शिक्षा संपायच्या आधी तीन वर्षं तुरुंगातून सोडलं, प्रिगोझीन १९९० साली बाहेर पडला.

प्रिगोझीननं रस्त्यावर हॉट डॉग विकण्याची टपरी काढली. प्रिगोझीनची आई हॉट डॉग करी आणि प्रिगोझीन ती विके. टपरी उत्तम चालली, भरपूर पैसा मिळाला. प्रिगोझीननं धंदा वाढवला. मध्य वस्तीत एका इमारतीत रेस्टॉरंट टाकलं. एक रेस्टॉरंट नदीत एका बोटीवर टाकलं. हे रेस्टॉरंट एक कसिनो झालं.

प्रिगोझीनचे पदार्थ चटकदार असत. रेस्टॉरंट लोकप्रिय झाली. लेनिनग्राडमधले मोठे लोक तिथं जात. पुढारी, पोलीस, लष्करी अधिकारी अशी खासखास मंडळी हजेरी लावत. प्रिगोझीननं गिऱ्हाईकांशी दोस्ती केली, त्याना हवं ते प्रिगोझीन पुरवत.

काळ १९९०-९१ चा होता. पुतीन यांची करियर सुरु झाली होती. पुतीन रेस्टॉरंटवर येत असत. पुतीन पूर्व जर्मनीतून परतले होते. लेनिनग्राडच्या मेयरच्या आश्रयाला गेले होते. गोर्बाचेव यांना हुसकून लावण्यासाठी कम्युनिष्ट पक्षाच्या कर्मठांनी बंड केलं. पुतीन त्या बंडात सामिल झाले. भविष्य कोणत्या दिशेनं चाललंय याचा अचूक अंदाज पुतीननी घेतला होता. योग्य गटात ते सामिल झाले होते.

प्रिगोझीन रेस्टॉरंट चालवत असताना नजर ठेवून होते. पुतीनची हुशारी त्यानी जोखली, पुतीनशी दोस्ती केली.

पुतीन सत्तेत वरवर चढत गेले. प्रिगोझीनना लेनिनग्राडमधल्या शाळा कॉलेजं, विविध सरकारी खाती यांचं केटरिंगचं कंत्राट मिळत गेलं. प्रिगोझीन सैन्याला अन्न पुरवत, हे कंत्राट १.२ अब्ज डॉलरचं होतं. प्रिगोझीन कसिनो धंध्यात उतरले. त्या वेळी पुतीनं कसिनो आणि जुगार या सरकारी खात्याचे प्रमुख होते. प्रिगोझीनना काय वाट्टेल ते करायला परवानगी होती.

पुतीन सत्तेच्या शिडीवर चढत होते तेव्हां देशातले बडे नेते आणि परदेशातले अध्यक्ष वगैरेना पार्ट्या देत. त्या पार्ट्यांची जबाबदारी प्रिगोझीनकडं असे. हा काळ सुमारे २००० च्या आसपासचा होता. रशियाची अर्थव्यवस्था गोते खात होती. वस्तूंची, अन्नपदार्थांची टंचाई होती. प्रिगोझीन दुनियाभरहून प्राणी आणून चमत्कारीक पदार्थ करत. पुतीनचे अत्यंत जवळचे एक मंत्री सर्जे आयव्हॅनोव यांच्यासाठी एक पार्टी प्रिगोझीननं दिली. त्या पार्टीत सोमालियातून आणलेलं शहामृग, आफ्रिकेतून गोळा केलेल्या मगरी-सुसरी, शार्क आणि द.अमेरिकेतून आणलेला पिरान्हा मासा यांचे पदार्थ होते. यातल्या पिरान्हा माशाची वाढ करायला अमेक देशांत बंदी आहे कारण तो मासा खतरनाक आहे. त्याच्या तोंडात दात असतात, तो माणसांना चावून चावून खातो.

अमेरिकेचे अध्यक्ष बुश आणि फ्रान्सचे जॅक शिराक प्रिगोझीनच्या रेस्टॉरंटमधे जेऊन गेले. 

पुतीन प्रिगोझीननं तयार केलेले पदार्थ खात. प्रिगोझीन स्वतः पुतीनना वाढत असे.पुतीनना खात्री होती की पुतीन त्यांना जे काही खायला देतात ते शुद्ध असणार. रशियाला कटकारस्थानाचा इतिहास आहे. विषप्रयोग करून पुढारी, मंत्री, राजा यांना मारण्याच्या घटना इतिहासात विपुल आहेत. त्यामुळं पुढाऱ्यांच्या अन्नात विष नाही ना याची खात्री केली जात असते. पुतीन यांना प्रिगोझीन सेफ वाटत असे. 

