मुख्य पात्र कधीच दिसत नाही असा चित्रपट.

मुख्य पात्र कधीच दिसत नाही असा चित्रपट.

दी वाॅर्डन

चित्रपटाला इंग्रजी सब टायटल नाही. चित्रपट इराणी. माणसं काय बोलतात ते कळायला मार्ग नाही. जे पडद्यावर दिसतं तेवढंच पाहून अंदाज बांधायचा. म्हणजे मूकपटच पहायचा म्हणायचं.

या सिनेमाबद्दल मी काहीच वाचलं नव्हतं. अगदी कोरा करकरीत होतो. निखिलेश चित्रे या मित्रानं चित्रपट चांगला आहे असं लिहिलं होतं म्हणूनच पहायला घेतला.

सुरवात होते कुंद वातावरणात पावसात तुरुंगाच्या एका दालनात. फाशीचा फलाट मोडला जात असतो, फाशीचा दोर ज्या खांबाला लटकत असतो तो खांब काढायच्या बेतात काही तुरूंग कर्मचारी असतात.

एक मेजर दर्जाचा वाॅर्डन आहे. एक कर्नल दर्जाचा वरिष्ठ वाॅर्डन येऊन काही तरी सांगतो. मेजर वाॅर्डन कामाला लागतो. तुरूंगाच्या बाहेर पाडकाम करणाऱ्या जेसीबी येऊन उभ्या रहातात. म्हणजे तुरुंग पाडला जातोयसं दिसतं. कैद्यांना बाहेर काढून बसमधे भरलं जातं. बस रवाना होते. दूरवर विमान उभं असतं, तुरुंगावरून विमानं उडत जाताना दिसतात. म्हणजे विमानतळाचा आणि तुरुंग तोडण्याचा काही तरी संबंध दिसतोय.

वाॅर्डन स्पीकर स्सिटीमवरून काही तरी आज्ञा देतो. तुरुंग रिकामा. मग आज्ञा कोणाला? काही तरी लोच्या दिसतोय. 

आता तुरुंगात शोधाशोध होते. काना कोपरा, छप्पर, यंत्रांचे कोपरे असं सारं काही शोधतात. आर्किटेक्टनं तयार केलेला तुरुंगाचा नकाशा पाहून इंचन् इंच जागा शोधतात. अगदी बाॅयलर आणि वाॅशिंग मंशीनंही. 

काय शोधतात? कोणाला शोधतात?

भाषा माहीत नसल्यानं काही कळत नाही.

वाॅर्डन हैराण. बाहेर लोकं थांबलीयत,त्यांना तुरुंग पाडायचाय आणि या शोधाशोधीमुळं ते थांबलेत.

वाॅर्डन एका कैद्याचे कपडे मिळवतो. ते कपडे पोलिसी कुत्र्याला वास घ्यायला देतो. हं. म्हणजे कैदी गायब आहे, त्याला कुत्रा दुनियाभर फिरून शोधून काढणार.

एक तुरुंगातच काम करणारी स्त्री कर्मचारी आहे. ती आणि वाॅर्डन सतत काही तरी बोलतात, वाद धालतात. गायब कैद्याबद्दल असणार. ज्या कोठडीतून कैदी गायब असतो ती कोठडी दिसते. भितीवर चारकोलनं एक चित्र काढलेलं असतं, कैदी आणि त्याच्या मानेभोवती फासाच्या दोराचं. एक स्त्री आणि एक छोटी मुलगी त्या कोठडीत जातात, आक्रंदतात. म्हणजे ही दोघं त्या कैद्याची पत्नी आणि मुलगी.

वाॅर्डन हैराण.

 तुरुंगात वायू सोडला जातो. तुरुंग कर्मचारी मास्क लावून वायूच्या धुरात शोधाशोध करतात. विषारी किंवा धुसमटवणारा वायू असावा. कैदी बाहेर येत नाही. वाॅर्डन हैराण. 

