फरा आणि काश्मिर फाईल्स

फरा आणि काश्मिर फाईल्स

फरा (Farah) याच शीर्षकाचा चित्रपट , फरा या १४ वर्षाच्या पॅलेस्टिनी मुलीची गोष्ट सांगतो.

गोष्ट सरळ रेषेत जाणारी आहे. १९४८ साल आहे. स्थळ आहे पॅलेस्टाईन. बाहेरून आलेल्या ज्यूंनी पॅलेस्टाईन  भूमीचा ताबा घेतलाय. एकेका गावात घुसून ते स्थानिक पॅलेस्टिनी लोकांना ठार करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात.   त्यांना मारून टाकतात. त्यांना गाव सोडून निघून जायला सांगतात. गावाचा कब्जा घेतात. तिथं इस्रायल नावाचा देश तयार करतात.

सात लाख पॅलेस्टिनी या घटनाक्रमात मारले गेले/  विस्थापित झाले.

इस्रायलनं पॅलेस्टाईन व्यापणं आणि त्यात झालेली हिंसा या  घटनेचं वर्णन अरबी भाषेत नकबा असं करतात. मराठीत म्हणतात आपत्ती. हिंदीत शब्द आहे तबाही.  

फरा एका पॅलेस्टिनी गावात रहातेय. तिच्या मैत्रिणीचं लग्न होणार आहे.  त्याचा आनंद  फरा व तिच्या आसपासची माणसं साजरा करत आहेत.  फराच्या वडिलांना वाटतंय की फराचं लग्न करून टाकावं. फरा तयार नाहीये. तिला शहरात जाऊन शिकायचंय. डॉक्टर वगैरे  व्हायचंय. वडील तयार नाहीत. तिचा एक काका तिच्या वडिलांना पटवून देतो, वडील तयार होतात.आता फरा खुषीत आहे, शहरात जाणार आहे.

फरा तिच्या मैत्रिणीबरोबर झोपाळ्यावर गप्पा मारत असते. गावात स्फोट होतो. गाव हादरतं. इस्रायली सैनिक गावात घुसतात. गावकरी जमतील त्या गोष्टी खाकोटीला मारून पळत सुटतात. फराला तिच्या मैत्रिणीचे वडील कारमधे घालतात आणि चल म्हणतात. फरा नकार देते, वडिलांबरोबर गावात रहायचं ठरवते. वडील तिला जायला सांगतीत. फरा तयार होत नाही.  वडील, गावाचे प्रमुख, जुनाट बंदुक खांद्यावर लटकावून लढायला बाहेर निघतात आणि फराला धान्याच्या कोठीत सुरक्षीत ठेवतात. कोठीला बाहेरून कुलूप लावता आणि सारं ठीक झाल्यानंतर येईन असं सांगून निघून जातात. 

बाहेरून कुलूप. फरा अडकली. कित्येक दिवस. 

इस्रायली सैनिक तिच्या घरात येतात. शेजारचं लपलेलं एक कुटुंब गोळा करतात. आई वडील, मुलं, एक नवजात बाळ. या बाळाचं बाळंतपण झालेलं फरानं कोठीच्या दरवाजाच्या फटीतून पाहिलंय. इस्रायली सैनिक अख्खं कुटुंब गोळ्या घालून ठार करतात.

छोटं बाळ उरतं. इस्रायली अधिकारी सैनिकाला आज्ञा देतो, मारून टाक. त्याला गोळी कशी घालायची? सैनिक त्या बाळाच्या अंगावर दुपटं पसरतो आणि लाथ घालून ते बाळ मारायचा प्रयत्न करतो. त्याला जमत नाही.  

फरा हे सारं दाराच्या फटीतून पहाते. 

फरा कोठीत अडकून पडलीय. काय खाते? देहधर्म कसे पार पाडत असेल? अंधुक प्रकाशात दिसणाऱ्या रेषांच्या हालचालींवरून आपण अंदाज बांधायचा.

वडिलांनी दिलेल्या पिस्तुलाचा वापर करून फरा दरवाजा फोडते, बाहेर पडते.

गाव उजाड झालेलं असतं. माणसं मेली की काय झालं ते तिला कळायला मार्ग नाही. फरा चालू लागते. चालते.. चालते…..कित्येक दिवसांनी ती सिरियात पोचते.

  जे पाहिलं अनुभवलं ते फरानं सीरियात गेल्यावर लिहिलं.

त्यावरच हा चित्रपट तयार झालाय.

डेरिन सलाम हिनं हा चित्रपट दिक्दर्शित केलाय. डेरीननं चित्रपटाचं शिक्षण घेतलंय. तिचा हा पहिलाच चित्रपट आहे.

चित्रपट सरळ रेषेत सरकतो. फ्लॅश बॅक वगैरे काहीही नाही. गावातले अत्याचार, फरा ते पहाते, फरा गाव सोडून जाते. पॅलेस्टाईनचा संघर्ष, त्यातलं राजकारण इत्यादी गोष्टींचे उल्लेख चित्रपटात नाहीत, चित्रपटात त्यातलं काहीही दिसत नाही. दिसतात ते फक्त अत्याचार करणारे इस्रायली सैनिक.कारण ते प्रकाशात असतात.

 पॅलेस्टाईनवर झालेला अन्याय आणि अत्याचार जगाला माहित झालाय. त्यावर खूप लिहिलं गेलंय. पॅलेस्टिनींचा नकबासुद्धा इतिहासात खूप उल्लेखला गेलाय.पण ते सारं पुस्तकात आहे. सलामनं ते दीडेक तासाच्या चित्रपटात दाखवलंय.

हिंदीत ट्रॅप्ड नावाचा चित्रपट मध्यंतरी येऊन गेला. शौर्य नावाचा एक तरूण आहे. नूरी या मुलीवर त्याचं प्रेम आहे,  वडिलांनी नूरीचं लग्न  दुसरीकडं करायचं ठरवलंय. दोघांनी पळून जायचं ठरवलंय. पण रहाणार कुठं? एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या तेरा चौदाव्या मजल्यावरच्या एका निव्वळ भिंती असलेल्या फ्लॅटमधे शौर्य जातो. आत जातो. दरवाजा बंद होतो, लॉक होतो. शौर्य अडकतो.

  तो तिथं आहे हे कोणालाही माहित नसतं.नूरीलाही सरप्राईज द्यायचं त्याच्या डोक्यात असल्यानं हे घर घेतोय हे त्यानं नुरीला सांगितलेलं नसतं. त्याचा फोन मेलेला असतो. आरडा ओरडा केला तरी इतर इमारती इतक्या दूर असतात की कोणाला ऐकू जात नाही. वीज नाही, पाणी नाही. खायला अन्नाचा कण नाही. झुरळं खाऊन जगायची पाळी येते. काही दिवसांनी तो बाहेर येतो. आपल्या ऑफिसमधे परततो. तोवर तो नाहिसा झालाय असं समजून त्याचे सहकारी नित्याच्या कामाला लागलेले असतात आणि त्याची प्रेयसीही नाईलाजानं त्याला विसरून दुसरं लग्न वगैरे वाटेला लागते.

माणसाला, कुटुंबाला, समाजाला एकटं पाडलं जातं. अंधार कोठीत. कोठीतलं आणि बाहेरचं असं दोन्ही जगं बदलतात. कायच्या काय बदलतात. आठवणी आणि सोसणं उरतं. 

दोन्ही जीवघेणं.

कुठंही ध्वनीची पातळी न उंचावता, भावनाना हात न घालता दिक्दर्शिका आपल्याला एक भीषण वास्तव दाखवते, काहीही कमेंट करत नाही. एका गावातला नकबा सलाम दाखवते आणि अख्ख्या पॅलेस्टाईनवर काय गुदरलं असेल याची कल्पना करणं ती प्रेक्षकांवर सोडते.

फटीतून फरा बाहेर पहाते. अगदी क्षीण अशा आवाजात गोळ्यांचा आवाज येतो. तितक्याच हलक्या आवाजात इस्रायली अधिकाऱ्यांचं वर्तन ऐकायला येतं. अगदी अशक्त आवाजात नवजात बाळाचं रडणं ऐकू येतं.

दीड तासाचा चित्रपट कोठीतल्या दृश्यानं व्यापला आहे. ती दृश्यं लांबीलयत असं वाटतं. अनुभव देण्यासाठी दृश्याची लांबी वाढवावी लागणं हे समजण्यासारखं आहे. पण किती लांबी? प्रेक्षकाला एकादी गोष्ट समजली, ती त्याच्या मनावर ठसली की पुरेसं असतं ना?

