सिनेमा. ऑस्कर २०३३. ‘अर्जेंटिना १९८५’

सिनेमा. ऑस्कर २०३३. ‘अर्जेंटिना १९८५’

Argentina 1985.

 Netflix.

ऑस्करच्या यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिना १९८५ हा चित्रपट इंग्लिशेतर भाषांतील चित्रपट या वर्गात नामांकन मिळवून सामिल झालाय. चित्रपट स्पॅनिश भाषेत आहे. १९८५ साली लष्करी अधिकाऱ्यांवर बेकायदेशीर अत्याचारांचा खटला झाला. त्या खटल्यावर चित्रपट आधारलेला आहे.

असंही म्हणता येईल की १९८५ नंतर अर्जेंटिन चित्रपट सृष्टीत नवं युग सुरू झालं. सुमारे शंभर वर्षाचा इतिहास अर्जेंटिन चित्रपट व्यवसायाला आहे आणि १९८५ पर्यंतचे चित्रपट साधारणपणे कोमट म्हणता येतील अशा रुपाचे असत. अर्जेटिना स्वतंत्र झाल्यापासून (१८१६) अर्जेंटिना सतत घालमेलीत अडकलेलं होतं. आर्थिक प्रश्न, क्रांत्या, हिंसा, भ्रष्टाचार अशी संकटं अर्जेंटिनात सतत कोसळत होती. अर्जेंटिनातला मध्यम वर्ग, भद्रलोक, या घालमेलीपासून दूर आपल्याच सुशेगात जगात जगत असे. चित्रपटही सामान्यपणे तसेच असत.  

दी ऑफिशियल स्टोरी (१९८५) आणि सिक्रेट इन देयर आईज (२००९) या दोन नव्या युगातल्या अर्जेंटिन चित्रपटांना इंग्लिशेतर भाषांतील चित्रपटाची ऑस्करं मिळाली. दोन्ही चित्रपट अर्जेंटिनातल्या लष्कर शाहीतल्या भयानक वातावरणाच्या पार्श्वभूमीवरचे होते. दोन्ही चित्रपट अर्जेंटिना लोकशाही उजाडल्यावर झाले.

अर्जेंटिना १९८५ हा Santiago Mitre या दिक्दर्शकाचा चित्रपट वरील म्हटलं तर पोलिटिकल या वर्गातला आहे.

१९७५ ते १९८४ अर्जेटिनात लष्करी सत्ता होती.  सत्तेला जे जे विरोध करतील त्यांच्यावर दहशतवादी, देशद्रोही असा शिक्का मारला जात असे, त्यांची विल्हेवाट लावली जात असे. माणसांना तुरुंगात टाकलं गेलं, त्यांचा छळ करण्यात आला, स्त्रियांवर बलात्कार झाले. अगणीत माणसं बेपत्ता झाली. १९८३ मधे राऊल अल्फोन्सोन अध्यक्ष झाले आणि नागरी, लोकशाही  सत्ता स्थापन झाली. अल्फोन्सोन यांनी लष्करानं केलेल्या अत्याचारांची चौकशी मुलकी कोर्टात केली, लष्करी कोर्टात नव्हे.

त्या चौकशीची कहाणी चित्रपटात सांगितलेली आहे.

चित्रपटाली सुरवातीची  दृश्यं अशी.

दुरून एक तरूण मुलगी एका तरुणाला भेटलीय, ते आपसात बोलत आहेत. एक माणूस हे दृश्य कारमधून पहातो. घरी परततो. पावसानं ओला झालेला कोट काढून ठेवतो. त्याचा दहा बारा वर्षाचा मुलगा येतो. तो बापाला रिपोर्ट देतो की ती मुलगी म्हणजे त्याची बहीण त्या माणसाबरोबर एक तास बारमधे होती.

आई मुलगा व बापामधलं संभाषण ऐकते. म्हणते  ‘तू आपल्या मुलाला त्याच्या बहिणीवर पाळत ठेवायला सांगतोस? आपल्याच मुलीवर आपल्याच मुलानं हेरगिरी करायची? तू आपल्या मुलाला बिघडवतोयस.’ 

 मुलगी आरशात पाहून मेकअप करताना दिसते. बाहेर निधालेली असते. आई विचारते मेकअप करून कुठे जाणारेस.

मुलगी म्हणते मी काय वाट्टेल ते करेन. आपल्या देशात लोकशाही आहे.

Julio strassera हा बाप, सरकारी वकील. त्याची पत्नी, मुलगी आणि मुलगा. ही दृश्यांतली पात्रं.

कुठल्याही देशात,कुठल्याही सामान्य घरात घडेल अशी घटना आणि संभाषण. काहीही नाट्यमय नाही.

आता शेवटली दृश्य पहा. यात Julio strassera हा माणूस टाईप रायटरवर बसून एक निवेदन तयार करतोय. नुकत्याच पार पडलेल्या खटल्यातला निकाल पुरेसा नाही म्हणून अपील करत असल्याचं या पत्रात म्हटलेलं असतं.

हेही दृश्य अगदीच सामान्य. म्हणजे करूण किंवा कसलंच संगीत नाही. Julio strassera याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत. कुठल्याही सामान्य खटल्यात जसं अपील केलं गेलं असतं तसंच अपील असल्यागत.

पण सुरवात ते शेवट या मधल्या १४० मिनिटात जगातली अभूतपूर्व घटना घडून गेलीय. जनतेवर भयानक अत्याचार लादणाऱ्या, हज्जारो लोकांना बेपत्ता करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना मुलकी कोर्टानं जन्मठेपेची सजा दिलीय. लष्करातले सर्वोच्च अधिकारी मख्खपणानं कोर्टात येतात, मख्खपणानं सांगतात की मुलकी कोर्टच आपल्याला मंजूर नाही. देशाला वाटत असतं की काsssही होणार नाही, अपराधी लोक सुटणार. पण तसं घडत नाही.

काहीही अनुभव नसलेले, बिनधास असलेले, नव्या पिढीतले तरूण अपराधांचे पुरावे गोळा करण्यासाठी जाम खटपट करतात. पुरावे संख्येनं आणि दर्जानं इतके मजबूत असतात की शिक्षा अटळ ठरते.

असा एकूण सॉलिड नाट्यमय मामला.

पण दिक्दर्शक सँटियागो मित्र यांनी चित्रपटात दृश्य नाट्य कटाप करून टाकलंय. एक अगदी सर्वसाधारण वकील; सरकारनं कामगिरी खांद्यावर टाकलीच आहे; प्रामाणिक सरकारी अधिकारी म्हणून ती आपल्याला पार पाडायची आहे; अशा अगदी कोरड्या रीतीनं जुलियो खटला उभा करतो. चालवतो.

कोर्टात खटला चालवतांना टेबलावर मुठी आपटणं नाही, छताकडं हात भिरकावत-डोळे गिरकावत केलेलं भाषण नाही, नाट्यमय पॉझेस नाहीत, प्रतीपक्षाचे कंठाळी आक्षेप नाहीत, न्यायाधिशाचं सतत हातोडा आपटणं नाही. लष्करानं केलेल्या अत्याचाराची थरारक दृश्यंही नाहीत.

जुलियो शांतपणे मुद्दे मांडतो. मुद्दे बिनतोड आहेत. कायद्यासमोर सर्व माणसं समान असतात, कायदा सर्वाना लागू आहे, आरोपींनी हे हे गुन्हे केले आहेत. बस.

खटल्यापेक्षा जुलियोच्या कुटुंबातले तणावच जास्त दाखवलेत, तेच अधिक प्रभावी आहेत. गंमतच आहे. एका राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्वाची घटना घडते पण ती एका सामान्य माणसाच्या जीवनाचा एक भाग असते अशी मांडणी. जुलियोची तरूण मुलगी आहे, तिचं प्रेम प्रकरण, ब्रेक अप. एक आगाऊ पण स्मार्ट मुलगा. एक कर्तव्यदक्ष पत्नी. खटला चालत असताना ही चार माणसं एकमेकांशी काय बोलतात ते प्रेक्षकांनी ऐकायचं.

चित्रपटाचा उत्कर्षबिंदू म्हणजे निकाल. सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांनी जन्मठेप. पण हा निकाल कोर्टात अगदीच कमी दाखवलाय. न्यायाधीश एका बारमधे बसून कसा निर्णय घेतात, खटल्याचा निकाल वर्तमानपत्रात येतो,  जुलियोच्या एका टेलेफोन संभाषणात तो जिंकलाय हे  आपल्याला कळतं. किती ननाट्य.

असं सारं असूनही चित्रपट पहावासा वाटतो याचं कारण काय असेल?

जुलियोची भूमिका करणाऱ्या नटाचा अभिनय हे एक कारण असेल. खटला ऐतिहासीक आहे, त्याला आणि घरच्या लोकांना खुनाच्या धमक्या येताहेत. अनुभवी वकील किंवा इनवेस्टिगेटर हाताशी नाहीत. या सगळ्या गोष्टी जुलियोच्या हालचालीत, बोलण्या चालण्यात, चेहऱ्यावर, कुठंही दिसत नाहीत. प्रस्तुत नट प्रदीप कुमारसारखा दिसतो. पण कोरडेपण, मख्खपण हा नटाच्या अभिनयाचा भाग आहे, तो त्याच्या व्यक्तीमत्वाचा भाग नाही. प्रदीप कुमार खांब दिसण्या पलिकडं कोणताच अभिनय करू शकत नाही, तसं या नटाबाबत नाहीये, त्याचं चित्रपटातलं चेहऱ्यावर कोणतेही भाव न येऊ देणं हे त्याच्या कष्टाचा आणि कौशल्याचा भाग आहे. 

एक मध्यमवर्गी, सर्वसामान्य वकील, सरकारी वकील Rocardo Darin यांनी चांगला उभा केलाय.

जेनेट माल्कम या बाई न्यू यॉर्करमधे लिहीत. सामान्य माणसाच्या जीवनातच असामान्य घटना घडतात असं त्या म्हणत, त्यावरच त्यांचं लिखाण आधारलेलं असे. याची आठवण येते.

आशय महत्वाचा, त्याला फार पावडर कुंकू न लावता तो मांडायचा असं या शैलीचं वर्णन करता येईल काय?

ग्रेटांच्या रांगेत हा चित्रपट बसणार नाही. पण त्याच्या वेगळेपणानं तो लक्षात रहायला हरकत नाही.

।।

Comments are closed.