सिनेमा. एका महिला युद्ध बातमीदाराची थरारक गोष्ट

सिनेमा. एका महिला युद्ध बातमीदाराची थरारक गोष्ट

एका महिला युद्ध बातमीदाराची थरारक गोष्ट

ए प्रायव्हेट वॉर

।।

चित्रपटाचं नाव आहे ए प्रायव्हेट वॉर.

चित्रपटातलं मुख्य पात्र आहे मेरी कोल्विन. ती बातमीदार आहे. लंका, इराक, अफगाणिस्तान, सीरिया इथली युद्धं तिनं कव्हर केलीयत. ऐन युद्धात ती रणात जाते आणि तिथल्या बातम्या लिहून किंवा टेलेफोनवरून पाठवते. 

२००१ मधे मेरी लंकेतल्या यादवीत जाते तिथं चित्रपट सुरु होतो आणि २०१२ साली सीरियात होम्स या गावात झालेल्या हल्ल्यात मरते तिथं चित्रपट संपतो.

मेरी कोल्विन ही हाडीमाशी खरीखुरी व्यक्ती होती. जन्मानं अमेरिकन, ब्रीटनमधल्या पेपरांसाठी (सीएनएन, बीबीसी टीव्हीसाठीही) बातम्या आणि वार्तापत्रं लिहिली.

एक दृश्य.

मेरी कोल्विन नग्न आहे, मित्रासमोर पलंगाशी उभी आहे.

दुसरं दृश्यं इराकमधे एका गावात जमीन खणली जातेय, १० वर्षांपूर्वी पुरलेली प्रेतं उकरून काढली जाताहेत.

तिसरं दृश्य मेरी संभोग करताना दिसत नाही परंतू तसे आवाज ऐकू येतात.

चौथं दृश्य उकरलेले सांगाडे एका शेजारी दुसरा अशा रीतीनं जमिनीवर ठेवलेले आहेत.

पाचवं दृश्य अत्यंत क्षुब्ध मनस्थितीत मेरी सिगरेट शोधतेय.

सहावं दृश्य सांगाडे

सातवं दृश्य क्षुब्ध मेरी धडपड करून बाटली शोधते, उघडते, ग्लासात दारू ओतते, प्यायला सुरवात करते.

इराकमधे फालुजा या गावातल्या या दृश्यांत जणू पूर्ण चित्रपट सामावलेला आहे.

२००१ साली मेरी लंकेत जाते. तिथं तामिळ टायगर्समधे तिचे काँटॅक्टस असतात. टायगरांच्या प्रदेशात मेरी पोचते. तिथं उपाशी आणि मरणासन्न  तामिळ माणसं मेरी पहाते, बातमी लिहिते. बातमीसाठी फिरत असताना समोरून लंकेचे सैनिक गोळीबार करतात. मेरी हात उंचावून ओरडून सांगते की ती पत्रकार आहे, गोळीबार करू नका. पण रणात असे डायलॉग कधी कोणाला ऐकू येतात होय? समोरुन एक हँडग्रेनेड येतो, मेरीच्या बाजूला पडतो आणि फुटतो.

जबरजखमी मेरी. तिला कोलंबोत हलवलं जातं. तिथून अमेरिकेत. बराच काळ इस्पीतळात. मोडलेली हाडं ठीक होतात, जखमा भरून निघतात पण एक डोळा मात्र जातो. डोळ्यावर मोशे दायान, चाचे लोक वापरतात तशी पट्टी लावून मेरी पुढल्या युद्धाच्या बातम्या द्यायला रवाना होते. 

जगभर मेरीची डोळ्यावरची पट्टी प्रसिद्ध होते. कुठंही गेली तरी लोक तिला ओळखतात.

२०१२मधे सीरियातल्या यादवीत मेरी पोचते. बाँब फुटत असतात. तिच्या जीपवर गोळीबार होत असतो. तिच्या मुक्कामाच्या जागेवर तोफेचे गोळे पडतात. लंडन टाईम्ससाठी ती लिहिते. तिला कळतं की होम्स या गावात वीसेक हजार माणसं, बायका, मुलं अडकून पडलीत. असदनं त्या माणसांची कोंडी केलीय, त्यांना अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही, वरून सतत बाँब वर्षाव. 

होम्स या गावातली स्थिती जगाला सांगण्यासाठी मेरी त्या गावात जाते. सभोवताली सूं सूं करून गोळ्या उडत असतात. मेरीला बातमी पाठवायची असते. तिला दिलेला खास टेलेफोन चालत नाही म्हटल्यावर ती तिसऱ्याच फोनवरून बातमी द्यायचं म्हणते. तिचा संपादक म्हणतो की माहित नसलेले फोन वापरू नको, आसदच्या  सैन्याला त्यावरून तुझा ठावठिकाणा कळेल. मेरी ऐकत नाही. बातमी देते. सैन्याला तिचा पत्ता लागतो. बातमी जिथून गेली त्या आधीच उध्वस्थ झालेल्या इमारतीवर  प्रचंड तोफगोळे पडतात. मेरी मरते.

मुख्य पात्र आहे मेरी. ती जीव धोक्यात घालून का हा उद्योग करते असा प्रश्न तिला लोकं विचारतात. ती म्हणते की युद्धात लोकांना काय सोसावं लागतं ते सांगणं हे माझं कर्तव्य आहे.

तिला भीती नाही वाटत?

मेरी म्हणते अजिबात नाही.

मेरीला खरं म्हणजे इतर कोणाही स्त्रीसारखं जगायचं आहे. लग्न करावं, मुलं व्हावीत असं तिला वाटतं. पण ते शक्य होत नाही. मेरीचा एक पाय नेहमी कबरीत.