  कैदी गायब, गेला तरी कुठं. तुरूंगात नाही, बाहेरही नाही.

 वरिष्ठ अधिकारी गंभीर चेहऱ्यानं एक लखोटा वाॅर्डनला देतो, बहुदा तंबी असावी. 

वाॅर्डन गाशा गुंडाळतो, जीपन जायला निघतो. परतताना थांबून मागं वळून पहातो. रिकाम्या तुरुंगात त्याला एका माणसाचा आकार दिसतो. अरेच्चा म्हणजे तो कैदी शिल्लक आहे तर. वाॅर्डन वेगानं तुरुंगाकडं परततो.

तुरुंग पाडायला सुरवात झालेली असते. फाशीचा फलाट आणि खांब एका ट्रकवर चढवलेला असतो, ट्रक निघालेला असतो. ट्रकच्या मागोमाग ती तुरूंग कर्मचारी कारमधून जात असते, त्या कारमधे फाशीवाल्या कैद्याची बायको आणि मुलगी असते. आता वाॅर्डन पाठलाग करून ट्रक अडवतो.

वाॅर्डन ट्रकवर चढतो. ट्रकच्या लाकडी फळ्यांमधल्या फटींतून वाॅर्डन दिसतो. आतून बाहेरचं दिसतं, म्हणजे आतून कोणी तरी पहातंय. आता माझी ट्यूब पेटते. फाशीच्या फलाटात तो कैदी लपलेला आहे.

कैद्याची पत्नी, मुलगी आणि स्त्री तुरुंग कर्मचारी फलाटाच्या आत पहातात. आतून हे तिधंही दिसतात. वाॅर्डन रोखून पहातो. पुन्हा पुन्हा.

आतमधे काळोख, कैदी असणार, पण दिसत नाही.

ट्रकवरून खाली उतरतो. जीपपाशी जातो. कैद्याचो कपडे ठेवलेली पिशवी धेतो, ट्रकवर ठेवतो. ट्रकवर थाप मारून ड्रायव्हरला जायला सांगतो.

तुरुंग कर्मचारी स्त्री प्रेमानं आनंदानं वाॅर्डनकडं पहाते, तिनं आभार मानलेतसं वाटतं. कैद्याची पत्नी व मुलगी आनंदीत झाल्यासं दिसतं.

इराणी भाषेत ऋणनिर्देश सरकू लागतात. चित्रपट संपला.

चित्रपट दोनदा पाहिला. नंतर मित्रानं सब टायटल्स पाठवली. त्यातून नंतर समजलं की तो कैदी निष्पाप असतो, त्यानं गुन्हा केलेला नसतो, त्याला अडकवण्यात आलेलं असतं. स्त्री तुरुंग कर्मचारीला ते माहीत असतं, तिनंच त्याला लपवलेलं असतं.

कोणी तरी काही तरी हरवलंय आणि शोधाशोध चाललीय हे पहिल्या तीन चारच मिनिटात कळतं. वॉर्डन, स्त्री कर्मचारी आणि गायब कैदी येवढी तीनच पात्रं महत्वाची, त्यांच्यावर चित्रपट उभा. 

पात्रं फारसी भाषेत बोलतात. आवाज फार क्वचित चढतात. त्यांचे हावभाव, वावर, क्वचित हातवारे यातून काय धडतय याचा अंदाज येतो. हालचाली, हावभाव आणि आवाज याची तीव्रता नाही.

म्हटलं तर हा रहस्यपट. शेवटल्या तीनेक मिनिटात उलगडा होतो. ध्वनीचा वापर नाही.  मी पूर्ण वेळ खुर्चीला खिळून होतो. सिनेमा कधी संपला ते कळलं नाही.

चित्रपट संपल्यानंतर माहिती मिळवली.

निमा जाविदी दिग्दर्शक आहे.

याला म्हणतात सिनेमा.

)(

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *