माणसं बेघर होताहेत

माणसं बेघर होताहेत

न्यू झीलँड सरकारनं बाहेरून येणाऱ्या लोकांना घरं खरेदी करायला बंदी घातलीय.
चीन आणि ऑस्ट्रेलियातल्या घरांच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्या मानानं न्यू झीलंडच्या शहरात जमीन आणि घरं स्वस्त असल्यामुळं भरपूर पैसे असलेले चिनी आणि ऑस्ट्रेलियन न्यू झीलँडमधे घरं विकत घेत आहेत. गेल्या १० वर्षात हा कल अधिक तीव्र झालाय.
न्यू झीलँडमधे घरांची बाजारपेठ खुली होती, सरकारचं तिच्यावर नियंत्रण नव्हतं. चिनी लोक येत आणि वाट्टेल ती किमत द्यायला तयार होत. घरमालक म्हणे की चांगली किमत मिळत्ये ना, मग झालं तर. त्या घरातल्या भाडेकरूकडं मालक लठ्ठ भाडं मागू लागले. ते देता येणार नाही म्हटल्यावर मालकांनी घरं सोडण्याच्या नोटिसा दिल्या. घरांच्या किमतीही याच पद्धतीनं वाढल्यावर घरांची मालकीही बदलली.
स्थानिक न्यू झीलँडर बेघर झालेत. न्यू झीलँडमधले २५ टक्के प्रौढ बेघऱ आहेत किंवा भाडेकरू झालेत. ते म्हणाताहेत आमच्याच देशात आम्हाला रहाणं मुश्कील झालंय. सरकारला मधे पडावं लागलं आणि सरकारनं घर खरेदीवर बंदी घातली.
न्यू झीलँडमधे बाहेरून आलेली माणसं बाहेरच्या देशातून आली. पण जर्मनीत, बर्लीनमधे, देशातलीच श्रीमंत माणसं घरं आणि प्रॉपर्ट्या घेत आहेत. बर्लीन, बॉन, ड्युसेलडॉर्फ इत्यादी मोठ्या शहरात (कारभाराची किंवा औद्योगीक किंवा बिझनेस शहरं) श्रीमंतांनी प्रॉपर्टी विकत घेतल्यामुळं प्रॉपर्टीच्या किमती कायच्या कायच वाढल्या. किमती वाढताहेत म्हटल्यावर आणखी लोकांनी त्या विकत घेतल्या. त्यामुळं आणखी किमती वाढल्या.
जुन्या घरात रहाणाऱ्या लोकांकडं मालक अधिक म्हणजे दुप्पट तिप्पट भाडं मागू लागले. पंचवीस तीस वर्षांपासून तिथं वास्तव्य करणाऱ्या माणसांनी ते भाडं कसं द्यायचं? भाडं पटीत वाढलं पण उत्पन्न पटीत वाढलं नाही. सामान्यतः सत्तर ऐंशी टक्के मध्यम वर्गीय माणसांचं उत्पन्न काही एका ठरावीक वेगानं वाढतं आणि म्हातारपण आलं की उत्पन्न थिजतं. अशा लोकांनी जायचं कुठं?
सेंट्रल बर्लीनमधे ब्रिजिट लस्टिग नावाची ६१ वर्षाची महिला रहाते.त्याच ठिकाणी तिचा जन्म झाला. तिथंच ती वाढली. ब्रिजिटचं उत्पन्न आहे दर महा ८०० डॉलर. त्यातून ती भाड्यावर ३०० डॉलर खर्च करते. औषधं अन्नपाणी यावरचा खर्च जेमतेम भागतो. सेंट्रल बर्लीनमधे प्रॉपर्टीच्या किमती वाढू लागल्यावर एका माणसानं ब्रिजिट रहाते ती इमारत ६० हजार डॉलरला विकत घेतली. मालक म्हणतो की तो आता भाडं दुप्पट करणार. ब्रिजीटला तेवढं भाडं देणं शक्यच नाही. मालक ब्रिजिटला हाकलायच्या प्रयत्नात आहे.
ब्रिजीटला नोटीस आलीय. बर्लीनमधे भाडेकरूंना संरक्षण आहे, मालकांना मनास वाटेल त्या प्रमाणं भाडेकरून हाकलता येत नाही. मालकानं कारण सांगितलं की त्याला त्याच्या बहिणीसाठी जागा हवीय. बहीण वारलीय. आता मालक दुसरं काही तरी कारण शोधतोय. कायद्यातल्या खाचाखोच्या शोधून मालक ब्रिजीटला हाकलायच्या प्रयत्नात आहे. मालकाला कोर्टात तोंड देणं ब्रिजीटला शक्य नाही, वकीलाला द्यायला तिच्याकडं पैसे नाहीत.
ब्रिजीटसारखी हजारो माणसं जर्मनीत रस्त्यावर आलीत.
अगदी असंच अमेरिकेत आयडाहोमधे घडतंय. आयडाहो हा अमेरिकेतला रखरखीत भाग. बटाटे, दुध दुभतं हा इथला प्रमुख व्यवसाय. श्रीमंत उद्योगी अमेरिकन भूभागाच्या तुलनेत तिथल्या जमिनी स्वस्त. आगी लागायला सुरवात झाल्यावर शेजारी कॅलिफोर्नियातल्या श्रीमंत लोकांनी आयडाहोत जमिनी आणि घरं खरेदी करायचा सपाटा लावला. भरपूर पैसे मिळतात म्हणून आयडाहोतल्या अनेकांनी घरं विकली आणि दुसरीकडं स्वस्त घरांच्या विभागात गेले. ज्यांना दुसरीकडं जायचं नाही, ज्यांची मुळं आयडाहोतच आहेत, ज्यांचं उत्पन्न आता थकलं आहे त्या माणसांनी काय करायचं?
जगभर हा कल दिसतोय.
मुंबईचंच पहा.
गिरगाव ते दादर ही मूळ मुंबई. मराठी संस्कृती या भागात वाढली. लेखक, कवी, पत्रकार, खेळाडू, राजकीय बुद्धीवंत इत्यादी माणसं या विभाात वाढली, त्यांनी मराठी संस्कृती वाढवली. काळाच्या ओघात गिरगावात पंजाबी, शिख, मारवाडी इत्यादी समाजातले व्यापारी आले. चाळीतल्या दोन खोल्यांच्या जागेला त्यांनी पाच पन्नास लाख मोजायला सुरवात केली. शंभरावर एकाद दोन शून्य पहायची सवय असलेल्या मध्यम वर्गीयांनी जागा विकल्या आणि ते उपनगरात गेले. तेच नंतर पार्ल्यांतही झालं. मराठी मंडळी डोंबिवली आणि त्याही पलिकडं गेली.
मुंबई, पुणे, नाशीक, औरंगाबाद, सांगली. सर्व ठिकाणी घरांच्या किमती आणि भाडी आकाशात रवाना झालीत. कोणा तरुणाला आयुष्य सुरु करण्यासाठी शहरांत जायचं म्हटलं तर अशक्य आहे. नुकत्याच शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरला दवाखाना सुरु करायचा असेल तर ते आता अशक्य आहे. प्रचंड पैसे देऊन दवाखाना उभारणं आणि पेशंटांना अवास्तव फिया आकारून पैसे उभे करणं येवढा एकच मार्ग उरलाय.
आता गिरगाव, दादर, पार्ले इत्यादी ठिकाणी मराठी शब्द कानावर पडणं कठीण झालंय. मराठी पदार्थ विकणारी चार दोन दुकानं शिल्लक आहेत, तिथला वडा-थालीपीठ एक्झोटिक फॅशन पदार्थ झालेत, त्याच्या किमती कायच्या काय वाढल्यायत. गिरगाव ते पार्ले, मराठी माणसं दिसेनाशी होताहेत.
बाजाराच्या नियमानुसार हे सारं चालतंय. मागणी आणि पुरवठा या नियमानुसार किमती ठरत आहेत. किमत द्यायला माणूस तयार असेल तर किमती वाढत जातात. ते समजण्यासारखं आहे. पण जगात बाजाराच्या पलिकडंही काही गोष्टी असतात की नाही?
असंख्य माणसं आयुष्यभर मेहनत करून एकादं घर उभारतात. त्यांची मेहनत कायदेशीर आणि नीताला धरून असते. त्या घरासाठी त्यानं खर्च केलेले पैसे येवढीच त्या घराची किमत असते काय? दहा बारा लाख रपये खर्च करून किवा भाड्याच्या रुपात देऊन एकादा माणूस घरात चाळीस वर्ष रहातो. एका दिवशी कोणी तरी येतो आणि म्हणतो की आता तुमच्या जागेची किमत दोन कोटी झालीय. पालिका आणि सरकारचा रेडी रेकनर समोर ठेवून तो ती किमत सांगतो. म्हणजे त्याच्या सांगण्याला सरकारचाही पाठिंबा असतो. शेजारी एकादा सिने नट, एकादा पुढारी, एकादा स्मगरल,एकादा गायक येऊन रहातो म्हणून घराची किमत दोन कोटी होते हे बाजाराचं म्हणणं ढीग खरं असेल पण रहाणाऱ्या माणसाचं काय. त्याची किमत वाढलेली नसते.
घराच्या आणि जागेच्या किमतीमधे एक कृत्रीमता आलेली आहे. केवळ मागणी आली किंवा दुर्मीळ झाली म्हणून एकाद्या चित्राची किमत काही अब्ज होणं वेगळं आणि घराची किमत वाढून घरातला माणूस बेघर होणं वेगळं.
संपत्तीची निर्मिती हे एक स्वतंत्र शास्त्र आहे, त्याला काही एक अर्थ जरूर आहे. संपत्ती, धन हा माणसाच्या जगण्याचा एक अटळ, आवश्यक आणि चांगला भाग आहे. परंतू या संपत्ती निर्मितीचे नियम अतिरेकी होत असतील तर तेही समाजाच्या हिताचं नाही. तो अतिरेक आता जगात होतोय हे माणसं बेघर होण्याच्या लक्षणातून दिसू लागलंय. अमेरिका आणि जर्मनी या श्रीमंत देशातली बेघर माणसांची संख्या वाढणं हे त्या विकृत संपत्ती निर्मितीचं लक्षण आहे.
आज मुंबईत जे होतंय तेच पुण्यातही होतंय. तेच प्रत्येक मोठ्या शहरात होऊ घातलंय. मुद्दा केवळ मराठी संस्कृती नष्ट होण्याचा नाहीये. माणसं जन्माला येताना भरमसाठ श्रीमंत नसतात. मेहनत करून ती मोठी होतात. पण बेघर अवस्थेतच जगायची वेळ आली तर माणसाचं जगणंच अशक्य होतं.
प्रश्न गंभीर आहे पण बिकट आहे. प्रश्न सांस्कृतीक आहे आणि आर्थिकही आहे. दोन्ही घटक विचारात घेऊन उत्तर देऊ शकणारी विचारधारा सध्या दिसत नाही ही एक मोठीच अडचण आहे. पण प्रश्ण सोडवणं जमलं नाही तर मोठ्ठाच अनवस्था प्रसंग येणार आहे. हिंसा, गुन्हेगारी, मनोविकार इत्यादी घटनांच्या रुपात तोंड देण्याची पाळी येईल हे लक्षात घेऊन हालचाली व्हायला हव्यात.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *