ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक

ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक

ट्रंपना उघडं करणारं बॉब वुडवर्ड यांचं पुस्तक
वॉटरगेट प्रकरण शोधून काढणाऱ्या बॉब वुडवर्ड यांचं ट्रंपांचे व्हाईट हाऊसमधले दिवस या विषयावरचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं. ट्रंप कसे निर्णय घेतात, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे यावर हे पुस्तक प्रकाशझोत टाकतं.
।।
पुस्तकाच्या सुरवातीच्या पानावर बॉब वुडवर्डनी डोनल्ड ट्रंप यांचा एक वाक्यं अवतरलं आहे. Real power is ….fear.
बळाचा वापर करून, धादांत खोटं बोलून, अवास्तव आणि प्रमाण नाकारणारी वक्तव्य करून समोरच्या माणसाला घाबरवणं हे ट्रंप यांचं वैशिष्ट्यं प्रस्तुत पुस्तकात पानोपानी प्रत्ययाला येतं.
ट्रंपनी निवडणुक लढवायचं ठरवलं त्यावेळचा एक किस्सा वुडवर्ड सांगतात.
ट्रंपनी बॉस्सी या रीपब पार्टीतल्या जुन्या कार्यकर्त्याला, निवडणुक अभ्यासकाला, निवडणूक लढवण्यासाठी काय करावं लागेल याचा सल्ला घेण्यासाठी बोलावून घेतलं.
बॉसी म्हणाले की प्रेसिडेंटची निवडणुक लढवतांना धोरणं महत्वाची असतात. उदा. रीपब पक्षाचा उमेदवार होणार असाल तर तुम्ही गर्भपाताच्या विरोधात असायला हवं. तुम्ही तर गर्भपाताच्या बाजूनं आहात.
ट्रंप म्हणाले, छे, मी कुठं गर्भपाताच्या बाजूनं आहे.
बॉसीनी पुराव्या दाखल ट्रंपची जुनी भाषणं काढून दाखवली.
ट्रंप म्हणाले, मला तर काही आठवत नाही. पण असू दे. आपण ते दुरुस्त करू.
बॉसी म्हणाले की तुम्ही आजवर फक्त एकदाच प्रायमरीमधे मतदान केलं आहे.
ट्रंप म्हणाले, छे, मी तर आयुष्यभर प्रायमरीत मतदान करत आलोय.
बॉसीनी मतदानाचे तपशील रेकॉर्डमधून काढून दाखवले.
ट्रंप म्हणाले, ठीक आहे, काही तरी मार्ग काढू.
बॉसी म्हणाले की तुम्ही रीपब पार्टीच्या तिकिटावर निवडणुक लढवणार म्हणता पण डेमॉ पक्षाला पैसे देता.
ट्रंप म्हणाले, शक्यच नाही. मी कधीच त्याना पैसे दिलेले नाहीत.
बॉसीनी रेकॉर्ड दाखवला. ट्रंपनी दिलेल्या देणग्यात ८० टक्के देणग्या डेमॉना होत्या.
ट्रंप म्हणाले हुंः, त्यात काय बिघडलं. मी धंदा करत असताना ते माझ्याकडं येत, पैसे मागत. न दिले तर ते माझ्या धंद्याच्या आड येतात, म्हणून दिल्या देणग्या. ठीकाय, आपण रेकॉर्ड दुरुस्त करू.
कोमी आणि इतर इंटेलिजन्स विभागांच्या प्रमुखांनी अध्यक्ष ट्रंप यांना एक प्रेझेंटेशन दिलं. त्यामधे रशियानं अमेरिकन निवडणुकीत केलेली ढवळाढवळ आणि ट्रंप यांच्या बाबतीतची माहिती यांचे उल्लेख होते. इंटेलिजन्सच्या लोकांना सुचवायचं होतं की या माहितीचा ब्लॅक मेलिंगसाठी वापर केला जाऊ शकतो.
त्यातली एक माहिती अशी.
ट्रंप रशियात गेले असताना त्यांनी मॉस्कोमधे एक उद्योग केला. बराक ओबामा प्रेसिडेंट या नात्यानं रशिया दौऱ्यावर असताना मॉस्कोमधे एका हॉटेलमधे सपत्नीक राहिले होते. ट्रंप त्या खोलीत काही वेश्यांना घेऊन गेले. ओबामांनी वापरलेल्या बेडवर त्या वेश्यांना लघवी करायला लावलं. या प्रकाराचं नाव ट्रंपनी गोल्डन शॉवर असं ठेवलं.
त्या हॉटेलमधे रशियन सिक्रेट सर्विसनं कॅमेरे आणि साउंड रेकॉर्डर लावले होते. अमेरिकेचा अध्यक्ष कसा वागतो पहा, अमेरिकन निवडणुक पद्धत आणि लोकशाही अशा माणसाला निवडते ते पहा असं ही चित्रं आणि रेकॉर्डिंग सांगू शकतं.
वुडवर्ड म्हणतात की वरील माहिती देणारा माणूस आणि त्याच्या माहितीतला खरेखोटेपणा एफबीआयनं तपासायला हवा होता. माहिती देणाऱ्याची पॉलीग्राफ टेस्ट घेऊन माहितीचा खरेपणा तपासायला हवा होता. माहितीची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी आवश्यक काळजी न घेता माहिती सादर केली असल्यानं ती माहिती कचरा या दर्जाची ठरत होती. एफबीआयचं हे वागणं प्रोफेशनल नव्हतं असं वुडवर्ड लिहितात.
वुडवर्ड यांची विचाराची पद्धत तर पुस्तकात कळतेच पण इंटेलिजन्सनं घिसाडघाईने केलेल्या उद्योगामुळं ट्रंप यांच्या व्यक्तिमत्वाचं एक हीन उदाहरण कसं सिद्ध होणं टळलं तेही कळतं.

नेटो या आंतरराष्ट्रीय संघटनेत रहायचं की नाही हा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी व्हाईट हाऊसमधे संध्याकाळी बैठक होती. अध्यक्ष ट्रंप, परदेश मंत्री, संरक्षण मंत्री या बैठकीत होते. चीफ ऑफ स्टाफनी विषय कार्यक्रम पत्रिकेद्वारे सर्वाना कळवला होता. ट्रंपनी कार्यक्रम पत्रिका पाहिलीच नव्हती. पूर्वतयारी करून, विचार करून बैठकीत भाग घेण्याची सवय ट्रंपना नव्हती. बैठक सुरु झाल्यावर फालतू विषयावर ट्रंप बोलत राहिले. टीव्हीवर पाहण्यात आलेल्या घटनेवरच बडबड करणं अशी ट्रंप यांची सवय होती. येमेनमधे अमेरिकेची फसलेली, फेल गेलेली कारवाई हा त्या दिवशी टीव्हीतल्या चर्चेचा एक गरम विषय होता. सेनेटर मॅकेननी सरकारवर टीका केली होती. ट्रंप त्याच विषयावर बोलू लागले आणि मॅकेनवर घसरले.
ट्रंप म्हणाले ” ..हे मॅकेन. येमेनमधल्या लष्करी कामगिरीबद्दल बोलताहेत. यांना काय अधिकार. स्वतः काय केलं. त्यांचे वडील नौदल प्रमुख होते, त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून मॅकेनना वियेतनामी कैदेतून सोडवून अमेरिकेत परत आणलं, इतर युद्ध कैदी तुरुंगात खिचपत पडले असताना….”
संरक्षण मंत्री जनरल मॅटिसनी ट्रंपना सांगितलं ” सर, तसं घडलेलं नाहीये. मॅकेननी तुरुंगाबाहेर पडायला नकार दिला, तीन वर्षं तुरुंगात राहून त्यांनी शारीरीक छळ सोसला आणि आणि नंतर ते यथावकाश इतरांबरोबरच तुरुंगातून सुटले.”
ट्रंप यांची माहिती किती तोकडी असते आणि माहिती न घेता कसे ते धडाकून खोटं बोलतात याचा हा एक नमुना.
नेटो या विषयावर चर्चा झाली नाही, ट्रंप यांनी अद्वातद्वा नेटो बंद केली पाहिजे असं काही वाक्यांत सांगितलं आणि बैठक संपली.
जनरल मायकेल फ्लिन यांच्याबद्दल सरकारच्या अनेक विभागांचे आक्षेप असतानाही ट्रंप यांनी त्यांना सुरक्षा सल्लागार या महत्वाच्या पदावर नेमलं. यथावकाश प्लिन यांचं बेकायदेशीर आणि राष्ट्रीय सुरक्षेला घातक वर्तन सिद्ध झालं. ट्रंपनी फ्लिनना एका ट्वीटच्या वाटेनं धाडकन हाकलून दिलं.
सुरक्षा सल्लागार हे फार महत्वाचं पद रिकामं ठेवता येत नसतं. ट्रंपनी आपल्या सहकाऱ्याना आदेश दिला, शोधा.
ले.जन. मॅकमास्टर यांचं नाव सुचवलं गेलं. मॅकमास्टर वॉर हीरो होते, बुद्धीमान होते, त्यांनी पुस्तकंही लिहिली होती. मॅकमास्टर हे लढवय्या आणि बुद्धीमान माणूस असं मिश्रण होतं. मॅकमास्टर सैन्यात कार्यरत होते.
ट्रंप यांचे सल्लागार स्टीव बॅनन यांनी मॅकमास्टर यांना सल्ला दिला ” ट्रंपना लेक्चर देऊ नका. त्यांना प्रोफेसर आवडत नाहीत.त्यांना बुद्धीमान माणसं आवडत नाहीत. हा गडी कधी वर्गात लेक्चरला बसला नाही, त्यानं कधी नोट्स काढलेल्या नाहीत. परीक्षेच्या आदल्या मध्यरात्री हा गडी कोणा तरी मित्राच्या नोट्स घेई, कॉफी पीत पीत त्यातलं जेवढं पाठांतर करता येईल तेवढं करी, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता परीक्षेला जाई आणि त्याला सी ग्रेड मिळत असे. असा हा माणूस आहे. तो अब्जाधीश होणारे येवढंच लक्षात ठेव…आणि जाताना युनिफॉर्ममधे जा. ट्रंपला युनिफॉर्म घातलेली माणसं आवडतात…”
मॅकमास्टर एक साधा म्हणजे अगदीच स्वस्तातला सूट घालून ट्रंप समोर हजर झाले.
मॅकमास्टरनी ट्रंपना २० मिनिटांचं लेक्चर मारलं. जगातले अनेक सिद्धांत त्यांनी ट्रंपना सांगितले.
मुलाखत संपल्यावर ट्रंपनी बॅननना विचारलं ” कोण होता हा माणूस ”
बॅनन म्हणाले ” हे होते जनरल मॅकमास्टर.”
ट्रंप म्हणाले ” तुम्ही तर म्हणाला होतात की ते लष्करात आहेत.”
बॅनन म्हणाले ” हो ते लष्करातच जनरल आहेत.”
ट्रंप म्हणाले ” मला तर वाटलं की ते बियर विक्रेते (बियर सेल्समन)
आहेत.”
मॅकमास्टर नापास झाले.
मागोमाग जॉन बोल्टन या एका विद्वान प्रोफेसरची त्या पदासाठी मुलाखत झाली. मुलाखत पाच दहा मिनिटातच संपली.
ट्रंपनी बोल्टनना नापास केलं कारण त्यांच्या मिशा झुडुपासारख्या जाड होत्या.
तरीही पुन्हा एकदा बोल्टन आणि मॅकमास्टर अशा दोघांनाही बोलवायचं ठरलं.
बोल्टन ट्रंप समोर उभे राहिले. त्यांनी मिशा काढलेल्या नव्हत्या. ट्रंपनी त्यांना चार दोन मिनिटातच नापास केलं.
नंतर मॅकमास्टर चकचकीत युनिफॉर्ममधे ट्रंप समोर उभे राहिले.
ट्रंपनी विचारलं ” तुम्हाला हा जॉब हवाय का ”
मॅकमास्टर म्हणाले ” होय.”
ट्रंप म्हणाले “दिला.”
लगोलग ट्रंप म्हणाले ” मिडियाच्या माणसांना बोलवा, मला जाहीर करायचंय.”
मिडिया आला. ट्रंप म्हणाले ” मॅकमास्टर हा ग्रेट माणूस आहे. तो ग्रेट काम करणार आहे याची मला खात्री आहे मी त्याला नेमलं आहे.”
मॅकमास्टर ग्रेट होते हे केव्हां ट्रंपना कळलं? त्यांनी बॅनन किवा कोणाकडूनही मॅकमास्टर यांची फाईल मागितली नव्हती, पाहिली नव्हती.
मॅकमास्टर चुटकीसरखी सुरक्षा सल्लागार झाले.
ट्रंप दररोज ट्वीट करून खोटं बोलतात. त्यांनी दोन वर्षात सत्तावीसशे वेळा असत्य किंवा अर्धसत्य वक्तव्यं केली आहेत हे वर्तमानपत्रांनी सिद्ध केलंय.
बॉब वुडवर्ड यांनी ट्रंप यांचं विस्तृत चरित्र पुस्तकात दिलं आहे. ते सहकाऱ्यांशी कसे वागतात, त्यांचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही, ते उथळ आहेत, ते कधी वाचत नाहीत, लिहत नाहीत, टीव्हीतल्या बातम्या आणि चर्चा हेच त्यांच्या ज्ञानाचं साधन इत्यादी वैशिष्ट्यं उदाहरणं देऊन वुडवर्डनी मांडली आहेत.
ही सारी वैशिष्ट्यं आणि वुडवर्डनी दिलेली उदाहरणं येव्हाना लोकांना माहित आहेत, त्यात नवं काही नाही. या विषयावर अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. वॉशिंग्टन पोस्ट, न्यू यॉर्क टाईम्स, न्यू यॉर्कर इत्यादी पेपरांनी लाखो शब्दांची वार्तापत्रं छापून जनतेला ट्रंप काय आहेत याची ओळख करून दिली आहे. गेली ४६ वर्षं वुडवर्ड प्रेसिडेंट आणि व्हाईट हाऊस कव्हर करत आहेत. वॉटरगेट प्रकरणाची वाच्यता त्यांनी केली होती. त्यांनी आजवर दिलेल्या बातम्या कधी खोट्या ठरलेल्या नाहीत. म्हणूनच त्यांचं प्रस्तुत पुस्तक गाजत आहे.
ट्रंप हा अगदीच बंडल माणूस असूनही त्याला जनतेचा भक्कम पाठिंबा कां मिळतो याचं विश्लेषण वुडवर्ड करत नाहीत. तो विचार वाचकांनी आपला आपण करायचा.
।।

FEAR
TRUMP IN THE WHITE HOUSE
BOB WOODWARD
।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *