रविवारचा लेख हवाई टॅक्सी, एक अनावश्यक चंगळ

रविवारचा लेख हवाई टॅक्सी, एक अनावश्यक चंगळ

 दुबाईमधे २०२६ मधे हवाई टॅक्स्या सुरू होणार हे नक्की.

हवाई टॅक्सी म्हणजे तीन माणसांना घेऊन हवेत उडणारी टॅक्सी. दुबाईतल्या हॉटेलच्या गच्चीवरून किंवा बागेत तयार केलेल्या हेलेपॅडवरून ही टॅक्सी हवेत झेपावेल आणि विमानतळावर पोचेल. एक चालक आणि तीन प्रवासी इतकी माणसं या टॅक्सीत बसतील.

 ही टॅक्सी हेलेकॉप्टरसारखीच असेल. म्हणजे तिला विमानासारख्या धावपट्टीची आवश्यकता नसेल, ती सरळ हवेत झेपावेल.  ती पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल, बॅटरीवर चालणारी असेल. एकदा चार्ज केलेली बॅटरी चाळीस मिनिटं चालेल. या विमानाचे उत्पादक म्हणतात की त्याचा  काहीही आवाज होणार नाही.  हे विमान बर्लीनच्या एयर शोमधे दाखवण्यात आलं होतं. तिथं त्या विमानाची सुरक्षितता, तांत्रीक अंगं तपासण्यात आली.

एका ब्राझिलियन कंपनीनं हे विमान तयार केलंय.

 दुबाईतली विमानसेवा कॅप्टन रामदीप ओबेरॉय चालवणार आहेत. 

विमान ही कवीकल्पना १९०3  साली अमेरिकेत वास्तवात उतरली. राईट बंधूंचं विमान हवेत उडालं. तिथून विमान कलेचा प्रवास सुरु झाला. विमानांचे आकार मोठे झाले, दर विमानी प्रवाशांची संख्या वाढत गेली, विमानांचे वेग वाढले, विमानं वातावरण ओलांडून बाहेर गेली. तंत्रज्ञान आणि यांत्रीक बुद्धीमत्तेचा वापर सुरु झाल्यावर चालकाशिवाय विमानं चालू लागली. ड्रोन म्हणजे छोटं विमानंच. ड्रोन आता घरोधरी वस्तूं पोचवू लागले आहेत आणि बाँबही टाकू लागले आहेत. अशा या हवाई वाहनाचा प्रवास आतापर्यंत दूरच्या अंतरापर्यंतच होता.तो आता हवाई टॅक्सीच्या रुपात जवळची अंतरं कापण्यासाठी होणारे.   

 अमेरिकेत कॅलिफोर्नियात टॅक्सी सेवा २०२५ पर्यंत सुरु करायचं चाललंय. तिथं हवाई टॅक्सी वाहतुकीचा अभ्यास झालेला आहे. विमानं कारखान्यात तयारही आहेत. टॅक्स्या चालवणारे म्हणतात की ऊबरच्या रस्त्यावर चालणाऱ्या टॅक्सीपेक्षा ही हवाई टॅक्सी स्वस्त असेल. चालक आणि इतर तीन माणसं अशी या विमानांची क्षमता असेल. 

युरोप आणि अमेरिकेत डझनभर कंपन्या बाजारात आल्या आहेत. त्यात ॲमेझॉन, मर्सिडीझ, जीप, टोयोटा इत्यादी बड्या कंपन्या आहेत. टोयोटा, मर्सीडीझ इत्यादी कंपन्यांना कार तयार करण्याचा अनुभव आहे, गुंतवण्यासाठी त्यांच्याकडं मायंदाळ पैसे आहेत. एयर बस, बोईंग या विमान कंपन्याही हवाई टॅक्स्या तयार करणार आहेत. त्यांच्याकडं तर विमानं तयार करण्याचा दीर्घ अनुभव आहे.

नुकताच बंगळुरूमधे एक एयर शो झाला. त्यामधे चेन्नईच्या आयआयटीशी सहकार्य केलेल्या स्टार्टअपनं एक विमानाचा प्रयोगशाळेत तयार केलेला एक प्रोटोटाईप करून ठेवलेला होता. ते विमान दोन जणांसाठीच होतं. त्याचा वेग ताशी १५० ते २०० किमी होता. सुमारे १५०० फुटापर्यंत ते उडू शकणार होतं. विमान बॅटरीवर चालणारं होतं. बॅटरी एकदा चार्ज केली की २०० किमी विमान चालू शकणार होतं. खर्चाचा विचार करता ऊबर टॅक्सीच्या दुप्पट भाडं होईल असा उत्पादकांचा अंदाज होता.

हवाई विमानांचं उत्पादन किफायतशीर होण्यासाठी ती विकली गेली पाहिजेत. शिवाय विमान उत्पादन खर्चिक असेल. भारतीय विमान कंपन्या परदेशी विमान कंपन्यांशी स्पर्धा करू शकतील? बोईंग, मर्सिडीझ इत्यादी कंपन्या जशी त्यांची विमानं जगभर खपवतील तसं भारतीय कंपन्याना जमेल?

 शहरात सिग्नल असतात. शिवाय गर्दीच्या वेळी वाहतूक खोळंबा असतो. गर्दीच्या काळात कितीही विलंब होऊ शकतो. हवाई टॅक्सीला ना सिग्नल ना गर्दीच्या काळातला वाहतूक खोळंबा. शहरात एकादं अंतर कापायला पन्नास मिनिटं लागत असतील तर हवाई टॅक्सी ते अंतर साताठ मिनिटात पार करेल.

टॅक्सीसाठी एक तळ लागेल, टॅक्सी तळ. शहरात अशा तळाला जागा मिळणं कठीण आहे कारण शहरात आधीच खूप गर्दी झालीय. उत्पादक काहीही म्हणत असले तरी या टॅक्सीचा आवाज होणार. शहरातल्या नागरिकांना हा आवाज मान्य होईल?

अनेक टॅक्स्या असतील. एकाच वेळी अनेक टॅक्स्या विमानतळाच्या दिशेनं झेपावतील. म्हणजे त्यांचं नियंत्रण करणं आलंच. परवानग्या आल्या. सुरक्षेचाही प्रश्न आहे. काही राडा असेल तर पोलिस तो कसा आटोक्यात आणणार? विमान वाहतुकीचाही विचार करावा लागेल. 

हे सर्व प्रश्ण अजून सुटायचे असल्यानं या हवाई टॅक्स्या तयार असूनही वाहतूक सुरु झालेली नाही.

कदाचित दुबाई हा जगातला पहिला देश असेल जिथं पुढल्या दोन वर्षात सुरु होईल. तिथे कोणा नागरिकाची आक्षेप घ्यायची शामत नाही. तिथं सुरक्षा वगैरेचा विचार आणि कायदे करण्यासाठी लोकसभा नाही, की प्रश्न विचारायला स्वतंत्र पेपर नाहीत.दुबाई ज्या राज्याचा भाग आहे त्या अरब अमिरातीच्या अमीरानं निर्णय घेतलाय,  ३५ विमानं खरेदी करून ठेवली आहेत.  

  सारा खटाटोप कशासाठी? विमानतळावर कारनं जायला पन्नास मिनिटं लागतात त्या ऐवजी सात मिनिटात विमानतळावर पोचण्यासाठी. चाळीस मिनीटं वाचावी यासाठी हा खटाटोप. अलीकडं कारमधे बसून दुनियाभरची कामं करता येतात, इंटरनेटमुळं जगाशी थेट संबंध असतो. त्यामुळं समजा कारमधे पन्नास मिनिटं गेली तरी काय हरकत आहे, करावीत की कामं कारमधे. अलीकडं काही कार तर येवढ्या मोठ्या असतात की तिच्यात माणसं व्यायाम करू शकतात, योगासनंही करू शकतात. वापरावा की तो वेळ शरीर आणि मन दुरुस्त करण्यासाठी.

हवाई टॅक्सीच्या नादानं एक गोष्ट मनात येते. हवाई टॅक्सीसारखीच रॉकेट सेवा आता येतेय. म्हणजे वेगवान रॉकेटमधे बसून चंद्रावर जायचं. विमानानं जायचं म्हटलं तर वर्षबिर्ष लागेल. रॉकेटमधून कमी काळात जाता येईल. चंद्रावर किंवा मंगळावर जायचं, तिथं वस्ती करायची. तिथं हवेशीर हॉटेलं वगैरे बांधायची, पर्यटन व्यवसाय सुरु करायचा, चंद्रावरची एक फेरी आणि तीन रात्रींचा मुक्काम रुपये दोन हजार कोटी. इतके पैसे असणारे लोक भारतातही आहेत. तो हिशोब मांडूनच इलॉन मस्कवगैरे लोकं रॉकेटं तयार करत आहेत.

अरे पृथ्वीची वाट लागतेय, तिकडं पहा. चंद्राबिंद्राच्या खटाटोपात जेवढा पैसा खर्ची पडेल त्याच्या शतांश पैशात पृथ्वी चांगली होईल.

शहरं वाढणार नाहीत याची व्यवस्था करा, ती चांगली ठेवा.

सध्या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होतोय, तो तसाच शिल्लक ठेवून आता हवेत वाहतुक खोळंबा करायचा बेत दिसतोय. खाली कारची गर्दी, वर विमानांची गर्दी.

घ्या भडंग.

।।

Comments are closed.