पृष्ठभागाच्या खाली काही तरी घडतय.

पृष्ठभागाच्या खाली काही तरी घडतय.

जनतेच्या मनात काय दडलंय?

भाग ३.

राजकीय प्रभाव, परिणाम?

धुप्पा,   हिप्परगा (माळ), रामतीर्थ, पार्डी, डोंगरकडा नायगाव, या गावातल्या लोकांशी बोललो. विविध ठिकाणी. त्यासाठी फार चहा प्यावा लागला. दुधाच्या चहाचा वीट आल्यावर बहुतेकांनी छोट्या ग्लासातून अर्धा ग्लास डिकॉक्शन पाजलं. म्हणजे बिनदुधाचा काळा चहा.

 लोकांना राहुल गांधीबद्दल कुतुहुल होतं. 

‘येवढा मोठा माणूस. टीव्हीवर दिसणारा. वडील, आजी, पणजोबा, पंतप्रधान. असा माणूस रस्त्यावर चालतो, लोकांच्याबरोबर, लोकांमधे मिसळतो. पाहुया तरी हा बाबा कोण आणि कसा आहे. छान वाटलं त्याला पहाताना भेटताना’ 

राहुलबद्दल लोकांना प्रेम आपुलकी निर्माण झाली होती. राहुल वक्तशीर होते. पहाटे उठून चालायला लागत. चालत आणि पळत. त्यांच्यासोबतच्या पोटं वाढलेल्या लोकांच्या तुलनेत ते मनात भरले.त्यांचे कपडे लोकांना आवडले. टी शर्ट, पँट  हा पोषाख तरुणांना आवडला. सभांमधली त्यांची भाषणं महागाई आणि आर्थिक संकट या विषयावर होती. तीही लोकांना आवडली.जनतेला खुष करण्याची खटपट त्यांच्या भाषणात नव्हती.

 महागाईबद्दल फार राग होता. सरकारनं महागाई वाढवलीय, जगणं सुधारायच्या ऐवजी आणखी बिघडवलय ही गोष्ट प्रत्येक व्यक्ती ठासून सांगत होती. 

यात्रेच्या संयोजनात स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या मीनल खतगावकर यांनी खूप मेहनत घेतली याचा उल्लेख लोकं करत होते. भास्करराव खतगावकर यांच्याबद्दल सर्व माणसं आदरानं आणि भक्तीभावानं बोलत होती. 

तुम्ही कोणाला मतं दिलीत आणि देणार असा प्रश्न मी कोणालाही विचारला नाही.  एकाद दोन अपवाद वगळता कोणीही राजकारणाचा विषय काढला नाही.

#

राजकारण.

भारत जोडोच्या नियोजनात भाग घेतलेले भास्करराव पाटील खतगावकर, काँग्रेस. तीन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार.

 खतगावकर यांची त्यांच्या नांदेडमधल्या घरात भेट झाली. दुमजली बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर एका ठिकाणी त्यांनी हिरवळ तयार केली आहे. तिथं खुर्ची टाकून ते काम करत बसले होते. सतत फोन येत होते. टेबलावरची वायरलेस रिमोट घंटी वाजवली की कोणी तरी सहाय्यक अदबीनं हजर होत असे. चार निरनिराळे सहाय्यक येऊन गेले.

खतगावकर ८१ वर्षाचे आहेत. आता आपण राजकारणातून निवृत्त झालोत असं सांगत होते. आता आपली सून मीनल खतगावकर कामं करते असं म्हणाले.

खातगावकरांशी बोलणं झालं.- ‘ तुम्ही केलेली कामं लोक पहातात आणि म्हणतात की पैशे खाण्यासाठी कामं केलीत,   आम्हाला पैसे द्या म्हणतात, असे पैसे मागण्यात काय गैर  आहे असा त्यांचा सवाल असतो. केलेल्या कामाबद्दल माणसं कृतज्ञ नसतात. ८० हजार मतं पक्की असतात, ती मिळणारच असतात, पण उरलेल्या २० ना पैसे द्यावे लागतात, मग ८० ना वाटतं आपल्याला पैसे कां मिळू नयेत, त्यांनाही पैसे द्यावे लागतात.सर्व एक लाखांना पैसे द्यावे लागतात ही आजची स्थिती. काम करणं वगैरेला काय अर्थ?  पैशावरच निवडणुकीचा निकाल लागणार.

एक मात्र झालं, पप्पू पप्पू म्हणत असत तो राहुल वेगळा आहे हे लोकांना कळलं. भाषणात आर्थिक प्रश्न मांडतो. इंग्रजीत चांगलं बोलतो. हिंदीत बोलतांना विषय सोडून भरकटतो,त्याला शब्द सापडत नाहीत. इतकं उन्हातान्हात चालणं ही सोपं गोष्ट नाहीये. नांदेडचं भाषण मात्र पडलं.

राहुलची प्रतिमा सुधारलीय, चांगली प्रतिमा लोकांमधे तयार झालीय. लोकांशी एक चांगला कनेक्ट तयार झालाय.

आता या उपकारक स्थितीचा उपयोग आमचा काँग्रेस पक्ष कसा करून घेतो ते पहायचं.’

  खतगावकर सध्या काँग्रेसमधे आहेत. खतगावकर हे शंकरराव चव्हाण यांचे जावई. म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (शंकरराव चव्हाणांचा मुलगा) यांचे मेव्हणे. खतगावकर यांच्या राजकारणावर शंकरराव चव्हाण यांचा प्रभाव आणि वजन होतं. २०१४ पर्यंत ते काँग्रेसमधे होते. २०१४ ते २०१९ ते भाजपमधे गेले. कारण त्यांचं आणि अशोक चव्हाण यांचं पटलं नाही. २०१९ मधे ते भाजप सोडून काँग्रेसमधे परतले. खतगावकर सांगतात की ते जरी भाजपमधे गेले तरी त्यांचे काँग्रेसमधल्या मित्रांशी आणि अशोक चव्हाण यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर चांगले संबंध होते. आता काँग्रेसमधे परतल्यावरही त्यांचे भाजपतल्या मित्रांशी, फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत.

 अशोक चव्हाणांचा मतदार संघ भोकर.भोकर हा शंकरराव चव्हाण यांनी जोपासलेला मतदार संघ. अशोक चव्हाण पंधरा वर्षं मंत्री आणि दोन वेळा मुख्यमंत्री होते. खतगावकरांचा मतदार संघ बिलोली. दोघंही आपापला मतदार संघ सांभाळून असतात. योजना आणणं, संस्था काढणं, आपल्याला उपकारक माणसं सरकारच्या विविध खात्यात ठेवणं या मार्गानं मतदार संघावर त्यांची पकड असते. 

सध्या खतगावकर आणि चव्हाण यांचं बरं आहे.

खतगावकर  काँग्रेसमधे गेले काय आणि भाजपमधे गेले काय, त्यांच्या संस्था आणि गोळा केलेली माणसं त्यांच्या ताब्यात असतात. पक्ष भले बदलो, बाकीच्या गोष्टी पक्क्या असतात. एका परीनं पक्ष वगैरेला काही अर्थ नसतो.

नांदेड लोकसभा मतदार संघातून अशोक चव्हाण दोन वेळा निवडून आले.   २०१९ साली प्रताप चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला आणि ते भाजपच्या तिकिटावर खासदार झाले.

चिखलीकर मुळातले काँग्रेसमधले. अशोक चव्हाण यांच्याशी ‘मतभेद’ झाल्यावर ते लोकभारती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षात गेले.तिथून  ते  भाजपत गेले. सध्या ते भाजपत आहेत.

  चिखलीकर भाजपमधे गेले तेव्हां खतगावकर आधीच काँग्रेस सोडून भाजपत दाखल झाले होते. खतगावकरांनी भाजप ताब्यात घेतला होता. त्यांच्या घरूनच पक्ष चालत असे, त्यांच्याच घरात काँग्रेस कार्यकर्ते भाजपत प्रवेश करत असत.चिखलीकर भाजपत आले आणि त्यांनी भाजप ताब्यात घ्यायला सुरवात केली, त्यांचा भाजपमधला प्रभाव वाढला. त्यामुळं खतगावकरांची पंचाईत झाली. एका म्यानात दोन तलवारी रहात नाहीत. त्यामुळं खतगावकरांनी भाजप सोडली आणि ते काँग्रेसमधे दाखल झाले.

अशोक चव्हाण, भास्कर खतगावकर आणि प्रताप चिखलीकर. तिघं खोखोचा खेळ खेळत असतात.

भारत जोडो यात्रा चालू असताना नांदेडमधे अफवा होती की अशोक चव्हाण भाजपशी बोलणी करत आहेत. समजा अशोक चव्हाण भाजपत गेले तर खतगावकर खुष, कारण त्यांचा काँग्रेसमधला प्रतिस्पर्धी जाणार. पण त्यामुळं  चिखलीकरांची गोची होणार. कारण चव्हाण भाजप ताब्यात घेणार. मग चिखलीकर भाजप सोडून काँग्रेसमधे जाणार. पण तिथं समजा खतगावकरांनी त्यांना वाव दिला नाही तर ते शिव सेनेत जाणार.

किती सहजपणे माणसं या पक्षातून त्या पक्षात जातात. किती मोकळी, लवचीक लोकशाही आहे पहा.

#

बालाची बच्चेवार, भाजप.

बालाजी बच्चेवार हे नायगावमधले एक भाजपचे कार्यकर्ते. १९९२ पासून ते भाजपत आहेत. राममंदीर आंदोलनानं प्रभावित होऊन ते भाजपचे सक्रीय कार्यकर्ते झाले. अमीत शहा शैलीच्या हिंदुत्वाचे ते कट्टर समर्थक आहेत. कट्टर म्हणजे इतके कट्टर की त्यांना सशस्त्र पोलिसांच्या पहाऱ्यात रहावं लागत असे. राजकीय आलेख तर उंचावायला हवा. २००९ साली त्यांनी पक्षातर्फे तिकीट मागितलं. आपला फौजफाटा घेऊन ते भाजपच्या मुख्यालयात दाखल झाले. त्या वेळी पक्षावर आणि निवड समितीवर गोपिनाथ मुंडे यांचं वर्चस्व होतं. मुंडेंचं म्हणणं पडलं की बच्चेवार नितीन गडकरी गटाचे आहेत. बच्चेवार यांचं म्हणणं असं की ते कोणत्याही गटाचे नव्हते, एक तीव्र सक्रीय कार्यकर्ते होते. पण मुंडेनी बच्चेवार यांना तिकीट नाकारलं.

मुंडे (भाजप)आणि शंकरराव चव्हाण (काँग्रेस) यांचं सख्य असल्यामुळं मुंडे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासमोर दुबळा उमेदवार देत असत.

तिकीट मिळत नाही म्हटल्यावर चिडलेल्या बच्चेवार यांनी जनसुराज्य या पक्षाच्या तिकीटावर विधानसभेची निवडणुक लढवली. नायगावमधले कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते. भाजपनं ठक्करवाड या दुबळ्या उमेदवाराला तिकीट दिलं. ठक्करवाड आणि बच्चेवार, दोघंही पडले. काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष म्हणून उभे असलेले वसंत चव्हाण निवडून आले. त्यांना निवडून आणणं असा डाव होता.

२००९ ची निवडणुक हरल्यावर बच्चेवार पुन्हा भाजपत परतले.

मागील तीन वर्षांपासून  भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत गोजेगावकर. ते काँग्रेसमधून भाजपत आले आहेत, मधल्या काळात तेही काँग्रेसमधे परतण्याच्या खटपटीत होते पण शिंदे फडणवीस सरकार आल्यामुळं त्यांची खटपट थंडावली आहे.

बच्चेवार हैराण आहेत. भाजपमधे प्रचंड गटबाजी आहे, निष्ठेला किमत नाही असं बच्चेवार यांचं म्हणणं आहे.

बालाजी कदम, काँग्रेस.

बालाजी कदम १३ वर्षं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.  त्या आधी ९ वर्षं तालुकाध्यक्ष होते. पक्षाच्या कार्यालयातच त्यांचा मुक्काम असे, पक्ष कार्यकर्ते आणि आम जनता यांच्याशी त्यांचा घट्ट संबंध होता आणि आहे. फटकळ आहेत. राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्ष या नात्यानं कदम यांची भेट घेतली आणि कदम यांचा प्रभाव राहुल गांधींवर पडला. राहुलनी दोन वेळा कदम यांना स्वतंत्रपणे दिल्लीला बोलावून घेतलं.

