मुख्यमंत्रीपद हुकलं

मुख्यमंत्रीपद हुकलं

फडणवीस दोनेक तास वर्षाच्या हिरवळीवर येरझारा घालत होते.

थांबेचनात. 

त्यांच्या पुढं मागं करणारे कमांडोही दमले. 

जेवायची वेळ टळून गेली म्हणून अमृता वहिनी देवेंद्रना शोधत होत्या तर त्यांना देवेंद्र हिरवळीवर फेऱ्या मारताना दिसले.

अमृतावहिनीही देवेंद्रांबरोबर फेऱ्या मारू लागल्या. “ आता थांबा, जेवून घ्या, पोट कमी करण्यासाठी इतका अघोरी उपाय करणं बरोबर नाही.”

देवेंद्र ऐकायला तयार नाहीत. वहिनींबरोबर साताठ फेऱ्या झाल्या. वहिनी जायला तयार नाहीत म्हटल्यावर धापा टाकत देवेंद्र म्हणाले, “ तुला समजत कसं नाहीये. तिकडं शरद पवारांनी कट रचलाय. ते उद्धव ठाकरेना आमच्यापासून फोडून सरकार स्थापन करण्याचा घाट घालत आहेत.”

“ मग त्यात काय झालं. या आधीही पवारांनी तो प्रयत्न केलाच होता की. पण तुम्ही पवारांना पटवलंत आणि सरकार स्थापन केलंत. सोपं आहे. तोच डाव आता टाका.” अमृता वहिनी.

“ तुला समजत नाहीये. या वेळी शरद पवारांनी मला गादीवरून उतरवायचं मनावरच घेतलंय. ते माननीय नरेंद्र मोदीजींना भेटले. माननीय मोदीजीना म्हणाले की तुम्हाला पाठिंबा द्यायला मी तयार आहे, फक्त त्या फडणविसाना दूर करा.” फडणवीस.

“ मग?” अमृता वहिनी.

“ मग काय. मला नरेंद्र माननीय मोदीजींचा फोन आला होता, विचारत होते की कुठं माझा त्यांच्या शेपटीवर पाय तर पडला नाही ना. मी म्हटलं की तसं काहीही नाहीये, त्यांचे आणि माझे सौहार्दाचे संबंध आहेत. त्यावर माननीय मोदीजी म्हणाले की अरे त्यांचे दुनियेतल्या सर्वांशीच सौहार्दाचे संबंध असतात, मीही त्याच्या बारामतीच्या घरी जेऊन आलोय. म्हणाले काही कर पण पवारांशी जमवून घे.” फडणवीस.

“ मग? ” अमृता वहिनी.

“ अगं मी पवारांशी संपर्क केला, गप्पा करून त्यांच्याकडून त्यांचा डाव काय आहे ते काढण्याचा प्रयत्न केला. पण पवार ताकास तूर लागू देत नाहीयेत.” फडणवीस.

“ मग? ” अमृता वहिनी.

“ मग काय माझं डोंबल. तुला कळत नाहीये. आपली गादी जातेय. काही तरी केलंच पाहिजे. अगदी पुढल्या काही तासांतच. नाही तर आपण पुन्हा नागपुरात जाणार, संत्री खायला.” फडणवीस.

अमृता वहिनी दमल्या. म्हणाल्या “ फेऱ्या मारून मारून जर तुम्हाला गादी मिळणार असेल तर मारा बापडे फेऱ्या,माझ्याच्यानं फेऱ्या होत नाहीत. मी जाते.”

अमृता वहिनी बंगल्याकडं निघाल्या. दहा बारा पावलं गेल्या असतील नसतील,  फडणवीस जोरात ओरडले.

“ अमृता!  युरेका. युरेका. मी परत येणार.”

अमृता वहिनी थबकल्या. 

“ मी मिरची हवन करणार. कालच कोश्यारी काका मला म्हणाले होते की तुम्ही कशाला येवढी खटपट करताय. कशाला काँग्रेसमधली माणसं फोडण्यासाठी इतकी विमानं आणि गाड्या गोळा करताय. मिरची हवन करा, सारे प्रश्न सुटतील.” फडणवीस.

देवेंद्र थांबले. फेरी बंद झाली. सर्व कमांडो सुखावले. 

“ अमृता, ताट वाढ. मी आलोच.” फडणवीस.

अमृता वहिनी सुखावल्या. लगबगीनं त्या डायनिंग रूमकडे निघाल्या.

फडणविसांनी जाकिटाच्या खिशात हात घातला, फोन काढण्यासाठी. जाकीट पोटावर इतकं घट्टं बसलं होतं की फोनच बाहेर येईना. दोन बटणं काढावी लागली.

फडणविसांनी राजभवनावर फोन लावला.

“ काका, तुम्ही मला  मिरची हवनाचं काही तरी बोलला होतात. त्याची आठवण झाली. काय आहे ते मिरची हवन. ते करायचा बेत आहे.”

कोश्यारी काका पलंगावर उघडे बसले होते. उष्मा फार झाला होता. मुंबईत बारा महिने उन्हाळाच असतो. आपल्याला कुठं या मुंबईत टाकलं असं त्यांना वाटत होतं.  आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून राहिल्यामुळं त्यांना एयरकंडिशनिंगची सवय नव्हती. त्यांनी राजभवनातल्या आपल्या दालनांतलं एयरकंडिशनिंग बंद केलं होतं, पंखा लावून ते उघडे बसत. जानव्यानं पाठ खाजवत स्तोत्र म्हणत असताना फडणविसांचा फोन आला होता.

फडणविसांनी मिरची हवन असं म्हटल्यावर कोश्यारी काका एकदम उठून उभे राहिले.

“ हात्तिच्या. मिरची हवन ना, सोप्पं आहे.  ते करायचं म्हटलं तर मध्य प्रदेशातून महामंडलेश्वर वैराग्यानंदांना बोलवावं लागणार. शिवराज सिंगांना सांगितलं की झालं. मी प्रचारक म्हणून मध्य प्रदेशात होतो तेव्हापासून शिवराजशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. चिंता नका करू.”

“ काका. तुम्ही फोन करणार. वैराग्यानंद स्पेशल विमानानं निघणार, मुंबईला पोचणार. इतका वेळ नाहीये. गळ्याशी आलंय. काही तासांचाच प्रश्न आहे.” फडणवीस.

“ अस्सं. मग काय बरं करता येईल?”  

“ काका शॉर्ट कट सांगा.” फडणवीस.

कोश्यारी विचार करू लागले.

“ काका ते मिरची हवन काय आहे ते मला सांगा. म्हणजे मी त्या हवनाची छोटी आवृत्ती काढेन.”

“ हात्तिच्या. आत्ता सांगतो.” कोश्यारीनी शर्ट आणि कोट घातला. डोक्यावर काळी टोपी चढवली. खुर्चीवर बसले. त्यांनी हवनाची गोष्ट सांगितली.

मिरची हवन म्हणजे यज्ञकुंड करून त्यात मिरच्या जाळायच्या. बगलामुखी मंत्राचा जप करत मिरच्या कुंडात सोडायच्या. बगलामुखी ही देवी शत्रूचा आणि संकटांचा नाश करत असते. सत्य युगात साऱ्या जगाला नष्ट करणारं एक भयंकर वादळ झालं होतं. भगवान विष्णू चिंतित झाले होते. त्यांनी सौराष्ट्रात हरिद्रा सरोवराच्या काठावर जाऊन तप करून भगवतीला संकटातून सोडवण्याची विनंती केली. विष्णूच्या तपानं भगवती प्रसन्न झाली आणि बगलामुखीच्या स्वरूपात प्रगट झाली. बगलामुखीला तीन डोळे होते. तिला चार हात होते. ती सोन्याच्या सिंहासनावर बसली होती आणि तिच्या हातात तलवार होती. या तलवारीनंच बगलामुखीनं वादळ नष्ट केलं. साधारण संकट असेल तर १० हजार बगलामुखी मंत्रजप करून भागतं. संकट मोठं असेल तर १ लाख मंत्रजप करावा लागतो. मंत्रजप आणि बगलामुखीसमोर मिरचीचं हवन. 

गोष्ट सांगितल्यावर कोश्यारी काका म्हणाले “ देवेंद्र तुमचं संकट केवढं मोठं आहे ते सांगा त्यावर जपाची संख्या आणि हवनाचं स्वरूप ठरवता येईल.”

काकांची गोष्ट संपेपर्यंत देवेंद्र डायनिंग टेबलशी पोचले होते, अमृता वहिनी ताट वाढत होत्या.

एका हातात फोन आणि दुसऱ्या हातानं पोळीचा तुकडा आमटीत बुडवत फडणवीस म्हणाले “ काका, संकट मोठं आहे हे खरंच पण तितकंही  मोठं नाही. माननीय  मोदीजी आणि माननीय अमीतजी शहा पाठीशी उभे असल्यानं १ लाखाचा जप करावा लागेल असं मला वाटत नाही. १ हजार जपानं भागेल. प्रश्न आहे यज्ञाचा. किती किलोचा यज्ञ करावा लागेल? ”

कोश्यारी काकांनी टोपी तिरकी करून डोकं खाजवलं.

