युद्धातलं वास्तव दाखवणारा ऑस्करवाला चित्रपट

युद्धातलं वास्तव दाखवणारा ऑस्करवाला चित्रपट

सिनेमा. ऑस्कर २०२३.

‘ऑल क्वाएट ऑन दी वेस्टर्न फ्रंट’.

हा पहिल्या महायुद्धाच्या शेवटल्या काळावर आधारलेला जर्मन चित्रपट २०२३ च्या ऑस्कर स्पर्धेत आहे.  चित्रपटाला खंडीभर ऑस्कर नामांकनं आहेत.

पहिल्या महायुद्धातलं जर्मन सैन्य हा चित्रपटाचा विषय आहे.

अलिकडं फ्रेंच, ब्रिटीश, कतारी वाहिन्यांवर जर्मनी, हिटलर, दोन्ही महायुद्ध या विषयावर माहितीपट दाखवले जात आहेत. माणसं मागं वळून महायुद्ध, जर्मनी, हिटलर, ज्यू नरसंहार या विषयांकडं पाहू लागलेत. एकेकाळी या विषयांकडं देशांमधे देशभावनेनं पाहिलं जात असे. अलीकडं देशभावनेच्या पलिकडं जाऊन घटना पाहिल्या जातात.

महायुद्धात ब्रिटीश जिंकले, फ्रेंच जिंकले, जर्मन हरले अशा रीतीनं आता पाहिलं जात नाही. युद्ध झालं आणि त्यात फारफार माणसं मारली गेली. इतिहासाकडं अंतर ठेवून, फार न गुंतता पाहिलं जातं. 

असाच प्रयत्न प्रस्तुत  ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट या चित्रपटात आहे.  याच नावाच्या कादंबरीवर (१९२९) याच नावानं एक चित्रपट १९३० साली झाला होता.

या चित्रपटाची उत्तर कथा दी रोड बॅक या नावानं १९३६ साली चित्रित झाली. क्वाएट फ्रंटमधली तुकडी युद्धावरून धरी परतल्यावर काय घडतं ते या उत्तर कथेमधे दाखवण्यात आलं होतं.

१९७९ साली याच नावानं एक टीव्ही फिल्म करण्यात आली.

स्टीवन स्पिलबर्गनं या चित्रपटातून प्रेरणा घेऊन  सेविंग दी प्रायव्हेट रायन हा युद्धपट १९९८ साली केला, त्या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचं ऑस्कर मिळालं होतं.

आणि पुन्हा हाच चित्रपट २०२२ साली.

१९३० ते २०२२ म्हणजे ९२ वर्षं   चित्रपट वेगवेगळ्या रुपांत निघत असतो यावरून त्या कथेत लोकांना आकर्षित करण्याची किती ताकद आहे ते लक्षात यावं.

१९३० साली हा चित्रपट हॉलिवूडमधे तयार झाला. पहिल्या महायुद्धात भाग घेतलेले माजी सैनिक निर्मात्यानं वापरले. दोन कॅमेरे लावले गेले. एकात इंग्रजी संवाद होते आणि एक कॅमेरा इंग्रजी नसलेल्या देशांसाठी होता. इंग्रजीतर आवृत्ती जर्मनीत पोचली. तेव्हां हिटलरची सत्ता सुरू झाली होती. हिटलरनं आपली गुंडसेना पाठवून थेटरात हा चित्रपट बंद पाडला.  गोबेल्सला कामी लावून हा चित्रपट कसा जर्मनीशी द्रोह करणारा, कसा जर्मनीविरोधी आहे, असा प्रचार हिटलरनं केला.

पहिल्या महायुद्धानंर स्थापन झालेल्या  लीग ऑफ नेशन्सनं (पुढं चालून लीगचं युनायटेड नेशन्स झालं) या चित्रपटाच्या अनेक प्रती विकत घेतल्या, जगभर दाखवल्या. युद्धाची भीषणता पाहून लोकांनी शांततेचा  प्रयत्न करणाऱ्या लीगला मदत करावी अशी लीगची अपेक्षा होती.

चित्रपटाचा नायक आहे पॉल नावाचा एक जर्मन तरुण.

शिक्षकाचं देशप्रेमानं ओतप्रोत भरलेलं भाषण पॉल ऐकतो. जर्मनीचा उज्ज्वल इतिहास आणि भविष्य तो प्रोफेसर दणदणीत भाषणातून ऐकवतो. अशा थोर पितृभूमीसाठी  तरूणांनी प्राण दिले पाहिजेत असं सांगतो. जगभर लोक देशाला मायभूमी मानतात, जर्मनी देशाला पितृभूमी मानते. (सावरकरही जर्मनीचं अनुकरण करून भारताचा उल्लेख पितृभू असा करतात.) 

पॉलचं लग्न व्हायचं असतं. युद्दावरून परतलं की छान जगायची स्वप्नं तो पहात असतो. एक प्रकारची झिंग असते. भरती होतो. त्याला युनिफॉर्म म्हणून  एका मेलेल्या  सैनिकाचे रिपेर केलेले कपडे  दिले जातात. त्याला ते होत नाहीत. बदलून दिले जातात. तेही मेलेल्या सैनिकाचेच.

सैनिकांची प्रेतं चिखलात पडलेली असतात. धान्याची पोती उचलावीत तसे सैनिक ती उचलतात आणि ट्रकमधे फेकतात. नंतर ती प्रेतं गोळा करून त्यांचे बूट, कपडे इत्यादी काढून घेतले जातात. त्या वस्तू धुतल्या जातात, शिवण यंत्रावर दुरुस्त केल्या जातात, नव्यानं भरती झालेल्या सैनिकांना दिल्या जातात.

युद्धात पॉलचं आणि त्याच्या मित्रांचं काय होतं ते चित्रपटात दिसतं. तुटलेले पाय आणि हात. रक्तानं माखलेला चेहरा. चिखलात रांगत जाणं, सर्व अंग चिखलानं माखलेलं. प्रसंगी चिखल प्यायचा. समोरचा सैनिक कोण आहे ते माहितही नाही. तो केवळ शत्रु देशाचा आहे म्हणून त्याला संगिनीनं भोसकायचं. संगीन घुसवायची, बाहेर काढायची, घुसवायची, बाहेर काढायची, घुसवायची बाहेर काढायची. तो सैनिक कोसळेपर्यंत.

एका फ्रेंच सैनिकाला पॉल भोसकतो. उचक्या देता देता त्या सैनिकाच्या तोंडातून आवाज येत असतो. पॉलला ते सहन होत नाही. त्याच्या तोंडात चिखल कोंबून आवाज बंद करायचा प्रयत्न पॉल करतो.  तोडातून आवाज आणि बुडबुडे येतच रहातात. पॉलला सहन होत नाही. तो कानावर हात ठेवून दूर जातो. सैनिक मरत नाही, तोडातून आवाज येतच रहातो. पॉल फ्रेंच सैनिकाकडं परततो. तोंडात कोंबलेला चिखल काढतो आणि चिखलात रुमाल बुडवून ते पाणी  त्या सैनिकाला पाजतो. आपल्या जवळचं गॉझ काढतो, सैनिकाच्या छातीवरच्या जखमेवर बांधतो. त्याच्या खिशातल्या पाकिटातून त्याचा फोटो आणि पत्ता ताब्यात घेतो.  त्याला सॉरी म्हणतो.

सैनिक मेलेले असतात. एक सैनिक येतो. मेलेल्या सैनिकाच्या कोटाचं बटण काढतो. त्याच्या गळ्यातल्या साखळीत एक बिल्ला असतो. बिल्ल्यावर सैनिकाचा नंबर असतो. सैनिक तो बिल्ला अर्धा मोडून सोबतच्या थैलीत टाकतो. मग मरून पडलेल्या पुढल्या सैनिकाच्या जवळ पोचतो.

हे नकोसं होणारं दृष्य स्पीलबर्गनं त्याच्या प्रायव्हेट रायनमधे दाखवलंय.

एका दृश्यात जर्मन सेनानी दिसतो. कित्येक वर्षं जर्मनीनं युद्ध केलेलं नसल्यानं तो वैतागलेला असतो. युद्ध नसेल तर सैनिकाच्या जगण्याला काय अर्थ आहे असं तो म्हणतो.

तह होतो. अकरा वाजता युद्ध थांबणार असतं. जर्मन सेनानी तुकडीला आदेश देतो की अजून तासभर शिल्लक आहे, जा, फ्रेंचांवर हल्ला करा, त्यांना मारा, विजयी होऊन युद्ध थांबवा. युद्ध थांबलंय अशा समजुतीत फ्रेंच सुस्तावलेले   असतात, मरतात.

१९३० साली चित्रपट निर्मितीचं तंत्र अगदीच प्राथमिक होतं. कॅमेरे, ते फिरवण्यासाठी वापरली जाणारी उपकरणं अगदी प्राथमिक होती. सत्यजित रे यांनी कॅमेरा आपल्या कारच्या डिकीमधे ठेवून चित्रीकरण केलं होतं. कथानक आणि सरळ मांडणी यामुळंच प्रेक्षक प्रभावीत होत असे.

२०२२ साली वेस्टर्न फ्रंट चित्रीत केला तेव्हां शक्तीवान कॅमेरे, आकाशातून चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन, चित्रीकरणाची डिजिटल पद्धत आणि चित्रीकरणांतर चित्राचा प्रभाव वाढवण्यासाठी केले जाणारे उपचार यामुळं कधी कधी कथा विसरली जाते, जे दिसतं आणि ऐकायला येतं त्यानंच प्रेक्षक प्रभावीत होतो.अगदी कमी प्रकाशातही कॅमेरा चार फुटावरून जसं दिसेल तसं दृश्य दाखवतो. गुडघ्याखालचा पाय नाहिसा झालंय असं चित्र निर्माण करणं आता नव्या तंत्रज्ञानाला शक्य झालंय. ध्वनीचं तर विचारायलाच नको. डावीकडून, उजवीकडून, मागून, छतातून आवाज येतात. आपण ऐन लढाईत सापडलोय असं वाटतं, रणगाड्याचे आवाज येतात तेव्हां खरोखरच आपली छातीहृदय धडधडतं.

१९२९ सालातलं जगणं उभं करणं हे आव्हान. त्या काळातले कपडे, वाहनं, रस्ते, दुकानं, रणगाडे, बंदुका, सायकली इत्यादी वस्तू उभ्या कराव्या लागतात, तयार कराव्या लागतात. ऐतिहासिक चित्रपट निर्माण करणं कठीण असतं. कला दिक्दर्शकाची कसोटीच असते.चिखलानं माखलेले चेहरे, कपडे, आपल्याला थेट लढाईत नेतात.

काय मिळतं या लढाईतून? कोण किंमत मोजतं? कोणाचा फायदा होतो? 

जर्मन चित्रपट स्वतःच्याच इतिहासात डोकावून असे प्रश्ण विचारतात.

।।

Comments are closed.