सिनेमा: हॉलिवूडचा इतिहास सांगतो ‘बॅबिलॉन’.

सिनेमा: हॉलिवूडचा इतिहास सांगतो ‘बॅबिलॉन’.

मूकपटाचं बोलपट हॉलिवूड वळण. बॅबिलॉन.

डेमियन शॅझेल या दिक्दर्शकाचा बॅबिलॉन हा चित्रपट थेटरांत झळकला आहे. झळकताक्षणीच चित्रपटाची चर्चा सुरु झालीय आणि यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत तो नामांकनं मिळवणार, बक्षिसं मिळवणार अशी भाकितं वर्तवली जात आहेत.एका परीनं ते स्वाभाविक आहे. पाचच वर्षांपूर्वी शॅझेलच्या ला ला लँडनं प्रेक्षकांना आणि ऑस्कर परीक्षकांना वेड लावलं होतं. अनेक बक्षिसांसह शॅझेल ऑस्करचा सर्वोत्तम दिक्दर्शक झाला होता.

हॉलिवूड चित्रपट सृष्टीत मूक सिनेमा संपून बोलपट सुरु झाला त्या काळाच्या (विशीचं-तिशीतलं हॉलिवूड)  आठवणी जागवत हा चित्रपट त्या काळात सिनेमा करणाऱ्यांचं  चित्र प्रेक्षकांसमोर मांडतो. मूकपटात संवाद नसत पण संगीत असे. चित्रपट सुरु असताना स्वतंत्रपणे संगीत वाजवलं जात असे, कधी कधी नट स्वतंत्रपणे संवाद म्हणत. संगीत, संवाद, ध्वनी थेट चित्रपटात गुंफता आला आणि चित्रपट बदलला. चित्रपटाची दुनियाच पायापासून डोक्यापर्यंत बदलली.

तेव्हां ८०० पेक्षा जास्त चित्रपट अमेरिकेत होत आणि खोऱ्यानं पैसा मिळवत. पैसा आणि त्या बरोबर येणारी प्रसिद्धी याचं वेड अमेरिकन समाजाला, अमेरिकन चित्रपट सृष्टीला लागलं होतं. ते वेड डोक्यात घेऊन चित्रपटात प्रवेश करणारी माणसं रंगवून हा चित्रपट तो काळ मांडतो. सहा माणसं आहेत. कोणाला नटी व्हायचंय, कोणाला निर्माता व्हायचंय, कोणाला संगीत दिक्दर्शक व्हायचंय, कोणाला दिक्दर्शक व्हायचंय कोणाला या धामधुमीत समीक्षक होऊन पैसा आणि लोकप्रीयता मिळवायचीय.

या वेडापोटी माणसं पार्ट्या करतात. पार्टीत अगदीच गलिच्छ म्हणावे असे प्रकार चालतात. ड्रग्ज. नग्नता. अनैसर्गिक सेक्स. स्टेडियमवर टीमनी मॅच खेळावी तसा सेक्स. कर्कश्श संगीत. आणि हे सारं अत्यंत वेगानं चित्रित आणि संकलित करून या चित्रपटात दाखवलंय. 

बॅबिलॉनमधे अनेक दृश्यं अशिष्ट आहेत. 

चित्रपट सुरु होतो तेव्हां एक होतकरू माणूस एक हत्ती ट्रकावर लादून टेकडीवर नेण्याचा प्रयत्न करत असतो. टेकडीवर एक सिनेमाची पार्टी व्हायची असते. हत्ती, ट्रक, चढण.एक अस्सल विनोदी चित्रपटाचा मसाला. या खटाटोपात तो हत्ती शी करतो, शू करतो. त्याची शू कॅमेऱ्याच्या लेन्सवर पसरते.

कॅमेऱ्याच्या लेन्सचा हा वापर कल्पकच म्हणायला हवा. चित्रपटात एका ठिकाणी गोल्डन शॉवर दाखवलाय. गोल्डन शॉवर म्हणजे स्त्रिया (पुरुषही खरं म्हणजे) कोणावर तरी, कशावर तरी, शू करतात. ही खास अमेरिकन पद्दत दिसतेय. डोनल्ड ट्रंप यांच्या सांगण्यावरून असा गोल्डन शॉवर रशियातल्या एका हॉटेलमधे करण्यात आला होता. ओबामा ज्या हॉटेलमधे सपत्नीक उतरले होते त्या हॉटेलमधल्या त्या खोलीतल्या त्या पलंगावर गोल्डन शॉवर. आपल्याकडं एकाद्या माणसाच्या तोंडावर थुंकणं म्हणजे अपमानाचा कळस मानला जातो. अमेरिकेत गोल्डन शॉवर. तर बॅबिलॉनमधे गोल्‍डन शॉवर आहे आणि त्यातली गोल्डन शू लेन्सवर परसलेली प्रेक्षक पहातो.

जवळपास याच कथावस्तूवर आधारलेला एक चित्रपट १९५२ साली प्रदर्शित झाला होता. सिंगिंग इन द रेन. अशीच वरवर जाऊ पहाणारी पात्रं आणि त्यांचे प्रताप आणि उपद्व्याप. पण ते सारं चित्रपटानं विनोदाच्या अंगानं नेलं, त्याला एक सभ्य रूप ठेवलं.

त्या चित्रपटाचा शेवट धमाल होता. नटी आहे. चित्रपटात ती गाणी म्हणत   असते. चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांसमोर त्यांच्या टाळ्या घ्यायला ती उभी असते. प्रेक्षक तिला सिनेमातलंच गाणं गायला सांगतात. ती कशी गाणार? कारण सिनेमात तिनं नुसता अभिनय केलेला असतो आणि पाठीमागं तिसऱ्याच गायिकेनं गायलेलं असतं. प्रेक्षकांना ते माहित नसतं, ते नवं असतं. पार्श्वगायनाचा प्रयोग चित्रपटात झालेला असतो.

निर्माता वाट काढतो.  नटीनं प्रेक्षकासमोर उभं राहून गाण्याचा हावभाव करायचा, पडद्यामागं गायिकेनं गाणं गायचं. लोक खुष होतात. एक माणूस पडदा उचलतो. लोकांना पाठीमागे गाणारी गायिका दिसते. टाळ्या, शिट्या, करमणूक. मूकपट ते बोलपट हा बदल दाखवण्याची ही तऱ्हा.

  ला ला लॅंड हा शॅझेलचा चित्रपट ही  दोन प्रेमिकांची कथा आहे. चित्रपटभर जॅझ आणि क्लासिकल संगिताची उधळण होत असते, नाच आणि गाणी. धम्माल. चित्रपट रोमँटिक पद्धतीनं केलाय. हाच शॅझेल तीन स्टार  बॅबिलॉन करतो.

शॅझेल स्वतः ड्रमर आहे. ऱ्हिदम, ताल, त्याच्या रक्तात आहे. २०१६ मधे त्यानं व्हिपलॅश ही फिल्म केली. एका ड्रमरला यश मिळण्यासाठी किती जीवघेणी खटपट करावी लागते याचं चित्रण व्हिपलॅश या चित्रपटात आहे. व्हिपलॅशचा  नायक जीव जाईपर्यंत ड्रम, झांजा बडवतो. कित्येक मिनिटं ड्रमरच्या टिपऱ्या आपल्याला दिसतही नाहीत इतक्या वेगानं थिरकत असतात. प्रचंड लय आणि त्या लयीला साजेसा ध्वनी आणि चित्र. अत्यंत वेगवान चित्रण आणि तितक्याच वेगानं संकलन. व्हिपलॅश पाहिला की शॅझेल या माणसाला चित्रपट किती छान समजलाय ते लक्षात येतं.

लय, ताल, वेग शॅझेलनं ला ला लॅंडमधेही वापरलाय आणि बॅबिलॉनमधेही. पण…बॅबिलॉनमधे माणसं आणि दृश्यांची हाताळणी अतिरेकाकडं झुकणारी आहे. हॉलीवूडमधे असभ्यपणा आहे, हाव आहे, हपापा आहे. पण हॉलीवूडमधे संगीतही आहे, कलाही आहे आणि कसबही आहे. शॅझेलनं असभ्यपणा ठळक करून दाखवलाय. बिघडत नाही. चित्रपट सृष्टी, समाज, याचं समीक्षण शॅझेलनं या चित्रपटात बटबटीत अंगानं केलंय. हा जॉनरही हाताळून पहावा असं   दिक्दर्शकाला वाटलं. ठीक.

चित्रपटाची तांत्रीक अंग उत्तम आहेत. चित्रीकरण, संकलन, कला दिक्दर्शन ही अंग उत्तम आहेत. त्यांना नामांकनं मिळतील. ब्रॅड पिटचा अभिनयही चांगला आहे.

तीनच वर्षांपूर्वी क्वेंटिन टेरंटीनोचा ‘वन्स अपॉन ए टाईम इन हॉलिवूड’ हा चित्रपट येऊन गेला. १९६० च्या दशकातल्या हॉलिवूडमधली बदलत्या प्रवाहांचा वेध या चित्रपटात आहे. चित्रपट क्षेत्राचा अविभाज्य भाग असलेली जीवघेणी स्पर्धा, अव्वल उंची गाठलेल्या नटाचा उतार असा भावनात्मक विषय टेरंटीनोनं हाताळलाय. पिट आणि डी कॅप्रियो या दोन नटांची सॉलिड जुगलबंदी या चित्रपटात आहे.हाताळणी बटबटीत नाही, अतिरेकी नाही, तिच्यात एक मानवी संबंधांतला ओलावा आहे. वन्स अपॉनला खच्चून नामांकनं मिळाली आणि दोन ऑस्करंही मिळाली.

हॉलिवूडला सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे. हॉलिवूडन अनेक लाटा निर्माण केल्या, अनेक प्रवाह निर्माण केले, अनेक वळणं घेतली. दर पाच दहा वर्षांनी चित्रपट करणाऱ्यांना मागं वळून पहावंसं वाटावं इतक्या गोष्टी हॉलिवूडमधे घडल्या आहेत. बॅबिलॉन प्रदर्शित होत असतानाच स्पीलबर्गचा फेबलमन्स हाही चित्रपट प्रदर्शित होतोय. फेबलमन्समधे स्पीलबर्गनं त्याचं लहानपण आणि चित्रपटवेड दाखवलंय. १९५० साली दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ हा चित्रपट छोट्या स्पीलबर्गला त्याच्या आईवडिलांना दाखवला. त्यामधे एक भरधाव रेलवे एका कारवर आदळते असं दृश्य होतं. त्या दृश्यानं स्पीलबर्गला पछाडलं. त्याला चित्रपटाचं वेड लागलं. घरातले कौटुंबिक तणाव, स्पीलबर्गच्या तारूण्यातले तणाव यांना तोंड देत देत स्पीलबर्ग चित्रपटाची कला कशी शिकला याचं चित्रण या चित्रपटात आहे.

चित्रपटाच्या शेवटी फोर्ड नावाचा एक नामांकित बाप दिक्दर्शक स्पीलबर्गला चांगली फ्रेम कुठली ते सांगतो. ज्या फ्रेममधे क्षितीज वरच्या अंगाला किंवा खालच्या अंगाला असतं ती फ्रेम चांगली, क्षितीज फ्रेमच्या मधे असेल तर ती फ्रेम बंडल असं फोर्ड ठासून सांगतो. स्पीलबर्गच्या डोक्यात ट्यूब पेटते. साक्षात्कार झालेला स्पीलबर्ग आनंदित होऊन उड्या मारत स्टुडियोबाहेर निघतो या दृश्यानं चित्रपट संपलाय.

स्पीलबर्गनं फेबलमन्स हा चित्रपट अगदी हळुवारपणे हाताळलाय, कुठल्याही वयोगटातल्या कुठल्याही देशातल्या माणसाला तो चित्रपट पहावासा वाटेल अशी त्या चित्रपटाची गंमत आहे. 

बॅबिलॉनची एक स्वतंत्र गंमत आहे खरी, पण बॅबिलॉन पहातांना डोक्याला त्रास होतो, आनंद वाटत नाही, हेही खरं.

बॅबिलॉन करतानाच शॅझेलनं फार गल्ला जमणार नाही असं गृहीत धरलं असावं. ते खरंही झालं. सिनेघरात चित्रपट फारसा चालला नाही. पण चित्रपट महोत्सवांत, ऑस्करमधे मात्र तो पाहिला जाणार असं दिसतंय.

।।

Babylon

Dir. Damien Chazelle.

Comments are closed.