कदम यांची अपेक्षा होती की त्यांना विधानसभेचं तिकीट मिळेल. अशोक चव्हाण यांनी कदम यांना तिकीट दिलं नाही. राहुल गांधी यांची मर्जी कदम यांच्यावर आहे हे कळल्यावर  अशोक चव्हाण आणि इतर पुढाऱ्यांनी कदम यांना पक्षात पूर्ण खच्ची केलं. भारत जोडो यात्रेत त्यांना सामिल होऊ दिलं नाही, राहुल गांधी याची भेट त्यांना मिळणार नाही अशी व्यवस्था अशोक चव्हाण गटानं  केली.

काँग्रेस पक्षाची वाट लागलीय असं कदम यांचं म्हणणं आहे. भाजपत जायचा  विचार त्यांच्या मनात येतो,  पण आता उशीर झालाय (भाजपत आता काँग्रेसजनांची खूपच गर्दी झालीय) असं कदम यांचं मत आहे.

।। 

७ ते ११ नव्हेंबर या काळात भारत जोडो यात्रा झाली.

८ ते १५ नव्हेंबर या काळात भारत यात्रेच्या मार्गावर असलेल्या डोंगरकडा गावात जटाशंकर मंदिराच्या परिसरात श्रीराम कथा/ज्ञानेश्वरी पारायण महोत्सव झाला. समाधान महाराज शर्मा या महोत्सवात भाषण करत. नाटकाच्या रुपात, प्रॉपर वेषभुषा वगैरे करून रामायण सादर केलं जात होतं. महिलांचा सहभाग प्रचंड. दररोज महाप्रसाद असे. पंचवीस तीस हजार माणसं या समारोहात होती, दररोज त्यांचं जेवण, महाप्रसाद गावात होत असे.

।।

सरकारं येतात, जातात. गावं अधिकाधीक बकाल होत जातात. गावातली घरं पडीक होतात, माणसं गाव सोडून जातात. गावात राहून भलं होण्याची शक्यता नसते. इलाज नाही म्हणून लोक गावात रहातात.

।।

दोन वर्षांनी निवडणुका येतील. माणसं कोणाला मतं देतील कुणास ठाऊक. शेवटी मतं कोणाला देतात याला तरी अर्थ कुठं असतो? कारण सर्व पुढारी आणि पक्ष सारखेच. परिस्थितीत बदल होत नाही. योजना जाहीर होतात. अमलात येत नाहीत.  काही योजना सुरवातीला चालतात, नंतर बंद पडतात. योजना चांगली असूनही उपयोग नसतो. भ्रष्टाचार, दिरंगाई आणि लाल फीत यात योजना अडकून पडतात, नागरीक कोरडेच रहातात.

एक मात्र खरं की निवडणुक आली की गाव आनंदात असतो. कारण पैसे वाटले जातात. 

तेवढंच काय ते खात्रीचं आणि रोख उत्पन्न.

दर निवडणुकीला पैशाचं प्रमाण वाढत जातं. तोच काय तो विकास.

।।

राहुलचं वागणं काहीसं वेगळं दिसतंय. राहुलनी नांदेड जिल्ह्यातून निवडक कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन पक्षाची स्थिती जाणून घेतली, शेतकऱ्यांची अवस्था जाणून घेतली. पक्षातल्या खोंडांना हाकलण्याची खटपट चाललीय असं दिसतं. नव्यांना ते जवळ करत आहेत. पक्षाची ही नवी बांधणी करताना त्यांच्या डोक्यात काय आहे ते कळत नाहीये. काँग्रेस ही एकेकाळी सर्वसमावेशक चळवळ असल्यानं अनेक गोष्टींत पक्षात भोंगळपणा होता. उदा. सावरकर. आता तो भोंगळपणा काढून काँग्रेस पक्षाला एक निश्चित रूप आणि कार्यक्रम देण्याची खटपट राहुल करत असावेत हे त्यांच्या नांदेड, नंतर हिंगोली आणि नंतर शेगावमधल्या भाषण आणि वर्तनातून दिसतंय. राहूलना २०२४, २०२९ ची घाई नाहीये असं वाटतंय. 

राहुलच्या मनात काय आहे ते कळत नाहीये.

जनतेच्या मनातही काय आहे ते कळत नाहीये.

 ।।

Comments are closed.