पटकथेमधेच प्रसंग कमी आहेत. फराचं जगणं, फराचं गाव, तिचे नातेवाईक, तिच्या आयुष्यातल्या इतर घटना, इस्रायली सैनिकांचं वागणं इत्यादी अधीकचे प्रसंग पटकथेत येते तर कंटाळवाणी लांबी कमी झाली असती, प्रेक्षकाला फराचं जगणं अधिक समजलं असतं. 

चित्रपटात फराचं घर, एक पॅलेस्टिनी घर पहायला मिळतं. घराचे खूप चांगलं डिटेलिंग आहे. भिंती, कोनाडे, वेगळ्या पातळ्या, पायऱ्या, बसण्याची जागा. आर्किटेक्चरच वेगळं आहे. गावाची रचनाही पहायला मिळती, रस्त्यांची रचना पहायला मिळती तर मजा आली असती.

वस्त्र हा सुरवातीला एक नुसता कापडाचा तुकडा असतो.  त्यावर  वेगळे धागे, वेगळे रंग यांची कशीदाकारी केली की ते वस्त्रं अधिकाधीक देखणं होत जातं. त्या देखणेपणात आणि रंगांत ते वस्त्र वापरणाऱ्या माणसांची संस्कृती दिसते. पटकथाही एक वस्त्रंच असतं.

सलाम या दिक्दर्शिकेचा पहिलाच चित्रपट असल्यानं कंटाळवाणा भाग का शिल्लक राहिला त्याचा अंदाज येतो. पण हेही खरं आहे की कसलेले आणि अनुभवी दिक्दर्शकही कंटाळवाण्या लांबलचक दृश्यांनी चित्रपट भरून टाकत असतात. दिक्दर्शकाच्या कलेबद्दलच्या काही कल्पना असतात, काही आग्रह असतात, काही दुराग्रह असतात, त्यातून कंटाळा चित्रपटात पसरतो. दिक्दर्शक आपणच निर्माण केलेल्या कलाकृतीत गुंततो, संकलन हा निर्मितीतला घटक विसरतो.पण शेवटी दिक्दर्शकाचं स्वातंत्र्य मान्य करायचं झालं. 

असो.

चित्रपट  विविध महोत्सवांत दाखवला गेला. गाजला.  इस्रायलच्या जन्माची, पॅलेस्टाईनच्या प्रश्नाची माहिती नाही अशा तरूण पिढीला या चित्रपटानं भारावून टाकलं. १९९० च्या आसपास जन्मलेल्या लोकांना पॅलेस्टाईन प्रश्नाची धग माहित नाही. त्यांनी अगदी अलीकडचं सीरियातलं सीविल वॉर पाहिलंय, तिथली हिंसा त्यांनी टीव्हीवर पाहिलीय. पण टीव्हीवरची दृश्यं पहाणं वेगळं आणि अशा हिंसेत माणसांना काय काय सोसावं लागतं ते कळणं वेगळं. त्या सोसण्याची कल्पना फरा या चित्रपटात आली. 

काश्मीर फाईल्सची आठवण होते. जिथं आपले वाडवडील जन्मले, जिथं आपण वाढलो, जिथं आपली मुळं खोलवर रुतलेली आहेत असं घर सोडून जावं लागण्याचा अनुभव काश्मिरी पंडितांनी घेतला. पॅलेस्टिनी लोकांसारखाच तो अनुभव. पण काश्मीर फाईल्सनं त्या अनुभवांचा बटबटीत राजकीय प्रचारासाठी वापर केला, एका राजकीय पक्षासाठी फिल्म तयार केली. फरामधे ते झालं नाही. फरा ही फिल्म फिल्म राहिली. 

फरा हा चित्रपट पॅलेस्टाईनमधे दाखवला गेला. इस्रायल सरकारनं तो दाखवण्यावर बंदी घातली. ज्या थेटरात दाखवला त्या थेटरांची परवानगी काढून घेतली. जगभर तो चित्रपट लोकांनी पाहिला.

फरा २०२३च्या ऑस्करच्या स्पर्धेत आहे.

फरा नेटफ्लिक्सवर आहे.

।।

Comments are closed.