पुस्तक: पहिल्या दिवशी १८ लाख प्रतींचा खप.

पुस्तक: पहिल्या दिवशी १८ लाख प्रतींचा खप.

Spare.

Prince Harry

Penguin

400 pages.

।।

ब्रिटीश युवराज हॅरी यांचं स्पेअर हे आत्मचरित्र बाजारात पोचलंय. इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकानं या चरित्राचं वर्णन धांगडधिंगा या शब्दात केलंय. घांगडधिंगा करमणूक करतो, बस, तेवढंच.

दी इकॉनॉमिस्ट ब्रिटीश असल्यानं त्यांना ब्रिटीश राजा, राजवाडा, राजमुकूट इत्यादी गोष्टी घरच्याच आहेत, परिचित आहेत.  त्यांना राजवाड्याबद्दल हॅरीनं घातलेला धांगडधिंगा नवं काही सांगत नाही, पण इतरांना त्यातून काही गोष्टी नव्यानं कळतात, ठसतात.

आत्मचरित्र हॅरीनं लिहायला घेतलं तेव्हापासूनच गाजत होतं. 

हॅरीचं आणि राजाड्याचं वाकडं होतं. हॅरीचा मोठा भाऊ युवराज विल्यम्स याच्याशीही हॅरीचं भांडण होतं. राणीनं म्हणजे आज्जीनं हॅरीचे सर्व किताब काढून घेतले होते. पित्यानं म्हणजे राजा चार्ल्सनं हॅरीला पैसे देणं बंद केलं होतं. 

तेव्हां हॅरी काही तरी दणदणीत लिहिणार, धमाल उडवणार अशी अटकळ लोकांनी बांधली होती.

हॅरीनं ज्या गोष्टी अनेक वेळा सांगितल्या आहेत त्याच पुस्तकात आहेत, थोडेसे तपशील आहेत येवढंच. पुस्तकात नवी माहिती नाही. हॅरीचं मद्यपान, हॅरीचं ड्रगसेवन, हॅरीच्या मैत्रिणी, हॅरीची मौजमजा आधीच पेपरांनी  छापली आहे, तेच या पुस्तकात आहे.

पुस्तक प्रसिद्ध झालं तेव्हां  पहिल्याच दिवशी युकेमधे ४ लाख प्रती खपल्या आणि अमेरिका व जगात इतरत्र १४ लाख प्रती संपल्या.

पुस्तकात काय आहे?

राजघराण्यातल्या, श्रीमंत माणसांना,  किमान दोन मुलगे हवे असतात. समजा मोठ्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर दुसरा मुलगा वारस म्हणून हाताशी हवा असा हिशोब ही माणसं करतात. पहिला मुलगा वारस असतो आणि दुसरा मुलगा स्पेअर म्हणजे राखीव असतो. सगळं कौतुक, अधिकार इत्यादी मोठ्या मुलाच्या वाट्याला येतात, दुसरा मुलगा कायम राखीव रहातो, दुय्यम रहातो. वारस आणि राखीव यांच्यात तणाव जन्मतात, टिकतात.

हॅरीच्या जन्माच्या वेळीही त्याच्या वडिलांनी त्याचं राखीव म्हणूनच स्वागत केलं. हॅरीचं दुःख असं की त्याला कायमच दुय्यम वागणूक दिली गेली. पुस्तकाचं शीर्षकही स्पेअर, राखीव असं आहे.

युवराज हॅरी (जन्म १९८४)चं एक धावतं चरित्र या पुस्तकात आहे, हॅरीनं सांगितलंय, J. R. Moehringer यांनी शब्दांकन केलंय. मोरिंगर नाणावलेले पत्रकार आणि लेखक आहेत, त्यांनी टेनिसपटू आंद्रे आगासी आणि नायकी या ब्रँडचे निर्माते फिल नाईट यांची चरित्र लिहिलीत. मोरिंजर स्पेअरचे घोस्ट रायटर आहेत, लेखक आहेत. हॅरीनं सांगितलं, मोरिंजरनी लिहिलं.

हॅरीची आई डायना. तिचं आणि हॅरीच्या वडिलांचं पटलं नाही. डायनाचं वैवाहिक जीवन उध्वस्थ होतं. हॅरीनं ते सारं पाहिलं होतं. हॅरी डायनात फार गुंतला होता. डायनाच्या वाटेला आलेली अवहेलना हॅरीनंही अनुभवली. हॅरीला राजवाड्यानं झिडकारलं, माध्यमांनी झोडपलं, ब्रिटीश समाजानंही अव्हेरलं. हॅरी डेस्परेट झाला. डेस्परेट जगला, जगतोय. ते सारं या पुस्तकात आलंय. आपल्या नशीबी जे काही आलंय त्याला माध्यमं जबाबदार आहेत, आपला भाऊ आणि राजवाड्यातल्या लोकांनीच आपल्या विरोधात कट केला, माध्यमांत माहिती पेरलीय असं हॅरी या पुस्तकात उदाहरणं देऊन सांगतो. 

  हॅरीला बिनभिंतींच्या जगात वावरायला आवडत असे. हॅरीला शेक्सपियर बोअर वाटत असे, शेक्सपियरची भाषा खूप अवजड आहे असं त्याला वाटत असे, त्याला स्टाईनबेक हा अमेरिकन कादंबरीकार आवडत असे. हॅरी पुस्तकालयात आणि पुस्तकात रमला नाही.

हॅरी शालेय वयात धूम्रपान, मद्यपान करत असे. वीड म्हणजे ड्रगची सवय त्याला शाळेपासूनच होती. भावाची नजर, मास्तरांची नजर चुकवून हॅरी ते उद्योग करत असे. शाळेत असतानाच एका मध्यम वयीन बाईशी संग करून हॅरीनं आपलं कौमार्य संपवलं होतं.  

भरपूर मैत्रिणी, पार्ट्या, धम्माल.

एक सॉलिड किस्सा. ‘पूल’ खेळ. त्याचा नियम असा की खेळताना एक खेळी हरली की एक कपडा अंगावरून उतरवायचा. शेवटी पूर्ण नागडं होण्याची पाळी हरणाऱ्यावर येत असे. मैत्रिणींबरोबर तो खेळ हॅरीनं केला. मैत्रिणीनी हॅरीचे फोटो काढले. अंगात शर्ट नसताना. खाली बहुदा चड्डी होती. पण फोटोत तो उघडा दिसत होता. मुलीनी तो फोटो इन्स्टाग्रॅम इत्यादी ठिकाणी टाकला. करोडो लोकांनी उघडा हॅरी पाहिला आणि नाना तर्क लढवले की फोटो काढल्यानंतर हॅरीची चड्डीही कशी गेली असेल, तो कसा पूर्ण नागडा झाला असेल.

 हॅरीनं इराक आणि अफगाणिस्तानात युद्धात भाग घेतला.  तो आफ्रिकेत   वन्य प्राण्यांत रमला, तो धाडसी होता.  आफ्रिकेतल्या अनाथ आणि प्रकृतीनं मार खालेल्ल्या मुलांसाठी त्यानं भरपूर वेळ दिला, त्यांच्या कल्याणासाठी खूप पैसे उभे केले.

हॅरीची तीन चार प्रकरणं आणि ब्रेक अप झाले. मेगन मर्कल हिच्याशी लग्न जुळलं तिथून सारी गडबड सुरु झाली. मोठा भाऊ, वहिनी, वडील, राजवाड्यातली मंडळी त्याच्या विरोधात होती. कारण मर्कल अमेरिकन होती आणि तिची आई आफ्रिकन होती. हॅरीच्या लग्नात त्या मंडळींनी खूप अडथळे आणले.  त्या लग्नामुळंच, झालेल्या छळामुळंच हॅरीनं राजवाडाच नव्हे तर ब्रीटन सोडलं.

हॅरीचं मानसीक स्वास्थ्य बिघडलं होतं.त्याला मानसोपचार घ्यावे लागले. त्याचा उपयोग झाला नाही.

  माध्यमं हात धुवून त्याच्या मागं लागली होती.   त्याची स्त्रीमैत्री, पार्ट्या, ड्रग, मद्यपान या बद्दल सतत मजकूर येत असे. कित्येक वेळा या मजकुरात सत्य नसे. हॅरीनं पुस्तकात अनेक ठिकाणी लिहिलंय की पेपरांनी त्याच्या आयुष्याची वाट लावली. पेपरांवरचा, पत्रकारांवरचा राग पुस्तकभर पसरलेला आहे.

  राज घराणं आणि ब्रिटीश माध्यमं वंशद्वेषी आहेत, त्यांना अमेरिकन-आफ्रिकन स्त्री राजघराण्यात आलेली आवडत नसल्यानं ती सर्व मंडळी आपल्याला छळतात असं हॅरीचं म्हणणं आहे.

आपलं म्हणणं पेपर छापत नसल्यानं आपली बाजू मांडण्यासाठी आपल्याला पुस्तक लिहावं लागलं असं हॅरीचं म्हणणं आहे. वडील, भाऊ आपल्यापासून दुरावले आहेत, त्यांच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज आहेत, ते या पुस्तकामुळं दूर व्हावेत आणि आपण पुन्हा गुण्यागोविंदानं नांदावं अशी हॅरीची इच्छा आहे.

पण ते जमेल असं वाटत नाही, कारण त्यांची बदनामी करणारा खूप मजकूर पुस्तकात लिहिलेला आहे.

पुस्तकाची भाषा छान आहे, खेळकर आहे. छोटी वाक्यं आहेत. ब्रिटीश लोकांची कंटाळवाणी शैली पुस्तकात नाहीये. जे काही म्हणायचं ते हॅरीनं थेट म्हटलंय.  

  हॅरी एक रांगडा माणूस आहे.  तो भरपूर चुका करतो आणि चुकांचं खापर इतरांच्या माथ्यावर फोडतो. नीती आणि कायदा या गोष्टी त्याला कळत नाहीत.आपलंही काही चुकलंय असं त्याला वाटत नाही, जुळवून घेण्याची त्याची इच्छा दिसत नाही.गुणावगुणांचं एक स्फोटक आणि बालसुलभ मिश्रण त्याच्या व्यक्तिमत्वात आहे हे पुस्तकातून जागोजागी दिसतं.

राजवाडा ही शेकडो वर्षांपासून तयार झालेली चाकोरी या पुस्तकात कळते. राजवाड्याच्या चार भिंतीत खूप घडत असतं पण ते बाहेर येत नाही.प्रस्तुत पुस्तकातून राजवाडा काहीसा कळतो.   

 ब्रिटीश जनतेला पुस्तक आवडलेलं नाही. 

पुस्तक  वाचनीय आहे.

।।

Comments are closed.