रक्त, किंकाळ्या, प्रेतं, सांगाडे, स्फोट हे सारं ती इतकं पहाते की तिच्या मेंदूत अव्यवस्था निर्माण होते, तिला झोपत लागत नाही, तिला सतत रक्तबंबाळ तरुणी दिसते, रक्तबंबाळ पाणी मागणारा छोटा मुलगा दिसतो. सैनिकही इतका काळ हिंसा पहात नाहीत. एक लढाई झाली की सैनिकाला आघाडीवरून मागं खेचतात आणि नॉर्मल जीवन जगायला लावतात. तरीही केलेल्या हिंसेमुळं सैनिकाला मेंदू विकार जडतात, दीर्घ काळ किंवा कायम उपचार घ्यावे लागतात.

मेरी एका मागोमाग एक अशी युद्धच पहात हिंडते. तिला उपचार घ्यायलाही वेळ नाही.

सेक्स, दारु आणि सिगरेट यामधे ती दुःखं आणि वेदना विसरायचा प्रयत्न करते. सेक्सचं सेशन संपलं रे संपलं की तिला जखमी  माणसं दिसू लागतात. दारू थोडीशी उतरली रे उतरली की तिला चिंधड्या झालेली निष्पाप माणसं दिसू लागतात.

काय होणार अशा बाईचं? तिच्या वाट्याला तुमच्या आमच्यासारखं सुखी जीवन येईल काय? असा विचार तिच्या सहकाऱ्यांच्या मनात येत असे, प्रेक्षकांच्या मनातही चित्रपट सुरु झाल्या झाल्या उद्भवतो. ती अशीच मरणार हे अटळ असतं. जणू तिला मृत्यूचंच आकर्षण वाटतं. एक डोळा, बरंच रक्त आणि हाडांची मोडतोड होऊन भागत नाही, शेवटी ती मरतेच. 

मेरी कोल्विन या महिलेचं बायोपिक. ही महिला असामान्यच होती. तेव्हां तिचं व्यक्तिमत्व सांगणं हा चित्रपटाचा उद्देश.

बायोपिक, चरित्रपट, करत असताना फार अडचणी असतात. किती किती आणि काय काय दाखवायचं? मेरीचं लहानपण वादळी होतं. आई वडिलांचं न ऐकता तिनं स्वतःचं करियर केलं. तिला पत्रकारी शाळेत हर्सी यांच्यासारखा भारी गुरु भेटला. हे सारं तिच्या घडणीत महत्वाचं होतं, पण ते सारं दाखवायचं तर चित्रपट सहा सात तासाचा होईल! तो भाग अगदी त्रोटक उल्लेखानं गुंडाळण्यात आला. २००१ ते २०१२ या काळातल्या महत्वाच्या घटना घेऊन त्या भोवती चित्रपट रचण्यात आला.

चित्रपट ही एक सत्यकथा आहे. दिक्दर्शक हाईनमन हा माहितीपट करणारा माणूस. त्यानं माहितीपटाची वैशिष्ट्यं वापरली. मेरी कोल्विन ज्या वास्तवात जगली ते वास्तव माहिती पटासारखं त्यानं वापरलं. युद्धातली दृश्यं चित्रपट भर पसरलेली आहेत. ती अत्यंत प्रभावी, पछाडून टाकणारी, डोळे मिटून घ्यावेत असं वाटायला लावणारी आहेत.

खरं म्हणजे अगदी फीचर चित्रपट असला तरी पात्रं आणि तो काळ लोकांना समजणं आवश्यक असतं. नट आर्किटेक्ट असतो, इंजिनियर असतो पण पण त्याचं आर्किटेक्ट-इंजिनियर असणं चित्रपटात दिसायला हवं. दिक्दर्शक हा मुद्दा नीट सांभाळतो. पत्रकारी आणि युद्ध दोन्ही गोष्टी तो आपल्याला समजून सांगतो, दाखवतो.

परंतू मुळात हा चरित्रपट आहे. ती सत्यकथा असली तरी चरित्रपट आहे, एका धाडशी अवलिया पत्रकाराचं चरित्र आहे. त्यामुळं मुख्य पात्राचं व्यक्तिमत्व वगैरे तर यायलाच हवं. मेरी आपलं चरित्र, आपले विचार, आपलं जगणं इत्यादी गोष्टी चित्रपटात कोणाला ना कोणाला तरी सांगतांना दिसते. मैत्रीण, संपादक, मित्र, सहकारी छायाचित्रकार, सैन्यातून पळालेला बंडखोर अशा कोणा ना कोणाशी तरी तो बोलते. पत्रकारी शैली. मुलाखतीतून मजकूर मांडणं. बोलत असताना मेरी अगदी जवळून दिसते, सभोवतालचं वास्तव पुसट होत जातं, फक्त मेरी दिसते, तिच्या चेहऱ्यावरची आणि डोळ्यातली (एकाच!) व्यथा, राग, आग आपल्याला दिसते. युद्ध, हिंसा, रक्तपात इत्यादी गोष्टी विरघळतात कथानकाची नायिका, मुख्य पात्र आपल्याला दिसू लागतं.

माहितीपट आणि चरित्रपट या दोन शैलींचं मिश्रण चित्रपटात आहे.

रोझमंड पाईक या अभिनेत्रीनं मेरी कोल्विनची भूमिका केलीय. प्रेक्षकाला खेचून घेते, खिळवते. या अभिनेत्रीच्या गाठी बऱ्याच गोष्टी आहेत पण खास नोंद म्हणून तिला मिळालेलं ऑस्करचं एक नामांकन आणि डाय अनदर डे या बाँड चित्रपटातलं काम यांचा उल्लेख करता येईल.

।।

A Private War

Dir. Mtthew Heineman

Actor Rosamund Pike

110 minutes

«

Comments are closed.