रविवारचा लेख गुन्हे सिद्ध तरी ट्रंप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत

रविवारचा लेख गुन्हे सिद्ध तरी ट्रंप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत

डोनल्ड ट्रंप २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवार होणार आहेत, त्या प्रचार मोहिमेत ते हिंडत असताना त्याच्यावरच्या दोन निकाल लागले.

सप्टेंबर २३ च्या शेवटल्या आठवड्यात न्यू यॉर्क कोर्टानं अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंपनी आर्थिक फ्रॉड केला असा आरोप सिद्ध करून २५ कोटी डॉलरचा दंड केला. ही केस उभी राहू नये यासाठी ट्रंप यांनी जंग जंग पछाडलं. पण न्यायालयानं चिकाटीन खटला पार पाडला.

आरोप असा. ट्रंप फायद्याचं असेल तेव्हां त्यांच्या मालमत्तेचा आकार आणि किमत फुगवत. मारे लागो, न्यू यॉर्कमधल्या प्रॉपर्टी, किंमत होती त्या पेक्षा ३.५ अब्ज डॉलरनं वाढवून दाखवली. एक प्रॉपर्टी १० हजार चौ.फु. होती, ट्रंपनी ती ३० हजार चौ.फूट दाखवली. वाढीव मालमत्तेमुळं धनवान व्यक्तींच्या यादीत त्यांचा क्रमांक वधारला आणि प्रॉपर्टीच्या वाढीव प्रमाणात ती प्रॉपर्टी गहाण ठेवून कर्ज घेता आलं. नंतर याच प्रॉपर्टींची किमत कमी दाखवली.केली. कमी प्रॉपर्टी असल्यानं आपण कर भरू शकत नाही असं त्यांनी कर खात्याला पटवलं. परिणामी त्यांचा कर कमी झाला. काही काळ त्यांनी कर दिलाच नाही.

हे उद्योग मायकेल कोहेन हे त्यांचे वकील करत असत. ते उद्योग बेकायदेशीर होते. काँग्रेसनं त्यांची चौकशी केली, न्यायालयानं त्यांच्यावर खटला भरला. कोहेन यांनी जबानी देताना ट्रंप यांच्या वतीनं केलेल्या वरील गुन्ह्यांची कबूली दिली. कबूली देताना त्यांनी संबंधित कागदपत्र कोर्टाला सादर केले. तेच कागदपत्र कोर्टानं पुरावा म्हणून वापरले आणि फ्रॉडचा खटला ट्रंप यांच्यावर भरला.

खटला उभा राहिला तेव्हां ट्रंप यांचे वकील कोर्टाला खोटी, असंबद्ध माहिती पुरवत असत. कोर्टानं त्यांना वारंवार सांगितलं की तीच तीच खोटी माहिती कोर्टानं नाकारली असताना पुन्हा पुन्हा तुम्ही मांडत आहात. वेळ काढण्याची ही रणनीती होती. कोर्ट वैतागलं. ट्रंप यांच्या पाचही वकिलांना प्रत्येक ७५०० डॉलरचा दंड केला.

हा खटला दिवाणी स्वरूपाचा होता. दंड आणि न्यू यॉर्कमधे व्यवसाय करायला बंदी अशी शिक्षा कोर्टानं दिली.

जून २०२३.

न्यू यॉर्कमधील न्यायालय.

पत्रकार लेखिका जाँ केरोल यांनी माजी प्रेसिडेंट डोनल्ड ट्रंप यांच्यावर भरलेल्या खटल्याचा निकाल लागला.  

घटना अशी.

जाँ केरोल डिपार्टमेंटल स्टोअरमधून बाहेर पडत असताना ट्रंप तिला भेटले. थांबवून म्हणाले की त्यांना त्यांच्या एका मैत्रिणीसाठी भेटवस्तू खरेदी करायची आहे, मदत कर.

केरोल म्हणाली एकादी हँड बॅग किंवा हॅट भेट द्या.  ट्रंप हसत हसत म्हणाले, नको, लिंगरी भेट देऊया. त्यांनी एक लिंगरी घेतली आणि केरोलला म्हणाले की ही लिंगरी तू घाल म्हणजे मला ती कशी आहे याची कल्पना येईल. केरोल तयार झाली, दोघं चेंजिंग रूममधे गेले. तिथं आत गेल्यावर ट्रंपनी जबरदस्तीनं केरोलचं चुंबन घेतलं आणि लिंगरी खाली खेचून तिच्यावर बलात्कार केला. सुमारे तीन मिनिटात ही घटना घडली.

ट्रंप प्रेसिडेंट व्हायच्या कित्येक वर्षं आधी घडलेल्या या घटनेची वाच्यता केरोलनी २०१९ साली एका पुस्तकात केली. २०१६ साली ट्रंप प्रेसिडेंट झाले होते. 

ट्रंपनी असं काही घडलंच नाही, आपण अशा बाईला कधी भेटलोच नाही, या बाईच्या डोक्यात बिघाड आहे, पैसे उकळण्यासाठी ही बाई आरोप करतेय असं ट्रंप म्हणाले.

केरोलनं ट्रंपवर बदनामीचा आणि बलात्काराचा खटला भरला. खटला भरल्यावर कित्येक स्त्रियांनीही ट्रंपनी आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करून आपल्यालाही या खटल्यात घ्या अशी विनंती केली.

प्रेसिडेंट असल्यानं केरोलना खटला भरणं कठीण झालं. नाना कायदेशीर मुद्दे काढून ट्रंपनी खटला न्यायालयात उभा रहाणार नाही  यासाठी  प्रयत्न केले. त्यांनी एकदा कोर्टात सांगितलं की प्रेसिडेंटवर कधीही कोणताही खटला होऊ शकत नाही, तो प्रेसिडेंटचा विशेषाधिकार आहे.

ट्रंप २०२० साली निवडणूक हरले आणि या खटल्याला गती आली. दोन खटले झाले, एक बलात्काराचा आणि दुसरा बदनामीचा.

बदनामीच्या खटल्यात कोर्टानं ट्रंपना ५० लाख रुपये दंड केला.

  बदनामी सिद्ध करण्यासाठी बलात्कार झाला हे सिद्ध होणं आवश्यक होतं. तो खटला झाला. ज्युरी होते.

ट्रंपच्या वकीलांनी मुद्दा काढला की बलात्कार झाल्याचा पुरावा द्या. बलात्कार या घटनेचे कायद्यातले अर्थ पिंजून काढण्यात आले. पुरुषानं स्त्रीच्या मर्जीविरोधात तिच्या योनीमधे लिंग घालणे याला बलात्कार म्हणतात आणि या घटनेचे रासायनीक पुरावे सादर करावे लागतात.

केरोलनं कोर्टाला सांगितलं की ट्रंपनी त्यांची लिंगरी खाली ओढून त्यांच्या योनीमधे आपली बोटं घातली.

चर्चा झाली. जर लिंग घातले नसेल तर त्याला बलात्कार कसं म्हणायचं. 

कोर्टानं वकील आणि ज्युरींना फैलावर घेतलं. महिलेची प्रतिष्ठा आणि भावना लक्षात घ्या असं सुनावलं. कायद्याच्या भाषेत तो बलात्कार नसला तरी महिलेच्या भावनांकडं लक्ष दिलं तर ती बलात्कार सदृश घटनाच म्हणावी लागते असा निकाल दिला. 

जानेवारी महिन्यात दुसरा खटला होणार आहे. त्यात ट्रंपना २५ कोटी डॉलरची शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे.

२००६ साली डोनल्ड ट्रंप यांचे स्टॉर्मी डॅनियल्स या एका पॉर्न नटीशी लग्नबाह्य संबंध होते. २०१६ मधे डोनल्ड ट्रंप निवडणुकीत उतरले तेव्हां डॅनियल्सनं संबंधांची वाच्यता करू नये यासाठी डॅनियल्सला १.३ लाख डॉलर्स देण्यात आले. हे पैसे निवडणुक फंडातून देण्यात आले, तो एक मोठा गुन्हा आहे. त्यावरचा निर्णय अजून झालेला नाही. पण आपले संबंध होते आणि पैसे दिले गेले हे ट्रंपनी मान्य केलंय.

ट्रंप यांच्यावर एकूण ७८ खटले आणि ९७ आरोप गुदरण्यात आले आहेत. 

प्रेसिडेंटपद गेल्यावर आपल्या घरी परतताना त्यांनी अनेक महत्वाचे आणि गुप्त कागदपत्रं घरी नेले असा एक आरोप आहे. हेरगिरी या कलमाखालचा हा आरोप आहे.

२०२० च्या निवडणुकीत जॉर्जिया या राज्यात पराभव झाल्यावर सरकारी यंत्रणा व इतरांवर खोटी मतं गोळा करून पराभव झाला नाही असं सिद्ध करण्याचा आदेश ट्रंपनी दिला. उघडपणे. या आरोपाचा खटला प्रलंबीत आहे.

२०२० ची निवडणुक आपणच जिंकलो आहोत, जो बायडन यांनी भ्रष्ट मार्गानं स्वतःला निवडून आणलं आहे; सबब त्यांच्या निवडीवर संसदेत होणारं शिक्का मोर्तब उधळून लावा; असा आदेश ट्रंपनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. शस्त्रानं सज्ज कार्यकर्ते १० हजारपेक्षा जास्त संख्येनं कॅपिटॉल इमारतीवर ६ जानेवारी रोजी चालून गेले. तिथं दंगरल झाली. त्यात पोलिस, सुरक्षा अधिकारी मारले गेले. या गुन्ह्याबद्दल अनेकांना शिक्षा झालेल्या आहेत. पण ही घटना घडवून आणणारे या नात्यानं ट्रंप यांच्यावरही खटला भरण्यात आला आहे. पुढल्या वर्षी त्याची सुनावणी होणार आहे.

या सर्व खटल्यांत जर ट्रंप दोषी ठरले तर त्यांना ९०० वर्षांची शिक्षा होऊ शकते. थोडक्यात असं की ते तुरुंगातून कधीच बाहेर येणार नाहीत.

आपल्यावर सूडबुद्धीनं खटले भरण्यात आले आहेत,हे खटले राजकीय आहेत असा प्रचार ट्रंप करत आहे. मी जनतेचा प्रतिनिधी असल्यानं जनतेनंच या खटल्यांचा खर्च सोसावा असं म्हणून ट्रंप पैसे गोळा करत आहेत.

ट्रंप यांची लोकप्रियता कमी होत नाहीये. अनेक पहाण्यांमधे त्यांची लोकप्रियता वाढताना दिसतेय.

।।

Comments are closed.