पेगॅसस. अर्थ, अनर्थ.

पेगॅसस. अर्थ, अनर्थ.

पेगॅससनं जगभर गोंधळ माजवलाय. 

हेरगिरी करणारं हे सॉफ्टवेअर आपण विकत घेतलंय की नाही, त्याचा वापर आपण करतोय की नाही ते सांगायला भारत सरकार तयार नाहीये. अमेरिकन संसद या सॉफ्टवेअरवर बंदी घालायचा विचार करतेय.

एनएसओ या कंपनीचं हे सॉफ्टवेअर सध्या जगातले काही देश आणि देशप्रमुख आपले विरोधक आणि लोकशाही खतम करण्यासाठी वापरत आहेत.

काय आहे हे पेगॅसस?

पेगॅसस हे एक स्पायवेअर आहे, एक हेरगिरी करणारं सॉफ्टवेअर आहे. सरकारं ते विकत घेतात. सरकार त्या सॉफ्टवेअरचा वापर करून एक मेसेज नागरिकाच्या फोनवर, व्हॉट्सअपवर, पाठवतं. तो मेसेज सेलफोनवर आला की काम झालं. तुम्ही तो मेसेज उघडा किंवा उघडू नका, ते सॉफ्टवेअर काम करू लागतं. तुम्ही  फोनवर जे जे लिहिता, बोलता, चित्रीत करता, जे मेसेज पाठवता, किंवा लोकांकडून तुम्हाला जे काही येतं ते सारं हे सॉफ्टवेअर सरकारला पाठवतं. 

स्मगलर आणि दहशतवाद्यांच्या कारवाया हुडकणं हा त्या सॉफ्टवेअरचा उद्देश आहे.

Niv Carmi, Shalev Hulio आणि Omri Lavie या तीन तरुणांनी त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांचा वापर करून NSO ही कंपनी २०१० मघे स्थापन केली आणि पेगॅसस तयार करून विकायला सुरवात केली. एका वेळी सुमारे १०० माणसं हाताळण्याची क्षमता असलेलं सॉफ्टवेअर एनएसओ गिऱ्हाईकांना म्हणजे सरकारांना विकते. सध्या एनएसओची मालकी एका ब्रिटीश कंपनीकडं आहे.

आताची ताजी स्थिती अशी की पेगॅसस लॅपटॉपमधे, कंप्यूटरमधे टाकता येतं. येवढंच नव्हे तर फोनचा वापर करणाऱ्या व्यक्तीच्या जवळपास कुठंही ते  चिकटवता येतं. तुम्ही सावधगिरी म्हणून फोन वापरला नाहीत तरीही तुमची माहिती हे स्पायवेअर सरकारकडं पाठवू शकतं.

फोन टॅप करून समाजहिताच्या विरोधी काम करणारी माणसं आणि संस्था यांच्यावर अमेरिकन सरकार व जगातली सर्व सरकारं  पाळत ठेवत असतात. त्यात काही चूक नाही. 

अमेरिकेत फोन टॅप करायचा असेल तर न्यायालय आणि संसदेच्या संबंधित कमीटीची परवानगी घ्यावी लागते. फोन टॅप करण्याची कारणं कमीटी आणि न्यायालयाला सांगावी लागतात. राष्ट्रपती किंवा कोणीही सरकारी माणूस मनास येईल तसा टॅपिंगचा वापर करू शकत नाही. तसं केलं तर त्याला शिक्षा होते.

 पेगॅसस हे फोन टॅपिंग या जुन्या तंत्राचं अत्याधुनिक रूप आहे येवढंच.

घोळ कुठं आहे?

घोळ आहे तो पेगॅससच्या वापराचा.पेगॅसस गाजतंय कारण त्याचा वापर करणारी सरकारं लोकांना, संसदेला, न्यायालयाला अंधारात ठेवून त्याचा राजकीय वापर करत आहेत.

व्हॉट्सअप कंपनीनं आरोप केला की १४०० व्हॉट्सअप वापरणाऱ्या लोकांची माहिती पेगॅससनं चोरली. या १४०० लोकांमधे भारतातले काही पत्रकार आहेत असं व्हॉट्सअपनं जाहीर केलं.

पत्रकार आणि खासदारांनी सरकारला विचारलं की सरकारनं पेगॅसस विकत घेतलं आहे की नाही, त्याचा वापर केला आहे की नाही, कोणाची माहिती घेतलीय आणि त्याची कारणं काय. सरकार या बाबत बोलायला तयार नाही.

सरकार एकीकडं स्वतःचे व्यवहार गुप्त ठेवतंय आणि त्याना नकोसे असलेल्या लोकांची माहिती काढून त्या माहितीचा गैरवापर करतंय. 

राफेल विमानं खरेदी करण्याचा व्यवहार, विमानाची किंमत याची माहिती कोणाकडंही नाही. पेपर ती माहिती मिळावी म्हणून कोर्टात गेले तर कोर्टानं ती माहिती देशहिताची असल्याचं जाहीर करून लपवून ठेवायला मदत केली.

पीपीई किट्स, प्राणवायूचे सिलिंडर, लस निर्मिती आणि वितरण,लशीचं अर्थकारण या बाबतची माहिती ना लस मिळालेल्यांना मिळाली ना लस न मिळालेल्यांना.

एक तर सरकार माहिती लपवतं आणि दुसरं म्हणजे सरकार पेगॅससकडून मिळालेल्या माहितीचा गैरवापर करतं.

२०१९ सालाच्या एप्रिलमधे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यावर स्त्री सहकाऱ्याशी दुर्वर्तन केल्याचा आरोप झाला. ज्या स्त्रीशी दुर्वर्तन झालं ती स्त्री, तिच्याशी संबंधित ११ स्त्रिया यांची माहिती पेगॅससचा वापर करून सरकारनं मिळवली.

२०१९ सालाच्या नोव्हेंबर महिन्यात गोगोई यांनी न्यायाची तत्व धुडकावून लावून बाबरीच्या जागी राम मंदीर बांधायला परवानगी देऊन सरकार आणि सत्ताधारी पक्षाची सोय केली.

२०२० सालाच्या मार्च महिन्यात गोगोई यांची नेमणूक सरकारनं राज्यसभेवर केली.

पेगॅससकी जय हो.

मेक्सिकोनं पेगॅसस विकत घेतलं. मेक्सिकन सरकारनं पेगॅससमधून माहिती गोळा करून पत्रकार आणि सत्तेला विरोध करणाऱ्या  व्यक्ती आणि संस्था खतम केल्या. 

सौदी प्रिन्सनं ते सौदी अरेबियासाठी विकत घेतलं. त्यानं पेगॅससचा वापर करून अदनान खाशोग्गीवर लक्ष ठेवलं. खाशोग्गी सौदी प्रिन्सच्या गैरकारभावर पेपरात लिहीत असे. प्रिन्सनं खाशोग्गीला समजावलं, घोळात घेतलं. गडी ऐकायला तयार झाला नाही. प्रिन्सनं त्याच्यावर   पाळत ठेवून त्याचा खून केला. 

ब्रिटीश सरकारवरही सत्ताधारी पक्षाला अडचणीचे ठरणाऱ्या लोकांची माहिती गोळा केल्याचा आरोप होतोय.

पेगॅसस हातात असल्यावर गादीवर बसलेलं कुठलंही सरकार विरोधक, न्यायालय, माध्यमं, पार्लमेंट इत्यादींच्या मुसक्या वळून त्यांना गलितगात्र करू शकतं. सत्तेला आव्हान देणारी सगळी मंडळी कुंईकुंई असा हलका आवाज काढून सत्तेपुढं गोंडा घालू लागतात हे आपण सौदीत, अमिरातीत, भारतात, पहातोय. 

रशियन सरकारनं एनएसोसारख्या खाजगी कंपन्या वापरून; खोटी माहिती, तोडमरोड केलेली माहिती, रंगवलेली माहिती, कल्पित माहिती पसरवून; फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेतल्या निवडणुका बिघडवण्याचा प्रयत्न केला.

निवडणुका आता निरर्थक होऊ पहात आहेत. दांडग्या कंपन्या आणि सत्ताधारी पक्ष माहितीचा गैरवापर करून मतदारांची मतं कलुषीत करताहेत.नागरीक स्वतःचं डोकं कमीतकमी वापरतात. सोशल मिडिया आणि माध्यमांतून भरवल्या जाणाऱ्या माहितीवरून   लोकं आपली मतं बनवत आहेत.

मतदारांचा विचार हा त्यांचा विचार नसतोच, तो इतर कोणाचा तरी असतो. आज अशी स्थिती होतेय की पेगॅसस घ्या, तहहयात सत्तेत रहा.

सुरीचा वापर भाजी चिरण्यासाठी करायचा की कोणाच्या पोटात खुपसण्यासाठी करायचा येवढाच प्रश्न आहे.

पेगॅसस जरूर वापरावं पण त्यावर संसद, न्यायालयं, माध्यमं यांचं नियंत्रण असावं येवढंच.

Comments are closed.