सेफ शेफ.

‘पुतीनचा शेफ’ या उपाधीनं प्रिगोझीन ओळखला जाऊ लागला.

प्रिगोझीन दणादण श्रीमंत होत गेले. पीटर्सबर्ग (आधीचं लेनिनग्राड) शहरात एका प्रचंड प्लॉटवर त्यानी घर बांधलं. या प्लॉटमधे एक फूटबॉल मैदान होतं, एक हेलीपॅड होतं. प्रिगोझीनकडं एक याट (बोट) आणि तीन चार विमानंही होती.

प्रिगोझीननं लक्ष घालण्यापूर्वी वॅग्नर एक साधी छोटी कंपनी होती, स्टार्टअप म्हणाना. वॅग्नरबद्दल प्रिगोझीनला पुतीनकडूनच कळलं असावं, त्यानं या कंपनीत पैसे घालायला सुरवात केली, एक सेना उभी राहिली. तिला पुतीनची साथ मिळत गेली.

वॅग्नर सेनेचं रूप प्रिगोझीननं ठरवलं. एक रूप असं. वॅग्नर सेनेत सामिल झालेला सैनिक काही कारणानं सेनेतून पळून जाऊ लागला, सेना सोडू लागला तर … त्याचं डोकं हातोड्यानं फोडलं जातं. हा डोकेतोड कार्यक्रम चित्रित करून प्रसारित केला जातो.

वॅग्नर सेनेला एक दहशतवादी सेना हे रूप प्रिगोझीननं दिलं. युक्रेनमधे ही सेना युक्रेनी जनतेवर अत्याचार करून दहशत पसरवत होती. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांचा खून करण्याची जबाबदारी प्रिगोझीनवर टाकण्यात आली होती.

हां हां म्हणता प्रिगोझीन हे एक प्रस्थ होत गेलं. पुतीनच्या कामातही प्रिगोझीन ढवळाढवळ करतात. कोणतंही वैधानिक पद नाही, कुठंही निवडुन आलेले नाहीत, तरीही ते रशियन सैन्याच्या नेमणुकीवर ते टीका करतात, लष्कर आणि पुतीनवर दबाव आणतात.

रशियाचे संरक्षण मंत्री शोईगु आणि लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ जनरल व्हॅलेरी जेरासिमोव हे प्रिगोझीनचे वैरी आहेत. त्यांना हटवून त्यांच्या जागी त्यांना त्यांचा आवडता जनरल बसवायचा आहे.

प्रिगोझीन यांची महत्वाकांक्षा सतत मोठी होत गेलीय. एके काळी त्याना वाटत होतं की आपण रशियन लोकसभेचं सदस्य व्हावं व्लादिमीर झिरोनोवस्की यांची जागा घ्यावी, झिरोनोवस्की पुतीनच्याही पलीकडचे देशीवादी होते, त्यांचा दरारा होता, ते पुतीनवरही टीका करत.

वॅग्नरनं केलेल्या अत्याचारांचा युरोपिय पार्लमेंटनं निषेध केला तेव्हां प्रिगोझीननं पार्लमेंट सदस्यांना एकेक व्हायोलीन केस पाठवली. प्रत्येक केसमधे एकेक हातोडा होता, हातोड्यावर लाल रंग लावलेला होता. वॅग्नर सेनेतून बाहेर पडणाऱ्यांची विल्हेवाट या हातोड्यातून दिसत होती. लाल रंग हा रंग होता की रक्त होतं ते कळलेलं नाही.

पार्लमेंट सदस्यांना उद्देशून त्यानं लिहिलं ‘मी युक्रेनचा अध्यक्ष कां होऊ नये?’

प्रिगोझीनना हवंय तरी काय? पुतीनच्या जवळ जात जात स्वतः सत्ताघीश होण्याचा तर त्यांचा डाव नाहीये? याच रीतीनं आपल्या वरिष्ठांचे काटे काढत पुतीन सर्वोच्च पदावर पोचले होते हे साऱ्या जगाला आणि प्रिगोझीनना माहितेय.

प्रिगोझीन, बंड याचं पुढं काय होणार?

पुतीन यांच्या सत्तेवर या बंडाचा कोणता परिणाम होईल?

पुढल्या भागात पाहूया.

।।

Comments are closed.