 “ ते मिरच्यांचं काही सांगता येत नाही. विलासपूरमधे रामटेकडी या गावात नवरात्रीच्या पहिल्या रात्री एक हवन झालं होतं, त्यात ५१ किलो मिरच्या टाकल्या होत्या. दिग्वीजय सिंगांनी यज्ञ केला त्यात ७ क्विंटल मिरच्या टाकल्या. पण बहुदा त्या कमी पडल्या असाव्यात कारण दिग्वीजय सिंग हरले. कमलनाथनंही हे हवन केलं होतं. पण तोही हरला होता. तेव्हां मिरच्या किती टाकायच्या ते माहीत नाही. भगवान विष्णूनं कधी मिरच्या वापरल्याचं पुराणात वाचनात आलेलं नाही.”

देवेंद्र फडणविसांची पोळी संपली. आता काय वाढायचं असं विचारत अमृता वहिनी उभ्या होत्या.

फडणवीस विचारात पडले. हातातला फोन निःशब्द. तिकडं कोश्यारी काका हातात फोन धरून उभे, फडणवीस काय म्हणतात त्याची वाट पहात. कारण नंतर विमान पाठवणं, मोदीजी आणि अमीत शहांना निरोप करणं ही कामं त्यांनाच करायची होती.

मिनीटभर शांततेत गेलं.

“ काका. मी ठरवलंय. नागपुरातलेच एक स्वामी इथं मुंबईत असतात. त्याना मी बोलावून घेतो. आता बाजार तर बंद झालेत, त्यामुळं मिरच्या गोळा करणं कठीण आहे. नव्या मुंबईतल्या बाजारात कोणाला तरी पिटाळतो. जेवढ्या मिळतील तेवढ्या मिरच्या गोळा करतो. इथे माझ्याच बंगल्यावर हवन करूया. तुम्ही याल ना?”

“ येईन की.” कोश्यारी म्हणाले.

अमृता वहिनीनी भात वाढला. एका हातानं तो कालवत फडणविसांनी शेजारी उभ्या असलेल्या माणसाला सांगितलं “  विनोद तावडेंना फोन लावा.”

तावडेंचा फोन झाला. 

अमृता वहिनींनी दोन गुलाब जाम ताटात ठेवले. फडणविसांनी ते खाल्ले. 

समोर उभे असलेल्या ओएसडीना लक्षात आलं होतं की आता आपल्याला हवनाची तयारी करावी लागणार आहे. 

जेवण झाल्यानं जाकिट  घट्ट झालं होतं. दोन बटनं सोडून फडणविसांनी ओएसडीला हवन कुंड तयार करायची सूचना दिली. नागपूरच्या स्वामीना आणायला गाडी पळाली. 

 फडणवीस सुखावले. निश्चिंत झाले.

।।

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीची तयारी चालली होती. फडणविसांनी आवराआवर चालवली होती. 

वर्षा बंगल्यावर फडणवीस खुर्चीवर बसलेले आणि समोर विनोद तावडे उभे.

दोघांचेही चेहरे काळवंडलेले होते.

“ तावडे, तुम्हीच घात केलात.” 

तावडेंना त्यांनी घात केला ते समजेना. ते  थिजले.

“ मी तुम्हाला चाळीस किलो मिर्च्या आणायला सांगितलं होतं. आठवतंय? तुम्ही हिरव्या मिरच्या आणल्यात. मी तुम्हाला लाल मिरच्या आणायला सांगितलं. तर तुम्ही फक्त दहा किलो लाल मिरच्या मिळाल्या म्हणालात. बाजारात लाल मिरच्या नाहीत असं तुम्ही म्हणालात. मुहूर्त टळत होता. म्हणून दहा किलोंचंच हवन करावं लागलं.  परिणाम काय झाला ते तुम्ही पाहिलंत. माझं अजित पवारांबरोबर केलेलं सरकार पडलं आणि उद्धवचं सरकार स्थापन झालं. मी चौकशी केली. बाजारात मिरच्या होत्या. पण तुम्ही चौकशी करण्याची मेहनत घेतली नाहीत. कारण रात्र झाली असल्यानं तुम्ही फार मेहनत करण्याच्या स्थितीत नव्हतात. तुमच्यामुळंच माझी गादी गेलीय.”

तावडेंच्या डोक्यात हज्जार विचार आले होते. कल्लोळ उडाला होता. काय बोलावं तेच त्यांना समजेना.

मान खाली घालून तावडे निघून गेले.

।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *