वाSSळवी, वाSSळवी.

वाSSळवी, वाSSळवी.

वाळवी.

वाळवी हा परेश मोकाशी यांचा चौथा चित्रपट.

माध्यमांत या चित्रपटावर जोरदार चर्चा चाललीय. चित्रपटाला लेबलं लावली जातायत. कॉमेडी, रहस्यम कॉमेडी, ब्लॅक कॉमेडी.

पहाणाऱ्याचा जसा अनुभव, दृष्टी, जगणं, तसं लेबल.

सुरवातीला एक काहीसं अशक्त मार्केटिंग झालं.तेही चुकीचं. पोस्टर केलंय ते इतकं बंडल आहे की त्यावरून काही पत्ता लागत नाही. एका कोचावर तिघं बसलेत आणि त्या कोचाचा एक पाय मोडलाय आणि तिघं कोसळत आहेत. किती निर्बुद्ध.

 मराठी चित्रपट आहे, मराठी माणसानं तो उचलून धरला पाहिजे, आपण मराठी माणसंच मराठीच्या कसे विरोधात असतो असा मजकूर  माध्यमात आला. नंतर चित्रपटाची भलामण आली. नंतर चित्रपटात काय कमी आहे यावर चर्चा झाली.

मराठी माणूसच तो. सिनेघराकडं सरकला नाही. काही लोकांनी चित्रपट पाहिला. सिनेघरात हशे पिकत होते, लोकं बोलून आणि हसून प्रतिक्रिया व्यक्त करत होते.सिनेमाघराचे  डोअर कीपर संधी मिळाल्यावर आत डोकावत असतात. त्यांना लोकांच्या प्रतिक्रिया कळल्या न् वाटलं की चित्रपट बरा आहे, लोकांना आवडतोय. दुसऱ्या दिवशी गर्दी वाढली. तिसऱ्या दिवशी आणखी गर्दी झाली. तीन दिवसांसासाठी लावलेला चित्रपट आठवडाभर दाखवला गेला.

बाहेर पडताना लोक आपसात बोलत होते. लगोलग सेलफोनवर मित्रांना, मैत्रिणीना, समानवयस्क लोकांना मेसेजेस करत होते.

चित्रपट चांगला असेल तर कालांतरानं तो लोकप्रीय होतो. शोले नाही का सुरवातीला साफ पडला होता. नंतर लोकांना तो पटला आणि काही काळानं हिटच नव्हे तर एक ऐतिहासीक गल्ला जमवणारा चित्रपट ठरला.

व्यावसायिक, हौशे काहीही म्हणोत, शेवटी प्रेक्षक स्वतःच्या अकलेनं चित्रपट मोजतो. 

तर वाळवी दणकून नाही पण चाललेला दिसतोय.

हा ॲबसर्ड सिनेमा आहे. 

ॲबसर्ड या शब्दाला अनेक छटा आहेत. विचित्र, विक्षिप्त, चक्रम, तर्काला न पटणारं, काय वाट्टेल ते, कार्यकारण संबंधांचा पत्ता नाही, नीती अनिती आणि योग्य अयोग्य याच्याशी संबंध नाही, पाप आणि पुण्य वगैरे शब्द चित्रपटाच्या शब्दकोशात नाहीत. म्हणजे ॲबसर्ड. 

समोर जे घडतं त्याला प्रश्न विचारायचे नाहीत आणि असं कसं घडू शकतं वगैरे विचार डोक्यात आणायचे नाहीत.

वाळवी हा चित्रपट वरील प्रश्न वगैरे मनात आणायला वावच ठेवत नाही, सटासट पुढं सरकतो, काय घडलं याचा विचार करेपर्यंत नवीनच काही तरी घडतं. काय होईल याचा विचार प्रेक्षक करू लागतो आणि तिसरंच काही तरी घडतं.

