समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे

समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे

समाज म्हणजे निवडक वस्तूंचं म्युझियम किवा आर्ट गॅलरी नव्हे
माणसाची किमत तो किती पैसे मिळवतो यावरूनच करायची का? हा प्रश्न इराणमधून स्थलांतरीत झालेल्या रोया हक्कियन डोनल्ड ट्रंपांच्या अमेरिकेला विचारत आहेत. कारण ट्रंप बाहेरच्या माणसांना देशात घेताना त्यांची पैसे मिळवण्याची क्षमता ही कसोटी लावणार आहेत.
वरील प्रश्न त्यांनी “Journey from the Land of No: A Girlhood Caught in Revolutionary Iran” या त्यांच्या ताज्या पुस्तकात उपस्थित केलाय. रोया हक्कियन एक कवयित्री आहेत.
रोया १९८५ साली अमेरिकेत स्थलांतरित झाल्या. खोमेनी यांचं धर्मराज्य इराणमधे स्थापन झाल्यावर जगणं अशक्य झालेली अनेक माणसं स्थलांतरीत झाली. शिक्षण झालेलं नव्हतं, कोणतंही कसब विकसित झालेलं नव्हतं, आयुष्याला नुकतीच सुरवात व्हायची होती अशा वेळी रोया अमेरिकेत स्थलांतरीत झाल्या.
रोयाना इंग्रजी येत नव्हतं. भाषेपासून त्यांना सुरवात करावी लागली. अमेरिकन जनजीवनही त्यांना अपरिचित होतं. विविध संस्थांनी त्यांना भाषा शिकवली, अमेरिकेत कसं जगायचं असतं शिकवलं. यथावकाश रोया कॉलेजात गेल्या, शिक्षण पूर्ण केलं, नोकरी मिळवली, त्यांचं जगणं सुरळीत सुरु झालं. अनेक इराणी माणसं अमेरिकन स्थाइक झालीयत, समाजाच्या सर्व क्षेत्रात ती मान्यवर आणि सुस्थित आहेत.
अशाच एक अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या अझर नफिसी या इंग्रजीच्या प्राध्यापिका. त्यांचं Reading Lolita in Tehran नावाचं एक वाचनीय पुस्तक आहे. खोमेनींचं राज्य सुरू व्हायच्या आधी त्या तेहरानमधे इंग्रजी शिकवत असत. खोमेनींचं राज्य सुरु झाल्यावर त्यांना विद्यापिठात बुरखा घालून वावरायची सक्ती करण्यात आली. नंतर लोलिता ही कादंबरी कामुक असून इस्लामी शिकवणुकीच्या विरोधात आहे म्हणून शिकवायला बंदी घालण्यात आली. नफिसी नाना आयडिया करून खोमेनीगिरीला वळसे घालून शिकवत. स्वतःच्या घरात किंवा विद्यार्थिनीच्या घरी त्या बंद दरवाजाआड वर्ग घेत. ते उघड झालं आणि त्यांना देश सोडावा लागला.
अब्द नॉर इफ्तीन हा सोमाली तरूण २०१४ साली अमेरिकेत स्थलांतरित झाला. त्याचं Call Me American हे पुस्तक काल परवा प्रसिद्ध झालंय.
इफ्तीन मोगादिशूचा रहिवासी. अल शबाब या अतिरेकी इस्लामी संघटनेच्या छळवादाला त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना तोंड द्यावं लागत होतं. मोगादिशूतलं जगणं भीषण, अतर्क्य आणि क्षणभंगूर होतं. अल शबाबचे जिहादी हातात चाबूक घेऊन केव्हां उगवतील, केव्हां घरात घुसतील, केव्हां कोणाला पकडतील, केव्हां कोणाला गायब करतील याचा नेम नसे. आयांकडून छोटी मुलं हिसकावून घेतली जात, त्यांना जिहादी केलं जात असे.
इफ्तीन केनयात पळाला. केनयातून त्यानं अमेरिकन व्हिसासाठी अर्ज केला. त्या वेळी सीरियातल्या यादवीमुळं युरोप आणि अमेरिकेत जाऊ पहाणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. ती हाताळणं शक्य नसल्यानं अमेरिका लॉटरी काढत असे. इफ्तीनची लॉटरी लागली. २०१४ साली इफ्तीन मेन या राज्यात पोर्टलँडमधे स्थलांतरीत झाला.
इफ्तीनची गंमत अशी की त्याला इंग्रजी भाषा थोडीशी कां होईना मोगादिशूमधेच येत होती. मायकेल जॅक्सनची गाणी आणि श्वात्झनेगरचे सिनेमे ही त्याची पाठ्यपुस्तकं. तेवढ्यावर त्यानं व्हिसासाठी मुलाखत दिली. अमेरिकेत आल्यावर त्यानं इंग्रजीचा पाठ्यक्रम पूर्ण केला आणि विद्यापिठात पदवी मिळवली. सोमालियातून आलेल्या लोकांना इंग्रजी शिकवणं हे त्याचं आताचं काम.
पुस्तकात इफ्तिननं सोमालियातले आणि अमेरिकेतले अनुभव, अमेरिकेत पोचण्याचा खडतर प्रवास, चितारला आहे. इफ्तीनचं एक भाषण यू ट्यूबवर आहे. समोर बसलेल्या काळ्या आणि गोऱ्या अमेरिकन श्रोत्याना इफ्तीन सांगतो ” मी मुस्लीम आहे. आफ्रिकन आहे. मला अमेरिकन म्हणा. अमेरिकेत लोकशाही आहे आणि सहिष्णुता (टॉलरन्स) आहे. त्यामुळंच बाहेरून येणारी माणसं अमेरिकेत स्थिरावतात….”
बाहेरच्यांना अमेरिकन अपरिचित असतात. अमेरिकनांना बाहेरची माणसं अपरिचित असतात. बाहेरच्यांना इंग्रजी येत नसतं. अमेरिकन लोकांना बाहेरच्या भाषा येत नसतात. त्यामुळं गैरसमज, गोंधळ होतात.यथावकाश दोहोंचा मिळून अमेरिकन समाज तयार होतो.
मॉड हार्ट लवलेस यांची Emily of Deep Valley या नावाची कादंबरी १९५० साली प्रकाशित झाली होती. मिनेसोटा या अमेरिकेतील राज्यात स्थलांतरीत झालेल्या एका सीरियन कुटुंबाची गोष्ट या कादंबरीत आहे. गैरसमज, संघर्ष, सामावून घ्यायला नकार या चक्रात सापडलेलं एक सीरियन कुटुंब आणि एक गोरं अमेरिकन ख्रिस्ती कुटुंब यांची कहाणी त्या कादंबरीत आहे. सीरियातून आलेले लोक ख्रिस्ती होते पण त्यांची नावं अरब होती. अरब म्हणजे मुसलमान या समजुतीमुळं स्थानिक गोरे ख्रिस्ती सीरियन स्थलांतरीतांना त्रास देत होते. ती कादंबरी वाचतांना अमेरिकेच्या घडणीचा काळ समजतो.
सुरवातीला उल्लेख केलेल्या रोया हक्कियन डोनल्ड ट्रंप यांच्या स्थलांतरीत धोरणाबद्दलचं मत मांडतात. ट्रंप यांना बाहेरची माणसं अमेरिकेत यावीशी वाटत नाहीत. विशेषतः आफ्रिकन, मुस्लीम आणि हिस्पॅनिक माणसं त्यांना अमेरिकेत नकोयत. आफ्रिकेतल्या, मध्य पूर्वेतल्या देशांना ट्रंप शिट होल, गुवाचे खड्डे, असं संबोधतात. बाहेरची माणसं निवडक असावीत, ती भरपूर शिकलेली आणि अमेरिकेच्या हिशोबात भरपूर पैसे मिळवण्याची क्षमता असणारी असावीत असं ट्रंप यांना वाटतं.
रोया म्हणतात की सर्वोत्तम आणि ऐतिहासीक अशा वस्तू म्युझियममधे किंवा आर्ट गॅलरीत निवडल्या जातात. पण समाज म्हणजे आर्ट गॅलरी किवा म्युझियम नसतं. सर्व प्रकारची माणसं समाजात असतात. भरपूर पैसे मिळवणारी आणि सर्वसामान्यपणे जगणारी. मागं पडलेली माणसंही समाजात असतात आणि त्यांना सामावून घ्यावं लागतं.
सोमालिया, सीरिया, अफगाणिस्तान, म्यानमार इत्यादी देशांमधली करोडो माणसं आज संकटात आहेत, देशोधडीला लागली आहेत, त्यांना जगता येत नाहीये. त्यांना कोणी तरी आश्रय देणं आवश्यक आहे. इतक्या माणसांना सामावून घेणं अमेरिकेला किवा अख्ख्या युरोपलाही शक्य नाही. तेवढी त्या देशांची क्षमता नाही. त्यामुळंच ते देश स्थलांतरितांवर निर्बंध घालत आहेत. त्यांचंही चूक आहे अशातला भाग नाही. परंतू या पेचातून जगाला वाट काढावीच लागेल.
आता जग लहान झालंय. जगाच्या कुठल्याही भागात संकट निर्माण झालं तरी त्याच्या झळा सर्व जगाला लागत आहेत. प्रत्येक देशाला स्वतःच्या हितासाठी जगाचं हित पहावं लागणार आहे.
म्यानमार किंवा सीरियात माणसं स्थलांतरीत होताहेत याला तिथल्या सरकारांची आणि समाजाची नालायकी कारणीभूत आहे. पण त्या सरकारांवर बाहेरच्या कोणाला कारवाई करणं कठीण असतं. ते देश म्हणतात की त्यांचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व हिरावून घेतलं जातं. हा पेच अवघड आहे. त्या सरकारांना योग्य निर्णय घेऊन आपली माणसं सांभाळायला भाग पाडणं ही एक वाट. ते घडत नाही तोवर शक्य तेवढी स्थलांतरीत माणसं सामावून घेणं व कालांतरानं त्यांना त्या त्या देशात परत पाठवणं ही दुसरी वाट.
पृथ्वी हे एक कुटुंब आहे असं म्हणायची पद्दत आहे. ते जर खरं करून दाखवायचं असेल तर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यानं स्वतःला तोशीश लावून घेण्याची तयारी दाखवायला हवी. तसं घडलं नाही तर सीरिया, म्यानमार, सीरिया ही संकटं साऱ्या जगाला खाऊन टाकतील.
वसुधैव कुटुंबकम ही केवळ सदिच्छा न रहाता एक कार्यक्रमही असावा लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *