एकहाती देश उभारणारा नेता.

एकहाती देश उभारणारा नेता.

होऊन गेलेल्या मोठ्या नेत्यांची चरित्र वाचणं उदबोधक असतं. नेता काळाच्या पडद्याआड गेल्याला बराच काळ लोटल्यानंतर त्या नेत्यांकडं अंतर ठेवून, तटस्थपणे पहाता येतं. त्यामुळं त्या नेत्याचं योग्य मोजमाप शक्य होतं. नेत्यांनी केलेली कामं काळाच्या ओघात टिकली असतील तर त्या नेत्याबद्दलचा आदर वाढतो.चरित्र वाचतांना एक गोष्ट तर नक्कीच होते. वर्तमान काळ समजायला  चरित्रं मदत करतात.

हेन्री किसिंजर यांनी लिहिलेल्या लीडरशिप या पुस्तकात जगातल्या सहा राष्ट्रप्रमुखांचं कर्तृत्व चरित्र रेखाटलं आहे. आपल्या सर्वाना माहित आहे की हेन्री किसिंजर अमेरिकेचे परदेश मंत्री होते, अमेरिकन अध्यक्षांचे सल्लागार होते. अमेरिकेचं वियेतनाम आणि चीन विषयक धोरण ठरवण्यात किसिंजर यांचा मोठा वाटा होता. ते नोबेल पारितोषिक विजेते आहेत. जगभरच्या नेत्यांच्या व्यक्तीगत गाठीभेटी घडल्यामुळं, नेत्यांना अगदी जवळून पहाता आल्यानं किसिंजर जेव्हां नेत्यांबद्दल लिहितात तेव्हां त्या लिखाणात एक सच्चेपणा दिसतो.लीडरशिप हे ताजं पुस्तक प्रसिद्ध झालं तेव्हां त्यांचं वय ९९ आहे आणि अजूनही त्यांचं लिखाण थांबलेलं नाही.

हेन्री किसिंजर यांनी लिहिलेल्या लीडरशिप या पुस्तकात सिंगापूरचे पंतप्रधान ली क्वान यू यांच्यावर एक धडा आहे. ली द्रष्टे होते असं किसिंजर म्हणतात.

ली क्वान यू १९५९ ते १९९० सिंगापूरचे पंतप्रधान होते. १९९० ते २०१५ (म्यृत्यू) ते सिंगापूरचे लोकसभा सदस्य होते. सिंगापूरची स्थापना करणाऱ्या पीपल्स ॲक्शन पार्टीचे १९५४ ते १९९२ ली सेक्रेटरी जनरल (सर्वेसर्वा) होते. 

ली क्वान यू यांनी सिंगापूर जन्माला घातलं, टिकवलं आणि विकसित केलं. सिंगापूर आधी ब्रिटीश साम्राज्याचा भाग होतं. नंतर ते स्वतंत्र झाल्यावर मलेशियाचा भाग बनलं. नंतर मलेशियापासून वेगळं होऊन सिंगापूर एक स्वतंत्र देश झाला, आजतागायत.

ली क्वान यू यांचे आजोबा चीनमधून स्थलांतरीत होऊन सिंगापूरमधे वसले. ली यांचं शिक्षण केंब्रिजमधे झालं, ते बॅरिस्टर होते.

ली यांनी सिंगापूर घडवला. सिंगापूरमधे ७४ टक्के चिनी, १४ टक्के मले आणि उरलेले लोक तामिळ होते. तीनही वंशाच्या लोकाना सांभाळणं ही तारेवरची कसरत ली यांनी केली. प्रत्येक नागरिकाला लष्करात काही काळ काम करायला लावून त्यानी सिंगापूरचे नागरीकत्व वांशिक ओळखीला दूर सारून घडवलं. भाषा ही एक मोठ्ठी अडचण होती. ली यानी इंग्रजी भाषा देशाची प्रमुख भाषा केली आणि चिनी-तामिळ-मले यांच्यापैकी नागरिकाला हवी असेल ती भाषा शिकण्याची सोय केली.

लोकशाहीमधे मिळणारं स्वातंत्र्य सिंगापूरच्या विकासासाठी मारक आहे असं ली यांचं मत होतं. त्यांनी नागरिकांच्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर बंधनं घातली. कायदे असे केले की मुक्तपणे व्यक्त होणं जवळ जवळ अशक्य होतं. ली यांचा पक्ष, त्यांचंच सरकार, त्यांचंच लोकसभेत बहुमत, पेपर आणि चॅनेल त्यांच्याच पक्षाच्या मालकीचे अशी चिरेबंद व्यवस्था ली यानी केली. देशाची एकता आणि आर्थिक विकास याच्या आड व्यक्तीस्वातंत्र्य येणार नाही अशी ही व्यवस्था होती. 

आपण हे कां करतोय ते ते उघडपणे सांगत असत. अमेरिकेशी दोस्ती ठेवताना ते अमेरिकेला सांगत की त्यांचा लोकशाहीवरचा भर अविकसित देशांच्या बाबतीत उपयोगी नाही. आशियातल्या अविकसित देशाना आर्थिक विकास आधी हवा असतो आणि तो साधायचा असेल तर मतमतांतरांचा कल्लोळ मारक ठरतो. म्हणूनच लोकशाही नियंत्रीत करणाऱ्या देशांबद्दल आकस बाळगू नका असं ते अमेरिकेला सांगत.

सिंगापूरच्या स्थापनेपासून ली यांचं लक्ष सिंगापूरच्या आर्थिक विकासावर होतं. सिंगापूर लहान देश. उद्योग आणि जहाज व्यवसाय हीच उत्पन्नाची मुख्य साधनं होती. त्यात गुंतवण्यासाठी लागणारा पैसा बाहेरून यायला हवा होता.   त्या काळात आशियात समाजवादी अर्थव्यवस्थेचा बोलबाला होता. ली यांनी मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली. अर्थशास्त्रीनी सांगितलं की देशातलं वेतनमान फार उंच आहे, ते कमी व्हायला हवं. ली यांनी वेतन कमी केलं गोठवलं. परदेशातून उद्योग आले. उत्पादन वाढलं.निर्यात सुरु झाली. आर्थिक विकासानं गती घेतली.

वेतन कमी झालं तर कर्मचारी-नागरिकांचं काय? ली यांनी शहराचा विकास केला, शहर स्वच्छ केलं, सार्वजनिक घरबांधणी कार्यक्रम घेऊन प्रत्येकाला परवडेल अशी घरं उपलब्ध केली. शिक्षण आणि आरोग्यावर खर्च केला. त्यामुळं जनता सुखी झाली.

ली यांनी जी अर्थव्यवस्था उभी केली त्याचं वर्णन अर्थशास्त्री लिबरल भांडवलशाही असं करतात.

सामान्य माणसाचं जगणं सुखकारक असल्यानं सिंगापूरमधे भारतासारखी किंवा अमेरिकेसारखी लोकशाही नाही या बद्दल जनता फार कटकट करत नाही. अधिक स्वातंत्र्य मिळालं तर बरं असं म्हणतात पण त्या पलिकडं दंगेबिंगे करत नाहीत.

सिंगापूर हा एक छोटा देश. आसपासचे आणि जगातल्या मोठ्या देशांशी पंगा घेतला तर मिनीटभरही सिंगापूर टिकू शकणार नाही हे ली यांना समजलं होतं. त्यातूनच त्यांची एक जागतीक दृष्टी तयार झाली होती. देशांनी आपसात सहकार्य  करून, स्पर्धा करून जगावं; दुसऱ्याला संपवणं हा उद्देश ठेवला तर सगळ्यांचाच नाश होईल असा विचार ली करत होते. तसा विचार केला नसता तर  इंडोनेशिया, जपान, चीन इत्यादी देशांनी सिंगापूरला केव्हांच गिळलं तरी असतं वा संपवलं तरी असतं.

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेला स्वतःच्या आर्थिक सामर्थ्याची जाणीव झाली. या सामर्थ्याचा एक गर्व अमेरिकेला झाला. अमेरिकेनं रशियाला कमी लेखायला सुरवात केली, चीनला एकटं पाडलं. ली मुक्त अर्थव्यवस्थावाले असल्यानं त्यांचं अमेरिकेशी सख्य होतं. ते अमेरिकेत येजा करत असत. त्यांनी अमेरिकन नेत्यांना सांगितलं की चीनशी भांडू नका, चीनचा विकास होऊ द्या, चीनला एकटं पाडू नका, विकसित चीन असणं अमेरिकेच्याही अंतिम हिताचं आहे.

निक्सन यांच्या परदेश नीतीवर ली यांचा प्रभाव दिसतो.

चीनही एकेकाळी स्वतःला जगाचं केंद्र मानत असे, चीनही एकेकाळी साम्राज्यवादी होता. सिंगापूर स्वतंत्र झाल्यावर सिंगापूरला गिळण्याचा, अंकित करण्याचा प्रयत्न चीन करत होतं. वियेतनाम, तैवान, कोरिया, भारत इत्यादी भाग आपल्या कह्यात असावेत असा चीनचा विचार होता. ली यांनी झाओ एन लाय यांना भेटायलाही नकार दिला होता. चीन सिंगापूरमधे रेडियोवरून सिंगापूरचा चीन करायचा असल्यागत प्रचार करत. ली यांनी सांगितलं की हा उद्योग बंद करा, सिंगापूरला सिंगापूरच राहू द्या. ली यांनी तैवानचं स्वातंत्र्य मान्य केलं होतं, तैवानला स्वतंत्रपणाने जगू देणं चीनच्याच हिताचं आहे असं ली म्हणत असत.

तिएनानमेन चौकात चीननं विद्यार्थी असंतोष चिरडला याचा जाहीर निषेध ली यांनी केला. पण त्याच वेळी विद्यार्थी चळवळ हाताबाहेर गेली असती तर चीनमधे पुन्हा एकदा अराजक माजलं असतं हे देंगनी लक्षात घेतलं होतं असं ली म्हणाले. कारण त्याच सुमाराला गोर्बाचेवनी रशियात सुधारणा केल्याचा परिणाम होऊन सोवियेत युनियन मोडलं ही गोष्ट ली नोंदतात. म्हणजे स्वातंत्र्य तर असायला हवं पण स्वातंत्र्याचे दुष्परिणामही होऊ शकतात हे त्यांना समजलं होतं.

ली म्हणत असत- दोन महाकाय हत्ती लढतात तेव्हां गवत चिरडलं जातं हे जितकं खरं तितकंच दोन हत्ती प्रेम करतात तेव्हांही गवत चिरडलं जातं.

सिंगापूर हा एक अगदी लहान देश होता, एक शहरच होतं. अनेक वंशाची व भाषांची माणसं तिथं रहात होती. आर्थिक विकासाचं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. ब्रिटीश सोडून गेले, त्यांनी दिलेला जहाज व्यवसाय नाहिसा झाला. मलेशिया, चीन, इंडोनेशिया हे देश गिळायला टपून बसले होते.हाणामाऱ्या न करता संकटं टाळत ली यांनी देश उभारला.

मधला मार्ग. व्यवहारवाद. ध्येयवादाच्या अतिरेकापायी नुकसान करून घ्यायचं नाही. शांतता आणि सलोखा; महत्वाचा आणि आवश्यक; हे त्यानी जाणलं. हाच मार्ग तुम्हाला तारेल असं ली यानी चीन आणि अमेरिकेला सांगितलं.

सिंगापूर स्वतंत्र झाला तेव्हां भविष्याबद्दल कोणतीही कल्पना कोणाहीसमोर नव्हती. ली क्वान यू यांनी एक कल्पना केली आणि त्यानुसार देश उभारला. एकहाती कारभार हे त्यांचं वैशिष्ट्यं, लोकशाहीसुद्धा त्यांनी स्वतःच्या पद्धतीनं अमलात आणली.

हे सारं जमलं याचं मुख्य कारण ली क्वान यु यांचा वैयक्तीक आणि सार्वजनीक व्यवहार भ्रष्टाचार विरहीत होता. पक्षासाठी, स्वतःसाठी, पैसे जमा करणं याची भानगडच नव्हती. ह्यूलेट पॅकार्ड ही पहिली अमेरिकन कंपनी इंडोनेशियात त्यांनी आणली तेव्हां त्याचं कमीशन ना त्यांनी खाल्लं ना पक्षाला दिलं. लोकशाहीचा सिंगापुरी अवतार त्यांनी साकारला तेव्हां त्यांना सत्ता त्यांच्या हातात हवी होती हे सर्वाना समजत होतं. पण सत्ता हाती ठेवतांना काही एक दृष्टी होती हेही लोकांना कळत होतं.

सिंगापूरमधे रस्त्यावर थुंकलं तर जबर दंड होतो. रस्त्यावर सिगारेट ओढली तर जबर दंड होतो. यात आपल्या स्वातंत्र्यावर गदा येतेय असं सिंगापुरींना वाटलं नाही. ली यांच्यावर टीका केलेली सरकारला सहन होत नाही हे बरोबर नाही हे लोकाना कळत होतं पण ली यांचे कार्यक्रम जनतेच्या हितासाठी असतात याची खात्री लोकाना पटत होती.

देंग जेव्हां सिंगापूरमधे गेले तेव्हां त्यांच्याबरोबर टेबलावर सिगारेटची थोटकी टाकण्यासाठी ॲशपॉट ठेवला होता आणि पिकदाणीही ठेवली होती. काय धूर काढायचा असेल, थुंकायचं असेल ते इथं करा, रस्त्यावर नको. 

सिंगापूर हे स्वच्छ शहर आणि तिथली उद्योगांची रचना पाहून देंग चीनमधे गेले आणि शांघायच्या जवळ त्यांनी सिंगापूरच्या पद्दतीचं शहर उभं केलं, तेच पुढं देंग यांचं चीनच्या विकासाचं मॉडेल झालं.

१९६५ साली सिंगापूरचं दरडोई जीडीपी ५१७ डॉलर होतं. आज ते ५९,५७६ डॉलरवर पोचलं आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, प्रत्येक कसोटीवर सिंगापूर जगात अव्वल आहे.  

।।

लीडरशिप.

हेन्री किसिंजर.

।।

Comments are closed.