एक उद्योगी आणि त्याची मैत्रिण, प्रेयसी. उद्योगी माणसाच्या पत्नीला ठार मारण्याचा कट रचतात. आत्महत्येचं नाटक करायचं, पत्नी मरणार, पती वाचणार.

प्रचंड तपशीलवार नियोजन करतात. असं नियोजन फक्त शेरलॉक होम्स किंवा डिटेक्टिव करू शकतो. डेंटिस्ट (प्रेयसी) असा विचार करू शकेल काय असा प्रश्न विचारायचा नाही.

डेंटिस्ट बाईला बंदुक कशी वापरावी, सायलेन्सर कसा वापरावा इत्यादी गोष्टी नाणावलेल्या पोलिस अधिकाऱ्यासारख्या माहित. डेंटिस्ट बाईला तिच्या अभ्यासक्रमात गुन्हा हा विषय शिकवला होता काय असा प्रश्न विचारायचा नाही. विचार करेपर्यंत ते दृश्य नाहिसं होतं, त्या जागी डोक्याला ताप देणारं नवं दृश्य सुरु होतं.

उद्योगी पोलिसांना सांगतो की त्याचं पिस्तूल हरवलंय.बस.अर्ध्या मिनिटात तक्रार दप्तरी दाखल, मंजूर.भारत नावाच्या देशात  पोलिस इतके धडाधड काम करतात काय असा प्रश्न विचारायचा नाही.

एका बाईचा आधीच खून झालेला असतो. पुन्हा दुसरा माणूस खून करतो. त्या प्रेताची विल्हेवाट लावायला माणसं निघतात. त्या खटाटोपात आणखी एक खून करतात. आणखी एक खून करतात. असे तीन खून आणि विल्हेवाटीची समस्या.  

विल्हेवाट लावायला निघालेल्या मंडळींमधे एक सायकियाट्रिस्ट आहे. त्याच्या घरात कुदळ आणि फावडं आहे. तो लीलया खड्डा खणतो. अरे हा सायकियाट्रिस्ट आहे की शेतमजूर असा प्रश्न विचारायचा नाही. तो विचार मनात ठसेपर्यंत चार नवी दृश्यं पुढं सरकलेली असतात.

ॲबसर्ड चित्रपटाची हीच तर गंमत आहे.

चित्रपटाचा शेवट तर कायच्या कायच अकल्पित. गंमत म्हणजे टाळक्यात दांडकं घालावं तसा शेवट होतो आणि श्रेयफलक सुरु होतो.

 शुद्ध मराठीत बोलायचं तर येडझवा प्रकार. 

खून. एक खून. दुसरा खून. तिसरा खून. विल्हेवाट. या सर्वाचं प्लॅनिंग. ते फसत जातं. तिसरंच काही तरी होत रहातं. गुंतलेली माणसं आपसात भांडत रहातात, एकमेकाचं वाभाडे काढत रहातात. काय न् काय. 

रहस्य आहे. गुन्हा आहे. काहीसा थरार आहे. माणसांचे आपसातले संबंध आहेत. पण सर्व गोष्टी चक्रमपणानं एकत्र गुंफलेल्या आहेत. 

जाने भी दो यारो हा चित्रपट आठवून पहा. त्यातही एक प्रेत असतं आणि ते पळवण्याचा खटाटोप चाललेला असतो. 

जाने भी दो यारोमधे प्रेताची पळवापळव चालली असताना देशातल्या भ्रष्टाचाराकडं लक्ष वेधलं जातं. ॲबसर्डिटीसोबत एक संदेशही.

सतीश आळेकरांच्या महानिर्वाणात आणखीनच धमाल. भाऊराव नावाचा माणूस मेलाय आणि तरी तो जमा झालेल्या लोकांशी बोलतो.  हसवता हसवता आळेकर समाजातल्या चालीरीती, त्यातला फोलपणा, भारतीय समाजातला दंभ इत्यादीवर भाष्य करत जातात. 

वाळवीमधे संदेश बिंदेश काही नाही.भारतीय रस्त्यावरची वाहतूक, लोकांची घाण करण्याची, अव्यवस्था माजवण्याची सवय, देशाची भरमसाठ वाढलेली लोकसंख्या, लोकांची दारू पिऊन गाडी चालवण्याची सवय अशा गोष्टीवर एकेका वाक्याचे ताशेरे आहेत. ताशेरा गंभीर, इंटलेक्चुअल माणूस गंभीर चेहरा करून मारेल असा पण माणसं तो खून-विल्हेवाट वगैरे चाललेलं असताना मारतात.प्रसंग काय, ताशेरे काय.

चित्रपट म्हणजे पट, म्हणजे कापड. त्यात एकादा विचाराचा मुख्य धागा नाही. हे विशेष.

लाह्या फुटाव्यात तशी छोटछोटी वाक्यं फुटत जातात.  लक्ष देऊन संवाद ऐकावे लागतात.

कास्टिंगही चांगलं आहे, नट मंडळी मजा आणतात.

एकही गाणं नाही.  सरळ एका ओळीचं कथानक.  पावणेदोन तास कसे जातात कळत नाही.

प्रत्येक माणूस आपल्या पद्धतीनं चित्रपट पहात असल्यानं त्याला त्यात काही त्रुटी, फटी दिसणं शक्य आहे. सत्यजीत रे, बर्गमन, कुरोसावा अशा उस्ताद मंडळींच्या चित्रपटातलेही दोष सांगितले जातात. ते समजण्यासारखं आहे. पण दोष दाखवून झाल्यावर, अपेक्षा बाळगून झाल्यावरही, शेवटी चित्रपट उरतो, तो पहाण्यालायक चांगला चित्रपट आहे हे उरतंच. तसंच वाळवीबाबत व्हायला हरकत नाही. 

वाळवीचं नाटक होणं सहज शक्य आहे. चित्रपट पहातानाही अनेक वेळा वाटलं की अरे हे तर पडद्यावरचं नाटक आहे. विशेषतः त्यातल्या संवादामुळं. बहुतेक काळ दोघं, तिघं आपसात बोलत असतात. नाटकासारखं. काही कथानकं अशीच जमलेली असतात, ज्याचं नाटक, सिनेमा असं काहीही होऊ शकतं.

फादर नावाचं एका स्मृतीभ्रंश झालेल्या वृद्धावरचं नाटक होतं. त्याचा सिनेमा झाला. त्याचं पुन्हा नाटकही झालं. नसिरुद्दीन शहानी ते नाटक केलं होतं, त्यातली केंद्रीय भूमिकाही नसीरुद्दीन शहांनी  केली होती.

परेश मोकाशींचाच एलिझाबेथ एकादशी हा सरळ चित्रपट होता. दोन धडपड्या मुलांची गोष्ट होती. एकादशीचं चित्रीकरण बहारदार होतं. पंढरपूर या गावातली एकाला एक चिकटून आसलेली घरं मोकाशींच्या कॅमेरामननं फारच सुंदर टिपली होती. त्या चित्रपटातल्या सर्व भूमिकाही छान वठल्या होत्या. मोकाशींच्या (मधुगंधा कुलकर्णी यांच्या) पटकथा घट्ट विणलेल्या असतात. गोष्ट सरसर सरकत जाते. हे सरकणं कॅमेरा आणि संकलन या दोन्ही डिपार्टमेंटमधे नीट सांभाळलं जातं.

परेश मोकाशीनी हरिश्चंद्राची फॅक्टरी, चि व सौ.कां, हेही चित्रपट केले आहेत. त्यांनी नाटकांत आणि चित्रपटात अभिनयही केला आहे. दोन्ही कलाप्रकारांतले सर्व घटक हाताळण्याचा अनुभव त्याना आहे हे चित्रपट पहाताना कळतं.

मराठीत असा चित्रपट झालेला दिसत नाही. 

।।

Comments are closed.