पुस्तक. साम्राज्यांचा उदयास्त

पुस्तक. साम्राज्यांचा उदयास्त

आधुनीक साम्राज्य हा प्रस्तुत पुस्तकाचा मुख्य विषय आहे. साम्राज्यं चालणं, टिकणं, लयाला जाणं यांचा अभ्यास ॲलसडेर रॉबर्ट्स (Alasdair Roberts) यांनी Superstates:  Empires of the 21st Century या पुस्तकात मांडला आहे.

एकेकाळी पर्शियन, रोमन, मोर्य, मिंग, ऑटोमन इत्यादी साम्राज्यं होती. ती मोडली आणि देश निर्माण झाले. लेखकाचं म्हणणं आहे की सध्याचे देश (अमेरिका, भारत, चीन) आणि युरोपीय समुदाय ही सुद्धा साम्राज्यांचं रूप घेतील. लेखक त्यांना महाराज्यं, सूपरस्टेट असं म्हणतो.

पूर्वीची साम्राज्यं आणि ही महाराज्यं यांची तुलना लेखक प्रस्तुत पुस्तकात लेखक करतो. जे साम्राज्यांचं झालं तेच महाराज्यांचंही होण्याची शक्यता लेखक वर्तवतो.

ख्रिस्त जन्माच्या आधी पाचशे वर्षं प्लेटो नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला. त्यानं रिपब्लिक नावाचं पुस्तक लिहिलं.  आदर्श राज्याची लोकसंख्या ५०४० असावी; राज्य येवढं मर्यादित ठेवलं तर  युद्द, शांतता, विविध राज्यव्यवहार सांभाळणं शक्य होईल असं त्याचं मत होतं.

प्लेटोचा जन्म झाला तेव्हां पर्शियन साम्राज्य आकाराला येत होतं. 

प्लेटोचा मृत्यू झाला त्यानंतर २७ वर्षांनी भारतात मौर्य  साम्राज्य सुरु झालं.

पर्शियन साम्राज्याची लोकसंख्या होती १.७ ते ३.५ कोटी. मौर्य साम्राज्याची लोकसंख्या होती ५ ते ७ कोटी. प्लेटोच्या हिशोबात अशी साम्राज्यं चालणं कठीण आणि अयोग्य होतं.

 पर्शियन साम्राज्य २२० वर्षं टिकलं आणि मौर्य साम्राज्य १३६ वर्षं टिकलं.

पर्शियन साम्राज्याचा पाडाव अलेक्झांडरनं केला. पर्शियन साम्राज्याचे लचके स्वतंत्रपणे मौर्य सम्राटानंही तोडले होते.

चंद्रगुप्त आणि नंतरचे मौर्य राजे वेगानं राज्य पसरवत राहिले. राज्य मोठं झालं. जागोजागी सुभेदार नेमण्यात आले. राजधानी पाटलीपुत्रातून राज्य चाले. अशोकानंतर सुभेदार फुटू लागले, आपापला सुभा उपभोगू लागले, राज्य अवजड झालं, राजधानीला ते सांभाळता येईनासं झालं. राज्य सांभाळण्याची कुवत असणारे राजे निर्माण झाले नाहीत. राज्य लयाला गेलं. मौर्य साम्राज्यात जेवढा भारत होता त्यात आताच्या देशात काही राज्यांची भर पडली खरी तरी पण आजचा भारत  ८५ टक्के तरी   मौर्य साम्राज्यच आहे.

 २०५० साली जगाची लोकसंख्या ९७० कोटी असेल. त्यात भारत  १७० कोटी, चीन १४० कोटी,अमेरिका ४५.८ कोटी आणि युरोप ४२ कोटी अशी लोकसंख्या असेल. उरलेली लोकसंख्या उरलेल्या १६० देशांत विभागलेली असेल.

लेखक म्हणतो की  चीन, भारत, अमेरिका आणि उत्तर युरोप अशी चार महाराज्यं असतील. उत्तर युरोपात अनेक घटक देश आहेत; चीन भारत आणि अमेरिका हे स्वतंत्र देश असले तरी त्यांची लोकसंख्या आणि ताकद पहाता ती साम्राज्यंच, महाराज्यं आहेत. अमेरिकेची लोकसंख्या भारताच्या मानानं कमी असली तरी अमेरिकेचा आकार, अमेरिकेचा प्रभाव आणि विविधता लक्षात घेता अमेरिकाही एक महाराज्य असेल.

साम्राज्यांची मोडतोड होणं, ती विस्तारणं आणि आक्रसणं, ती लयाला जाणं याची कारण कमी अधिक प्रमाणावर सर्व साम्राज्यात समान आहेत. साम्राज्यात अनेक संस्कृतींचे समाजगट होते, त्या त्या समाजगटांच्या महत्वाकांक्षा होत्या. त्या प्रभावी ठरल्या, बंडाळ्या झाल्या.

साम्राज्य चालवण्यासाठी सुभेदार नेमावे लागत, कारभार विकेंद्रीत करावा लागत असे. स्थानिक सुभेदार स्वतंत्र होत, ते बंड करत, उठाव करत.

शेजारचे देश, साम्राज्यं स्वतःचा विस्तार करण्यासाठी बाहेरून साम्राज्यावर हल्ले करत. त्यामुळं साम्राज्याचे लचके तुटत, साम्राज्य मोडकळीस येई, कधी कधी ते दुसऱ्या साम्राज्याचा भाग बने.

लेखकाचं म्हणणं आहे की साम्राज्याच्या मोडतोडीचं अंतर्गत कारणांना वेगळ्या स्वरूपात महाराज्यांनाही तोंड द्यावं लागेल. प्रजेत असंतोष होईल, प्रजेतले घटक सरकारला-स्टेटला आव्हान देतील, फुटूनही निघतील.

महाराज्यांवरचं एक संभाव्य संकट पर्यावरणाचं असेल. २०५० च्या आसपास पर्यावरणाचं संकट अतीगंभीर होईल असं लेखक म्हणतो. तपमान तीनेक अंशानं वाढल्यावर हाहाकार होण्याची शक्यता अनेक अभ्यासकांनी वर्तवलीय, तसं सांगणारी पुस्तकंही दुकानांत दाखल झालीत. फार माणसं मरतील, असंतोष कमालीचा वाढेल. खूप म्हणजे खूपच माणसं स्थलांतर करतील, सुरक्षितता दिसते अशा देशात जातील. हे देशांच्या सीमांवरचं आधुनिक आक्रमण असेल.

अंतर्गत असंतोष, बंडाळी हेही एक मोठं संकट महाराज्यांना सोसावं लागेल. ज्या देशात लोकशाही आहे तिथले समाजगट आपपापलं स्वातंत्र्य जपण्याच्या प्रयत्नात केंद्रीय सत्तेला आव्हान देतील. ज्या देशात लोकशाही नाही तिथं जनतेतल्या असंतोषाला वाट करून देण्याची लोकशाहीची वाट नसल्यानं तिथला असंतोष हिंसा-कटकारस्थानं या वाटांनी केंद्रीय सत्तेला आव्हान देईल.देशीवाद, धर्मवाद डोकं वर काढतोय. अतिरेकी ख्रिस्ती, मुस्लीम आणि हिंदू विचारधारा डोकं वर काढत आहेत.या विचारधारा समाजव्यवस्था, सूपरस्टेट खिळखिळी करतील.

अशा संकटांचा सामना महाराज्यं कसा करणार आहेत?

लेखकाचं सांगणं आहे की आधुनिक सूपर राज्यांनी आपली राज्यंही ठिसूळ आहेत हे लक्षात ठेवायला हवं. भले आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे परिस्थिती पटकन लक्षात येईल, भले आधुनिक तंत्राचा वापर करून जनतेशी त्वरीत संवाद आणि संपर्क साधणं शक्य होईल. पण सरकारांनी हेही लक्षात ठेवायला हवं की तंत्रज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे. विरोधी, फुटीर,असंतुष्ट घटकही तंत्रज्ञानाचा वापर करून सरकार विरोधी शक्ती अधिक बळकट करू शकतील.

तेव्हां सरकारांनी सुशेगात राहू नये असा लेखकाचा सल्ला आहे. लेखक सांगतो की राज्य करणाऱ्यांनी सावध व्हावं. आपलं राज्य प्राचीन आहे, त्याला काहीही होणार नाही असा भ्रम बाळगू नये. सैन्य,पोलिस, वित्तसंस्था आणि माध्यमं हाताशी असल्यावर चिंता करायचं कारण नाही असं समजू नये. केंद्रामधे (राजधानी, केंद्र सरकार इत्यादी) सत्ता केंद्रीत करून राज्याची गठडी वळण्याचा प्रयत्न करू नये, तसं केलं तर राजधानीपलीकडच्या जनतेतला असंतोष हाताबाहेर जाईल. राजधानीच्या पलिकडं असणाऱ्या समाजाला (उदा.सुभेदार) सत्ता दिली की काम भागलं असंही विचार करणं धोक्याचं आहे. कारण केव्हां सुभेदार राजधानीत धडकेल ते सांगता येत नसतं.

लेखक म्हणतो की लवचीक रहा. पोथी, मंत्र याना चिकटलात तर संपाल. राजधानीच्या पलिकडं असणाऱ्या जनतेशी जिवंत संपर्क ठेवा, त्यांच्याशी संवाद ठेवा, त्यांचं म्हणणं ऐका. पारदर्शक रहा. पारदर्शकता संपली की संशय सुरु होतो. संशय सुरु झाला की निष्ठा नाहिशा होतात. 

मी आणि माझा पक्ष प्रथम अशी एक विचारधारा सत्ताधारी ( म्हणजे सरकार, राज्यकर्ता वर्ग) सुरु करतात. देशात मी प्रथम आणि जगात माझा देश प्रथम. अमेरिका फर्स्ट, ट्रंप फर्स्ट. चीन फर्स्ट, सी जिनपिंग फर्स्ट. यातून एक फाजील आत्मविश्वास तयार होत असतो, जो शेवटी घातक ठरू शकतो.

झारनं साम्राज्य उभारलं. यथावकाश अनेक देश त्या साम्राज्यातून बाहेर पडले. कम्युनिष्ट क्रांतीनं एक कम्युनिष्ट साम्राज्य उभारलं. १९९० नंतर त्या साम्राज्यातले देश फुटून बाहेर पडले. २००० सालापासून पुतीननी चेचन्या, जॉर्जिया, क्रायमिया हे फुटलेले देश पुन्हा रशियन साम्राज्यात आणले असून आता बेलारूस आणि युक्रेनला रशियात घ्यायचा पुतीनचा विचार आहे.

लेखक ॲम्हर्स्ट या गावात मॅसॅच्युसेट विश्वशाळेत सार्वजनिक धोरण (public policy) हा विषय शिकवतात.

।।

Superstates: Empires of the 21st Century 

by Alasdair Roberts.

२३५ पानं.

प्रकाशक Polity.

||

Comments are closed.