पुस्तक. प्लेगनं मानवी जीवनाला वळण लावलं

पुस्तक. प्लेगनं मानवी जीवनाला वळण लावलं

ब्लॅक डेथ हे पुस्तक २००४ साली प्रसिद्ध झालंय. 

या पुस्तकात १३४७ ते १३५२ या काळात झालेल्या प्लेगच्या महासाथीचा अभ्यास आहे. या कालखंडालाच ब्लॅक डेथचा कालखंड म्हणतात. त्या आधी इसवी ५४१ मधे प्लेगची एक साथ होऊन गेली होती. या दोन्ही साथींचा अभ्यास प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे.  

तुम्ही विचाराल, की चौदाव्या शतकातल्या साथीवरचं २००४ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक आता कां वाचावं?

वाचावं,  कारण त्यातून साथ या आरोग्य संकटातून समाज काय शिकला ते कळतं. नुकतीच कोविडची साथ येऊन गेली आणि समाज त्यातूनही बरंच काही शिकला आहे.

पहिली प्लेगची साथ सुमारे सन ५४१ मधे इजिप्तमधे सुरु झाली, सुदान, इथियोपिया या देशात पसरून भूमध्य समुद्रातून काँन्स्टंटिपोपल (इस्तंबुल) पर्यंत पोचली आणि तिथून ती मजल दर मजल करत फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांच्या वाटेनं युरोपभर पसरली. पटापट  माणसं मरत. हां हां म्हणता माणूस मरे. किती माणसं मेली यावर जाणकारांमधे मतभेद आहेत. पण साधारणपणे तत्कालीन बायझंटाईन साम्राज्याच्या लोकसंख्येच्या ४० टक्के माणसं मेली यावर जाणकारांचं एकमत आहे.

ब्लॅक डेथ या नावानं कुप्रसिद्ध असलेली साथ १३४७ ते १३५२ या काळातली. १३४७मधे प्लेगनं रशियातून सुरवात केली आणि आफ्रिका, पश्चिम युरोप, आशिया, चीन असं जवळ जवळ जगभर प्लेगनं थैमान घातलं. किती माणसं मेली याचा काही पत्ताच लागत नाही. तुकड्या तुकड्यानं लोकांनी नोंदी केल्या, अनुमानं केली. अंदाज पंचे एक तृतियांश युरोप या साथीत मृत्यूमुखी पडलं असं म्हणतात.

रोगाचं मूळ असणाऱ्या उंदीर आणि पिसवांचा नाश करणं, माणसांच्या वस्त्यातून उंदरांचं नियंत्रण करणं हे उपाय; अँटीबायोटिक्सचा वापर; व्यक्तिगत आरोग्य आणि सुरक्षितता या गोष्टी नसल्यामुळं थेट विसाव्या शतकापर्यंत प्लेग होत राहिला. १८९८ ते १९०८ या काळात भारतात प्लेगच्या साथीनं १.२ कोटी माणसं मारली.

पहिली साथ झाली तेव्हां काँस्टँटिनोपलवर जस्टिन राजाचं (कॅथलिक) राज्य होतं. नंतर इस्लामनं ते राज्य काबीज केलं. काळात, त्या जगात (भूमध्य सागर, प.युरोप) ज्यू, इस्लाम आणि ख्रिस्ती असे तीनही धर्म होते. त्या वेळच्या समाजात धर्माचा प्रभाव होता आणि सेक्युलर ज्ञानाकडंही माणसं वळली होती. परंतू विज्ञानाचा उगम झालेला नसल्यानं धर्मापेक्षा वेगळा विचार करणारे सर्व विचार सेक्युलर मानले जात.

इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मजीवीनी प्लेगचे खुलासे केले आणि बहुतांशी खुलासे देवानं दिलेली शिक्षा आहे अशा स्वरूपाचे होते. ख्रिस्ती धर्माचा आधारच   माणसानं पापं केल्यामुळं देवानं त्याला पृथ्वीवर धाडलंय असा होता. त्यामुळं पापाची शिक्षा असं या साथीचं रूप होतं. इस्लामी धर्मजीवी सांगत होते की देव सारं काही करतो त्यापाठी देवाचा काही एक विचार असतो. म्हणून देवानं काही तरी विचार करून ही शिक्षा धाडलीय. इजिप्तमधल्या इस्लामी धर्मजीवींनी सांगितलं की स्त्रिया नीट वागत नाहीत, बुरखा पांघरत नाहीत, रस्त्यांवर फिरतात, त्यामुळं पुरुष चळतात, हे सारं पाप आहे आणि देवानं त्यासाठी ही शिक्षा दिलीय.स्त्रिया नीट वागल्या की रोगराई दूर होईल असं धर्मजीवींचं म्हणणं.

माणसं, माणसांची पापं, दूषित हवा ही रोगाची कारणं आहेत मुद्द्याभोवती प्लेगचा विचार घोटाळत राहिला. जंतुंमुळं रोग होतात आणि जंतू नष्ट करता येतात व त्या वाटेनं रोग नियंत्रण करता येतं हे माणसाला कळलेलं नव्हतं. ते कळण्यासाठी आवश्यक आधुनिक विज्ञान निर्माण व्हायला सोळावं शतक उजाडावं लागलं.

युरोपमघे ख्रिस्तीनी ज्यूवर  राग काढला. ज्यूंच्यामुळं रोग पसरतो असं त्यांनी सांगितलं. गावोगाव ज्यूंच्या वस्त्या जाळण्यात आल्या.

उपासना, प्रार्थना, प्रायश्चित्त इत्यादी मार्ग धर्मजीवींनी सांगितलं. धर्मजीवी नसलेल्यांनी शरीरातून विशिष्ट ठिकाणी रक्तस्त्राव घडवाव जेणेकरून दुषीत रक्ताबरोबर रोगही जाईल असे प्रयोग केले. काहींनी अंगावर मातीचे लेप लावायला सांगितले. पण प्रामुख्यानं जिथं साथ पसरलीय ती ठिकाणं सोडून दूर निघून जा या उपायावर भर होता.

ब्लॅक डेथ साथीनंतर युरोप हादरलं. युरोपची आर्थिक घडी विस्कटली, नवी घडी समाजानं बसवली. धर्मव्यवस्था, राज्यव्यवस्था यात खूप बदल झाले. धर्म आणि राज्य यातील संबंध नव्यानं घडले, धर्म आटोक्यात आला. कला, साहित्य, विज्ञान या क्षेत्रांत नवा विचार जन्माला आला, प्रबोधनाला या साथीनं वाट करून दिली. 

आधुनिक जगाच्या उदयाचं ब्लॅक डेथ हे एक प्रमुख कारण आहे असं म्हणायला वाव आहे.

लोकांमधली प्रतिकारशक्ती, उंदीरच नाहिसे  होणं, उंदरांमधली प्रतिकारशक्ती वाढणं इत्यादी कारणांमुळं प्लेग ओसरत असे पण कालांतरानं तो पुन्हा डोकं वर काढत असे. जगभर त्यामुळं काही काळाचं अंतर ठेवून प्लेगची साथ येतच राहिली. थेट विसाव्या शतकापर्यंत प्लेग होत राहिला. १८९८ ते १९०८ या काळात भारतात प्लेगच्या साथीनं १.२ कोटी माणसं मारली.

१८९६ साली हाँगकाँगमधे प्लेग झालेला पहिला रोगी डॉक्टरांनी बरा केला. स्विस संशोधक अलेक्झांडर येरसिन याला घटनेचं श्रेय आहे. हा स्विस संशोधक प्लेगचा पाठलाग करत वियेतनाममधे गेला, तिथं त्यानं प्लेगचे जंतू शोधले आणि उपचाराचे प्रयोग केले आणि शेवटी त्याच्या प्रयोगांना हाँगकाँग आणि भारतात यश मिळालं.

प्रस्तुत पुस्तकात प्लेगचा सर्व बाजूंचा इतिहास सप्रमाण मांडलेला आहे. सहावं ते एकोणिसावं असा १४ शतकांचा धावता आढावा पुस्तकात आहे. प्लेग या विषयावर औषधोपचार, अर्थ, राज्य, धर्म इत्यादी अंगांनी झालेलं संशोधन आणि विचार पुस्तकात आहे. इतिहासकार, डॉक्टर्स, संशोधक, कवी, लेखक, राज्यकर्ते यांचे संदर्भ पुस्तकात जागोजागी  येतात. या व्यक्तींवर छोटी टिपणं पुस्तकात परिशिष्टात आहेत. इतिहासकार, लेखक, पोप, डॉक्टर्स यांनी त्या त्या काळात अभ्यास केले, नोंदी केल्या. त्या नोंदी लिखित स्वरूपात पहायला मिळतात. अशा त्या काळाचं तपशीलवार वर्णन करणाऱ्या दस्तैवजांची नोंद परिशिष्टात आहे.

सुमारे पावणे तीनशे पानाचं पुस्तक कॉलेजात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे. परंतू पुस्तकाची शैली इतकी प्रवाही आहे की कोणाही माणसानं हे पुस्तक सहज वाचावं.

पुस्तक ब्लॅक डेथ म्हणजे प्लेग या विषयावर आहे पण त्यात चौदाशे वर्षांचा धावता इतिहास आहे. आज जग आधुनिक झालंय म्हणजे काय घडलंय याची चांगली कल्पना या पुस्तकामुळं येते. शाळा कॉलेजातला अभ्यास नीरस असायचं कारण नाही किंवा तो केवळ परीक्षेत  गुण मिळवायसाठीच असायला पाहिजे असंही नाही. अभ्यास रंजकही असू शकतात हे हे पुस्तक दाखवतं. 

।।

प्लेगचा मानवी मनावर परिणाम.

रोगराईला जंतू कारणीभूत आहेत हे समजल्यावर माणसाच्या विचारात फरक पडला. हे जंतू मारता येतात, टाळता येतात हे माणसाला प्रयोगांती समजलं. त्यामुळं देवबाप्पाचं काही खरं नाही, देवबाप्पाला मापात घ्यायला हवं असं लोकांना वाटू लागलं, लोकांच्या वर्तनात फरक पडला. 

 ।।

THE BLACK DEATH

Joseph P. Byrne

GREENWOOD PRESS.

Comments are closed.